वाट कितीही बिकट असू दे, एकमेकांना साथ देत पुढे जात राहायचं… शिख समुदायात दिसणारा हा भाईचारा, त्यांची आक्रमक लढाऊ आणि तेवढीच कल्पक- जुगाडू वृत्ती सध्या सरकारला फारच तापदायक ठरतेय. किमान आधारभूत किंमत आणि अन्य मागण्यांसाठी पुन्हा एकदा दिल्लीच्या दिशेने निघालेले शेतकरी अश्रुधुरापासून, वॉटर कॅननपर्यंत प्रत्येक आव्हानावर आपल्यापरीने उत्तर शोधत आहेत. यावेळी तर त्यांच्या गाठीशी आधीच्या आंदोलनाचा अनुभवही आहे…

एवढा दूरचा पल्ला गाठायचा तर इंधन वाया दवडून चालणार नाही. म्हणून एकाच वेळी सर्व ट्रॅक्टर्स न चालवता, एका ट्रॅक्टरला दोन- दोन ट्रॉली किंवा एखाद- दोन ट्रॅक्टर्स जोडून रॅली धीम्या गतीने पुढे नेत डिझेल वाचवलं जातंय.

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
child who fell into the open canal rescued
सोलापूर: उघड्या कूपनलिकेत पडलेल्या बालकास सुखरूप बाहेर काढण्यास यश
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

हेही वाचा – फली नरीमन ‘हिंदू-धर्माधारित राज्या’बद्दल काय म्हणाले होते?

आकाशातून आश्रुधुराच्या नळकांड्या टाकणारे ड्रोन इतरत्र भारकटावेत म्हणून उडवण्यात आलेल्या पतांगांचे व्हिडीओ तर व्हायरल झाले आहेतच. पण अश्रुधुरापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी आणि या नळकांड्या निष्प्रभ करण्यासाठी साधे सोपे उपाय करण्यात येत आहेत. कोणी डोळ्यांना स्विमिंगसाठीचे चष्मे लावून फिरत आहेत, कोणी हेल्मेट घातलं आहेत, कोणी मास्क लावले आहेत तर कोणी जमिनीवर पडणाऱ्या नळकांड्यांवर ओली गोणपाटं टाकून त्या विझवत आहेत. काहींच्या मते इनो किंवा मीठ खाल्लं तरी अश्रुधुरापासून काही प्रमाणात संरक्षण मिळतं. त्यामुळे त्याचाही वापर होत आहे. धूर दूर लोटण्यासाठी शेतकऱ्यांनी एक्झॉस्ट फॅन सदृश भले मोठे पंखे तयार केले आहेत. पाईपमधून हवेचा जोरदार झोत सोडणारी, अश्रुधुराच्या नळकांड्या विझवण्यासाठी पाणी फावरणारी यंत्रही या ट्रॉलीजवर उभारण्यात आली आहेत. अश्रुधुराचा परिणाम केवळ डोळ्यांपर्यंतच सीमित राहत नाही. चेहऱ्यावरच्या त्वचेलाही त्यामुळे इजा होते. त्वचेची जळजळ थांबवण्यासाठी मुलतानी माती वापरली जात आहे. डोक्यावर पग (शिखांची पगडी) परिधान केलेले, गॉगल आणि मुलतानी माती लावलेले अनेक चेहरे वृत्त वाहिन्या आणि समाजमाध्यमांवरून प्रसारित झालेल्या दृश्यांत दिसत आहेत.

वाहनांना चिलखत…

सरकारशी चौथ्या फेरीतली चर्चा फिसकटल्यानंतर आंदोलनाने आणखी उग्र रूप धारण केलं आहे. सरकारने घातलेली तारेची कुंपणं उखडून टाकण्यासाठी, वाटेत उभारलेल्या भिंती पाडण्यासाठी पोकलेन, जेसीबी आंदोलनस्थळी आणण्यात आले आहेत. या वाहनांवर हल्ला झाला तरीही त्यांची फार हानी होऊ नये, टायरवर गोळीबार करून ते निकामी केले जाऊ नयेत आणि मुख्य म्हणजे चालकाला इजा होऊ नये म्हणून वाहनांना संपूर्णपणे लोखंडी पत्र्यांचं कवच चढवण्यात आलं आहे.

पूल अडवलात तर नवा बांधू!

शंभू बॉर्डरवरून हरयाणामध्ये जाऊ पाहणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी हरयाणा सरकारने घग्गर नदीवरचा पूल बॅरिकेड्स लावून बंद केला होता. त्यामुळे शेतकरी पुढे जाऊ शकत नव्हते. मात्र आता त्यांनी स्वतःच रेती आणि सिमेंट भरलेली शेकडो पोती ट्रॅक्टर भरभरून आणली आहेत. आम्हीच नदी पार करण्यासाठी पूल तयार करू असं त्यांचं म्हणणं आहे. हे कितपत शक्य आणि व्यवहार्य आहे याचा अंदाज बांधणं शक्य नसलं तरीही शेतकऱ्यांची जबरदस्त जिद्द आणि चिकाटी मात्र त्यातून दिसते.

