अवनीश पाटील
एखाद्या देशाच्या राजकीय इतिहासाला निर्णायक वळण देणाऱ्या घटना लोकांच्या स्मृतीत राहतातच असे नाही. देशबंधू चित्तरंजन दास यांचे अकाली निधन आपल्या देशाच्या बाबतीतही अशीच एक विस्मृतीत गेलेली घटना आहे. सन १९२५ साली म्हणजे शंभर वर्षांपूर्वी चित्तरंजन दास यांचे झालेले निधन, हा केवळ एका थोर नेत्याचा अंत नव्हता. तर तो बंगालच्या आणि संपूर्ण भारताच्या राजकीय इतिहासाला वळण देणारा एक निर्णायक क्षण ठरला. दास यांच्या जाण्याने एक युगच संपुष्टात आल्याची भावना सर्वत्र पसरली. काही इतिहासकारांनी या घटनेला ‘राष्ट्रीय संकट’ म्हटले, तर काहींनी ‘युगाचा अंत.’ हे दोन शब्द या घटनेची आणि तिच्या परिणामांची तीव्रता अधोरेखित करायला पुरेशी आहे.
देशबंधू चित्तरंजन दास हे स्वदेशी आंदोलनाच्या काळापासूनच भारतीय राजकारणातील परिचित नाव होते. मात्र, १९१७ नंतर त्यांच्या झंझावाती नेतृत्वाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आणि ते राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आले. ते बॅरिस्टर होते. तथापि, ते काही साधेसुधे वकील नव्हते, तर आपल्या काळातले सगळ्यात यशस्वी आणि लोकप्रिय वकील म्हणून त्यांचा दबदबा होता. पण देशाच्या स्वातंत्र्यासाठी १९२० साली त्यांनी आपल्या वकीलीच्या यशस्वी कारकीर्दीवर एका क्षणात पाणी सोडले. गांधीजींच्या असहकार चळवळीत त्यांनी स्वत:ला झोकून दिले आणि काही काळातच या चळवळीचा ते एक प्रमुख चेहरा बनले.
चित्तरंजन दास यांची पार्श्वभूमीही तशीच देदीप्यमान होती. त्यांचा जन्म वैद्य समाजात झाला होता. ब्राह्मो समाजाशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते आणि त्यांनी इंग्लंडमधून कायद्याची पदवी मिळवली होती. उच्चभ्रू वर्तुळात त्यांना प्रचंड मान होता. मात्र देशासाठी आपल्या वैभवावर आणि ऐशोआरामी जीवनावर लाथ मारण्याची धमक त्यांनी दाखवली. त्यामुळेच ते सामान्य माणसाच्या हृदयात जागा मिळवू शकले.
स्वराज्य पक्षाचे नेते म्हणून त्यांनी बंगालमध्ये इंग्रजांची दुहेरी शासनपद्धती अक्षरशः खिळखिळी करून टाकली. इतकेच नाही तर कलकत्ता महानगरपालिकेला राष्ट्रवादी विचारांवर चालणाऱ्या प्रशासनाचा एक उत्तम नमुना म्हणून देशासमोर ठेवले. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हे सर्व करत असताना ते एकाच वेळी तीन-तीन मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळत होते. ते कलकत्याचे (आताचे कोलकाता) महापौर, बंगाल विधान परिषदेतील स्वराज्य पक्षाचे नेते आणि बंगाल प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष होते.
देशबंधू चित्तरंजन दास यांनी बंगालच्या राजकारणाला केवळ नवी दिशाच दिली असे नाही, तर तिथल्या माणसाच्या मनात स्वाभिमानाची ज्योत पेटवली. त्या काळात बंगालच्या राजकारणावर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्यासारख्या नेत्यांचा प्रभाव होता. पण त्यांची विचारसरणी आणि ओळख काहीशी पाश्चात्य विचारात दडली होती. दास यांना हे चित्र मुळापासून बदलायचे होते. त्यांना तीव्रतेने वाटत होते की, बंगालची स्वतःची ओळख या पाश्चात्य प्रभावात हरवून जात आहे, ती थांबवायला पाहिजे.
यावर दास यांनी एक अचूक उपाय शोधला. त्यांनी नव्याने मूळ धरू पाहणाऱ्या ‘प्रादेशिक बंगाली अस्मिते’लाच आपले सर्वात मोठे शस्त्र बनवले. याचा परिणाम लगेच दिसू लागला. १९२० च्या दशकात ही ‘बंगाली जाणीव’ इतकी प्रभावी ठरली की, तिने संपूर्ण राजकीय विचारांवर आपला पगडा बसवला. या अस्मितेच्या स्वाभिमानी हुंकारामुळे बंगाली मनावरील इंग्रजी प्रभाव हळूहळू कमी होऊ लागला. त्यामुळेच, चित्तरंजन दास हे केवळ एक नेते राहिले नाहीत, तर विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात बंगालचा बुलंद आवाज बनले. त्यांनीच बंगालला स्वतःची नवी ओळख शोधायला आणि घडवायला मोलाची मदत केली.
