अमित शहा
नरेंद्र मोदी यांनी भारताला केवळ आर्थिक आणि राजकीयदृष्ट्याच नाही, तर मानसिक आणि सांस्कृतिकरीत्याही सामर्थ्यवान केले आहे. गेल्या ११ वर्षांत त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने स्वाभिमान, स्वावलंबन आणि आत्मविश्वासाची जी नवीन उंची गाठली आहे, ती ऐतिहासिक आणि अद्वितीय आहे.
इतिहासात १७ सप्टेंबर हा दिवस अनेक कारणांनी महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी सर्व शिल्पकार बांधव आणि कामगार वर्ग अतिशय उत्साहात विश्वकर्मा जयंती साजरी करतात. आजच्याच दिवशी हैदराबादला क्रूर निजाम आणि रझाकारांपासून मुक्ती मिळाली होती आणि आजच्याच दिवशी एका अशा जनसेवकाचा जन्म झाला, ज्याने आपले संपूर्ण आयुष्य देश आणि देशवासीयांना समर्पित केले. तो जनसेवक म्हणजे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. मोदीजींचा हा जन्मदिवस विशेष आहे कारण हा त्यांचा ७५ वा जन्मदिवस आहे. १४० कोटी देशवासीयांच्या वतीने मोदीजींना जन्मदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा देतो आणि ईश्वराकडे प्रार्थना करतो की भारताच्या मजबूत भविष्याकरिता मोदीजींना दीर्घायुष्य, ऊर्जा आणि आरोग्य लाभो. अनेक दशकांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करताना मला याचा अनुभव आला की त्यांचे व्यक्तिमत्त्व एका राजकीय नेत्यापेक्षाही राष्ट्रहिताला समर्पित असलेल्या ध्येयनिष्ठ नेतृत्वकर्त्याचे आहे. असे नेतृत्वकर्ते ज्यांच्या नेतृत्वाच्या मुळाशी राष्ट्राचे उत्थान आणि जनतेचे कल्याण ध्येयवाक्याप्रमाणे रुजलेले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे हे वैशिष्ट्य आहे की त्यांच्याकडे समाजातील सर्व स्तरांचा सहभाग आपल्या शासनामध्ये सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक दूरदृष्टी आहे. समाजातील कोणताही वर्ग किंवा व्यक्ती विकासापासून वंचित राहू नये, या उद्देशाने धोरणांचे नियोजन आणि अंमलबजावणी यावर त्यांचा भर असतो. ते शासनाला सत्तेचे साधन नाही, तर सेवेचे माध्यम मानतात. याच कारणामुळे त्यांच्या सरकारमध्ये गरीब-कल्याणाला केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना केवळ सुरूच झाल्या नाहीत, तर त्यांनी यशस्वीपणे आपले उद्दिष्ट साध्यही केले आहे.
आपण पाहू शकतो की जनधन योजनेने ५० कोटींपेक्षा जास्त लोकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडून आर्थिक समावेशनाचे एक नवीन पर्व सुरू केले; उज्वला योजनेने घरोघरी धुरापासून मुक्ती आणि सन्मानजनक जीवनाचा संदेश पोहोचवला; आयुष्मान भारतने गरिबांना आरोग्याची सुरक्षा दिली, तर त्याच वेळी प्रधानमंत्री आवास योजनेने गरीब वर्गाला स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी दिली. मी अशा योजनांच्या कोणत्याही लाभार्थ्याच्या डोळ्यांत समाधान आणि विश्वास पाहतो, तेव्हा मला समजते की मोदींचे शासन जन कल्याणाच्या उद्दिष्टाला कशा प्रकारे प्रत्यक्षात साकार करत आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी देशाच्या अनेक भागांमध्ये समाजातील प्रत्येक वर्गासोबत संवाद साधला. त्यांच्या तपस्वी जीवनाचा हा तो काळ होता, ज्यात त्यांनी देशाचा आत्मा केवळ जवळून पाहिलाच नाही, तर ते त्याच्या आंतरिक शक्तीशी परिचित झाले. त्यांचा हा अनुभव त्यांच्या शासनाच्या धोरणांमध्ये आणि कार्यशैलीमध्ये गरीब-वंचितांप्रति संवेदनशीलतेच्या रूपात दिसून येतो.
