सुनील देवधर

अरुणाचल प्रदेशमधील पारंपरिक श्रद्धाजागरणाद्वारे तिथल्या संस्कृतीच्या संरक्षण, संवर्धन व विकासासाठी कार्यरत असलेल्या तेचि गुबिन यांना ‘वन इंडिया पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यानिमित्त गुबिन यांच्या आणि पुरस्कार देणाऱ्या ‘माय होम इंडिया’ या संस्थेच्या कार्याविषयी..

भारत-चीन सीमा हा एक कायमचा तणावग्रस्त प्रदेश आहे. या सीमेवरच्या खेडय़ांतील जनजीवनावरही या तणावाचा परिणाम होतो. हा परिणाम कोणत्या स्वरूपाचा असतो, सीमेवरच्या गावखेडय़ांत राहणाऱ्या लोकांना नेमक्या कोणकोणत्या समस्या भेडसावतात, त्यांची माहिती कशी मिळवता येईल, त्या कशा सोडवता येतील, यावर विचारमंथन होणे गरजेचे असते. सीमावर्ती भागातील दुर्गम खेडय़ांत जाऊन तेथील लोकांची स्थिती जाणून घेण्याचा अलीकडच्या काळातला (नागरिकांच्या पातळीवरचा) पहिला प्रयत्न २०१० साली अरुणाचल प्रदेशात झाला. ‘सीमांत दर्शन यात्रा’ या नावाने पार पडलेल्या या उपक्रमांतर्गत महिनाभरात ९१ जण भारत-चीन सीमेवरील १००हून अधिक खेडय़ांमध्ये जाऊन, राहून, परिस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन आले. त्यांना परिस्थिती अत्यंत विदारक असल्याचे दिसले.

एक एकत्रित सविस्तर अहवाल तयार करून राज्यपालांना आणि त्यांच्यामार्फत राष्ट्रपतींना सादर करण्यात आला. या अहवालाचे महत्त्व काय होते, याचा अंदाज आपल्याला एकाच गोष्टीवरून लावता येऊ शकतो, ती म्हणजे, त्या अहवालातील सूचनांच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून एकटय़ा अरुणाचल प्रदेशात भारत-चीन सीमेवर इंडो-तिबेटीयन बॉर्डर फोर्सची ५२ नवी ठाणी सुरू करण्यात आली. आधी असलेल्या ठाण्यांची डागडुजी करण्यात आली. तिथे कायमस्वरूपी मनुष्यबळ तैनात राहील याची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली. या सीमांत दर्शन यात्रा मोहिमेचे नेतृत्व त्यावेळी जेमतेम चाळिशीत असलेल्या एका वास्तुरचनाकाराने केले होते. त्याचे नाव- तेचि गुबिन.

अरुणाचल प्रदेशातली सर्वात मोठी जनजाती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘न्यिशी’ जनजातीत जन्मलेल्या गुबिन यांनी चंडिगडमधून वास्तुरचनाकार म्हणून पदवी घेतली आणि अरुणाचल सरकारच्या गृहनिर्माण विभागात रुजू झाले. त्यावेळच्या त्यांच्या सभोवतालच्या सामाजिक मापदंडांनुसार पद, पैसा, प्रतिष्ठा सारे काही त्यांच्याकडे होते. त्या जोरावर सारे जीवन अगदी आरामात जगणे त्यांच्यासाठी कठीण नव्हते. पण, सभोवतालचे सामाजिक वास्तव त्यांच्या संवेदनशील मनाला स्वस्थ बसू देत नव्हते. बऱ्याच विचाराअंती नेमके काय खटकते आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ‘न्यिशी इंडीजिनस फेथ अँड कल्चर असोसिएशन’च्या (निफ्का) माध्यमातून आपल्या जमातीच्या पारंपरिक रीतिरिवाजांची, संस्कृतीची जपणूक व पुनरुज्जीवन करण्यास सुरुवात केली. बऱ्याच प्रयत्नांती पारंपरिक पद्धतीने प्रार्थना करण्यासाठी प्रार्थनाघराची निर्मिती करण्यात त्यांना यश आले. आधुनिकीकरणाच्या रेटय़ात पारंपरिक श्रद्धांपासून दूर गेलेल्या पिढीला पुन्हा आपल्या मूळ श्रद्धांकडे वळवण्याच्या प्रयत्नांच्या नशिबी उपहास, हेटाळणी, तिरस्कार, विरोध हे सारे असतेच. गुबिन यांच्या नेतृत्वाखाली ‘निफ्का’चा प्रवास या पायऱ्या ओलांडून स्वीकाराच्या मुक्कामापर्यंत वेगात झाला.

