कुठल्याही सरकारी योजनेच्या अंमलबजावणी साठी सर्वात महत्वाची गोष्ट  म्हणजे परिपूर्ण डेटा. तो नसेल तर त्या योजनेचे कसे बारा वाजतात याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारची ‘लाडकी बहीण योजना’. प्रगत, डिजिटल असा झेंडा मिरवणाऱ्या राज्य सरकारकडे आपल्या राज्यातील नागरिकांचा कुठलाच विश्वसार्ह व परिपूर्ण असा डेटा नसल्याने या योजेनचा गैरफायदा तब्बल २६ लाख महिलांनी व १४ हजार ५०० पुरुषांनी घेतलेला आहे.  महिलांसाठी असणाऱ्या योजनेत पुरुष लाभार्थी पात्र ठरत असतील, तर हा प्रकार महाराष्ट्र राज्य सरकारच्या कार्यक्षमतेची आणि डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर या व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा ठरतो. भविष्यात याची पुनरावृत्ती टाळण्यासाठीचा एकमेव व सर्वोत्तम ऊपाय म्हणजे  ‘परिपूर्ण डेटा संकलन’.
महाराष्ट्र असो की  संपूर्ण देश. गेल्या पाच सहा दशकात विविध कल्याणकारी योजना आखल्या गेल्या. त्यावर लाखो करोडो रुपये खर्च केले गेले. योजनांचा फायदा झालाच नाही असे नाही परंतु बहुतांश योजनांची फलश्रुती प्रश्नार्थकच राहिलेली आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. योजनांच्या अंमलबजावणीतील दोष त्यास कारणीभूत आहेतच, पण त्याहीपेक्षा योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यापर्यंत पोचवण्यातील सर्वाधिक अडथळा म्हणजे वास्तववादी, परिपूर्ण, विश्वासार्ह माहितीचा अभाव.

सरकारने गुंतवलेल्या पैशाचे अपेक्षित परिणाम होतात याची खात्री करण्यासाठी डेटा-आधारित निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. याचा अर्थ असा होतो की घेतलेले निर्णय विश्वसनीय डेटाद्वारे सूचित केले जातात. राज्यकर्त्यांना धोरणे बनवण्यासाठी किंवा कल्याणकारी योजना राबवण्यासाठी सर्वाधिक गरजेचे असते ते नागरिकांच्या सामाजिक, आर्थिक माहितीचे संकलन. आपल्या देशात अशा प्रकारच्या विश्वासार्ह माहितीचा नेहमीच अभाव असल्याने ‘योजनांचा सुकाळ ,पण फलश्रुतीचा अभाव’ ही आपल्याकडची नेहमीची परिस्थिती असते. योजना असंख्य असूनही आजही अनेक गरजू लाभार्थी प्रत्यक्ष लाभापासून वंचितच आहेत. विश्वासार्ह, परिपूर्ण डेटा संकलनाचा अभाव असल्याचा फटका सर्वच योजनांना बसतो आहे.

अन्नसुरक्षेसाठी आपल्या देशात ‘रेशन वितरण व्यवस्था’ आहे. वर्तमानात अधिवेशनातच ही बाब समोर आली आहे की पात्र नसणाऱ्या लाखो सरकारी कर्मचाऱ्यांनी वर्षानुवर्षे या योजनेचा लाभ घेतला आहे. व्यक्ती मृत होऊन ५/१० वर्ष होऊन देखील त्या व्यक्तीच्या नावाने धान्याचा लाभ घेतला जातो. एवढेच कशाला नुकतेच एक प्रकरण उजेडात आलेले आहे की अगदी यूपीएससी सारख्या यंत्रणेची फसवणूक करून कागदोपत्री ४० करोड संपत्ती असणाऱ्या व्यक्तीच्या मुलीने क्रिमी लेयर घटकाखाली भाप्रसे पदाचा लाभ घेतलेला आहे.

योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणात देखील समन्वय नसल्याने एकाच योजनेसाठी पात्र असणारी व्यक्ती  वेगवेगळ्या  अन्य योजनांचा लाभ घेताना दिसतो. याचे कारण एकाच  सरकारी यंत्रणांकडे अगदी ग्रामपंचायत पातळीपासून ते राज्य -केंद्र स्तरापर्यत  प्रत्येक नागरिकाच्या बाबतीतील  आवश्यक आर्थिक ,सामाजिक गोष्टीविषयी केंद्रीभूत पद्धतीने डेटाचा अभाव.

गेल्या सात दशकांत  अनेक धोरणे आणि योजना सुरू करण्यात आल्या, परंतु या योजनांची  यशस्वी अंमलबजावणी करण्यात अपयश  आल्याचे दिसते. यामुळे एकुणातच भारताची प्रतिमा   “Best in planning, but Worst in Implimentation”  अशी झालेली दिसते . याचे मुख्य कारण म्हणजे योजना तयार करण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक वस्तुनिष्ठ माहिती संकलनाचा अभाव.

