रघुनंदन भागवत
चोरट्याने फोन करून आपण बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. ‘आपले केवायसी पडताळून पाहायचे आहे. त्यासाठी एक लिंक पाठवली आहे. त्यावर क्लीक करा’ असे त्याने सांगितले. जेष्ठ नागरिकाने सदर लिंकवर क्लीक केल्यावर काही वेळातच त्याच्या खात्यातून अमुक अमुक पैसे काढण्यात आले.
‘आपल्याला परदेशातून एक गिफ्ट पार्सल आले आहे. ते सोडवण्यासाठी विशिष्ट खात्यावर एवढी रक्कम ट्रान्सफर करा’ असा फोन एका उच्चशिक्षित महिलेला आला. तिने पैसे पाठवले तरी पार्सल मिळाले नाही, तेव्हा फसवणुकीचा प्रकार लक्षात आला.
‘आपल्या फोनवरून सायबर क्राईम घडला आहे. आपल्यावर लवकरच सीबीआय कारवाई होईल. ती टाळायची असेल तर या खात्यावर एवढी रक्कम पाठवा’, असा फोन आला व सदर व्यक्तीने घाबरून जाऊन रक्कम पाठवली आणि नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
‘आपली एका कंपनीकडे आपण क्लेम न केल्यामुळे एवढी मोठी रक्कम पडून आहे. सदर पैसे मिळण्यासाठी आपली बँक खात्याची डिटेल्स व केवायसी कागदपत्रे पाठवून द्या’ असा कॉल आला.. त्या व्यक्तीला वाटते की खरंच कुठली तरी अशी रक्कम राहिली असेल म्हणून सर्व तपशील पाठवला गेला व नंतर थोड्याच वेळात बँक खात्यातून मोठी रक्कम काढून घेण्यात आली.
अशाच प्रकारच्या बातम्या आपण रोज वाचतो, पण…

जसजशी मोबाईल /संगणक तंत्रज्ञानात क्रांती झाली तसतसे सायबर फ्रॉडचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढू लागले. आजकाल घरफोडीच्या गुन्ह्यांपेक्षा या प्रकारच्या तंत्रज्ञान आधारित गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जसजसा वाढत जाईल तसतसे या गुन्ह्यांचे प्रमाण आणखी वाढेल आणि गुन्ह्यांचे स्वरूपही बदलेल.

अशा प्रकारचे गुन्हे कसे रोखायचे ही आज सर्व नियंत्रकांची, तपास यंत्रणांची एक डोकेदुखी झाली आहे. या गुन्ह्यांचे वैशिष्टय म्हणजे गुन्हेगार अदृश्य स्वरूपात काम करतो. तो जगाच्या पाठीवर कोठेही राहून हे गुन्हे अगदी कमीत कमी वेळात करू शकतो. हे गुन्हेगार तंत्रज्ञानाचा कुशलतेने वापर करण्यात तरबेज असतात. बहुतेक वेळा ते उच्चशिक्षित असतात. त्यांचे बोलणे चालणे, भाषेवरील प्रभुत्व, बोलण्यातील नम्रता, अदब यामुळे ते आपल्या सावजाचा विश्वास सहजपणे संपादन करतात. चारचौघात वावरताना त्यांच्याबद्दल कुणालाही संशय येत नाही.

हे सगळं खरं असलं तरी, रोज फसवणुकीच्या एवढ्या बातम्या वाचूनसुद्धा अधिकाधिक लोक अशा प्रकारांना बळी कसे पडतात याचे आश्चर्य वाटणे साहजिक आहे. ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ ही मराठीतील म्हण इथे का लागू पडत नाही असाही प्रश्न पडतो. यासाठी काय कारणे असू शकतील याचा विचार केला असता, ढोबळ स्वरूपात खालील प्रमाणे विश्लेषण करता येईल.

१- हाव:- प्रत्येक माणसाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा हव्यास असतोच. सर्वात जास्त हव्यास आढळतो तो पैशाचा. कितीही पैसे मिळाले तरी माणूस संतुष्ट नसतो. सामान्य माणसाच्या या सहज प्रवृत्तीचा गैरफायदा फ्रॉडस्टर बरोबर उठवतात. पैशाचे आमिष दाखवले तर माणूस लगेच भुलतो आणि समोरची व्यक्ती ज्या सूचना करते त्यांचे तंतोतंत पालन करतो. त्यामुळेच लिंक क्लीक करणे, ओटीपी शेअर करणे वगैरे प्रकार होतात.

२-फुकटेपणाचे आकर्षण- बरेचदा फ्रॉडस्टर तुम्हाला लॉटरी लागली आहे किंवा गिफ्ट जाहीर झाली असे सांगून आपल्या जाळ्यात ओढतात. गिफ्ट/वस्तू घेण्यासाठी विशिष्ट ठिकाणी बोलावतात व फसवणूक करतात.

