scorecardresearch

महाराष्ट्र हेच माझे कुटुंब, माझी जबाबदारी!

‘लोकसत्ता’ वर्धापन दिन आणि ‘वर्षवेध’ प्रकाशन सोहळय़ात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या सर्वागीण प्रगतीविषयी राज्य सरकार करीत असलेल्या प्रयत्नांचे सविस्तर विवेचन केले.

Chief Minister Eknath Shinde detailed discussion on the progress of Lok Satta anniversary and Varshvedh release ceremony
महाराष्ट्र हेच माझे कुटुंब, माझी जबाबदारी!

‘लोकसत्ता’ वर्धापन दिन आणि ‘वर्षवेध’ प्रकाशन सोहळय़ात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या सर्वागीण प्रगतीविषयी राज्य सरकार करीत असलेल्या प्रयत्नांचे सविस्तर विवेचन केले. देशातील सर्वाधिक पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे महाराष्ट्रात सुरू असून मुंबई महानगर प्रदेश हा देशाच्या विकासाला मोठा हातभार लावेल, असा विश्वास व्यक्त केला. विरोधकांवरही ‘मार्मिक’ टीका-टिप्पणी केली.

दैनिक ‘लोकसत्ता’च्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा. ‘लोकसत्ता’ परिवाराचे आणि माझे मी मुख्यमंत्री होण्याआधीपासूनचे नाते आहे. माहिती आणि बातम्यांच्या गदारोळात एक विश्वसनीय व्यासपीठ म्हणून छापील माध्यमांचे आणि विशेषत: ‘लोकसत्ता’चे स्थान आजही कायम असून ‘लोकसत्ता’ने एक वैचारिक परंपराही जपली आहे. अनेक नवीन मराठी शब्दच नव्हे, तर एक मराठीचा शब्दकोशच ‘लोकसत्ता’मधून वाचायला मिळतो. ‘पॉलिसी पॅरालिसीस’ ला ‘धोरण लकवा’ हा शब्द ‘लोकसत्ता’ने दिला. आमचे सरकार येण्यापूर्वी तत्कालीन सरकारला धोरण लकवाच झाला होता. परंतु, आमच्या सरकारने तो दूर केला.

farmers protest for legal guarantee on msp
अग्रलेख : दोन ‘राजां’ची कहाणी!
loksatta editorial on ashok chavan decision to resign from congress
अग्रलेख : अशोकरावांचा ‘आदर्श’!
Samorchya bakavarun economics Budget NDA Government Budget discussions
समोरच्या बाकावरून: मनोरंजन करणारे अर्थमंत्र्यांचे दावे..
crime-news
अग्रलेख: कडेकडेचे मध्यात..

हेही वाचा >>>परिघावरचे लोक हाच इथल्या राजकारणाचा मुख्य प्रवाह…

वर्षवेध वार्षिक ग्रंथ

‘लोकसत्ता वर्षवेध’ ही एक पुस्तिका नाही,  वर्षभरातील घटनांची माहिती देणारे हे पुस्तक आहे. गेल्या वर्षांत राज्य, देश इतकेच काय तर जगभरात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या.  अशा सर्व लहान मोठय़ा घटनांचा लेखाजोखा आपल्याला वर्षवेध २०२३ मध्ये वाचायला मिळेल. स्पर्धा परीक्षांमध्येदेखील हे पुस्तक अत्यंत उपयोगी असून त्याचा विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो. आणखी दहा-पंधरा वर्षांनी हे पुस्तक वाचले जाईल, तेव्हा त्यातील केवळ माहिती महत्त्वाची ठरते. दृष्टिकोन महत्त्वाचा नसतो. त्यामुळे हे पुस्तक प्रसिद्ध केल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे अभिनंदन.