अरुणाचल प्रदेशात २६ जमाती आणि १०६ उपजमाती आहेत. म्हणजे इतक्या वेगवेगळय़ा प्रकारच्या भाषा, वस्त्रप्रावरणांच्या आणि आहार-विहाराच्या, नृत्याच्या, निसर्गपूजनाच्या पद्धती तिथे कधीकाळी प्रचलित होत्या. मात्र, हे सारे वैविध्य धर्मातराच्या रेटय़ाखाली नष्ट होत चालल्याचे गुबिन यांच्या लक्षात आले. त्यातूनच अन्य जमातींमध्ये असे काही वाटणारे कोणी आहे का, याचा शोध घेण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांना ‘निफ्का’च्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. यातूनच अरुणाचलमधील सर्व जमातींमध्ये पारंपरिक श्रद्धा जागरणाचे काम सुरू झाले आणि आज अरुणाचल प्रदेशात पारंपरिक श्रद्धांनुसार चालवली जाणारी विविध जमातींची मिळून ५००हून अधिक प्रार्थनाघरे उभी राहिली आहेत. या साऱ्याच जमाती निसर्गपूजक आहेत. त्यातही ‘दोन्यी’ (सूर्य) आणि ‘पोलो’ (चंद्र) ही दैवते सर्वत्र समान आहेत. या दैवतांच्या उपासनेच्या गेल्या २० वर्षांत फोफावलेल्या चळवळीमुळे अरुणाचल प्रदेशची राजधानी ईटानगरमध्ये नुकत्याच सुरू झालेल्या नव्या विमानतळाचे नाव ‘दोन्यी पोलो विमानतळ’ ठेवण्यात आले आहे.

पारंपरिक श्रद्धा जागरणाचे हे काम स्थिरावत असतानाच शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, उद्योजकता संधींचा अभाव अशा अन्य समस्यांवरही गुबिन विचार करतच होते. त्यातूनच ‘अरुणाचल विकास परिषदे’चे अध्यक्षपद त्यांच्याकडे आले. सीमांत दर्शन हा या ‘अरुणाचल विकास परिषदे’च्या कामाचाच भाग होता.

अशांत सीमावर्ती भागातील राज्यांत होत असलेल्या या साऱ्या कार्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. म्हणूनच ‘माय होम इंडिया’ या संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या ‘वन इंडिया पुरस्कारा’साठी यंदा तेचि गुबिन यांचे नाव निश्चित करण्यात आले. ‘अवर नॉर्थ इस्ट’ या इंग्रजी शब्दांची अद्याक्षरे घेऊन या पुरस्कारातील ‘वन’ हा शब्द तयार होतो. ईशान्येत भारतीय एकत्वाचा भाव जागविण्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या या पुरस्काराची सुरुवात २०११ मध्ये नागालँडमध्ये हिंदी भाषेच्या प्रसाराचे काम करणाऱ्या पी. जे. जमीर यांच्यापासून झाली. त्यानंतर मुष्टियुद्धपटू मेरि कोमपासून अनेकांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. बिरुबाला राभांसारख्या काही जणांची या पुरस्कारानंतर पद्म पुरस्कारांसाठी निवड झाली. ही एका अर्थाने संस्थेच्या कामावर उमटलेली राजमान्यतेची मोहोरच होती.

