संदेश पवार

‘‘मला एकाही माणसाने मी बौद्ध धर्मच का स्वीकारला, हा प्रश्न विचारला नाही. कोणताही दुसरा धर्म न स्वीकारता हाच धर्म का स्वीकारला, हा कोणत्याही धर्मांतराच्या चळवळीतील मुख्य आणि महत्त्वाचा प्रश्न असतो. धर्मांतर करताना धर्म कोणता व का घ्यावयाचा, हे तावून सुलाखून पाहिले पाहिजे. आम्ही हिंदू धर्म त्यागाची चळवळ १९३५ पासून येवले येथे ठराव करून हाती घेतली होती. मी हिंदू धर्मात जन्मलो, तरी हिंदू धर्मात मरणार नाही अशी प्रतिज्ञा मी मागेच केली होती आणि काल ती मी खरी करून दाखवली. … नरकातून सुटलो, असे मला वाटते. मला कोणी अंधभक्त नको आहेत. ज्यांना बौद्ध धर्मात यावयाचे आहे, त्यांनी जाणिवेने आले पाहिजे. त्यांना तो धर्म पटला पाहिजे…’’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या ऐतिहासिक धम्मदीक्षाभूमीवरून बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी १५ ऑक्टोबर १९५६ रोजी केलेल्या ऐतिहासिक भाषणातील हा भाग आहे.

discussion about constitution change is an insult to babasaheb says ramdas athawale
संविधान बदलाची चर्चा हा बाबासाहेबांचा अपमान; रामदास आठवले यांचा आरोप, दलित मोदींच्या पाठीशी असल्याचा दावा 
prakash ambedkar caa nrc against hindus
“हिंदुंना भाजपच फसवतेय”, ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका; म्हणाले, “सीएए आणि एनआरसी कायदा मुस्लिमांच्या नव्हे…”
Dr. Babasaheb Ambedkar and Buddhism
विश्लेषण: ‘या’ जाती बौद्ध धर्म का स्वीकारतात? त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान काय?
Dr. Babasaheb Ambedkar and Kalaram Mandir Satyagraha
काळाराम मंदिर सत्याग्रह आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर झालेली दगडफेक, १९३० मध्ये ‘त्या’ दिवशी नेमके काय घडले होते?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या ऐतिहासिक रक्तविहिन धम्मक्रांतीची भूमिका व बौद्ध धम्म स्वीकारामागची भूमिका स्पष्ट करणारी आहे. हे सांगण्याचे कारण म्हणजे धर्मांतराला ६७ वर्षे पूर्ण झाली आहेत. तत्कालीन अस्पृश्य म्हणवल्या समाजाने बौद्ध धम्म स्वीकारला आणि आपल्या जीवनाच्या प्रगतीचा- उन्नतीचा मार्ग त्यांना मिळाला. या उन्नतीच्या मार्गामुळेच बौद्ध धम्माचे अनुयायी विकासाच्या वाटेवर आहेत. म्हणूनच आज संपूर्ण देशभरात बौद्ध धर्मांतरांची लाट पसरल्याचे दिसते.

आणखी वाचा-रावणाच्या प्रतिमेचे दहन कशासाठी?

भारतीय समाजात चातुर्वर्ण्य व्यवस्थेमुळे समाजातील चौथ्या वर्गातील (क्षुद्र) जातींचे अनन्वित हाल होत होते. त्यांच्यावर प्रचंड अन्याय, अत्याचार होत होते. त्यांच्या शोषणाला, त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला एकमेव कारण होते ते म्हणजे धर्म आणि धर्माचे ठेकेदार. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील दीनदुबळ्या, तळागाळातील वर्गाला, अस्पृश्य म्हणून गणल्या जाणाऱ्या वर्गाला स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी, त्यांना ताठ मानेने समाजात उभे राहण्यासाठी नवा मार्ग दाखविला, तो बौद्ध धम्माच्या रूपाने. नागपूरच्या दीक्षाभूमीवर आपल्या सात लाख अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. हे जगातील एकमेवाद्वितीय रक्तविहीन धम्मक्रांतीचे उदाहरण म्हणून गणले जाते. या धम्मक्रांतीमुळे बौद्ध धम्म स्वीकारलेल्या समुदायाने आज ६७ वर्षांत सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा अशा नानाविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी केली आहे आणि आपल्या जीवनाला सुसंस्कृत आकार दिला आहे.