महाराष्ट्र हेच माझं कुटुंब, माझी जबाबदारी

आमचे सरकार सर्वसामान्य जनतेचे सरकार असून गेल्या दोन वर्षांत आम्ही उत्तम निर्णय घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्ही जे जे निर्णय घेतले ते लोकहिताचे होते. हे सरकार आज पडणार, उद्या पडणार, परवा पडणार अशा रोजच्या वावडय़ा उडत होत्या. पण आमचे सरकार अतिशय मजबुतीने उत्तमपणे काम करीत आहे. मी आणि माझे सरकार गेले वीस महिने सातत्याने जनतेमध्ये जाऊन आणि प्रत्येक प्रसंगाला खंबीरपणे सामोरे जाऊन लोकहिताचे काम करण्याचा प्रयत्न करीत आहोत. मला काय मिळाले, यापेक्षा मी या राज्याला काय दिले, मी देशाला काय देणार आहे ही भावना मनामध्ये ठेवून राज्यकर्त्यांनी काम केले पाहिजे. पण कधीतरी आठवण आली की बाहेर पडायचे, दोन-चार सभा घ्यायच्या आणि तथ्यहीन आरोप करायचे, अशा लोकांचा देखील अनुभव आपण घेतला आहे. पण आताचा शिवसेना पक्ष, हा अशा लोकांचा नाही. मी आणि माझं कुटुंब म्हणणाऱ्यांचा हा पक्ष नाही तर २४ तास घराचे दरवाजे शिवसैनिकांसाठी उघडे ठेवणाऱ्या बाळासाहेबांचा हा पक्ष आहे. या ठिकाणी आपल्याला राजकीय भाषण करायचे नाही. परंतु शेवटी बाळासाहेबांची भूमिका आणि या सर्वसामान्य माणसाची भूमिका डोळय़ासमोर ठेवून आम्ही सरकार स्थापन केले. माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढय़ा पुरता मर्यादित न राहता अख्खा महाराष्ट्र हे आपले कुटुंब आहे ही भावना ठेवून २४ तास कार्यकर्त्यांसाठी, जनतेसाठी काम करण्याची आपली भूमिका आहे. म्हणूनच काम करणाऱ्यांच्या म्हणजेच महायुतीच्या मागे राज्यातील जनता उभी आहे.

हेही वाचा >>>इम्रान खान “प्लेयर ऑफ द मॅच”; लोकांनी तर कौल दिला, आता पाकिस्तानात काय होणार?

महानगर प्रदेश देशाचे ग्रोथ इंजिन

महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे, जिथे पायाभूत सुविधांची सर्वाधिक कामे सुरू आहेत. पूर्वीच्या सरकारने अनेक प्रकल्पांसमोर अडथळे निर्माण केले होते. आमच्या सरकारने मात्र या सर्व पायाभूत सुविधा, मेट्रो प्रकल्पातील अडथळे दूर केले असून आता सर्व प्रकल्पांची कामे गतीने सुरू आहेत. गेल्या महिन्यात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अटल सेतूचे लोकार्पण झाले. लवकरच सागरी मार्ग आणि मेट्रो-३ सुरू होईल. ठाणे- बोरिवली भुयारी मार्गालाही आता मंजुरी मिळाली आहे. महानगर प्रदेशात ३४० किमी लांबीचे मेट्रो जाळे विस्तारते आहे. बुलेट ट्रेनच्या कामातील अडथळे दूर झाले आहेत. महानगर प्रदेशाचा कायापालट करणारे असे अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यातील काही प्रकल्प पूर्णत्वाकडे आहेत, काही प्रगतिपथावर आहेत तर काहींची कामे लवकरच सुरू होणार आहेत. या प्रकल्पांमुळे महानगर प्रदेशात आर्थिक विकासाची नवी केंद्रे उदयाला येणार आहेत. मुंबई हे देशाचे ग्रोथ इंजिन समजले जायचे. परंतु, आता मुंबईच्या बरोबरीने महानगर प्रदेश नवे ग्रोथ इंजिन म्हणून उदयाला येईल.

