सुनील सांगळे
आज डॉ. नरेंद्र दाभोलकर असते तर त्यांनी बहुधा हे दावे करणाऱ्यांना समोरासमोर चर्चेचे आव्हान दिले असते…
एके काळी पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची अधोगती किती झपाट्याने होत आहे याची अनेक उदाहरणे आता जागोजागी दिसू लागली आहेत. राजकारणाची पातळी अत्यंत खालच्या दर्जावर गेली आहे यावर रास्त टीका होतच असते; पण इतर अनेक गोष्टी धर्म, ‘पुरातन विज्ञान’ यांच्या नावाखाली खपून जात असतात.
आज वर्तमानपत्रात आलेल्या एका बातमीनुसार सेवा सदन संस्थेच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी यांचा ‘प्रयोगशील शेतकरी’ या पुरस्काराने गौरव करण्यात आला. हा पुरस्कार त्यांना वसंतराव नाईक प्रतिष्ठान आणि वनराई फाउंडेशनतर्फे देण्यात आला. महाराष्ट्रातील हरित क्रांतीसाठी मोठे काम केलेले माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कुटुंबियांचे हे प्रतिष्ठान असल्याने या पुरस्काराला महत्त्व आहे. कांचन गडकरी या केंद्रीत मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी आहेत. इथपर्यंत सारे ठीकठाक.
परंतु पुरस्कार स्वीकारल्यानंतरच्या भाषणात कांचन गडकरी यांनी तद्दन अवैज्ञानिक दावे केले. त्या म्हणाल्या “शेतात बियाणे पेरल्यापासून धर्मसंस्कार केले तर शेती भरघोस उत्पादन देते. आम्ही आमच्या धापेवाड्यातल्या शेतीत सोयाबीनला श्री सूक्त व मंत्रोच्चार ऐकवले. त्यामुळे उत्पादन वाढले.” विशेष म्हणजे हे सगळे दावे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू व्यासपीठावर उपस्थित असताना केले गेले.
आता याविरुद्ध काही बोलणे म्हणजे आपल्याच हिंदू धर्माचा अवमान समजला जाईल बहुतेक. असले मंत्रोच्चार, पाखंडी बाबा, स्वामी, ज्योतिष, रत्ने-खडे याविरुद्ध बोलण्याचे पातक डॉ. नरेंद्र दाभोलकर वारंवार करत आणि त्यामुळे त्यांना ‘असुर’ ठरवून ‘शिक्षा’ दिली गेली होती. आज डॉ. दाभोलकर असते तर त्यांनी बहुधा हे दावे करणाऱ्यांना समोरासमोर चर्चेचे आव्हान दिले असते. जमीन, पाणी, खते वगैरे सम प्रमाणात देऊन जमिनीच्या विविध पट्ट्यांवर हा प्रयोग करून फक्त एका पट्ट्यावर मंत्रोच्चार करून त्याचेच उत्पादन वाढवून दाखवा म्हणून सांगितले असते.
ही वैज्ञानिक पद्धत आहे. त्यामुळे तसले लोक गेले तेच बरे झाले! वास्तविक उपनिषदांसारखे महान गहन तत्त्वज्ञान असलेला आपला धर्म आणि असले अवैज्ञानिक दावे यांचा दूरान्वयानेही संबंध नाही. पण एखादा बदाम फेकून देऊन त्याचे कवच तेवढे चावत बसावे, तशी आपल्या धर्माची अवस्था आपणच करून टाकलेली आहे. विशेष म्हणजे यात तथाकथित सुशिक्षित लोक आणि उच्चशिक्षित नवीन पिढीही सामील असते.
उच्चशिक्षण आणि अंधश्रद्धा यांचा काहीही संबंध नाही हे आजची तरुण पिढी आणि आता अस्तंगत झालेली आमच्या आधीची पिढी यांची तुलना केली तर मला तरी जाणवते. याचे मूळ कारण हे आहे की (विवेकानंद म्हणाले होते तसे) ज्या समाजातील अज्ञानी बहुजन हळूहळू शिक्षण घेऊन वर येत जातात, ते अर्थातच समाजातील उच्चवर्गीयांचे अनुकरण करतात व त्यांच्यात सामील होऊ पाहतात. त्यामुळे जो समाज किंवा वर्ग आधीच पुढारलेला होता त्यांच्यावर या नव्याने वर येणाऱ्या वर्गाला मार्ग दाखविण्याची मोठी जबाबदारी असते. युरोप अमेरिकेत ती जबाबदारी त्यांनी पार पाडल्याने तिथे विज्ञानाधिष्टित कल्पना रुजल्या. याउलट आपल्या समाजात आहे त्या अंधश्रद्धा घट्ट धरून ठेवण्यात वरिष्ठ वर्गाचे हितसंबंध जोडले गेलेले असल्याने त्या अधिक घट्ट कशा होतील याकडे लक्ष दिले गेले. अंधश्रद्धांना धार्मिक अधिष्ठान दिले की ते सोपे होते हे लक्षात आल्याने तसे केले गेले.
बाय द वे, सहज माहिती काढली तर भारताचे वार्षिक सोयाबीन उत्पादन १.३ कोटी मेट्रिक टन आहे. तेच ब्राझीलचे १६० कोटी, तर अमेरिकेचे १२० कोटी मेट्रिक टन आहे. दूरच्या खंडातले हे देश कोणते मंत्रोच्चार आपल्या शेतांमध्ये करतात त्याचा अभ्यास करायला पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी स्वतः आणि काही मर्जीतील अधिकाऱ्यांच्या सोबत ब्राझील आणि अमेरिकेचा अभ्यास दौरा करावा अशी माझी सूचना आहे. कारण आपले सोयाबीनचे उत्पादन आता १६०/१२० पट वाढवायचे असेल तर आपल्या पुरातन जादूंचा अंगीकार करण्याशिवाय इतरांनाही सोपा मार्ग नाहीच. तसेच यातूनच रोजगारांच्या कोट्यवधी संधी उपलब्ध होतील ते वेगळेच. कारण लाखो एकर शेतीवर असे मंत्र म्हणायला लोक लागतील. शाळेपासून, कॉलेज पासून, ते कृषी विद्यापीठात असे मंत्र शिकवणारे शिक्षक, प्राध्यापक नेमावे लागतील!
बाकी ते भारतीय संविधानातील ‘राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे’ या भागात लिहिले आहे म्हणे त्या काळातील घटनाकारांनी की “सरकार जनतेत विज्ञानवादी दृष्टिकोन रुजविण्यासाठी प्रयत्न करील”! ते राहू द्यावे तसेच! आपल्याला वाटेल तसे वागावे, फक्त संविधान आम्हीच वाचवतो आहोत असे ओरडत राहावे. हवे तर, ‘त्यांनी घटनेची हत्या केली’ असाही गळा काढावा… जनतेत तसेही कोण लेकाचे संविधान वाचतात? ((समाप्त))