scorecardresearch

Premium

शहरातली ‘गटारी’ नाही, ग्रामसंस्कृतीतली ‘आकाडी’

गणपती, दसरा, दिवाळीचा थाट वर्षागणिक वाढत असताना गावरहाटीशष, कृषकसंस्कृतीशी नाते सांगणारे अनेक सण, प्रथा-परंपरा मागे पडू लागल्या आहेत. आजच्या गटारीचे मूळ रूप असलेली आखाडी आणि तशाच अन्य प्रथांविषयी…

gatari special
आषाढ मासातील बेंदूर सण आणि पौर्णिमा झाल्यानंतर जिभेचे चोचले पुरविणाऱ्या श्रावणपूर्व आकाडी (आखाडी) जत्रांना सर्वत्र प्रारंभ होतो. (फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

श्रीकांत जाधव
आषाढ मासातील बेंदूर सण आणि पौर्णिमा झाल्यानंतर जिभेचे चोचले पुरविणाऱ्या श्रावणपूर्व आकाडी (आखाडी) जत्रांना सर्वत्र प्रारंभ होतो. गटारीचे हे मूळ रूप. घरगुती आणि गल्लीतील सार्वजनिक असे जत्रांचे दोन प्रकार असतात. घरगुती आकाडीसाठी काळ्या रंगाची कोंबडी किंवा कोंबडा तर गल्लीतील सार्वजनिक आकाडीसाठी बकऱ्याचा (बोकड) बळी देऊन देवतांना देणं दिले जाते. त्याचा नैवेद्य बनवून दैवतांना दाखवला जातो.

घराघरांतील माणसांना, शेतात कष्ट करणाऱ्या माणसांना सुख शांती लाभावी, वाईट प्रवृत्तींच्या प्रभावापासून व भूत पिशांच्च्यांकडून बाधा होऊ नये, कोणालाही त्रास होऊ नये, उग्रदेवता आणि भूतेखेते तृप्त व शांत राहावीत यासाठीची ही प्रथा पाळली जात असे. हल्ली मात्र यातील अंधश्रद्धा भावना मागे ही प्रथा म्हणजे सामिष भोजनावर (रस्स्यावर) ताव मारण्यासाठीचे एक निमित्त झाले आहे! पूर्वी शेजारीपाजारी, मित्रमंडळी, स्नेही निमंत्रणावरून एकमेकांकडे जाऊन अशा सामिष भोजनाचा आस्वाद घेत असत, खरे तर तो एक स्नेह मेळावाच असे. आता ही प्रथा बंद पडून आकाडी घरगुती स्वरूपातच साजरी केली जाऊ लागली आहे. शेतातील कामे उरकलेली असतात. हिरवेगार शिवार वाऱ्याच्या मंद झुळुकेबरोबर डोलू लागलेले असते, मन आनंदी असते! पावसामुळे बळीराजा, कष्टकरी कामकरी जरा उसंतीतच असतात. म्हणूनच आकाडी जत्रा दणक्यात साजरी केली जाते. आकाडी म्हणजे म्हणजे खवय्येगिरी चैन, विरंगुळा आणि श्रमपरिहार असेच काहीसे स्वरूप असते! खवय्येगिरी म्हणून का होईना ही प्रथा परंपरा आणि त्याची मजा आजही टिकून आहे. सण-वार आणि ग्रामीण संस्कृतीचे घट्ट नाते आहे. हिंदू संस्कृतीतील सर्वच सण खेड्यापाड्यात अत्यंत उत्साहाने साजरे केले जातात. सणाची चाहूल लागताच सर्वत्र आनंद व चैतन्य संचारते. ढवळ्या पवळ्यांच्या कौतुकाने बेंदूर सण साजरा करताना बळीराजाचा उत्साह अगदी शिगेला पोहोचलेला असतो.

Sakat Chauth Sankashti Chaturthi 100 Years Later Two Extreme Rare Yog Trigahi These Three Rashi To Earn Huge Money Ganpati Blessing
Sakat Chauth: १०० वर्षांनी संकष्टी चतुर्थीला दोन दुर्मिळ योग बनल्याने ‘या’ तीन राशींचे आयुष्य होईल मोदकासारखे गोड
health benefits of cinnamon effects of cinnamon in diseases role of cinnamon in human health
दालचिनी कोणकोणत्या आजारांना दूर ठेवते हे माहितेय का?
Ram Lalla Idol Selection History in Marathi
Ayodhya Ram Mandir अयोद्धेतील राममंदिर: रामरायाच्या ‘त्या’ दोन मूर्तींचे काय होणार?
Ram Mandir
Ram Janmbhoomi Mandir : १००० वर्षे श्रीरामजन्मभूमी मंदिर टिकून राहणार, L&T चा दावा

आणखी वाचा-कलंक, कोंबडीचोर, घरकोंबडा, निपुत्रिक, महारोगी… राजकारण कधी सभ्य होतं ?

