scorecardresearch

या जगात श्रद्धाचा आफताब एकमेव नाही हे दुर्देव…

संयुक्त राष्ट्रांतर्फे २५ नोव्हेंबर हा ‘स्त्रियांवरील हिंसा विरोधी दिवस’ म्हणून साजरा होतो. त्यानिमित्त आलेला ताजा अहवाल, स्त्रिया तसेच मुलींच्या जोडीदाराकडून आणि कुटुंबियांकडून होणाऱ्या हत्यांचे वास्तव उघड करणारा आहे…

या जगात श्रद्धाचा आफताब एकमेव नाही हे दुर्देव…
या जगात श्रद्धाचा आफताब एकमेव नाही हे दुर्देव…

वैशाली चिटणीस

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण सध्या देशभर चर्चेचा विषय आहे. आपल्या प्रेमाच्या व्यक्तीला थंड डोक्याने ठार करून, तिचे ३५ तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवून त्यांची नंतर महिनाभर शांतपणे विल्हेवाट लावणे ही क्रौर्याची परिसीमा आहे. त्यामुळे हे विशिष्ट प्रकरण दुर्मिळातले दुर्मिळ असले तरी कुणीतरी कुणावर तरी प्रेम केले, त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्यानेच गळा घोटला ही गोष्ट एकमेवाद्वितीय मात्र नाही. प्रेमप्रकरणातून झालेल्या भांडणातून जोडीदाराने स्त्रियांना मारहाण केल्याची तसेच त्यांची हत्या केल्याची अनेक उदाहरणे असतात. अनेकदा तशा बातम्या माध्यमांमधून येतात. त्याबरोबरच इतर कौटुंबिक कारणांमुळे स्त्रियांना पतीने किंवा कुटुंबातील इतर सदस्यांनी मारहाण केल्याची उदाहरणेही असतात.

यापैकी सगळ्याच प्रकरणांची पौलीस दप्तरी नोंद होत नाही. कारण अनेक जणी भीतीपोटी किंवा इतर कारणांमुळे तक्रार नोंदवण्यासाठी पुढेच येत नाहीत. त्या तशा जर पुढे आल्या तर काय होऊ शकते, हे सांगणारे उत्तम उदाहरण म्हणजे ‘यूएनडीओसी’ म्हणजेच युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्ज ॲण्ड क्राइम या संघटनेचा लिंगाधारित कारणांसाठी स्त्रिया तसेच मुलींच्या हत्या (जेंडर रिलेटेड किलिंग्ज ऑफ विमेन/गर्ल्स (फेमिसाइड- फेमिनिसाईड)) हा अगदी ताजा अहवाल. २०२१ या वर्षामधल्या स्त्रियांशी संबंधित जगभरातील गुन्ह्यांची आकडेवारी घेऊन हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

‘प्रतिसाद सुधारण्यासाठी माहितीत सुधारणा’ (इम्प्रूव्हिंग डेटा टू इम्प्रूव्ह रिस्पॉन्सेस) असे या अहवालाच्या मुखपृष्ठावरच म्हटले आहे. एखाद्या प्रश्नाशी संबंधित माहिती हातात असेल, तर त्यावरचे उपाय शोधता येतात. धोरणे आखता येतात आणि त्यांची अंमलबजावणी करता येते. उदाहरणार्थ मुलींच्या शाळागळतीचे प्रमाण किती आहे, हे लक्षात आले की त्यामागची कारणे कळतात. त्यावर उपाययोजना करता येते. पण स्त्रियांसंदर्भातील लैंगिक गुन्ह्यांची खरी आकडेवारीच उपलब्ध नाही, असे हा अहवालदेखील सांगतो. देखील हा शब्द वापरण्याचे कारण म्हणजे आपल्यावरील अत्याचाराची तक्रार नोंदवण्याचे धाडस अनेक स्त्रियांकडे नसते. अनेकींना मुळात शारीरिक- मानसिक- लैंगिक छळ होणे हा गुन्हा आहे, हेच माहीत नसते. हे सगळे माहीत असलेली श्रद्धा पालकर सारखी सुशिक्षित तरुणी पोलिसांकडे जाते, ‘आपला जोडीदार आपला खून करेल आणि आपले तुकडे करून फेकून देईल,’ अशी धमकी त्याने दिल्याची लेखी तक्रार नोंदवते आणि नंतर ती तक्रार मागेही घेते. यामुळे या प्रकरणातही गुन्हा नोंदवला गेलाच नाही. जे आपल्याकडे होते, तेच इतर राज्यांमध्ये, इतर देशांमध्येही घडते आहे. अशा जागतिक परिस्थितीची दाहक जाणीव या ताज्या अहवालाच्या निष्कर्षांमधून होते. थोडक्यात सांगायचे तर आपल्यावरील गुन्ह्याची वाच्यता करण्यासाठी स्त्रिया पुढे आल्या तर परिस्थितीत फरक पडू शकतो, हे या अहवालाचे सांगणे आहे.