संघाचे प्रचारक म्हणून काम करताना मोदीजी संघटन कौशल्य शिकले आणि नंतर भाजपचे संघटन शिल्पकार म्हणून त्यांनी संघटन कार्य काळानुरूप बनवण्यासाठी अनेक यशस्वी सुधारणा तसेच प्रयोग केले. मी स्वत:ला भाग्यवान समजतो की भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना मला मोदीजींचे मार्गदर्शन तसेच त्यांचा संघटनात्मक अनुभव राष्ट्रीय पातळीवर अमलात आणण्याची संधी मिळाली.
कठीण परिस्थितीत निर्णय घेण्याच्या क्षमतेवरूनच मजबूत नेतृत्वाची ओळख पटते. या बाबतीत मोदीजींची नेतृत्व क्षमता वेगळ्याच पोलादी धाटणीची आहे. मी अनेकदा पाहिले आहे की परिस्थिती कितीही मोठी असो, त्यांचे असाधारण धैर्य आणि स्पष्ट दृष्टिकोन असतो. २०१४ नंतर असे अनेक प्रसंग आले, जेव्हा देशाला महत्त्वपूर्ण आणि कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता होती. अशा सर्व प्रसंगी, पंतप्रधान मोदीजींनी नेतृत्वाची सूत्रे अतिशय दृढतेने आणि कौशल्याने हाताळत राष्ट्रहिताला अनुरूप निर्णय घेतले. नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या उपाययोजनांद्वारे आर्थिक सुधारणांना गती देत आपल्या अर्थव्यवस्थेत एक नवीन अध्याय जोडला. अनुच्छेद ३७० रद्द करणे ही तर अनेक शतके स्मरणात ठेवण्याजोगी ऐतिहासिक घटना आहे. या निर्णयातून केवळ राजकीय साहसच नव्हे तर राष्ट्रीय एकता आणि अखंडताप्रति मोदीजींचा अतूट विश्वासदेखील दिसून येतो. तिहेरी तलाकसारख्या सामाजिक कुप्रथांवर बंदी घालण्याचा निर्णय हे महिलांचा सन्मान आणि अधिकारांचे रक्षण करण्याचे धाडसी पाऊल होते. हे निर्णय घेणे सोपे नव्हते. यापैकी अनेक निर्णयांना कडाडून विरोधदेखील झाला, मात्र पंतप्रधान मोदीजी कधीही विचलित झाले नाहीत. राष्ट्रहितासाठी कुठली कृती करणे आवश्यक आहे याबरोबरच विरोध आणि टीकेची पर्वा न करता कुठल्याही परिस्थितीत ती पूर्णत्वास नेण्यावर त्यांचा दृढ विश्वास होता.
खूप जुनी गोष्ट नाही, जेव्हा कोविड-१९ सारख्या महामारीने संपूर्ण जगाला हादरवून टाकले होते. अशा कठीण परिस्थितीतदेखील मोदीजींनी जनतेला केवळ आश्वस्त केले नाही तर देशातील उद्याोग, वैज्ञानिक आणि युवकांना आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने प्रोत्साहन दिले. जग विचार करत होते की या महामारीत भारताची अवस्था किती बिकट होईल. मात्र आपल्या नेतृत्वाच्या कौशल्याची ही कमाल होती की देशात विक्रमी वेळेत लशींची केवळ निर्मितीच झाली नाही तर तंत्रज्ञान संचालित मोफत लसीकरण अभियानाच्या माध्यमातून आपण जगासमोर कोविड व्यवस्थापनाचे अनुकरणीय प्रारूप सादर केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने हे वेळोवेळी सिद्ध केले आहे की राष्ट्रीय सुरक्षा आणि आत्मसन्मान यांच्याशी कोणतीही तडजोड शक्य नाही. उरी हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकने जगाला दाखवून दिले की भारत आता दहशतवादाचा मूकदर्शक बनून राहणार नाही. पुलवामाच्या घटनेनंतर झालेल्या बालाकोट हवाई हल्ल्याने हा संकल्प अधिक दृढ केला. अलीकडेच पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल ७ मे २०२५ रोजी राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ने हे धोरण निर्णायकपणे स्थापित केले की जेव्हा-जेव्हा देशाची अस्मिता आणि नागरिकांच्या सुरक्षेला हानी पोहोचेल, तेव्हा तेव्हा भारत संपूर्ण साहस आणि दृढ निर्धाराने त्याला सडेतोड उत्तर देईल. या कारवायांनी देशवासीयांच्या मनात केवळ विश्वास आणि गौरवाची भावना मजबूत केली नाही तर जगाला हा संदेशही दिला की नवा भारत आपल्या हितांचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहे.