या आंबेडकरी समुदायाकडे आज आदराने पाहिले जाते. महाराष्ट्रातील बौद्ध समुदाय हा एक विचारी आणि सामाजिक- राजकीयदृष्ट्या सजग असणारा समुदाय म्हणून ओळखला जातो. शिक्षणाचे महत्त्व या समुदायाने जाणल्यामुळे बौद्ध धर्मियांत शिक्षणाचे प्रमाणही लक्षणीयरित्या वाढले आहे. शासन- प्रशासनात, नोकऱ्यांत या समुदायाचे प्रतिनिधित्व बऱ्यापैकी वाढलेले दिसून येते. त्यमुळेच समाजाची उन्नती होण्यास मदत झाली आहे. जुना धर्म त्यागून नवा बौद्ध धम्म स्वीकारल्यामुळे, बौद्ध धम्माच्या आचरणाने सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक नवी परिमाणे या समुदायाने स्वीकारली. विज्ञानाचा ध्यास घेऊन वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला. अंधश्रद्धांचा त्याग केला. कर्मकांडे त्यागली आणि म्हणूनच स्वतंत्रपणे विचार करण्याची एक शैली या समुदायांमध्ये निर्माण झाली.

आणखी वाचा-आता निदान समलैंगिकता हा ‘रोग’ समजून उपचार तरी केले जाणार नाहीत… 

दैववादाचा त्याग करून विज्ञानवादाचा स्वीकार केल्यामुळे, विवेकनिष्ठ भूमिका घेऊन स्पष्टपणे अन्यायाविरोधात उभे ठाकण्याची ताकद या समुदायात निर्माण झाली आहे. अन्याय अत्याचारांविरोधात ठामपणे उभे राहण्याची, रस्त्यावर उतरून लढा देण्याची एक प्रचंड शक्ती बाबासाहेबांच्या वैचारिक अधिष्ठानामुळे आणि बुद्धाच्या करूणेच्या मार्गामुळे निर्माण झालेली दिसते. केवळ बौद्धांवर अन्याय होतो म्हणूनच बौद्ध रस्त्यावर येऊन आंदोलने करतात असे नव्हे, तर समाजातील इतर बौद्धेतर लोकांवरील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय अन्याय, अत्याचारासंदर्भातही विशेषत: महाराष्ट्रातील बौद्ध समाज स्पष्ट भूमिका घेताना, प्रसंगी आंदोलन लढे उभारताना दिसतो. याचे मुख्य कारण म्हणजे बाबासाहेबांनी केलेली धम्मक्रांती आणि त्या धम्मक्रांतीतून दिलेला बुद्धाचा ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हा विचार हा समाज खऱ्या अर्थाने अंगीकारताना दिसतो. या सर्व पार्श्वभूमीवर काही देशांमध्ये आपल्याला बौद्ध धर्मांतरे घडताना दिसत येत आहेत.

गेल्या वर्षी याच अशोक विजयादशमीच्या निमित्ताने देशाची राजधानी दिल्लीत बौद्ध धर्मांतराचा कार्यक्रम दिल्ली सरकारमधील बौद्ध समाजाचे मंत्री डॉ. राजेंद्रपाल गौतम यांच्या उपस्थितीत पार पडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे वाचन करून हजारो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देण्यात आली. या कारणास्तव डॉ. राजेंद्र पाल यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्यावर माध्यमे आणि सवर्ण समाजातील लोकांनी कठोर टीका केली होती. मात्र या टीकेला न जुमानता डॉ राजेंद्रपाल गौतम यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देणे पसंत केले. तेव्हापासून त्यांनी अधिक उमेदीने केवळ दिल्लीमध्येच नव्हे, तर देशभर फिरून बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीची आवश्यकता, तिचे महत्त्व पटवून देण्यास सुरुवात केली. विविध राज्यांत, विविध शहरांत धर्मांतराचे कार्यक्रम केले. ही धर्मांतरे कोणत्याही प्रलोभनामुळे, बळ अथवा सक्तीमुळे झालेली नाहीत. लोक स्वतःहून बौद्ध धर्मात येत आहेत. गेल्या वर्षभरातच भारताक लाखो लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. आताही अशोक विजयादशमी दिनी- धम्मक्रांतीच्या दिनी देशातील निरनिराळ्या राज्यांत, निरनिराळ्या शहरांत अशाच प्रकारचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होत आहेत. या पुढच्या काळातही होणार आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेले सामाजिक समतेचे स्वप्न साकार होणार आहे.

