ज्योत्स्ना पाटील
पहलगाममधील हल्ला जेवढा नृशंस, तेवढाच अनेक प्रश्न उपस्थित करणारा ठरला. ज्यांनी काश्मीरचे वातावरण अनुभवले आहे आणि ज्यांच्यात सरकारच्या कारभाराविषयीही काही किमान पातळीवर जागरुकता आहे, अशा बहुतेकांच्या मनात अनेक प्रश्नांची साखळी तयार झाली असेल…सामान्यपणे कधीही काश्मीरला गेल्यावर पर्यटनस्थळी पावलापावलावर हमखास भारतील लष्कराचे सैनिक तैनात दिसतात. मग यावेळी असे काय झाले की, बैसारनमध्ये एकही सैनिक, पोलीस किंवा खासगी सुरक्षारक्षकही उपस्थित नव्हता? प्रत्येक ठिकाणी सैनिकांचा असणारा वेढा ‘मिनी स्वित्झर्लंड’ला का नव्हता? काश्मीर हा सर्वांत संवेदनशील प्रदेश आहे. असे असताना सुरक्षा व्यवस्थेत अशी हलगर्जीपणा का झाली? भारत-पाकिस्तानच्या सीमेपासून पहलगामपर्यंतचे अंतर पार करून आलेले दहशतवादी सैनिकांच्या एकाही तुकडीला दिसले नाहीत? हल्ला झाला, देशातील प्रत्येक नागरिक व्यथित झाला. देशातील अठ्ठावीस निष्पाप बांधवांशी व त्यांच्या कुटुंबियांशी भावनेच्या धाग्याने जोडला गेला. देशाचे पंतप्रधानही परदेश दौरा अर्ध्यावर सोडून परत आले, पण ते काश्मीरला न जाता बिहारला का गेले? प्रचार करणे एवढे महत्त्वाचे होते? देशाच्या बिकट परिस्थितीत सर्वपक्षीय बैठकीला काहीच अर्थ नसतो का? सर्वपक्षीय बैठक म्हणजे रिकामटेकड्या लोकांचा रिकामटेकडा उद्योग असतो का? राजनाथसिंह संरक्षणमंत्री पदावर असले, तरीही त्यांचे त्या पदावरील अस्तित्त्व फारसे जाणवतच नाही. सामान्य जनतेला नेहमी अमित शहाच बोलताना दिसतात. त्यामुळे असेल कदाचित! अलीकडे कोणी दहशतवादाविषयी काही वक्तव्य केले की ती व्यक्ती देशभक्त असल्याचे सिद्ध झाले असे मानले जाते. त्यात आणखी दहशतवादासाठी काँग्रेसला जबाबदार धरले, की झालेच, त्याला एखादे चांगले पद देऊन गौरविणे हे कर्तव्यच ठरते.
आता सर्वच चॅनेलवाले बरळतील, ‘सरकारने, सुरक्षेत चूक झाली असे सांगितले.’ आता हे कुणी सांगितले तर किरण रिजिजू या महोदयांनी अर्थात ते खापरही टूर कंपन्यांच्या माथी फोडण्यात आले. आता या चॅनेलवाल्यांचा एवढ्या वर्षांचा अभ्यास असूनही साधे एवढे कळू नये की, हे किरण रिजिजू यांचे वैयक्तिक मत आहे. त्यात सरकारचा काय संबंध…? पण चॅनेलवाल्यांना तसेही सध्या काही काम नाही. पहलगामची तिच तिच दृश्ये किती वेळा दाखवणार, म्हणून त्यांनी रिजिजू महाशयांना पकडले, त्यात त्यांचा काय दोष! बिहार प्रचारातून सवड मिळाली तर या विषयावर पंतप्रधान बोलतीलच, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरजच नाही. खरे आहे ना! मोदींनी एक चांगले केले, पाकिस्तानशी केलेला सिंधूनदी जल करार तोडला. आता पाण्याशिवाय तडफडून मरेल पाकिस्तान, नाही का? पण तरी आमच्यासारख्या नागरिकांना एक प्रश्न पडला की, सुसाट धावणाऱ्या या नद्यांचे पाणी अडवल्यावर हिमालयात भूस्खलन होणार नाही, भूकंप होणार नाहीत? तसे झाले, तर हजारो, लाखो लोकांना जीव गमवावा लागणार नाही? अर्थात असे काही अघटीत घडणार नसल्याचे प्रमाणपत्र पर्यावरण मंडळाने दिलेच असेल म्हणा आणि जगतिक बँकेनेही करार तोडल्याचे प्रशस्तीपत्रक दिलेच असेल. आता सिंधू, झेलम, चिनाब या तिन्ही नद्यांवर बांध घालणे तर सरकारच्या हातचा मळ आहे. निशिकांत दुबे तर एका रात्रीत बांध घालून पाणी अडवून दाखवतील, यावर आमचा पूर्ण विश्वास आहे.