परराष्ट्र धोरण क्षेत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यशैली असाधारण आहे. आज जेव्हा ते एखाद्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उभे राहून भारताची भूमिका मांडतात, तेव्हा आपल्या सर्वांमध्येच एक अभिमानाची भावना जागृत होते. यापूर्वी भारताला नेहमीच एका उदयोन्मुख राष्ट्राच्या रूपात बघितले जात असे, मात्र आज पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील भारत जागतिक नेतृत्वाची भूमिका घेण्याकडे वाटचाल करत आहे. मग तो पॅरिस हवामान बदल करार असो, जी ट्वेन्टी परिषद असो किंवा संयुक्त राष्ट्रांमधील त्यांचे भाषण असो. प्रत्येक ठिकाणचा त्यांचा आत्मविश्वास भारताच्या वाढत्या सामर्थ्याचे आणि गौरवाचे प्रतीक आहे.
नरेंद्र मोदी यांना मी जितके जाणतो त्या आधारावर हे सांगू इच्छितो की त्यांचे व्यक्तिमत्त्व केवळ धोरणे आणि कार्यक्रमांपर्यंत मर्यादित नाही. त्यांच्यात एक असे विशेष गुणवैशिष्ट्य आहे ज्यामुळे ते जनतेशी थेट जोडले जातात. त्यांच्या बोलण्यातील उत्स्फूर्तता आणि साधेपणामुळे ते संवाद साधताना थेट लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचतात. ते आकाशवाणीवरून ‘मन की बात’ या त्यांच्या कार्यक्रमातून बोलतात तेव्हा कोट्यवधी लोकांना असे जाणवते की ते त्यांच्याशी थेट संवाद साधत आहेत. एखाद्या गावचा शेतकरी असो, शहरातील विद्यार्थी असो किंवा एखादी गृहिणी असो सर्वांनाच त्यांच्याबद्दल आपलेपणा जाणवतो. ही काही साधारण गोष्ट नाही.
मी सिंहावलोकन करतो तेव्हा मला जाणवते की नरेंद्र मोदी यांनी भारताला केवळ आर्थिक आणि राजकीयदृष्ट्याच नव्हे तर मानसिक आणि सांस्कृतिकरीत्याही सामर्थ्यवान केले आहे. भारताच्या अंतर्गत ताकदीची चांगली जाण असलेल्या मोदीजींचे हे स्वप्न आहे की २०४७ मध्ये, भारत स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण करेल, तेव्हा आपला देश ‘आत्मनिर्भर भारत’ आणि एक महान देश म्हणून पुन्हा अस्तित्वात येईल आणि हे साध्य करण्यासाठी, ते त्यांच्या दूरदर्शी धोरणांसह देशाला या दिशेने वेगाने घेऊन जात आहेत. आपण जगात कोणापेक्षाही कमी नाही हा विश्वास त्यांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात जागृत केला आहे. गेल्या ११ वर्षांत त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने स्वाभिमान, स्वावलंबन आणि आत्मविश्वासाची नवीन उंची गाठली आहे, जे माझ्या मते ऐतिहासिक आणि अद्वितीय आहे.
वास्तविक खरे नेतृत्व तेच असते जे प्रत्येक क्षणी राष्ट्राला समर्पित असते आणि ज्याची दूरदृष्टी वर्तमानाच्या पलीकडे भविष्याचा वेध घेत असते. नरेंद्र मोदींचे हे व्यक्तिमत्त्व आज भारताची सर्वात मोठी ताकद आहे.