प्रा. मिलिंद जोशी, भारती विद्यापीठ
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून देणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘राजर्षी’ या विशेषांकाचे प्रकाशन नुकतेच कोल्हापूर येथे झाले. त्या वेळी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचे गाढे अभ्यासक व ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार आणि संतसाहित्य, इतिहासाचे अभ्यासक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्यात रंगलेला संवाद…

डॉ. जयसिंगराव पवार: ‘लोकसत्ता’ला राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी विशेषांक काढावासा वाटला, याचा कोल्हापूरकरांना मोठा आनंद आहे. साध्या साध्या गोष्टींवर खूश होणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी ही मोठी पर्वणी आहे. भारती विद्यापीठाच्या विद्यामाने हा अंक निघतो आहे, ही आणखी आनंदाची बाब. आतापर्यंत आम्हाला भाषणे देण्याची सवय आहे; मात्र जाहीर संवाद साधण्याचा हा माझ्या आयुष्यातील पहिलाच प्रसंग आहे. अशा प्रकारे गप्पा मारायला मलाही आवडतील. मला वाटतं, सुरुवात डॉ. सदानंद मोरे यांनी करावी.

डॉ. सदानंद मोरे: ‘लोकसत्ता’ आणि भारती विद्यापीठाला मनापासून धन्यवाद देतो. ‘लोकसत्ता’ने कोल्हापूरमध्ये ‘राजर्षी’ अंक प्रकाशित करण्याला आणखी वेगळे महत्त्व आहे. इथे कोल्हापुरातील सगळी थोर मंडळी उपस्थित आहेत. त्यांच्यासमोर आपल्यासमवेत हा संवाद होतो आहे, याचाही आनंद आहे. राजर्षी शाहू महाराजांना जाऊन आता सुमारे शंभर वर्षे होऊन गेली. इतक्या वर्षांत बऱ्याच नद्यांच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले आहे. तरीही आपणाला राजर्षींच्याविषयी विशेषांक काढावासा वाटतो, यातच त्यांची महती सामावली आहे. डॉ. पवार सरांची संपूर्ण हयात शाहू अभ्यासात गेली आहे, त्यांच्यासमोर मी एक फ्रीलान्स अभ्यासक आहे, हे आधीच नमूद करतो. असो! तर, छत्रपती शाहू महाराज आणि बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड हे दोन राजे समकालीन होते. शाहूंना अल्पायुष्य लाभले, सयाजीरावांना दीर्घायुष्य लाभले. मात्र, या दोघांनीही त्या काळामध्ये आपल्या संस्थानासाठी जे जे काही उत्तम करता येणे शक्य होते, ते सर्व काही केले. ब्रिटिशांच्या अमलाखाली देश पारतंत्र्यात असतानासुद्धा पाश्चात्त्य जगतात जे नवीन उदयास येत होते, ते आपल्याकडे येऊ लागले. विशेषत: आधुनिक शिक्षण. ते येत असताना स्थानिक पातळीवरही येथे हजारो वर्षे काही परंपरा अस्तित्वात होत्या. त्या ज्ञानावर काही विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती. बाहेरून येणाऱ्या ज्ञानामध्येही त्यांना नव्या संधी दिसल्या आणि त्यांनी गतीने हे ज्ञान मिळविण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यातून पूर्वी ज्ञानाच्या बळावर सत्तेत असलेल्या वर्गानेच या नव्या ज्ञानसंपादनातून दुय्यम सत्ता प्राप्त केली. त्यापूर्वी राजे म्हणून ज्यांची सत्ता होती, ज्यांनी दिल्ली, अटकेपार आपला पराक्रम गाजविला, त्या मराठे, क्षत्रियांचे स्थान मात्र या नवशिक्षण व्यवस्थेमध्ये धोक्यात आले. हा धोका नेमका ओळखला तो महात्मा फुले यांनी. त्यांच्या दृष्टीने शेती व्यवसाय करणारे मराठा, कुणबी शूद्र होते. या वर्गामध्ये नवविचारांविषयी जागृती करण्याचा कार्यक्रम फुले यांनी हाती घेतला. त्यासाठी त्यांनी एजन्सी म्हणून सरकारकडे आग्रह धरला आणि स्वत:ही सार्वजनिक सत्यधर्म समाजाची स्थापना केली. जोतिराव फुले यांनी हे जे समाजबदलाचे स्वप्न मनी बाळगले होते, ते प्रत्यक्षात साकार करण्याचे कार्य पुढे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केले.

