कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त)
फिल्ड मार्शल आर्चीबाल्ड वेव्हेलनुसार; “कॅव्हेलरी मॅन टेल्स अबाऊट व्हिक्टरी, आर्टिलरी मॅन डिस्प्लेज फायर पॉवर, सिग्नल अँड इंजिनियर मॅन कोट्स हिज प्राईझ बट ए इन्फंट्री मॅन कामली किप्स हिज अचिव्हमेंट अंडर हिज बूट्स”. माझ्या माहितीनुसार, इन्फंट्री हा शब्द फ्रेंच शब्द ‘इन्फंट्री सर्का १५७० एडी’ आणि इटालियन शब्द ‘इन्फंट्रीया’पासून आला असून त्याचा अर्थ ‘पायदळ सैनिक’ आहे. प्रत्यक्षात इन्फंट्री ‘युद्धभूमीची मास्टर’ असते. तिला ‘क्वीन ऑफ बॅटल’ म्हणजेच ‘युद्धाची राणी’ असेही म्हणतात, कारण बुद्धिबळाचे पटल युद्धभूमीसारखे असते आणि राणी हा त्या खेळातील सर्वांत निपुण आणि कुठेही जाऊ शकणारा मोहरा असतो. त्याच प्रमाणे; शत्रू प्रदेशात घुसखोरी करण्यासाठी, घातक/कमांडो कारवाई युद्धात प्रत्यक्ष हल्ला करून जिंकलेल्या जमिनीचे रक्षण करण्यासाठी, कैद्यांना ताब्यात ठेवण्यासाठी, शस्त्रास्त्र हस्तगत करण्यासाठी आणि दिलेले राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पायदळाशिवाय पर्यायच नसतो.
युद्धांत पायदळाचे शौर्य, बलिदानाची अनेक उदाहरण आढळतात. महाभारतात ‘संशप्तक’ या पायदळ सैनिकांनी केलेल्या शौर्य गाथांचे वर्णन सापडते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायदळाने केलेल्या पराक्रमाच्या अनेक कथा आहेत. स्वातंत्र्यानंतर; १९४७मध्ये मेजर शैतान सिंह, ६२मध्ये मेजर धनसिंग थापा, ६५मध्ये हवालदार अब्दुल हमीद, ७१मध्ये नायक अल्बर्ट एक्का, ८७मध्ये सुभेदार बाना सिंग मेजर परमेश्वरन आणि ९९मध्ये कॅप्टन विक्रम बत्रा आणि सुभेदार मेजर योगेंद्र सिंह यादव यांच्या शौर्यगाथा, भारतीय पायदळ सैनिकांच्या शौर्याची उदाहरणे आहेत. सीआरपीएफ जवानांच्या नक्षलींविरोधातील शौर्याच्याही अनेक कथा आहेत. नैसर्गिक आपत्तींतही पायदळाने गाजवलेल शौर्य उल्लेखनीय आहे.
भारतीय लष्कर आणि स्थलसेनेत पायदळाच (इंडियन मॅन) महत्व अनन्य साधारण आहे. २७ ऑक्टोबर, १९४७ला श्रीनगरला पाकिस्तानी कबाईल्यांच्या आक्रमणासून वाचवण्यासाठी ‘सिख रेजिमेंट’ची पहिली बटालियन तिथे उतरली तो दिवस स्थलसेनेत पायदळ दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आज दोन अशा चकमकींबद्दल जाणून घेऊया ज्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही पायदळाने धैर्याचे उदाहरण घालून दिले.
पहिली घटना श्रीलंकेतील घनदाट जंगलात, असंख्य शत्रूंनी घेरलेल्या, बाकी युनिटपासून वेगळ्या पडूनही पूर्ण रात्रभर लढत असताना दारूगोळा संपल्यामुळे शेवटचा ‘बायोनेट चार्ज’ शहीद झालेल्या तीस खालसा (सिख) सैनिकांची आहे. मी ब्रिगेड मेजर असताना हे युनिट आमच्या ब्रिगेडचा हिस्सा असल्यामुळे मी यातील बहुतांश सैनिकांना ओळखत होतो.
तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी श्रीलंकेतील ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तामिल इलाम’ला (एलटीटीई) शरण येण्यास भाग पाडण्यासाठी १९८७मधे भारतीय शांतीसेनेचा सहभाग असलेले ‘ऑपरेशन पवन’ सुरू केले होते. पण अंतिम घटकेला वेलूपिल्लाई प्रभाकरननी हत्यारांसह शरण येण्यास नकार दिल्यामुळे, येनकेन प्रकारे त्याला नि:शस्त्र करण्यासाठी सशस्त्र अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. हा अपरिपक्व राजकीय निर्णय होता. भारतीय सेनेसाठी हा मोठा सामरिक धक्का होता. या अभियानाचा ओनामा, १२ ऑक्टोबर, १९८७ला रात्री बाराच्या सुमारास ५४ इन्फंट्री डिव्हिजनच्या ‘जाफना स्पेशल हेलिबॉर्न ऑपरेशन’द्वारे झाला. यासाठी; १० पॅरा कमांडोचे १२० कमांडो आणि १३ सिख लाईट इन्फन्ट्री बटालियनचे ३६० सैनिक नियुक्त करण्यात आले.
पहिल्या टप्प्यात; ४० पॅरा कमांडोंची पहिली तुकडी मेजर शेओनान सिंग आणि १३ सिख लाईट इन्फंट्रीचे ३० सैनिक मेजर बिरेंद्र सिंगच्या नेतृत्वात दोन हेलिकॉप्टर्सने निघाले. ऑपरेशनल प्लॅननुसार; पॅरा कमांडोंना एलटीटीई नेत्यांचा शोध आणि सिख लाईट इन्फंट्रीला लँडिंग ग्राउंडचे रक्षण करण्याची जबाबदारी दिली होती. स्वाभाविक, बिरेंद्र सिंगचे हेलिकॉप्टर सर्वांत आधी लँड झाले. मेजर शेओनान सिंगच हेलिकॉप्टर थोड्या दूरवर लँड झाले. बाकी ट्रुप्स नंतरच्या सॉर्टीमधे येणार होते. १३ सिख लाईट इन्फंट्रीचे ३० वीर खालसे लँडिंग ग्राउंडवर ताबा मिळवून त्याचे रक्षण करण्यासाठी हेलिकॉप्टरद्वारे मेजर बीर सिंगच्या नेतृत्वात उत्तर श्रीलंकेतील जाफना विश्व विद्यालयाच्या प्रांगणात उतरले. हे काम कठीण आहे याची जाणीव त्यांना होती पण त्यांना ही कल्पना नव्हती की भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या नकळत एलटीटीईने त्यांचा रेडियो मेसेज इंटरसेप्ट करून या ऑपरेशनची माहिती आधीच मिळवली होती. प्रभाकरनने भारतीय हेलिकॉप्टर जाफना युनिव्हर्सिटीच्या लँडिंग ग्राउंडमधे उतरतील याची खूणगाठ बांधून अँबुशची तयारी केली. युनिव्हर्सिटी कॅम्पसला एका किल्ल्याचे स्वरूप देऊन त्यांनी पूर्ण तयारी केली.
सिख ट्रूप्स युनिव्हर्सिटीच्या प्रांगणात उतरता क्षणीच लिबरेशन टायगर्सनी त्यांच्यावर स्वयंचलित रायफल्सनी गोळ्यांचा तुफान मारा केला. सिख प्लॅटूनचा पहिला बळी त्यांचा रेडियो ऑपरेटर झाल्यामुळे त्यांचा एयर बेसमधील इंडियन मिलिटरी हायकमांडशी संपर्क तुटला आणि कुमक मागवण्याचे सर्व मार्ग खुंटले. ३० सिख सैनिक त्या अनोळखी भागात एकटे लढत होते. ३००हून अधिक इलाम गनिमांचा सामना करत होते. एलटीटीई सुप्रीमो प्रभाकरनने या सर्वांना जिवंत पकडण्याचे आदेश दिले होते, पण त्यात टायगर्स अपयशी ठरलेत. वीर सिख सैनिकांनी त्यांना अजिबात दाद दिली नाही. १३ ऑक्टोबरच्या सूर्योदयानंतर बिरेंद्र सिंग व सुभेदार संपूर्ण सिंगही शहीद झाल्यानंतर ३० पैकी केवळ तीन सैनिक उरले. त्यांनी जवळपास साडेअकरा वाजेपर्यंत एलटीटीईला जवळ येऊ दिले नाही. त्यांचा दारूगोळा संपल्यावर त्या तिघांनी आपल्या रायफल्सवर बायोनेट चढवले आणि तीन दिशांनी “बोले सो निहालचा नारा देत, एकसाथ शत्रूवर हल्ला केला. त्यातील दोघांची एलटीटीईने हत्या केली आणि जखमी नायक गोरा सिंगला युद्धबंदी केले. या आधी, सारागढीच्या लढाईत तत्कालीन सिख इन्फंट्रीच्या जवानांनी दिलेल्या आत्माहुतीची आठवण करून देणारा क्षण होता तो.