चित्तरंजन दास यांच्यासाठी ‘देश’ हेच सर्वस्व होते. त्यांच्या लेखी, देश म्हणजे केवळ जमिनीचा तुकडा नव्हे, तर साक्षात जिवंत आई, त्यांची मातृभूमी होती. हेच त्यांचे परमोच्च श्रद्धास्थान आणि त्यांच्या कार्याची अंतिम प्रेरणा होती. त्यांचे ठाम मत होते की, बंगालची खरी ओळख, म्हणजेच ‘बंगाली अस्मिता’. आजकाल काहीजण म्हणतात की, राष्ट्रवादाची कल्पना आपल्याला पाश्चात्य देशांकडून मिळाली. पण दास यांनी हा विचार साफ धुडकावून लावला. त्यांच्या मते, जेव्हा परकीय संस्कृतीचा प्रभाव वाढू लागला, तेव्हाच बंगाली माणसाला आपल्या मुळांची आणि आपल्या खऱ्या ओळखीची किंमत अधिक तीव्रतेने जाणवली. दास यांनी बंगालच्या मातीला आणि तिथल्या लोकांना केवळ एक प्रांत म्हणून पाहिले नाही, तर तिला एका जिवंत, शक्तिशाली आणि तेजस्वी आईचे रूप दिले. याच प्रेमळ आईला ते मोठ्या आदराने ‘बंगमाता’ किंवा ‘देशांबिका’ म्हणून संबोधायचे. जणू काही ती भूमी नसून, साक्षात एक देवताच आहे, जी आपल्या लोकांचे रक्षण करते आणि त्यांना प्रेरणा देते.
तुमचा धर्म कोणताही असो, तुमची पहिली ओळख ‘बंगाली’ आहे!” – देशबंधू चित्तरंजन दास यांनी दिलेला हा केवळ एक राजकीय सिद्धांत नव्हता, तर बंगालच्या विखुरलेल्या समाजाला एका सूत्रात बांधणारा तो एक क्रांतिकारी मंत्र होता. त्यांच्या याच एका धाग्याने समाजातील तथाकथित उच्चभ्रू हिंदू, मुस्लिम आणि इतर सर्व घटकांना एकत्र बांधले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. जातीपातीच्या अभिमानाला त्यांनी हिंदू धर्माला आतून पोखरून काढणारी कीड म्हटले. ‘ख्रिश्चन, मुस्लिम, इतकेच काय, चांडाळसुद्धा आपले बांधवच आहेत,’ असे ते ठणकावून सांगायचे.
१६ जून, १९२५ रोजी साध्या तापाने सुरू झालेले आजारपण आणि त्यात आलेला हृदयविकाराचा झटका त्यांच्या जीवावर बेतेल, अशी कुणी कल्पनाही केली नव्हती. त्यांच्या या अनपेक्षित जाण्याने अवघा देश सुन्न झाला. एखाद्या नेत्यावर जनतेचे किती अलोट प्रेम असू शकते, याचं जिवंत उदाहरणच त्या दिवशी पाहायला मिळाले. ही दुःखद बातमी दार्जिलिंगमध्ये कळताच, त्यांच्या ‘स्टेप असाईड’ नावाच्या घराकडे लोकांच्या झुंडीच्या झुंडी धावू लागल्या. बघता बघता घराबाहेर मोठा जनसमुदाय गोळा झाला होता. कुणालाही काही सुचत नव्हते, प्रत्येकजण स्तब्ध होता. अनेकांच्या डोळ्यांतील अश्रूंचा बांध फुटला होता. आपला कुणीतरी खूप जवळचा, हक्काचा माणूस कायमचा निघून गेल्याची भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
कलकत्त्याच्या सियालदह स्टेशनवर जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त माणसांची डोकी दिसत होती. जणू ‘माणसांचा महासागर’च आपल्या लाडक्या नेत्याच्या अंत्ययात्रेची वाट पाहत होता. या विराट अंत्ययात्रेत दास यांना खुद्द महात्मा गांधींनी खांदा दिला होता. एका अंदाजानुसार, या यात्रेत तब्बल दोन ते तीन लाख लोक सहभागी झाले होते. दोन मैलांचे अंतर पार करायला या गर्दीच्या महासागराला तब्बल सहा तास लागले. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती की, गर्दीला शांत करण्यासाठी खुद्द गांधीजींना कुणाच्या तरी खांद्यावर उभे राहावे लागले. चिता पेटवताना तर लोकांचा लोंढा थेट चंदनाच्या चितेवर कोसळतो की काय, अशी भीती वाटत होती. या सगळ्यात एक गोष्ट विशेष लक्ष वेधून घेत होती. अंत्ययात्रेच्या सर्वात पुढे, फुलांच्या सजावटीत गांधीजींचे प्रतीक असलेला ‘चरखा’ ठेवण्यात आला होता. या एका गोष्टीवरून स्पष्ट होत होते की, गांधीजींनी देशबंधूंच्या कार्याचे आणि त्यांच्या प्रतीकांचे महत्त्व किती अचूक ओळखले होते. ते एका नेत्याच्या निधनासोबतच, एका विचारालाही तितकाच मान देत होते.