डेटा संकलन मोहीम गरजेची:

सरकारी  यंत्रणांकडे  वस्तुनिष्ठ, विश्वसार्ह डेटा नसल्याने  बहुतांश सरकारी योजनांमध्ये हक्काचे लाभार्थी मोठ्या संख्येने मागे राहतात. दुसरीकडे, अनेक बेकायदेशीर प्राप्तकर्ते खोट्या कागदपत्रांमुळे दावा करतात आणि लाभ मिळवतात. त्यामुळे अनेक सरकारी योजना प्रयत्न करूनही अपयशी ठरतात.

राज्य स्थापनेच्या ६५ वर्षानंतर देखील आजही अगदी ग्रामपंचायत हद्दीत पासून ते मंत्रालय पातळीपर्यंतच्या कोणत्याच यंत्रणेकडे राज्यातील ज्या नागरिकांसाठी योजना राबवल्या जातात त्यांची विश्वासार्ह वस्तुनिष्ठ परिपूर्ण माहिती नसते. एवढेच कशाला शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांविषयीची माहिती ग्रामपंचायत पातळीवर देखील उपलब्ध नसल्याने  योजनांच्या बाबतीत बट्ट्याबोळ होतो आहे. योजना राबवणाऱ्या यंत्रणांत समन्वय नसल्याने  योजनांची कशी फसगत होते याचे उदाहरण म्हणून सुनियोजित शहर नवी मुंबईचे देता येईल.

गेल्या काही वर्षात पालिकेने करोडो रुपये खर्च करून एलईडी हायमास्ट बसवलेले असताना त्याच शहरासाठी केंद्र सरकारकडून ‘सोलर हायमास्ट’ ची योजना देण्यात आली. त्याचा परिणाम असा होताना दिसतो आहे की, ज्या ठिकाणी हायमास्ट उभे आहेत त्याच हायमास्टच्या उजेडाला स्पर्धा करणारे सोलर हायमास्ट उभारले जात आहेत. यंत्रणांच्या पातळीवर एवढा गोंधळ असेल तर नागरिकांच्या पातळीवर, कुटुंबाच्या पातळीवरील योजनांची काय अवस्था असेल याचा अंदाज येऊ शकतो. दुसरे उदाहरण मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे देता येऊ शकेल. ग्रामसेवकापासून ते जिल्हाधिकाऱ्यापर्यंत सर्व नोकरशाहीला कामाला जुंपले होते. प्रत्येक योजनेच्या बाबतीत  अशी अवस्था दिसते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाचा अपव्यय होताना दिसतो.

यावरील सर्वोत्तम आणि एकमेव उपाय म्हणजे राज्य सरकारने ग्रामपंचायत स्तरापासून ते राज्याच्या मंत्रालय पातळीपर्यंत उपलब्ध तंत्रज्ञानाच्या मदतीने वस्तुनिष्ठ, वास्तवदर्शी, परिपूर्ण असा डेटा संकलन उपक्रम राबवावा. टीसीएससारख्या संस्थेला कंत्राट देऊन प्रत्येक ग्रामपंचायतीतील, नगर पंचायतीतील, महापालिकेतील  नागरिकांचा  शिक्षण,  आर्थिक स्थिती, जात -धर्म, पशुप्राणी संख्या, वर्तमानात घेतल्या जाणाऱ्या योजनांची माहिती, दुचाकी, चारचाकी गाडीची उपलब्धता, निवासाचा प्रकार (झोपडी, कच्चे घर, पक्के घर, बंगला, बहुमजली इमारतीत सदनिका इत्यादी)  मोबाईल क्रमांक,  आधार -पॅन -रेशनकार्ड अशा सर्व गोष्टीं बद्दलचा डेटा संकलित करावी.

डेटा संकलन जलद गतीने करता यावे यासाठी संकेतस्थळ किंवा अँप निर्माण करून त्याच्या आधारे आधार ओटीपी आधारित लिंकद्वारे माहिती भरण्याची सुविधा द्यावी. ज्या कुटुंबातील व्यक्ती संगणक साक्षर आहेत ते सदरील माहिती स्वतः भरू शकतील. असे केल्यास ज्या कंपनीला कंत्राट दिले जाईल त्याचा प्रतिनिधी प्रत्यक्ष भेट देऊन जलदगतीने माहितीची सत्यता तपासू शकेल. उर्वरित माहिती संकलित करू शकेल.

सर्व योजना आधार –पॅन,  प्रॉपर्टी कार्ड /७-१२ शी  संलग्न करा :

व्यक्तीच्या जन्माबरोबरच त्याच्याबाबतच्या डेटा निर्मितीची प्रक्रिया सुरु व्हायला हवी आणि मृत्यूनंतर लगेचच निष्कासित केली जायला हवी. व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आधार सारखा महत्वपूर्ण दस्ताऐवज निष्क्रिय केला जायला हवा जेणेकरून त्याचा दुरुपयोग केला जाऊ शकणार नाही. अपात्र लाभार्थी टाळण्यासाठी राज्य सरकारने आपल्या  अखत्यारीतील सर्व विभागांच्या  वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक पातळीवर राबवल्या जाणाऱ्या सर्व योजना या आधार क्रमांक, पॅन क्रमांकाशी जोडाव्यात. तंत्रज्ञानाची उपलब्धी पाहता गोष्ट अवघड नक्कीच नाही.