आणखी वाचा-नारायण राणे यांच्या ‘मराठा अस्मिते’ला इतिहासाचा निर्विवाद आधार आहे? 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विज्ञाननिष्ट होते आणि म्हणूनच त्यांनी कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करताना वेगवेगळ्या प्रकारे विचार करून मगच आपले धोरण व कृती ठरवली. बौद्ध धम्माचा स्वीकार करतानाही त्यांनी प्रचंड विचार केला होता. अभ्यास केला होता आणि त्यामुळेच समकालीन विचारवंतांमध्ये धर्माबाबत असणारी मतमतांतरे लक्षात घेता डॉ. आंबेडकरांनी आपली मते स्पष्टपणे मांडलेली आहे. १५ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमीवर केलेल्या भाषणातही त्यांनी माणसासाठी धर्म का आवश्यक आहे, याविषयी स्पष्ट भूमिका मांडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्याबाबत म्हणतात, “मनुष्यमात्राच्या उत्कर्षासाठी धर्म ही अत्यंत आवश्यक वस्तू आहे. मला माहीत आहे की कार्ल मार्क्सच्या वाचनामुळे एक पंथ निघाला आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, धर्म म्हणजे काहीच नाही. त्यांना धर्माचे महत्त्व नाही. त्यांना सकाळी ब्रेकफास्ट मिळाला, त्यात पाव, मलई, लोणी, कोंबडीची टांग वगैरे असली, पोटभर जेवण मिळाले, निवांत झोप मिळाली, सिनेमा पहावयास मिळाला की सारे संपले. हे त्यांचे तत्वज्ञान. मी त्या मताचा नाही. माझे वडील गरीब होते. म्हणून मला या प्रकारचे सुख काही मिळाले नाही. माणसाचे जीवन सुख समाधानाच्या अभावी कसे कष्टमय होते, याची मला जाणीव आहे. आर्थिक उन्नतीची चळवळ आवश्यक आहे, हे मी मानतो. मी त्या चळवळीच्या विरोधात नाही. माणसाची आर्थिक उन्नती व्हावयास पाहिजेच.”

त्यामुळे बौद्ध धम्म स्वीकारामुळे नव दीक्षित समुदायाला जीवन जगण्याचा एक नवा मार्ग मिळणार आहे. या विज्ञाननिष्ठ बौद्ध धम्माच्या माध्यमातून सामाजिक समता निर्माण होईल आणि हे समतामूलक समाज निर्मितीतील एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, अशी बाबासाहेबांना अपेक्षा होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे समतामुलक समाजाचे स्वप्न पाहिले होते, जातीअंताची जी भूमिका मांडली होती, त्यासाठी आवश्यक असणारी ही महत्त्वाची बाब होती. म्हणूनच आज देशात बाबासाहेबांचा हा विचार उच्चरवाने सर्वत्र मांडला जात आहे. त्याचा स्वीकार केला जात आहे.

आणखी वाचा-क्रिकेटच्या चर्चेत राजकारण आहे, आणि काळाबाजारसुद्धा… 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर माणसाच्या विकासाबाबत आपले मत व्यक्त करताना असेही म्हणतात की, “मनुष्याला शरीराबरोबर मनही आहे. म्हणून दोन्हींचाही विचार करावयास हवा. मनाचा विकास झाला पाहिजे. मन सुसंस्कृत झाले पाहिजे.ज्या देशातील लोक अन्नाशिवाय माणसाचा सुसंस्कृत मनाशी संबंध नाही असे म्हणतात, त्या देशाशी अगर लोकांशी संबंध ठेवण्याचे मला काहीच प्रयोजन नाही. जनतेशी संबंध ठेवताना माणसाचे शरीर जसे निरोगी पाहिजे, तसेच मनही सुसंस्कृत झाले पाहिजे. एरवी मानव जातीचा उत्कर्ष झाला, असे म्हणता येणार नाही.”