सरकारचे एका बाबतीत मात्र खूप कौतुक वाटते. एवढे सगळे होऊनही अदानी समुहाच्या कंपनीकडून पाकिस्तानला होणारा वीज पुरवठा खंडीत करण्याचा वेडेपणा सरकारने केला नाही. नाहीतर भारताला खूप मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले असते. पाकिस्तानने शिमला करार तोडला तेही चांगलेच झाले, त्यामुळे चीनचाही मार्ग मोकळा होऊन जाईल नाही का? पाकिस्तानने हवाई क्षेत्रात प्रवेशास बंदी केली तेही आपल्यावर उपकारच झालेत म्हणा; कारण शत्रूच्या प्रदेशात जायचेच कशाला? तसे केल्यास आपल्या हिंदू धर्माला विनाकारण कलंक लागतो; शिवाय आपले नागरिक अधिक पैसे मोजून विमानप्रवास करतील तर देशातला काळा पैसा आपोआपच बाहेर येईल आणि ती प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करायची पंतप्रधानांच्या मागची ब्यादही एकदाची मिटून जाईल, नाही का?
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘धरम पुछा, जाति नहीं’ हे नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या टीमला भारतरत्न अवश्य द्या. कारण गेल्या १२ वर्षांच्या कठोर परिश्रमांतून पेरलेले हिंदू-मुस्लीम द्वेषाचे बीज चांगलेच तरारून आले आहे. त्याला थोडे खतपाणी घातले तर पाकिस्तानचा (ना)पाक हेतू चांगल्याप्रकारे सफल होऊन एका भारताचे रूपांतर चार भारतांत (तसेही पाकिस्तानने खलिस्तानसाठी केलेली खेळीही ‘नहले पे दहला’) होऊन आपण यशाचे शिखर चारपट गाठणार त्याकरिता ‘फुलों, फलों और वोट बटोरों’ एवढेच सांगावेसे वाटते. ‘देश में दंगल, पाकिस्तान में मंगल’ करण्यासाठी आपण आयतीच जमीन तयार करून देणार आणि म्हणणार मातीत गाडणार. ते मात्र बापदादांच्या शंभरेक पिढ्या मातीत खपूनही काही जमलं नाही पण हे सरकार मात्र एवढे नक्की करून दाखवेल.
या सरकारने ३० ते ७० वर्षे वयोगटातील नागरिकांना अफूची गोळी देऊन केवळ मूर्च्छित केले नाही तर बेकारही केले. सोशल मीडियावर फेक न्यूज पसरवणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याचे काम कुणी करायचे हे ठरवण्यासाठी ग्रोकचे मत घ्यावे लागेल का? आणि एक कळकळीची विनंती, जे कोणी मुस्लीम नागरिकांनी पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि दोघांनी जीवही गमावला हे काँग्रेसने पसरवलेले नरेटिव्ह आहे. त्यामुळे त्या मुस्लीम नागरिकांचा सरकारने चुकूनही उल्लेख करू नये. अन्यथा हिंदुत्व उगीचच धोक्यात यायचे नि मग जनता राष्ट्रद्रोहाचा ठपका ठेवायची.
तरीही मूळ मुद्दा तसाच राहिला. या कारवायांचे खापर कुणावर फोडावे आणि त्यातून जनतेला मूर्ख कसे बनवावे याचे नियोजन कसे करावे, या प्रश्नाने पुन्हा विचारांचा धुरळा उडत आहे. पंतप्रधान प्रवास करून खूप थकले असतील, त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे नंतर कधीतरी देता येतील. तशीही काही घाई नाही. बड़े बड़े देशों (शहरों) में, ऐसी छोटी छोटी बातें होती है। दिल पे मत लेना।
२८ भारतीय बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून, कुटुंबातील सदस्यांना या दु:खातून लवकरात लवकर सावरण्याची ताकद परमेश्वराने आणि अल्लाने द्यावी! हीच प्रार्थना! jdpatil25@gmail.com