ग्रामीण भागात ‘बेंदूर सणांचे लेंडुर’ अशी म्हण प्रचलित आहे. हाच बेंदूर सण सणांचे लेंडूर (सणांची मालिका) घेऊन येतो. आभाळाच्या झालेल्या मायेने म्हणजे वरूण राजाच्या कृपेने शेतकरी राजा बळीराजा खुशीत असतो. ‘दोन मजली रंगीत माडी, दारी बांधली बैलांची जोडी!’ हे ग्रामीण भागातील चित्र आताशा दुर्मीळ झाले असले आणि शेतीचे यांत्रिकीकरण झाले असले तरी बळीराजाचे सर्जा- राजा, ढवळ्या- पवळ्यावरचे प्रेम तसूभरही कमी झालेले नाही! सणाच्या पूर्वसंध्येला खांद मळणी, बैलांना पोषणासाठीचा खास आहार दुसऱ्या दिवशी त्यांना गाव पाणवठयावर मुक्त स्नान, त्यांना सजवणे नंतर वाद्यांच्या गजरात दिमाखात मिरवणूक, ग्रामप्रदक्षिणा, ग्राम दैवतांचे दर्शन, घरी गृहलक्ष्मीकडून पूजा, साजूक तुपातील पुरणपोळीचा नैवेद्य! गोठ्यातील समृद्ध पशुधन आणि घरातील दुधाची समृद्धी हीच बळीराजाची दौलत! बळीराजा आजही त्याच्या पशुधनावर जीवापाड प्रेम करतो. सणांचा सांस्कृतिक ठेवा खऱ्या अर्थाने ग्रामीण जनतेनेच जतन केला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

बेंदूर सणानंतर येणारा आणि महिला व मुलींना विशेष आनंद देणारा सण म्हणजे नागपंचमी! खेड्यापाड्यात गल्लोगल्ली महिला मुलींची फेर धरून गायली जाणारी माहेरच्या, सासरच्या सुखाची महती सांगणारी गाणी आज-काल दुर्मिळ झाली आहेत. हादग्याची गाणी, झिम्मा फुगडीचा रात्री उशिरापर्यंत होणारा ‘झपूर्झा’ आता दुर्मिळ झाला आहे.

आणखी वाचा-गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके – गर्भपात करण्याचा नवा व्यवसाय ?

धान्याची मळणी करण्यासाठी लागणारे खळे आता कालबाह्य (नाहीसेच) झाले आहे. पूर्वी पैऱ्यामध्ये शेती केली जायची पैरा म्हणजे ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ!’ अशीच काहीशी सहकार्याची भावना असे. सामुदायिकरित्या शेती कसण्याचा हा प्रकार असल्यामुळे शेतकामाच्या निपटाऱ्याचा ताण वाटत नसे. पैऱ्याच्या शेतीमध्ये खुशीखातर श्रमपरिहार म्हणून सामिष भोजनाचा बेत असायचा. अशा भोजनाला इर्जीक म्हणायचे! बलुतेदारी मोडीत निघाली, इर्जीक पद्धत बंद झाली सामाजिक एकोपा नाहीसा झाला! खळे, तिवडा, इर्जीक कालबाह्य झालेच तसेच मोटेवरची गाणी दुर्मिळ झाली आणि त्याबरोबरच ढवळ्या पवळ्याचे कौतुकही दुर्मिळ झाले. भल्या पहाटे गाव जागवत येणारी वासुदेवाची स्वारी दुर्मिळ झाली. घराघरांतून ऐकू येणाऱ्या जात्यावरच्या ओव्या, गाणी दुर्मिळ झाली.

गावोगावच्या ग्रामदेवतांच्या यात्रा म्हणजे गावकऱ्यांसाठी पर्वणीच! यात्रोत्सव अत्यंत उत्साहात साजरे केले जातात. चैत्र शुद्ध प्रतिपदेला येणाऱ्या गुढीपाडव्यानंतर तर यात्रांचा हंगाम चांगलाच बहरतो, जोर धरू लागतो. दूरवर शहरात राहणारी मंडळीसुद्धा आपल्या ग्रामदैवताच्या यात्रेसाठी आवर्जून आणि हौसेने येतात. लेकीबाळी, माहेरवाशिणीसुद्धा आवर्जून हजेरी लावतात. पै पाहुण्यांना यात्रेची निमंत्रणे जातात. ‘देवाचं चांगभलं’चा जयघोष करत रात्री निघणारा छबिना हे यात्रेचे विशेष आकर्षण असते. देवाच्या पालखीची मिरवणूक, ग्रामप्रदक्षिणा, चांगभलंच्या गजरात रात्र जागवली जाते. गावात सुख-शांती नांदण्यासाठी ग्रामदैवताला मनोभावे साकडे घातले जाते. यानिमित्ताने यात्रेकरूंच्या मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशा मंडळेही सेवा करतात. खेळणी, वस्तूंची, मेवा मिठाईच्या दुकानांची अगदी रेलचेल असते. कुस्तीच्या फडाचेही आयोजन केले जाते. त्यामुळे कुस्तीशौकिनही खुशीत असतात. भर व खेळणे असे यात्रेचे दोन दिवस असतात. पहिल्या दिवशी पुरणपोळी सारख्या मिष्टान्नाचा थाट असतो, तर दुसऱ्या दिवशी सामिष भोजनाचा खासा बेत असतो. बैठकीत, ओट्यावर, मंदिरांच्या, पाराच्या कट्ट्यावर गप्पांचे फड रंगतात! एकमेकांचे क्षेमकुशल, गाठीभेटी किंबहुना पोरापोरींच्या लग्नगाठींचे बेतही पक्के होतात! विशेष आनंद व विरंगुळा देणारा यात्रोत्सव हा ग्रामीण संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे!

आणखी वाचा-राज्ययंत्रणेच्या दुटप्पीपणाची ‘कावड’ कुणाच्या खांद्यावर?

इतर सर्व सण पारंपरिक पद्धतीने अत्यंत उत्साहात साजरे केले जातात. गुढीपाडवा, गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, मकरसंक्रांत या सणांची गोडी ग्रामीण भागात काही औरच असते! विज्ञानाच्या प्रगतीमुळे माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊन जीवन काहीसे सुखमय झाले असले तरी ग्रामीण संस्कृती लोप पावत असल्याची खंत आज वाटते!

jadhavshrikantm@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: About akhadi and other similar practices which are the original form of todays gutari celebration mrj

First published on: 15-07-2023 at 08:41 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×