डॉ. पवार: इतिहास समजून घेण्यासाठी शे-दोनशे वर्षे मागे जाऊन त्याचा वेध घ्यावा लागतो. तत्काळात धर्म, शिक्षण, व्यवसाय, नोकरी या सर्व बाबतीत ब्राह्मणशाहीची मक्तेदारी होती. पुरोहितशाही त्याचा एक भाग म्हणून कार्यरत होती. हा वर्गच पेशवे काळात ब्युरोक्रसी म्हणून कार्यरत होता. इंग्रजांनी पेशवाई नष्ट करण्याच्या कालखंडात शिक्षणाला प्रोत्साहन दिले. वर्ण वर्चस्ववादी समाजानेच आधी इंग्रजी शिक्षण घेतले आणि कारकून, मामलेदाराच्या जागा पटकावल्या आणि नोकरशाही पूर्वीप्रमाणेच आपल्या हाती राखली. पुढे शाहू महाराजांनी राज्यकारभार स्वीकारला, तेव्हाही हे चित्र तसेच होते. संस्थानच्या राज्यकारभारात एकही ब्राह्मणेतर अधिकारी नव्हता. सर्व सनदी अधिकारी ब्राह्मण वर्गातील होते. जे ब्राह्मणेतर होते, त्यातही ख्रिाश्चन व पारशीच होते. ही स्थिती पाहून शाहू महाराजांनी आरक्षणाचे धोरण जाहीर केले.

महात्मा फुले यांनी विद्योचे महत्त्व खऱ्या अर्थाने ओळखले होते. त्यांनी सरकारने लोकल फंडातला पैसा शूद्रातिशूद्रांच्या शिक्षणावर खर्च करण्याची मागणी केली. हे कार्य शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात मोठे केले. फुले यांच्या कालखंडात केशवपन, बालविवाह या चळवळी उच्चवर्णीय वर्गात सुरू होत्या. मात्र, खालच्या शूद्रातिशूद्रांच्या उन्नतीसाठीचा झगडा महात्मा फुले यांनी चालविलेला होता. फुले यांचे कार्य हे खरे म्हणजे एक प्रकारे क्रांतीच होती. बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्यामुळेच फुले आणि शाहू हे समाजक्रांतिकारक ठरतात.

आमच्या लहानपणी सयाजीराव गायकवाड ठाऊक होते, पण शाहू महाराज मात्र ऐकलेले नव्हते. आजची पिढी सुदैवी अशासाठी की यांना शाहू महाराज माहीत आहेत. सयाजीरावांनी प्रिव्ही कौन्सिलपर्यंत लढा देऊन आपले संस्थान स्वतंत्र ठेवण्यात यश मिळविले होते. ते ब्रिटिशांचे मांडलिक नव्हते. कोल्हापूरच्या तुलनेत बडोदा संस्थान खूपच मोठे होते. आपले संस्थान युरोपीय ज्ञानाच्या धर्तीवर विद्योची कास धरणारे हवे, येथे आधुनिक सुविधा व्हायला हव्यात, म्हणून सयाजीरावांनी त्यांच्या संस्थानात तळमळीने अनेक सुधारणा केल्या. शाहू महाराजांनीही बडोद्याच्या तोडीच्या सुधारणा करवीर संस्थानात केल्या. त्यांच्यात आणि शाहू महाराज यांच्यात मूलभूत फरक असा होता की सयाजीरावांचे वर्तन हे युरोपनाइज्ड होते, तर शाहूंच्या वर्तनात एक प्रकारचे रांगडेपण होते. मात्र, दोघांच्या सामाजिक बांधिलकीमध्ये अजिबात फरक नव्हता, हे महत्त्वाचे.