राज्यातून उद्योग पळविले, अशा विरोधकांकडून आरोळय़ा ठोकल्या जातात. पण परदेशी गुंतवणुकीतदेखील आपले राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नातही राज्याचा वाटा सर्वाधिक आहे. सर्वाधिक पायाभूत सुविधा प्रकल्प, सर्वाधिक स्टार्टअप महाराष्ट्रातलेच आहेत. महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य करण्यासाठी वन िवडो सिस्टीम तयार केली असून कुठेही परवानग्या अडविल्या जात नाहीत. उद्योगांना लाल फितीचा फटका बसणार नाही याची पुरेपूर काळजी घेत आहोत. यंदाच्या दावोस आर्थिक परिषदेच्या माध्यमातून राज्यात तीन लाख ५३ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले. गेल्याच आठवडय़ात स्टील उदयोगात ४० हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार झाले. आपल्या राज्याकडे एक उद्योगस्नेही राज्य म्हणून जगभरात पाहिले जात आहे. एकूणच प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राचा झंझावात सुरू असून या औद्योगिक भरारीमुळे केवळ रोजगार निर्मितीच होणार नाही तर राज्याचा सर्वागीण विकास होईल, याची मला शंभर टक्के खात्री आहे. तसेच देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलर करण्याचा निर्धार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. या उद्योग भरारीमुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलर करण्याचे लक्ष्य आम्ही नक्की गाठू.

मोदी द्वेष हा विरोधकांचा एकमेव अजेंडा

आज भारताची अर्थव्यवस्था जगभरामध्ये एक अभिमान वाटावा अशी प्रगती करीत आहे. जगभरातल्या अन्य देशांची अर्थव्यवस्था कोलमडत असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणल्यांतर आता ती तिसऱ्या क्रमांकावर आणण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने प्रयत्नशील आहेत. म्हणून देशाच्या प्रगतीबद्दल सगळय़ांना अभिमान वाटला पाहिजे. जगभरात मोदी यांचा आदर आणि लोकप्रियता वाढत असताना आपल्याकडे मात्र मोदीद्वेष हा विरोधकांचा एकमेव अजेंडा सुरू आहे. मोदीसाहेबांची लोकप्रियता वाढली की इकडे यांची तगमग वाढते. परदेशात त्यांचे कौतुक झाले की इकडे यांचा रक्तदाब वाढतो. देशाच्या प्रगतीबाबत त्यांना असूया आहे. सत्तेसाठी कोणत्याही थराला ते (विरोधक) जाऊ शकतात. पण एकीकडे मोदींवर टीका करायची आणि दुसरीकडे मोदींनी सुरू केलेल्या ‘वंदे भारत’ रेल्वेगाडीने प्रवास करायचा, असे त्यांचे सुरू आहे. भविष्यात ते बुलेट ट्रेनमधूनही प्रवास करतील. विरोधकांनी कितीही टीका केली, तरी लोक नेहमी काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभे राहतात. आणि म्हणून सातत्याने काम केले पाहिजे. राज्याचा सर्वागीण विकास झाला पाहिजे. राज्यातील जनतेला काय हवे, काय नको ते आपण पाहिले पाहिजे. तीच राज्यकर्त्यांची जबाबदारी असते. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या नऊ वर्षांत केलेल्या कामाच्या जोरावर या देशाला नवी ओळख मिळवून दिली. देशाचा विकास, या देशाची प्रगती हाच त्यांचा सततचा ध्यास. म्हणूनच मोदी यांनी यावेळेस रालोआ (एनडीए) ला ४०५ जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला असून त्यांच्या या स्वप्नांना महाराष्ट्रातूनही खूप मोठे पाठबळ मिळेल. राज्याचा सर्व बाजूंनी विकास सुरू आहे, त्यामुळे लोकसभेच्या ४५ पेक्षा जास्त जागा मिळतील यात शंका नको.

शब्दांकन – संजय बापट

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chief minister eknath shinde detailed discussion on the progress of lok satta anniversary and varshvedh release ceremony amy

First published on: 11-02-2024 at 01:51 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×