प्रा. अजित केंभवी
प्राध्यापक नरेश दधीच यांचे ६ नोव्हेंबर २०२५ रोजी, वयाच्या ८१ व्या वर्षी, चीनमधील शैक्षणिक भेटीदरम्यान निधन झाले. त्यांचा हा अकस्मात झालेला अंत वैज्ञानिक समुदायासाठी, तसेच भारतात आणि इतर अनेक देशांत विविध क्षेत्रांतील मोठ्या प्रमाणात असलेल्या मित्र आणि सहकाऱ्यांसाठी अत्यंत दु:खद आहे. ते इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (IUCAA) च्या संस्थापकांपैकी एक होते, आणि २००३ ते २००९ दरम्यान संस्थेचे संचालक होते. आयुकाशी त्यांचे नाते अखेरच्या दिवसापर्यंत सक्रिय वैज्ञानिक म्हणून कायम राहिले.

नरेश दधीच यांचा जन्म राजस्थानमधील चुरूजवळील एका गावात झाला. त्यांचे वडील पुजारी होते. ते लहान वयातच शिक्षणासाठी घराबाहेर पडले. त्यांनी बीआयटीएस-पिलानी येथून गणितातील पदवी आणि वल्लभ विद्यानगर येथून एम.एस्सी. प्राप्त केली. १९६६ साली ते गणितातील संशोधनासाठी पुणे विद्यापीठात (सध्याचे एस.पी. पुणे विद्यापीठ – SPPU) आले. येथे त्यांना प्रख्यात गणितज्ञ व सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ प्रा. व्ही. व्ही. नारळीकर (प्रा. जयंत नारळीकर यांचे वडील) यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्याची संधी मिळाली. दधीच यांनी अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या अत्यंत गुंतागुंतीच्या सिद्धांतात विशेष प्रावीण्य मिळवले आणि त्या क्षेत्रातील मोठे तज्ज्ञ म्हणून प्रतिष्ठा मिळवली.

सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीस पीएच.डी. पूर्ण झाल्यानंतर दधीच यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गणित विभागात व्याख्याता म्हणून नियुक्ती झाली, आणि तेथूनच त्यांचा वैज्ञानिक प्रवास प्रभावीपणे सुरू झाला. त्यांनी गुरुत्वाकर्षणाचे शास्त्रीय व क्वांटम पैलू, कृष्णविवरांचे खगोलभौतिकी, ब्रेन-वर्ल्ड ब्रह्मांडविद्या, इत्यादी विषयांवर संशोधन केले. काही वर्षांतच त्यांच्या बरोबर संजीव धुरंधर, बी.एस. सत्यप्रकाश आणि पॅट्रिक दासगुप्ता यांसारखे देशातील अग्रगण्य संस्थांतून पीएच.डी. केलेले तेजस्वी तरुण संशोधक जमा झाले. तसेच संजय वाघ, रवी कुलकर्णी, सुचेता कोश्टी आणि वर्षा दफ्तरदार यांसारखे संशोधन विद्यार्थी त्यांच्या गटात होते. यांपैकी अनेकजण पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावरील अग्रगण्य वैज्ञानिक झाले. या काळातील संशोधनात कृष्णविवरांमधून ऊर्जा काढण्यासाठी सुचवलेली रोचक ‘मॅग्नेटिक पेनरोज प्रक्रिया’ विशेष उल्लेखनीय आहे.

१९८७ च्या सुमारास दधीच यांच्या आयुष्यात मोठा बदल घडला. त्या वेळी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत (TIFR) मुंबईत कार्यरत असलेले प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ प्रा. जयंत नारळीकर हे विद्यापीठ व्यवस्थेत येऊन देशातील विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये खगोलशास्त्राचा प्रसार करू इच्छित होते. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे योग्य स्थान ठरेल असे वाटल्यामुळे त्यांनी हा विचार दधीच यांच्यासमोर मांडला. चर्चेअंती असे स्पष्ट झाले की हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एक नवीन केंद्र उभारणे आवश्यक आह, जिथे देशभरातील विद्यापीठांतील शिक्षक व विद्यार्थी खगोलशास्त्रात संशोधन करू शकतील. अल्पावधीतच तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या येथे झालेल्या विज्ञान परिषदेतील भाषणात अशा केंद्राच्या स्थापनेची घोषणा केली. त्यानुसार प्रा. यशपाल (तेव्हा यूजीसीचे अध्यक्ष) आणि प्रा. जयंत नारळीकर यांनी ही जबाबदारी स्वीकारली, आणि २९ डिसेंबर १९८८ रोजी आयुकाचे भूमिपूजन झाले. हीच आयुका आज एक जागतिक दर्जाची संस्था म्हणून विकसित झाली असून, त्यात प्रामुख्याने तरुण व चैतन्यपूर्ण शिक्षकवृंद तसेच अत्याधुनिक संशोधन सुविधा उपलब्ध आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आयुकाच्या माध्यमातून देशभरातील-अगदी दुर्गम भागांतीलही- शेकडो विद्यार्थी व शिक्षक खगोलभौतिकी क्षेत्रात उतरले आणि उत्कृष्ट संशोधन साध्य करू लागले.