३-तारतम्याचा अभाव:- एखादे पार्सल आले आहे ते घेण्यासाठी पैसे मागितले जातात. फसणाऱ्या व्यक्तीची विचारशक्ती अशा वेळी काम करेनाशी होते. आपण कुठलेही पार्सल मागवलेले नाही याचा विसर पडतो. एखादी चांगली वस्तू मिळून जाईल या आशेने या व्यक्ती गुन्हेगारांच्या तावडीत सापडतात.

४- व्यवहार ज्ञानाचा अभाव:- आपण बरेचदा वाचतो की सायबर क्राईमला बळी पडणारी माणसे तंत्रज्ञानस्नेही व उच्चशिक्षित असतात. पण त्यांना व्यवहारज्ञान नसते. वेळेच्या अभावामुळे बरेचसे आर्थिक व्यवहार घरबसल्या करायची सवय झालेली असते. हल्ली बँकेचे व्यवहार नेट बँकिंगने करायची सवय झाल्याने प्रत्यक्ष बँकेचे कामकाज कसे चालते, प्रत्येक व्यवहार कुठल्या पद्धतीने पूर्ण होतो वगैरे ज्ञान नसते. त्यामुळेच अशी उच्चशिक्षित माणसे सायबर क्राईमला बळी पडतात. बरेचदा तुम्हाला अमुक रकमेचे कर्ज मंजूर झाले आहे असा मेसेज येतो. प्रत्यक्षात आपण अर्ज केल्याशिवाय व कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय कधीही कोणतीही अर्थसंस्था कर्ज मंजूर करत नाही. पण बऱ्याच लोकांना याची माहिती नसते आणि ते भूलथापांना बळी पडतात.

५ – तंत्रज्ञान वापरण्याची भीती:- सामान्यपणे जेष्ठ नागरिक तंत्रज्ञानस्नेही नसतात. त्यांना जुजबी ज्ञान असते. पण त्यांना अमुक एक गोष्ट केली नाही तर फोन बंद पडेल, कॉम्प्युटर बंद पडेल अशी भीती दाखवली जाते. या भीतीपोटी ते पटकन आलेल्या फोनप्रमाणे कृती करतात व अलगद गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात.

बँकिंग मधील सायबर फ्रॉडसुद्धा वरील कारणांमुळेच होतात.

यावर उपाय काय? नुसते सावधानतेचे इशारे देऊन उद्दिष्ट साध्य होत नाही. त्यासाठी खालील मुद्दयांवर सातत्याने प्रबोधन करणे जरूरीचे आहे, असे वाटते.

१- खासगीपणा जपा:- आपण समाजात वावरतो तेव्हा सार्वजनिक ठिकाणी बोलताबोलता आपली खासगी माहिती बरेचदा उघड करतो. आपल्या आसपास अनोळखी व्यक्ती असतात. त्यातील कोणी गुन्हेगारी प्रवृत्तीचा असू शकतो. तो या माहितीचा दुरुपयोग करून तुम्हाला फसवू शकतो. आपला पासवर्ड कधीही कुणाला सांगू नका.

२- कॉल रेकॉर्ड करा:- एखादा फसवा कॉल आला तर तो रेकॉर्ड करा म्हणजे पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाला तपासासाठी मदत होऊ शकते.

३- कॉलची खातरजमा करा:- समजा बँकेतून बोलतो, इन्शुरन्स कंपनीमधून बोलतो असे सांगितले गेले तर आपल्या शाखेला/एजन्टला फोन करून खात्री करून घ्या.

४- जाणकार रहा, सतर्क रहा:- रिझर्व बँकेची जाहिरात करताना अमिताभ बच्चन सांगतात, ‘जाणकार रहा, सतर्क रहा’. हे सर्वांनी लक्षात ठेवणे जरुरीचे आहे.

५- कॉमन सेन्सचा वापर करा:-एखादा फसवा कॉल आला तर आपण संमोहित झाल्यासारखे प्रतिसाद देतो. अशा वेळी कॉमन सेन्स जागरूक असणे महत्वाचे आहे. आपण एखादी वस्तू बुक केलीच नाही तर ती आपल्याला कशी काय मिळेल असा साधा विचार जरी केला तरी आपण अशा फसवणुकीपासून स्वतःला वाचवू शकतो.

६-हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नये:- अधिकाधिक संपत्ती, पैसे कमी कष्टात किंवा कष्ट न करता मिळवण्याची माणसाची प्रवृत्ती कमी झाल्याशिवाय सायबर धोकेबाजीला आळा बसणार नाही. कितीही प्रयत्न करा. अशा फ्रॉडमुळे फसलेल्या पीडिताची अवस्था ‘तेलही गेले तुपही गेले, हाती धुपाटणे आले’ अशी होते. हे ‘कळते पण वळत नाही’ त्याला काय करणार?

raghunandan.bhagwat@gmail.com