scorecardresearch

Premium

यंदा मुंबईत विपरीत उन्हाळा, महाराष्ट्रात कमी पावसाळा… असे का?

…आणि हो, अरबी समुद्राच्या तापमानाशी याचा काय संबंध?

rain and summer in maharashtra
यंदा मुंबईत विपरीत उन्हाळा, महाराष्ट्रात कमी पावसाळा

माणिकराव खुळे

मुंबई शहर, उपनगरे समुद्रातील एक प्रकारचे बेट असून त्याचा काही भाग हा समुद्रसपाटी व त्याही खाली आहे. मुंबई व उपनगरांच्या पूर्व व दक्षिण दिशेला सह्याद्री उभा ठाकला आहे. उत्तर व पश्चिम दिशेला मात्र विशेष अटकाव नाही. मार्च ते मे हा तीन महिन्यांचा मान्सूनपूर्व हंगाम महाराष्ट्रासाठी भौगोलिक रचनेनुसार वातावरणात एकाएकी खूप बदल घडवून आणतो. कोकण किनारपट्टीवर दिवसा व रात्री वाऱ्याची दिशा वेगळी असते. याच दरम्यान पाकिस्तान, अफगाणिस्तान व राजस्थानच्या भागातून उच्च दाबाची प्रणाली निर्माण झाली तर वायव्य दिशेकडून गुजरात, अरबी समुद्रावरून वारे, उष्णता व आर्द्रता घेऊन मुंबईसह संपूर्ण कोकणात सह्याद्रीवर आदळतात व जबरदस्त उष्णतेची लाट मुंबईसह कोकणात महाराष्ट्राच्या इतर भागांपेक्षा अधिक जाणवते. परंतु उष्णतेची लाट आदळण्याची ही प्रक्रिया या वर्षी २०२३ च्या हंगामात विशेष घडून आलेली नाही.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Pankaja Munde
“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…
Marathi Woman Trupti Devrukhkar Shared video
धक्कादायक! मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं, मनसेने इंगा दाखवल्यानंतर माफी, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त
The son told his mother a strange reason for not studying
अभ्यास न करण्यासाठी मुलानं आईला सांगितलं भन्नाट कारण; Video एकदा पाहाच

प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात वातावरण कसे वळण घेते त्यावर या गोष्टी अवलंबून असतात. मुंबई शहरासाठी सरासरी पूर्वमोसमी हंगामातील समान तापमान दाखवणाऱ्या रेषा (आयसोथर्म ) बघितल्यास मुंबईचे तापमान हे गुजरात राज्य व केरळपर्यंत पसरलेल्या किनारपट्टी समान आहे. गुजरात व किनारपट्टीचे तापमानही समुद्रसपाटीपासून अधिक उंचीवर असलेल्या भूभागाचे आहे, की जेथे हवेचा दाब मुंबईपेक्षा कमी असतो. पर्यायाने तेथील उष्णता मुंबईपेक्षा तुलनेत कमी तर मुंबईत अधिक असते. कधी-कधी ‘वारा खंडितता’ (विण्ड डिसकंटिन्युटी) प्रणालीमुळे मुंबईत थोडाफार पाऊसही होतो. गुजरात राज्यातील समुद्रसपाटीपासून दीड किमीपर्यंतच्या हवेच्या जाडीत वाहणाऱ्या चक्रीय वाऱ्याच्या अतिबाहेरील परीघ क्षेत्रातून तसेच जोडीला दुपारी चार ते मध्यरात्रीपर्यंत वाहणाऱ्या खाऱ्या वाऱ्याच्या संयोगातून अरबी समुद्रातून लोटलेल्या आर्द्रतेच्या ऊर्ध्वगमनातून तेथील स्थानीय क्षेत्रावर, मुंबई शहर परिसरात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची हजेरी लागते.

लाटा नसूनही मुंबई तापली

मुंबईसह कोकणात मे महिन्यात पावसाळी वातावरणाचा जोर नसला तरी कधी कधी अशा ‘वारा खंडितता’ वातावरणीय प्रणालीतून किरकोळ पाऊसही पडून जातो. त्यातलाच हा एक भाग समजावा व त्यामुळे अधूनमधून मुंबईच्या उष्ण वातावरणात थोडासा गारवा निर्माण होऊन दिलासाही मिळतो. परंतु या वर्षी ‘वारा खंडितता’ प्रणालीमुळे तसेच ‘ला निना’ ओसरण्याच्या व ‘एल-निनो’ विकसित होण्यापूर्वीच्या वातावरणीय अवस्थेमुळे, मे महिन्यात थंडावा देणाऱ्या किरकोळ पावसाचा आनंद हिरावून घेतला गेला, असे वाटते. जेव्हा या प्रणालीत बदल होतो किंवा ती पूर्णपणे विरळ अथवा नामशेष होते तेव्हाच मुंबईत हवेचे वहन होऊन उन्हाळ्यात वातावरण आल्हाददायक होते. तसेही या वर्षी २०२३ च्या उन्हाळ्यासाठी मुंबई व उपनगरात इतर भागांबरोबर उष्णतेसंबंधी केलेल्या भाकिताप्रमाणे कोकणात मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात दुपारचे कमाल तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची सर्वाधिक शक्यताही ५५ टक्के होती. त्याप्रमाणे मुंबई व कोकणात महाराष्ट्रातील इतर भागांपेक्षा उन्हाळा अस्वस्थ करणारा व कडक जाणवला.

पहाटेचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता सर्वाधिक म्हणजे ४५ टक्के होती. त्याप्रमाणे मुंबईतील रहिवासी भूभागावर पहाटेचा गारवा कमीच जाणवला. त्याचा परिणाम मार्च २०२३ पासून मुंबईत दिसला. तसेच या वर्षी मुंबईत भाकिताप्रमाणे उष्णतेच्या अधिक लाटाही जाणवल्या नाहीत. केवळ ‘वारा खंडितता’ प्रणाली अधिक कालावधीपर्यंत टिकून राहिल्यामुळेच उष्णतेने तापलेली व अस्वस्थ करणारी मुंबई आपण मार्च ते मे महिन्यात अनुभवली.

भारतीय हवामान खात्याने दुसऱ्या पायरीतील सुधारित अंदाज २६ मे २०२३ ला देताना वायव्य भारत वगळता देशात सरासरी इतका म्हणजे ९६ ते १०४ टक्के पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. पावसाळ्यात ‘एल- निनो’ विकसित होण्याच्या दाट शक्यतेबरोबरच केवळ धन आयओडीच्या अस्तित्वामुळे सकारात्मक दिलासाही अंदाजात दिलेला आहे. वायव्य भारतात (जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगड, राजस्थान, उत्तर मध्य प्रदेश व पश्चिम उत्तर प्रदेश) मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाची म्हणजे ९२ टक्क्यांपेक्षाही कमी पावसाची शक्यता वर्तवली आहे.

सांगलीत मात्र चांगला पाऊस!

देशात ९६ ते १०४ टक्के श्रेणीत पडणारा पाऊस हा जरी सरासरीइतका पाऊस मानला जात असला तरी या वर्षी देशात गुणात्मकदृष्ट्या केवळ ९६ टक्के पाऊस अपेक्षित आहे. पण हा पाऊस सरासरीपेक्षा नावालाच कमी (कारण ‘सरासरीपेक्षा कमी’ ची व्याख्या ‘९५ टक्क्यांपेक्षा कमी’ पासून सुरू होते). महाराष्ट्र हा मध्य भारत विभागात मोडतो. मध्य भारतात जरी सरासरी इतक्या पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी, उपलब्ध माहितीचे तीन भाग करून ते एकमेकांशी ताडून पाहण्याच्या ‘टर्साइल’ श्रेणी प्रकारानुसार सांगली जिल्हा वगळता संपूर्ण महाराष्ट्रात गणिती संभाव्यतेच्या (प्रोबॅबिलिटी) भाषेत सरासरीपेक्षा कमी पावसाचीच शक्यता आहे आणि ही शक्यताच टक्केवारीच्या भाषेत सर्वाधिक असून ती ५५ टक्के आहे. मुंबईसह कोकण व सह्याद्रीच्या पूर्वेकडील मध्य महाराष्ट्रात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाची सर्वाधिक संभाव्यता ही ३५ टक्के जाणवते. म्हणजे मुंबईत सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता जाणवते. खरे तर मुंबईसाठी पावसाची हीच सरासरीपेक्षा कमी पावसाची टर्साइल श्रेणी योग्य समजावी. कारण सरासरीपेक्षा अधिक पाऊस हा मुंबईतील जनजीवन विस्कळीत करतो. महाराष्ट्रात केवळ सांगली जिल्हा व लगतच्या परिसरात मात्र सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.