ट्रॉली नव्हे ट्रान्सफॉर्मर

एक साधी, सामान वाहून नेणारी ट्रॉली किती प्रकारे वापरता येऊ शकते याची प्रात्यक्षिकं या आंदोलनात जागोजागी दिसत आहेत. साध्या प्लास्टिकच्या ताडपत्रीने झाकलेल्या ट्रॉलीपासून ते टॉयलेट, किचन असलेल्या, रुग्ण आणि वृद्धांच्या सोयीसाठी एअर कंडीशनर लावलेल्या, व्होल्व्हो बस सारखे टायर आणि सीट्स बसवलेल्या, छतावर सोलार पॅनल लावलेल्या, पडदे किंवा लाकडी फळ्या लावून स्त्रियांसाठी आडोसा केलेल्या, किराणा सामान, गाद्या, चार्जिंग पॉइंट्स, कपडे वाळवण्यासाठी दोऱ्या… असं सारं काही असलेल्या ट्रॉली शेतकऱ्यांच्या सर्जनशीलतेचं आणि तगून राहण्याच्या जिद्दीचं चालतं बोलतं प्रदर्शन ठरत आहेत. ट्रॉलीमध्ये जागा नसेल तर ट्रॉलीखालच्या जमिनीवर- चारा भरलेल्या गाद्या आंथारून किंवा चकांमधल्या जागेत- लाकडी फळी टाकून त्यावर झोपणारेही अनेक आहेत. यातल्या बहुतेक सुविधा शेतकऱ्यांनी स्वतःची कौशल्य आणि शेतीसाठीचं साहित्य वापरून निर्माण केल्या आहेत.

लंगर बाबे नाणक दा…

शीख समुदाय सर्वत्र ओळखला जातो तो त्यांच्या लंगरसाठी. गुरुद्वारात आलेल्या प्रत्येकाला जात- धर्म न पाहता पोटभर जेवण मिळेल, याची दक्षता घेणारा हा समुदाय इथेही सर्वांच्या खाण्यापिण्याची काळजी घेत आहे. लंगर बाबे नाणक (गुरू नानक) दा… अशा घोषणा देत रोज शेकडो किलो अन्न शिजवलं आणि वाटलं जात आहे.

आंदोलनकर्ते थंडी- वाऱ्यात, वॉटर कॅनन, रबरी बुलेट्स आणि अश्रुधुराच्या माऱ्यात तगून राहवेत म्हणून त्यांचे देशभरातले हितचिंतक शक्य ते सारं काही करत आहेत. मग ते स्वतः शेतकरी असोत वा नसोत.

कपूरथळा इथले एक हलवाई एक भलं मोठं मशीन घेऊन मोर्चाबरोबर मार्गक्रमण करत आहेत. हे मशीन आहे कॉफी बनवणारं. पाईपमधून सतत वाहणारं उकळतं, फेसाळतं दूध आणि दुसऱ्या पाईपमधून बाहेर पडणारी गरम वाफाळती कॉफी… पाच मिनिटांत १०० कप कॉफी तयार करण्याची क्षमता या यंत्रात आहे. उत्तरेतल्या थंडीत दिवसभर उघड्यावर असलेल्यांसाठी ही गरम कॉफी मोठा दिलासा ठरत आहे. गुरुदासपूरच्या एका व्यक्तीने घाऊक प्रमाणात रोट्या तयार करणारं एक यंत्र आणलं आहे. कोणी पटियाळातून ऊस घेऊन येतंय तर कोणी लुधियानातून रस काढण्याचं यंत्र आणून ठेवलंय. लहान मोठा, उच्च – नीच, श्रीमंत – गरीब असेल फुटकळ भेद विसरून जेवण शिजवण्यापासून भांडी विसळण्यापर्यंत सगळी कामं सेवा म्हणून केली जातायत. अनेक यूट्यूबर्स, ब्लॉगर्स ही माहिती जगापर्यंत पोहोचवतायत…

हेही वाचा – जैवउत्पादने हा संधींचा पेटारा

पण ही सारी सज्जता नापास ठरवणारे दिवसही येतात. बुधवार, २१ फेब्रुवारी हा असाच नापास दिवस ठरला. दिल्लीच्या दिशेने रवाना होण्यासाठी पूर्ण सज्ज असलेल्या आंदोलनकर्त्यांवर अचानक शोककळा पसरली. एकीकडे सरकारकडून चर्चेच्या पाचव्या फेरीचा प्रस्ताव ठेवला जात असताना दुसरीकडे अश्रुधुरचा जोरदार वर्षाव सुरूच होता. त्या धुमश्चक्रीत शुभकरण सिंग या तरुणाचा डोक्याला मार लागून मृत्यू झाला आणि संपूर्ण जात्था शोकात बुडून गेला… केवळ रबर आणि प्लास्टिकच्या गोळ्याच नाहीत तर पेलेट गनचासुद्धा वापर केला जातोय, असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. वापरण्यात येतं असलेल्या आश्रुधुराच्या नळकांड्या मुदत संपलेल्या आहेत, असे दावेही केले जात आहेत. अनेकांना जखमी झाल्यामुळे किंवा डोळ्यांना इजा झाल्यामुळे उपचार घ्यावे लागत आहेत. हा संघर्ष आणखी किती काळ सुरू ठेवावा लागणार, किती काळ घरापासून दूर, असं उघड्यावर रहावं लागणार आणि कोणाला काय काय गमावावं लागणार याचे आडाखे या घडीला कोणीच बांधू शकत नाही.

पण लढे हे असेच असतात.. त्यात यश येवो वा अपयश- अनेकांना बरंच काही गमावावं लागतं. पण म्हणून हातावर हात घेऊन बसून राहणंही शक्य नसतं. विरोधी आवाजावर लेबल चिकटवून मोकळं होण्याच्या आजच्या काळात खलिस्तानी म्हणून कितीही हिणवलं जात असलं तरीही शीख समुदायाच्या लढाऊ बाण्याबद्दल कोणालाही शंका असणार नाही. मोर्चा जिंदाबाद करेंगे… हा हौसला तीन वर्षांपूर्वीही होता आणि यापुढेही कायम राहील अशीच चिन्हं आहेत…

vijaya.jangle@expressindia.com