देशबंधू दास यांच्या निधनाने भारतीय इतिहासावर, विशेषतः बंगालच्या राजकारणावर फार दूरगामी परिणाम झाले. एक नाजूक राजकीय समतोल टिकवून ठेवण्यासाठी त्यांची भूमिका किती निर्णायक होती, याची त्यांच्या समकालीन नेत्यांना पूर्ण जाणीव होती. बंगाल आज विधवा झाला आहे,’ अशा शब्दांत दुःख व्यक्त करत महात्मा गांधीजींनी देशबंधूंची जागा कोणीही घेऊ शकणार नाही, असे म्हटले. लोकमान्य टिळकांच्या जाण्याने देशाच्या नेतृत्वात जी पोकळी निर्माण झाली होती, तीच देशबंधूंच्या निधनाने पुन्हा एकदा त्यांना जाणवली. या नेतृत्त्वहीन अवस्थेत, आकाशच कोसळल्यासारखे आणि जमीन हादरल्या सारखी वाटत होती. याच अस्थिरतेमुळे आता हिंदू-मुस्लिम संघर्षाला तोंड फुटेल, अशी महात्मा गांधीजींना भीती होती.
देशबंधूंचे राजकीय वारसदार, सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या गुरूच्या निधनाचे वर्णन ‘बंगालच्या तरुणाईसाठी कधीही न भरून निघणारे नुकसान’ आणि ‘संपूर्ण भारतासाठी एक घोर राष्ट्रीय संकट’ असे केले. बोस यांनी स्पष्टपणे म्हटले की, जून १९२५ हे भारताच्या अलीकडच्या इतिहासातील एक निर्णायक वळण होते आणि जर देशबंधू आणखी काही वर्षे जगले असते, तर भारताचा इतिहास निश्चितच वेगळा असता.
देशबंधूंच्या जाण्याने नेमकं काय गमावले, याचे अचूक विश्लेषण इतिहासकार जॉन ब्रूमफिल्ड यांनी केले आहे. त्यांच्या मते, देशबंधूंनी केवळ राजकारण केले नाही, तर एक अशी मजबूत राजकीय व्यवस्था उभारली होती, ज्यामुळे बंगालमधील उच्चवर्णीय हिंदू नेते राजकारणाच्या केंद्रस्थानी टिकून होते. ते जणू या नेतृत्वासाठी एक अभेद्य कवच होते. पण देशबंधूंच्या जाण्याने हे कवचच जणू भंग पावले. ज्यावेळी राष्ट्रवादी चळवळीत मतभेद वाढत होते आणि हिंदू-मुस्लिम संबंध ताणले जात होते, त्याच नेमक्या निर्णायक क्षणी बंगालचा हिंदू ‘भद्रलोक’ (उच्चभ्रू) समाज पोरका झाला, नेतृत्वहीन झाला. इतिहासकार ब्रूमफिल्ड पुढे म्हणतात, हा धक्का तात्पुरता नव्हता. देशबंधूंच्या मृत्यूने हिंदू राजकारण्यांनी जे राजकीय नेतृत्व गमावले, ते त्यांना पुढची दोन दशके, थेट बंगालच्या फाळणीपर्यंत, परत मिळवताच आले नाही. ते राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले गेले आणि एका हतबल, निष्प्रभ विरोधी पक्षाच्या भूमिकेत अडकून पडले.
गटबाजीने पोखरलेले राजकारण आणि धार्मिक द्वेषाने धुमसणारा समाज; या बंगालच्या स्फोटक समीकरणाला हाताळणे हे एखाद्या अग्निदिव्यापेक्षा कमी नव्हते. पण देशबंधू चित्तरंजन दास यांच्याकडे ही कला होती. बंगालच्या राजकारणातील आग विझवण्याची अनोखी हातोटी देशबंधूंमध्ये होती. मुस्लिम नेते दुसऱ्या कुठल्याही हिंदू नेत्यापेक्षा जास्त विश्वास देशबंधूंवर ठेवायचे. या विश्वासाचेच फळ म्हणजे १९२३ साली झालेला ‘हिंदू-मुस्लिम करार’. यात त्यांनी राजकीय पाठिंब्याच्या बदल्यात मुस्लिमांना सरकारी नोकऱ्यांमध्ये मोठा वाटा देण्याचे वचन दिले. देशबंधूंनी ज्या गटबाजीला आणि धार्मिक द्वेषाला आपल्या करिष्म्याने आवर घालून ठेवला होता, तो त्यांच्या निधनानंतर पुन्हा उफाळून आला. त्यांच्या निधनाने एका पर्वाचा अस्त झाला आणि बंगालच्या इतिहासातील ‘दुर्दैवी दशकांची’ सुरुवात झाली. या दशकांमध्ये बंगालने धार्मिक हिंसाचार, युद्ध, दुष्काळ आणि अखेरीस फाळणीचे भीषण वास्तव अनुभवले.
avnishpatil@gmail.com