अहवालातील प्रमुख निष्कर्ष

• २०२१ मध्ये जागतिक पातळीवर, अंदाजे ८१,१०० महिला आणि मुलींची जाणीवपूर्वक हत्या केली गेली. गेल्या दशकभरात स्त्री हत्यांचे हे प्रमाण कायम राहिले आहे.

• स्त्रिया आणि मुलींच्या बहुतेक हत्या त्यांच्या स्त्री असण्यामुळेच होतात. २०२१ मध्ये, जगभरातील सुमारे ४५ हजार महिला आणि मुली त्यांच्या जोडीदार किंवा कुटुंबातील इतर सदस्यांकडून मारल्या गेल्या. याचा अर्थ दर तासाला सरासरी पाचहून अधिक महिला किंवा मुली त्यांच्याच कुटुंबातील कोणाकडून तरी मारल्या जातात.

• जगभरात पुरुष आणि मुलांच्या हत्या होण्याचे प्रमाण जास्त (८१ टक्के) आहे. पण वैयक्तिक आयुष्यामुळे, घरातल्या वादांमुळे हिंसाचाराला बळी पडण्याचे महिला आणि मुलींचे प्रमाण जास्त आहे. जगभरातील सर्व महिला हत्यांपैकी ५६ टक्के हत्या या जोडीदार किंवा कुटुंबातील इतर सदस्यांकडून कौटुंबिक- वैयक्तिक कारणांमुळे होतात. एकूण पुरुष हत्यांपैकी केवळ ११ टक्के हत्या कौटुंबिक- वैयक्तिक कारणांमुळे होतात.

• महिला आणि मुलींच्या लिंगाधारित कारणांमुळे होणाऱ्या हत्यांची जागतिक पातळीवरील आकडेवारी मिळवणे आव्हानाचे ठरते. उपलब्ध माहितीतही तफावत असते. २०२१ मधील साधारणपणे ८१,१०० महिलांची लैंगिक कारणांमुळे हत्या झाली असा अंदाज आहे. त्यातील दहापैकी चार घटनांच्या बाबतीतत अशा परिस्थिती आहे की त्या लिंगाधारित कारणांमुळे झालेल्या हत्या आहेत, हे सिद्ध करण्यासाठी संबंधित माहिती उपलब्ध नाही. अशा हत्यांचे तपशील, माहिती मिळणे कठीण असल्याने त्या होऊ नयेत यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय करणेही शक्य होत नाही.

• २०१० आणि २०२१ दरम्यान, युरोपमध्ये जोडीदाराकडून स्त्रियांची हत्या होण्याच्या प्रमाणात सरासरी घट (१९ टक्क्यांपर्यंत) झाली आहे. याच्या उलट अमेरिकेत याच कालावधीत या बाबतीत सरासरी वाढ (सहा टक्के) नोंदवली गेली आहे. आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलियासह इतर देशांची (ओशनिया) माहिती उपलब्ध नाही. याचाच अर्थ तेथील कल काय आहे, याचा अंदाज लावणे शक्य नाही.

• उत्तर अमेरिकेत आणि थोड्याफार प्रमाणात पश्चिम आणि दक्षिण युरोपमध्ये, २०२० हे वर्ष महिला आणि मुलींच्या लैंगिक-संबंधित हत्यांसाठी विशेषतः घातक होते… हा कोविड महासाथीच्या काळातील टाळेबंदीचा परिणाम असू शकतो.

• युरोप आणि अमेरिकेतील वेगवेगळ्या २५ देशांमधील कोविड महासाथीच्या सुरुवातीच्या काळातील कल पाहता स्त्रियांच्या हत्यांमध्ये वाढ झाल्याचेच दिसते. पण या हत्या प्रमुख्याने जोडीदारापेक्षाही कुटुंबातील इतर सदस्यांकडून झाल्या आहेत. २०१५ पासूनची आकडेवारी पाहता कोविड काळात कुटुंबातील सदस्यांकडून हत्या होण्याचे प्रमाण जास्त आहे.

एकुणात जोडीदाराकडून तसेच कुटुंबातील सदस्यांकडून स्त्रियांची हत्या होण्याचे प्रमाण आशिया आणि आफ्रिका खंडांमध्ये जास्त आहे, हे हा अहवाल नोंदवतो आणि माहिती- पुरावे गोळा उभे करण्याची गरजही व्यक्त करतो. स्त्रियांचे संरक्षण करण्यासाठी त्यानुसार धोरणे आखायला हवीत. कायदे, विशेष न्यायालये असायला हवीत, नागरी संस्था तसेच स्त्रियांसाठी काम करणाऱ्या संघटना आणखी भक्कम व्हायला हव्यात. त्याबरोबरच नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य देणे, स्त्रियांचे सक्षमीकरण, गरिबी हटवणे, सुविधा पुरवणे इत्यादी उपायही अहवालात सुचवण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व विशेष लेख ( Features ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या