रोशन विनायक बनकर
तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रावर देखील कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) प्रभाव वाढत आहे. भाषणे तयार करणे, निबंध लेखन, प्रश्नोत्तरे मिळवणे किंवा शाळेतील कार्यक्रमांचे वृत्तलेखन करणे अशा कामांसाठी आज अनेक शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर करत आहेत. परंतु या सोयीमुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. शिक्षण हे ज्ञान देण्यापुरते राहते का, की विचार, चिंतन आणि सृजनशीलता ही हळूहळू कमी होत चालली आहे? शिक्षक आणि विद्यार्थी तयार उत्तरांवर अवलंबून राहिले, तर भविष्यात त्यांच्या विचारशक्तीवर परिणाम होण्याचा धोका नाही का?
तंत्रज्ञानाची झपाटलेली दुनिया
आजचा काळ कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे. औद्योगिक क्षेत्र असो, शेती असो किंवा आरोग्यसेवा, सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर झपाट्याने वाढत आहे. या तंत्रज्ञानाने माणसाचे श्रम कमी केले, कार्यक्षमता वाढवली, आणि अनेक क्षेत्रात अचूकता आणली. मात्र शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा प्रवेश होताना गंभीर प्रश्न उभा राहतो. शिक्षण म्हणजे फक्त माहिती देणे नाही, तर विचार, चिंतन आणि सर्जनशीलता जागवण्याची प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रश्नाचे उत्तर रेडिमेड स्वरूपात मिळाले, तर वाचनाची सवय, विषय समजून घेण्याची क्षमता आणि चिंतनशीलता कमी होते. या प्रक्रियेतूनच विद्यार्थ्यांच्या मनात विचार करायला शिकण्याची सवय निर्माण होते, जी फक्त माहिती मिळवण्यापुरती मर्यादित राहिली तर त्याचा दीर्घकालीन परिणाम चिंताजनक ठरतो.
वाढता एआय वापर
आज प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षक व विद्यार्थीही कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर करीत आहेत. भाषणे तयार करणे, वृत्तलेखन करणे, निबंध किंवा पत्र लेखन तयार करणे हे सर्व कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीद्वारे क्षणार्धात मिळते. यामुळे शिक्षकांचा वेळ वाचतो, विद्यार्थ्यांना लगेच उत्तर मिळते, परंतु त्याच वेळी विचारशक्ती कमी होण्याचा धोका वाढतो. विद्यार्थ्यांना या साधनांच्या सोयीचा उपयोग करायला शिकवला जातो, पण स्वतः विचार करून उत्तर शोधण्याची सवय कमी होते. त्यामुळे तयार उत्तरांवर अवलंबून राहण्याची मानसिकता वाढते आणि स्वतः विचार करून शिकण्याची जिद्द हळूहळू कमी होते.
अनेक शिक्षक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर करून वर्गातील काम जलद पार पाडतात. उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांना पाच प्रश्न आणि उत्तरं तयार करण्यासाठी सर कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीकडे फोटो पाठवतात, आणि विद्यार्थी ती उत्तरे प्रत्यक्ष धडा न वाचता वर्गात दाखवतात. यामुळे त्यांच्यातील स्वत: विचार करून उत्तर शोधण्याची क्षमता कमी होण्याचा धोका निर्माण होतो, ज्याला दीर्घकालीन शिक्षणावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
मार्गदर्शकच मार्ग हरवतो तेव्हा…
एका प्रसिद्ध खाजगी व्यवस्थापनाच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक भेटले असता त्यांनी अभिमानाने सांगितले. “आम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीच्या मदतीने भाषणे तयार करतो, पालक-शिक्षक बैठकीचे मुद्दे मिळवतो, कार्यक्रमांचे वृत्तलेखनसुद्धा तयार करतो. अगदी मीटिंगमध्ये काय बोलायचे हे देखील कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली सुचवते.”
मुख्याध्यापकांच्या या विधानाने एक गंभीर प्रश्न उभा राहतो, शिक्षक किंवा मुख्याध्यापक स्वतः विचार न करता सर्व गोष्टींसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीवर अवलंबून राहत असतील, तर विद्यार्थ्यांना कोण शिकवणार? असेच होत राहिले आणि व्यवस्थापनाने उद्या “रोबोटिक मुख्याध्यापक” आणला, तर चालेल?
या मुख्याध्यापकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीकडून हे काम कसे करून घेतले जाते ते दाखवले. त्यातून लक्षात आले की ज्या शिक्षणपद्धतीत शिक्षक स्वतःचा अनुभव, निरीक्षणशक्ती आणि ज्ञान वापरत नाहीत, ती विचार हरवणारे शिक्षण घडवू शकते. शिक्षक हा केवळ माहिती देणारा नसतो, तर विद्यार्थ्यांना विचार करण्यास प्रवृत्त करणारा मार्गदर्शक असतो; तो स्वतः विचार करत नसेल, तर भविष्यातील पिढी फक्त रेडिमेड उत्तरांवर अवलंबून राहील.
चिंतनशीलतेवर आघात
एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत वर्षाला लाखभर फी भरून शिकणारा सातव्या वर्गातील विद्यार्थी सांगतो की “सरांनी पाच प्रश्नोत्तरे लिहून आणायला सांगितली. मी त्या धड्याचा फोटो चॅटजीबीटीवर टाकला आणि त्याने तयार केलेली उत्तरे दुसऱ्या दिवशी वर्गात दिली.”
ही साधी घटना प्रत्यक्षात चिंताजनक आहे. विद्यार्थी धडा वाचत नाही, अर्थ समजून घेत नाही, स्वतः विचार करत नाही. फक्त तयार उत्तर लिहितात. त्यामुळे वाचनाची सवय, समजून घेण्याची क्षमता आणि चिंतनशीलता हळूहळू कमी होते.
शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना फक्त कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीच्या उत्तरांवर अवलंबून न राहता, त्या उत्तरांचे विश्लेषण करायला शिकवले पाहिजे. उदाहरणार्थ, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीने दिलेली उत्तरे चुकीची असली तर ती लक्षात येईल आणि विद्यार्थ्यांना स्वतः विचार करून बरोबर उत्तर शोधण्याची सवय लागेल.
वापर आवश्यक पण मर्यादित
कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर चुकीचा नाही; ते एक उपयुक्त साधन आहे. योग्य मार्गदर्शनाखाली वापरल्यास विद्यार्थ्यांच्या क्षमतेत भर पडू शकते. पण अविचाराने किंवा अतिरेकी वापराने शिक्षण विचारशून्य आणि परावलंबी बनते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा सर्जनशील आणि मर्यादित वापर शिकवणे आवश्यक आहे, जेणेकरून कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली केवळ साधन राहील, आधार नव्हे.
कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली औद्योगिक आणि कृषी क्षेत्रात फायदेशीर ठरू शकते, पण शिक्षण क्षेत्रात ती माणसाचा विचार करण्याचा स्वभाव हरवू शकते. शिक्षणाचे ध्येय केवळ माहिती देणे नाही, तर विचार करायला शिकवणे हे आहे. आजचा प्रश्न फक्त इतकाच आपण मुलांना शिकवत आहोत की विचार थांबवायला शिकवत आहोत?
कारण कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा विचार देऊ शकते, पण विचार करण्याची सवय मात्र माणसालाच जोपासावी लागते.
roshan0906@gmail.com