त्यामुळे मानवी उत्कर्षासाठी सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक या सर्वच बाबतींत समता प्रस्थापित होण्यासाठी बौद्ध धम्म हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. जीवन जगण्याचा तो एक मध्यम मार्ग आहे. आणि म्हणूनच त्या मार्गाचा आपण अवलंब केला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. तीच भूमिका बाबासाहेबांच्या अनुयायांनी स्वीकारली आणि त्यामुळे या समाजाची उन्नती होण्यास मदत झाली. हे पाहूनच ज्या समुदायाने बाबासाहेबांचा हा धम्मक्रांतीचा मार्ग स्वीकारलेला नव्हता असा बहुसंख्य समुदाय आज मोठ्या आशेने या धम्मक्रांतीकडे पाहात आहे. बाबासाहेबांचा विचार, तथागत भगवान बुद्धांचा विचार स्वीकारण्यासाठी पुढे येतो आहे. त्यामुळे देशात बौद्ध धर्मांतरे मोठ्या संख्येने होताना दिसतात. ही एक चांगली गोष्ट म्हणावी लागेल.

या पार्श्वभूमीवर वर्तमान राजकीय परिस्थितीत विचार केला तर, डॉ. आंबेडकरांचा विचार, तथागत बुद्धांचा विचार स्वीकारणारा हा समुदाय एकीकडे वाढत असताना त्यांना अटकाव करण्यासाठी देशातील विविध राज्यांत धर्मांतरविरोधी कायदे करण्याचा घाट घातला जात आहे. नव्हे तर काही राज्यांत धर्मांतरविरोधी कायदे केले गेले आहेत. धर्मांतर होऊ नये, अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे. केवळ आपल्या वर्चस्वाला धक्का लागू नये, या भीतीपोटी अशी पावले उचलली जात आहेत. मात्र असे कितीही कायदे केले गेले, तरीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारण्याची किंवा बौद्ध धम्म स्वीकारण्याची जी चळवळ देशात उभी राहिली आहे, ती कदापि थांबणार नाही किंवा कुणालाही ती थोपवताही येणार नाही.

आणखी वाचा-भारतीय (जनता पक्षाच्या) राजकारणाचा विश्वकर्मा

बौद्ध संघटना समाजात परिवर्तन करण्यासाठी सामाजिक समतेचा विचार मांडत आहेत आणि आदर्श भारतीय समाजाच्या निर्मितीस सहाय्य करत आहेत. विषमता गाडून समतेवर उभारलेला भारत निर्माण करण्यासाठी पावले टाकली जात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे समतामूलक समाजाचे स्वप्न पाहिले होते, जातीअंताची जी चळवळ त्यांनी उभी केली होती, तिला साकार करण्यासाठी सबंध भारतभरातील आंबेडकरवादी पुढे सरसावत आहेत, हे भारतासाठी आशादायक चित्र आहे. त्यातूनच खऱ्या अर्थाने आदर्श समाजाची निर्मिती होणार आहे. त्यामुळे कोणत्याही राजसत्तेने अशा प्रकारच्या बौद्ध धर्मांतरांना विरोध न करता उलट सहाय्यच केले पाहिजे. कर्मकांडाच्या, अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेल्या भारतीय समाजाला बाहेर काढण्यासाठी आणि त्याला विज्ञाननिष्ठ समाजात परिवर्तितण्यासाठी बौद्ध धम्म हाच एकमेव मार्ग आहे. बुद्धाचा विचार हाच समाजाला उन्नतीच्या, प्रगतीच्या व विज्ञानाच्या वाटेवर घेऊन जाणार आहे.

लेखक मुक्त पत्रकार असून आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक आहेत

sandesh.pawar907@gmail.com