नागरिकांच्या, समाजाच्या माहितीत सातत्याने बदल होत असतो, ही त्यातली एक खोच असू शकते.  पण त्यासाठी उपाय आहेत. उदा. एखादी व्यक्ती मृत पावली व ज्या सरकारी यंत्रणेने त्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला तयार केला आहे त्या यंत्रणेने आपल्या पातळीवरील डेटामध्ये  त्या व्यक्तीला मृत गटात टाकले तर आपसूकच अन्य यंत्रणांना ते कळू शकेल व त्याला दिल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ थांबवता येऊ शकेल.

माहितीचे संकलन परिपूर्ण असेल तर १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी अर्ज करा, कागदपत्रे जोडा हा सोपस्कार न करता देखील सदरील नागरिकाचे नाव मतदार यादीत आपसूकच  समाविष्ट करता होऊ शकेल. राज्यसरकारकडे वस्तुनिष्ठ डाटा असेल तर मनुष्यबळाचा अपव्यय कसा टाळला जाऊ शकेल या साठी तलाठ्याकडून दिल्या जाणाऱ्या उत्पनाच्या दाखल्याचे देता येऊ शकेल. कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्न ही सर्वात महत्वाची अट असते. हा दाखला केवळ त्या आर्थिक वर्षेसाठीच ग्राह्य धरला जातो.  हा द्राविडी प्राणायाम टाळण्यासाठी संकलित डेटा महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. जी सरकारी यंत्रणा योजनेची अंमलबजावणी करत आहे ती  उपलब्ध डेटाच्या आधारेच सदरील लाभार्थ्याला पात्र /अपात्र ठरवू शकेल. प्रत्येक वेळी उत्पनाचा दाखला मागवण्याची आवश्यकता उरणार नाही.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने डेटा अपडेट सहज संभव :

नागरिकांचा डेटा ही बदलणारी बाब आहे आणि त्यामुळे वारंवार डेटा अपडेट करणे आवश्यक असते. आधुनिक तंत्रज्ञान, संगणकीकरण, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यामुळे देशातील १४० करोड जनतेचा डेटा अपडेट करणे सहज शक्य आहे. समजा १२ वी पास अशी नोंद असणाऱ्या व्यक्तीने पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला आधार ओटीपी बेस्ड, आधार बायोमेट्रिक ओळखीच्या सहाय्याने संकेतस्थळावर किंवा ॲपवर डेटा अपलोड करण्याची  सुविधा  देऊन, सर्टिफिकेट अपलोड करण्याची सुविधा देऊन डेटा अपडेट केला जाऊ शकतो. एवढेच नव्हे तर संलग्न महाविद्यालयाने सर्टिफिकेट विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड केल्यानंतर त्याच्या सहाय्याने डायरेक्टसंबंधित विद्यार्थ्यांच्या संकलित डेटा अपडेट केला जाऊ शकतो.

थोडक्यात काय तर उपलब्ध तंत्रज्ञानाचा परिपूर्ण पद्धतीने उपयोग केला तर प्रत्येक नागरिकाचा डेटा सातत्याने अपडेट केला जाऊ शकतो .

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

योजनांचा गैरफायदा टाळण्यासाठी…

सरकारी यंत्रणांच्या बरोबर सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध असण्याचा नियम /कायदा केल्यास अपात्र लाभार्थीना मोठ्या प्रमाणावर आळा घातला जाऊ शकेल. उदा : ग्रामपंचायती मार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनेतील लाभार्थीची यादी पब्लिक डोमेनवर उपलब्ध असेल तर त्या गावातील सजग नागरिक अपात्र लाभार्थींची माहिती सरकारी यंत्रणांना देऊ शकतील. लाभार्थ्यांच्या पात्रतेवर आक्षेप नोंदवू शकतील, राजकीय लागेबांधे, आर्थिक गैरप्रकारातून लाभ घेणाऱ्या अपात्र  लाभार्थ्यांविषयी आक्षेप नोंदवू शकतील. याचा अर्थ जनतेचा तिसरा डोळा सरकारी योजनेच्या लाभार्थ्यांवर राहिला तर निश्चितपणे त्याचा सकारात्मक परिणाम  दिसून येईल.  

पराकोटीची पारदर्शकता हीच योजना राबवणाऱ्या यंत्रणेतील अपप्रवृत्तीला आणि योजेनचा गैरफायदा उठवणाऱ्या अपात्र  लाभार्थ्यांवर अंकुश आणण्यासाठी आणि  योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी ही गुरुकिल्ली ठरू  शकते.  आगामी जनगणना उपक्रमासाठी देखील या डेटाचा उपयोग होऊ शकेल.
विविध सामाजिक विषयाचे अभ्यासक

danisudhir@gmail.com