‘वन इंडिया पुरस्कारा’चे हे बारावे वर्ष आहे. ‘माय होम इंडिया’ ही संस्थाही आता १७ वर्षांची झाली. शिक्षणासाठी ईशान्य भारतातून अन्य शहरांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी दिलेल्या आधाराच्या हातापासून ‘माय होम इंडिया’च्या कामाची सुरुवात झाली. हे काम करतानाच ईशान्य भारतातली विविधता आणि तेथील समस्यांची गुंतागुंत याविषयीच्या आमच्या ज्ञानात आणि जाणिवेत भर पडत गेली. ईशान्य भारतातील भौगोलिक, सांस्कृतिक वैविध्याची आणि वैशिष्टय़ांची ओळख उर्वरित भारताला करून देण्याची आवश्यकता आम्हाला सतत चढत्या भाजणीने जाणवत आली आहे. त्यातूनच या जनजातीय सामाजाच्या वैशिष्टय़ांची माहिती देणे, गैरसमज दूर करणे, आपल्या एखाद्या निर्हेतुक सहज कृतीतूनही त्यांची मने दुखावली जाऊ नयेत यासाठी सामाजिकदृष्टय़ा हळव्या जागांची ओळख पोलीस दलांपासून सामाजिक, सार्वजनिक मंडळांच्या सदस्यांपर्यंत सर्वाना करून देणे, असे ईशान्य भारताबद्दल माहितीप्रसाराचे उपक्रम राबविण्यात आले. आजवरच्या अशा १० हजारांहून अधिक लहान-मोठय़ा कार्यक्रमांतून देशभरातील कोटय़वधी नागरिकांपर्यंत विविध माध्यमांतून ही माहिती पोहोचविण्यात आली.

माहितीच्या पुढचा टप्पा होता अभिसरणाचा. त्यासाठी गणपती, दसरा-दिवाळी, होळीसारखे सण साजरे करताना ईशान्य भारतातील या बंधू-भगिनींना त्यात सहभागी करून घेण्यात येऊ लागले. उर्वरित भारतीय समाजासोबत एकत्र येण्याच्या या प्रयत्नांबरोबरच, जमातींनाही एकत्र आणण्याची गरज भासू लागली होती. त्यातूनच मग फ्रॅटर्निटी कप फुटबॉल स्पर्धेसारख्या कल्पना पुढे आल्या. ईशान्य भारतीय राज्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांच्या संघांमध्ये बंगळूरु, पुणे, मुंबई, दिल्ली अशा काही प्रमुख शहरांत या स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्या चुरशीने खेळल्या जातात आणि विद्यार्थ्यांना व्यापक ओळख मिळवण्यास उपयुक्त ठरतात.

या साऱ्या प्रवासात संस्थेच्या कार्यात अनेक नवनव्या आयामांचीही भर पडली. त्यातला एक महत्त्वाचा आयाम म्हणजे ‘सपनों से अपनों तक’. घरच्यांशी भांडून-तंटून किंवा चंदेरी दुनियेच्या स्वप्नांच्या मागे लागून अनेक अल्पवयीन मुले मुंबईत येतात. कायद्याचे रक्षक त्यांच्यापर्यंत पोहोचले तर ती बालगृहांमध्ये डांबली जातात, अन्यथा मोहमयी दुनियेच्या स्वप्नाचा त्यांचा प्रवास बहुधा गुन्हेगारी अधोविश्वाच्या एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्यातच जाऊन संपतो. ईशान्य भारतातून पळून आलेल्या अशाच मुलांमुळे ‘माय होम इंडिया’चे लक्ष या विषयाकडे वेधले गेले. त्याची व्याप्ती लक्षात घेता केवळ ईशान्य भारतापुरते मर्यादित न राहता या कामाचा देशभर विस्तार करण्यात आला. त्यानंतरच्या गेल्या आठ वर्षांत केवळ ईशान्य भारतातील सुमारे ५०० आणि देशभरातील तीन हजारांहून अधिक मुलांना बालगृहांच्या कोंडवाडय़ांतून बाहेर काढून त्यांच्या घरी त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘माय होम इंडिया’ने केले आहे.

sunil.deodhar@gmail.com

लेखक भाजपचे राष्ट्रीय सचिव आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.