एकंदरीत जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक जाणवते. महाराष्ट्रात कमी पावसाची शक्यता असली तरी पावसाचे योग्य वितरण झाल्यास व उपलब्ध पूर्वपाणीसाठा व वेळेत मान्सूनचे आगमन झाल्यास कदाचित शेतपिके हंगाम जिंकता येऊ शकतो. महाराष्ट्राबरोबरच लगतच्या गुजराथ दक्षिण मध्य प्रदेश व छत्तीसगड, राज्यात तसेच उत्तरपूर्व कर्नाटक, दक्षिण आंध्रप्रदेश व तेलंगणाच्या काही भागांत टर्साइल प्रकारनुसार सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता जाणवते. जून महिन्यात महाराष्ट्र, तेलंगणा व आंध्रप्रदेशात जून महिन्याच्या सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असून पावसाच्या ओढीबरोबरच जून महिन्याच्या सरासरी तापमानापेक्षा अधिक तापमान असण्याची सर्वाधिक शक्यताही ५५ टक्के जाणवते. या वर्षीच्या पावसाळ्याच्या जून- सप्टेंबर या चार महिन्यांत ‘एल- निनो’ विकसित होण्याच्या शक्यतेबरोबरच भारतीय महासागरात धन ‘भारतीय महासागरीय द्वि-ध्रुविता’ (पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल) विकसित होण्याची शक्यताही आहे. म्हणजेच या अवस्था एकमेकांना शह-काटशह देऊन देशाला सरासरी इतका पाऊस देण्याची शक्यता जाणवते. कारण एक पावसाला मारक तर दुसरा पावसाला तारक ठरतो आहे.

‘इंडियन ओशन डायपोल’- आयओडी!

‘एल निनो ’, ‘ला निना’ अवस्था तसेच ‘इंडियन ओशन डायपोल’ किंवा आद्याक्षरांनुसार ‘आयओडी’च्या धन ऋण व तटस्थ अवस्था यावर पाऊस कमी किंवा जास्त पडणार हे ठरते. अरबी समुद्राच्या पृष्ठभागावरील (साधारण २०० फूट खोलीपर्यंत) एका ठिकाणचे पाण्याचे तापमान त्याच्या निरीक्षण काळातील सरासरी तापमानापेक्षा (म्हणजे सरासरी व प्रत्यक्ष तापमान या दोघांतील काढलेल्या फरकानंतर) किती अधिक किंवा उणे म्हणजे धन किंवा ऋण आहे, यावर ते ठरते. हे चार किंवा तीन किंवा काहीही असू शकतो. अरबी समुद्रातील (१० अंश दक्षिण ते १० अंश उत्तर अक्षवृत्त व ५० अंश ते ७० अंश पूर्व रेखावृत्त पर्यंतच्या चौकोनातील) विविध ठिकाणी अशा प्रकारच्या तापमानाच्या नोंदी घेऊन पुन्हा त्यांची एक सरासरी काढली जाते, ही अर्थातच धन वा ऋण असू शकते.

 जेव्हा अरबी समुद्राचे पाणी बंगालच्या उपसागरातील पाण्यापेक्षा अधिक उष्ण असते तेव्हा ‘भारतीय महासागरीय द्वि-ध्रुविता’ म्हणजेच ‘इंडियन ओशन डायपोल’ (आयओडी) हा भारत देशात पाऊस पडण्यास अनुकूल असलेला ‘धन आयओडी’ समजावा. मात्र वरीलपेक्षा उलट स्थिती असेल तर भारतात पाऊस पडण्यास प्रतिकूल असलेला ‘ऋण आयओडी’ समजावा. आणि वरील दोघांपेक्षा ‘ना धन, वा ना ‘ऋण’ म्हणजे दोन्ही महासागरांचे तापमान सारखेच असेल, तरीदेखील भारत देशात पाऊस पडण्यास अनुकूल काल असलेला ‘तटस्थ आयओडी’ समजावा.

यंदा एल-निनोचे वर्ष आहे, सरासरी इतका पाऊस देशात तर सरासरीपेक्षा कमी पाऊस महाराष्ट्रात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय जून महिन्यात पाऊस कमी व उष्णता अधिक असून मान्सूनचे आगमनही उशिरा होणार असल्याचे भाकीत पुढे आले आहे. त्याप्रमाणे मान्सून अजून अंदमानातच खिळलेला दिसतो आहे व त्याच्या मार्गक्रमणाचा वेग जसा अपेक्षित असावयास हवा तसा जाणवतही नाही. या पार्श्वभूमीवर खरीप हंगामाचे काय नियोजन करावे असा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये दिसतो.

मान्सूनचे आगमन कधी होते, आगमनानंतर त्याचे अस्तित्व किती टिकते व त्यात पाऊस कोसळण्याची किती ताकद असेल या तीन गोष्टींना प्रथम प्राधान्याने स्वतः लक्ष ठेवून, हवामान विभाग वेळोवेळी देत असलेल्या माहितीवरूनच पीकपेरणी अथवा पीक लागवडीचा विचार शेतकऱ्यांकडून व्हावा, असे वाटते. घोडामैदान जवळच आहे. वरील चर्चेचा आशय मनात पक्का रुजवून आणि विवेकाच्या कसोटीवर परिस्थितीचे आकलन करून घेऊन, येणाऱ्या खरीप हंगामाच्या पीक नियोजनात शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक उडी घ्यावी, असे वाटते.

लेखक भारतीय हवामान खात्यातील ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ज्ञ आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Its a different summer in mumbai this year and low monsoon in maharashtra ysh

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×