१२ सप्टेंबर १८९७ ला ब्रिटिश भारतीय लष्कराच्या २१ सिख सैनिकांवर, १०,०००पेक्षा अधिक आदिवासी पख्तुन ओराकझाईंनी,उत्तर पश्चिम फ्रंटियर प्रांतातील (आता पाकिस्तानचा खैबर पख्तुनखवा प्रांत) सारागढीमधे हल्ला केला. हवलदार इशर सिंहच्या नेतृत्वाखालील सिख सैनिकांनी, हार पत्करण्याऐवजी लढून मृत्यूस तोंड देण्याचा निर्णय घेतला. लष्करी इतिहासकार याला, इतिहासातील सर्वांत महान लढा म्हणतात. सरते शेवटी, आपला देश आणि युनिटचे नाव राखण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढलेल्या, आपल्या शूर सहकाऱ्यांच्या बलिदानाची गाथा कथन करण्यासाठी त्या तीनपैकी फक्त नायक गोरा सिंग वाचला होता. दोन दिवस उलटून गेल्यावरही बिरेंद्र सिंगकडून जाफन्याची काहीच खबरबात मिळाली नाही म्हणून मुख्यालय चिंतीत झाले. पुढेही यांच्याशी संपर्क न होऊ शकल्यामुळे, या लोकांची काहीच माहिती न मिळाल्यामुळे, इंडियन पीस किपिंग फोर्स मुख्यालयाने त्यांना शोधण्यासाठी आणि मेजर शेओनान सिंगच्या जवानांना सोडवण्यासाठी १० पॅरा कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल दलबीर सिंग यांच्या नेतृत्वाखाली एक मदत दल, ६५ आर्मर्ड रेजिमेंटच्या तीन टी-७२ टँकसह पाठवले. १८ तासांच्या लढ्यानंतर त्यांची सुटका झाली. वो कहानी फिर कभी.
जेव्हा ही सर्च अँड रेस्क्यू पार्टी तिथे पोचली तेव्हा त्यांना त्या जागेवर सिख एलआयचे छिन्नविच्छिन्न गणवेश आणि ५० मिलिमीटर मशीनगनचे हजारो रिते खोके मिळालेत. त्या सर्व मृत योद्ध्यांचे मृतदेह गोळ्यांनी विदीर्ण झालेली, गणवेश विरहित कलेवर जवळच्या बुद्धीस्ट नागराज विहार मंदिरात ओळीत मांडून ठेवली होती. ती कुजल्यामुळे त्यांचे दहन करण्यात आले. दरवर्षी १२ ऑक्टोबरला १३ सिख लाईट इन्फंट्री बटालियनमध्ये, त्यांचा संबंध नसलेल युद्ध करताना देश आणि युनिटचे नाव राखण्यासाठी देहार्पण केलेल्या या सर्व वीरांच्या स्मरणार्थ, अरदास (प्रार्थना) आणि गुरु ग्रंथ साहिब या परमपूजनीय धार्मिक ग्रंथाच पारायण केले जाते. जाफना युनिव्हर्सिटीत त्यांच्या स्मरणार्थ एक स्मारक उभारले आहे ज्यावर ‘दे फॉट, दे फेल; लास्ट मॅन, लास्ट बुलेट; फॉर नाम, नमक, निशान,’ असे लिहिली आहे. त्यांच्या स्मरणार्थ असाच नाम फलक, अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातही लावण्यात आला आहे.
दुसरी गोष्ट १५ जून २०२०ला भारतीय सेनेतील इन्फंट्री/ काही आर्टिलरी सैनिकांनी; चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिक आणि त्यांच्या सपोर्ट फोर्समधील चीन्यांशी लडाखमधील गलवान खोऱ्यात, मध्ययुगीन युद्धाची आठवण करून देणारी एक भयंकर चकमक केली होती. १९६७मध्ये सिक्कीममधील ‘नाथू ला’त (ला म्हणजे खिंड) झालेल्या रक्तरंजित चकमकीनंतर हा पहिलाच ‘सायनो इंडियन ब्लडी फेस ऑफ’ होता. यात भारताचे; १६ बिहार रेजिमेंटचे (इन्फंट्री बटालियन) कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू यांच्यासह २० सैनिक आणि सुमारे ११६ चीनी सैनिक मृत्युमुखी पडले. चकमकीत भारतीय सैनिकांनी; दगड, तारा गुंडाळलेले दंडे, अणकुचीदार खिळे लावलेले दंडे, बायोनेट्स इत्यादि अश्मयुगीन हत्यारांचा वापर केला होता. १६ बिहार इन्फंट्री बटालियन व ३ फिल्ड आर्टिलरी रेजिमेंटची घातक कमांडो प्लॅटून्स आणि १६ बिहारचे ४० सैनिक यांनी चीनी सैनिकांवर, त्यांनी कल्पनाही केली नसेल असा, सांप्रत काळातील सर्वांत भयंकर, प्रतिहल्ला चढवला. घातक कमांडो, हातघाईचे युद्ध (क्लोझ क्वार्टर बॅटल) आणि तीक्ष्ण हल्ला (स्पियर हेड अटॅक) करण्यात माहीर असतात. आपल्या कमांडिंग ऑफिसरच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हल्ला करताना, भारतीय सैनिकांच्या बुलंद आवाजात त्यांचे ‘वॉर क्राय’ निनादत होते.