आयुकाच्या स्थापनेत दधीच यांची भूमिका अत्यंत निर्णायक होती. प्रा. जयंत नारळीकर यांच्या संस्थापक, संचालक म्हणून नियुक्तीआधीच आयुकात औपचारिकरीत्या नियुक्त होणारे ते पहिले व्यक्ती होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, यूजीसी महाराष्ट्र शासन आणि केंद्रातील विविध मंत्रालयांदरम्यान दुवा साधत त्यांनी संस्थेच्या गुंतागुंतीच्या उभारणीची प्रक्रिया अत्यंत सुकर केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरातील योग्य जागा ओळखून ती आयुकासाठी हस्तांतरित करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तिथे आज चार्ल्स कोरिया यांनी रचलेले सुंदर आयुका कॅम्पस देशातील खगोलशास्त्राचे प्रतीक म्हणून उभे आहे.

काळानुसार, आणि विशेषत: संचालकपदाच्या काळात, दधीच यांनी आयुकासाठी अनेक महत्त्वपूर्ण खगोलशास्त्रीय सुविधा उपलब्ध केल्या. त्यांनी गिरावली येथील आयुका दुर्बीण कार्यान्वित केली, दक्षिण आफ्रिकेतील मोठ्या दुर्बीण ( SALT) प्रकल्पात आयुकाचा सहभाग निश्चित केला, तसेच थर्टी मीटर टेलिस्कोप (TMT) आणि भारतातील लिगो (LIGO) गुरुत्वीय-तरंग वेधशाळा प्रकल्पांत भारतीय संस्थांचा सहभाग सुरू केला.

आयुकाची कल्पना सर्वदूर पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही दोघांनी, कधी कधी प्रा. जयंत नारळीकर आणि इतर सहकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणावर पार पाडली. मोठ्या शहरांपासून लहान गावांतील महाविद्यालयांपर्यंत आम्ही प्रवास केला, तेथील शिक्षक व विद्यार्थ्यांना आयुकातील सुविधा समजावून सांगितल्या. त्यांच्या भौतिकशास्त्र, गणित आणि सांख्यिकीतील कौशल्यांचा उपयोग उदयोन्मुख खगोलशास्त्रीय समस्यांवर करण्याबाबत आम्ही त्यांना प्रेरित केले. नवीन दुर्बिणी, उपग्रह आणि माहिती तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या संशोधनातील संधींनी अनेक तरुणांना आकर्षित केले, आणि आयुकामध्ये सहयोगासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत गेली. नवीन विभाग स्थापन झाले आणि एक समृद्ध वैज्ञानिक समुदाय तयार झाला. पश्चिम बंगाल, आसाम, ईशान्य भारत, काश्मीर आणि केरळ या भागांत आम्ही विशेष यशस्वी झालो. दधीच आणि मी हे प्रवास काही आठवड्यांपूर्वी ते चीनला रवाना होईपर्यंत,३६ वर्षे सतत करत राहिलो. आज आमच्या तरुण सहकाऱ्यांनी ही परंपरा पुढे नेली आहे.

दधीच यांची बौद्धिक भूमिका त्यांच्या वैज्ञानिक कामापलीकडेही खोल आणि ठाम होती. कौटुंबिक पार्श्वभूमी धार्मिक असूनही ते नास्तिक आणि युक्तिवादवादी होते. ते कट्टर समाजवादी होते आणि स्त्री-पुरुष, तरुण-प्रौढ, गरीब-श्रीमंत यांच्या समानतेवर त्यांची निष्ठा होती. त्यांचे जीवन अत्यंत साधे, जवळपास तपस्वी होते, परंतु त्यांना आनंद उपभोगायलाही आवडत असे. पार्ट्यांना जाणे आणि त्या स्वत: आयोजित करणे याचाही आनंद त्यांनी लुटला. परदेशात प्रवास करणे, व्याख्याने देणे आणि फलदायी संशोधन सहयोग करणे हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. अशाच एका प्रवासादरम्यान, बीजिंग येथे त्यांचे निधन झाले.

दधीच यांचे पुण्यात, देशभरात आणि परदेशातील अनेक देशांमध्ये-विशेषत: उझबेकिस्तान, कझाकस्तान यांसारख्या मध्य आशियाई देशांत-असंख्य मित्र आणि आदरकर्ते होते. दक्षिण आफ्रिकेशी त्यांचे विशेष जिव्हाळ्याचे संबंध होते आणि ते तेथे अनेक दशकांपासून दरवर्षी किमान एक महिना घालवत. वैज्ञानिक समुदायाबाहेरही त्यांचे नाट्य, कला आणि सादरीकरण क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी घनिष्ठ संबंध होते. अनेक वर्षे सुप्रसिद्ध नाटककार, कलाकार आणि नटांनी आयुकामध्ये कार्यक्रम सादर केले, ज्यामुळे तेथील उत्कृष्ट विज्ञानासोबत समृद्ध सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले. आयुकाला शहर आणि देश पातळीवरील कला-विज्ञान केंद्र म्हणून विकसित करण्याची ही परंपरा आपण त्यांच्या स्मरणार्थ जिवंत ठेवली पाहिजे.
लेखक आयुका येथे प्राध्यापक आहेत.
akk@iucaa.in