अवघ्या अर्ध्या तासांत तुटलेले हातपाय आणि फुटलेल्या डोक्यांच्या चीनी कलेवरांनी पोस्ट भरून गेली. उर्वरित चीनी सैनिक पळून गेले, काही मरण पावले. ३ फिल्ड रेजिमेंटच्या घातक प्लॅटूनमधील दोन जेसीओ वीर या हातघाईच्या झटापटीत शहीद झाले आणि त्वेषाने समोरा गेलेला एक कॅप्टन व दोन जवान अलगद, कुमक म्हणून आलेल्या चीनी सैनिकांच्या जाळ्यात अडकले. या लढणाऱ्या भारतीय मंडळींना कुमक म्हणून खालून वर येत असलेल्या ३ फिल्ड रेजिमेंटच्या वीरांनी, चार पीएलए ट्रूप्ससह चीनी कमांडिंग ऑफिसरला बंदी केले. याच चीनी ऑफिसरच्या बदल्यात पीएलएने आपल्या सैनिकांना सहीसलामत परत केले आणि पोस्ट खाली केली. कोणाचही तोंड उघडण्यासाठी त्याचे नाक दाबावे लागत ही म्हण येथे चपखल लागू झाली.
‘जय बजरंग बली’ व ‘बिरसा मुंडा की जय’ हा वीर बिहाऱ्यांचा आणि ‘बोले सो निहाल, सत श्री अकाल’ या ३ फिल्ड रेजिमेंटच्या खालसा ट्रुप्सच्या जयकाऱ्यांनी गलावान खोऱ्यातील आसमंत दुमदुमला. दोन्ही युनिट्सचा प्रत्येक वीर किमान तीन चार चीनी सैनिकांशी अवर्णनीय त्वेषाो लढत होता. त्या इलाक्यात यासाठी लक्षणीय ताकद व अत्यंत सुदृढ शरीरयष्ठीची आवश्यकता असते जी या बिहारी व खालसा सैनिकांकडे होती. याचमुळे, चीनी सैनिकांना धडकी भरली आणि ते मैदान सोडून पळून गेले. ‘चिडिया नाल मैं बाज लढावां, गिद्दाड नू मैं शेर बनावां, सवा लाखसे एक लढावां, जो इन्फन्ट्री मॅन कहलावां’ या शिखांच्या म्हणीसारखीच ही चकमक झाली. माझ्या आठवणीत तरी, एलएसीवर झालेली ही सर्वांत धाडसी कारवाई होती. याचे वर्णन करायला शब्दही अपुरे आहेत. २००१मधे निवृत्त झाल्यामुळे,या वीरांबरोबर चीन्यांशी लढण्याची संधी मिळाली नाही याच दुःख मला आजही होत.
फिल्ड मार्शल मॉन्टगोमेरीनुसार,“ॲट द एंड ऑफ वॉर, बुट्स ऑन ग्राउंड मॅटर मोस्ट”. युद्धात; जमीन,हवा, समुद्र, अवकाश, सायबर स्पेस, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, आर्थिक इत्यादींचा वापर केला जातो. विमान, तोफा, क्षेपणास्त्रे, ड्रोन्स किंवा स्पेस फायरच्या माध्यमातून शत्रूला भाजून काढता येते. याद्वारे; जमिनीवरील संरचना नष्ट होऊन भूमिगत संरक्षण व्यवस्थेचेही नुकसान झाले तरी जमीन शत्रूच्याच ताब्यात राहिली तर त्या सर्वांची पुनर्बांधणी करता येते. ही संसाधने; शत्रूला शोधू शकत नाहीत किंवा जिंकलेले क्षेत्र नियंत्रित करू शकत नाहीत. हे फक्त पायदळातील सैनिक, इन्फट्री सोल्जरच करू शकतो. म्हणूनच २७ ऑक्टोबरला साजऱ्या झालेल्या ‘पायदळ दिना’ निमित्त पायदळ सैनिकांना सलाम!
abmup54@gmail.com