डॉ. मोरे: आणखी एक मुद्दा मला सांगायचा आहे, तो असा की, फुले, शाहू, आंबेडकर या त्रिकुटापैकी महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांचे साहित्य विपुल उपलब्ध असून शाहू महाराजांचे केवळ आदेश आणि अवघी १५-१६ भाषणे उपलब्ध आहेत. अशा वेळी उपलब्ध सामग्रीच्या आधारे महाराजांच्या कृतीचे विश्लेषण करणे अवघड असले तरी फुले, आंबेडकर यांच्या तुलनेत त्यांचे वेगळेपण सांगता आले पाहिजे, असे मला वाटते.

डॉ. पवार: शाहू महाराज हे कर्ते सुधारक होते, हे आपण आधी लक्षात घ्यायला हवे. महाराजांचे विश्लेषण करण्यासाठी साधनांची कमतरता आहे, ही बाब खरी असली तरी महात्मा फुले यांच्या मनामध्ये जे सामाजिक, शैक्षणिक कार्य करावयाचे होते, ते शाहू महाराजांनी पुढे नेण्याचे काम केले. स्वत: सत्यशोधक समाजाचे सदस्य नसल्याचे सांगत असतानाही सत्यशोधकांचे कैवारी होण्याइतके प्रचंड कार्य त्यांनी केले. सामाजिक न्याय प्रस्थापनेचे त्यांचे कार्य प्रचंड मोठे आहे. सन १९२० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लिहिलेल्या पत्रात ते त्यांना ‘लोकमान्य’ असे संबोधतात. ब्राह्मण ब्युरोक्रसीमुळे दलितांमधील ‘स्पिरिट’ नाहीसे झाल्याची भावना त्यात व्यक्त करतात. त्यातून जातिभेद निर्मूलनाच्या कार्याची गरज महाराज अधोरेखित करतात. स्वत: महाराजांनी त्या कामी पुढाकार घेऊन अनेक गोष्टी केल्या. मातंग समाजातील लोकांना आपले स्वत:चे ‘घाटगे’ हे आडनाव दिले. धनगर-मराठा आंतरजातीय विवाह लावून दिले. काळाच्या पुढच्या आणि तत्कालीन महाराष्ट्राला न पेलणाऱ्या अनेक गोष्टी महाराजांनी पुढाकार घेऊन केल्या. वेदोक्तासारख्या प्रकरणांनी शाहू महाराजांमधील स्फुल्लिंग चेतविले आणि ते भेदभावाविषयी पेटून उठले असले तरी त्यांच्या मनामध्ये जातिभेदाविषयी चीड होतीच. त्यांनी घडवून आणलेली सामाजिक क्रांती ही त्यांच्या अंत:करणातून आलेली उत्स्फूर्त प्रेरणा होती. त्यातून समाजक्रांती घडवून आणण्यासाठी जे जे करावयाचे, ते ते सर्व त्यांनी केले.

डॉ. मोरे: शाहू महाराजांना ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादात बंदिस्त करण्याऐवजी त्यांना त्यातून बाहेर काढायला हवे. शाहू महाराज हे एक अव्वल दर्जाचे धर्मसुधारक होते. त्या अंगाने त्यांची प्लेसमेंट थेट विश्वामित्रापर्यंत करायला हवी. फुले, आंबेडकरांनी वेद नाकारले. तथापि, शाहू महाराज वेदांच्या चौकटीत आपले अधिकार मागत होते. ते ब्राह्मणविरोधी नव्हते, तर स्वतंत्र शंकराचार्य नियुक्त करणारे, वैदिक पाठशाळा काढणारे धर्म क्रांतिकारक होते, या अंगानेही शाहू महाराजांच्या कार्याकडे पाहण्याची, त्याची मांडणी करण्याची गरज मला वाटते. फुले आणि आंबेडकर यांच्या कात्रीत आपण शाहू महाराजांना अडकवले आहे की काय, असे वाटते. त्यांच्यापासून वेगळे काढून शाहू महाराज आपल्याला स्वतंत्रपणे सांगता आले पाहिजेत, असे मला वैयक्तिकरीत्या वाटते.

डॉ. पवार: महाराजांनी केलेल्या धार्मिक सुधारणांचा मुद्दा आपण म्हणता तसा रास्त आहे. मात्र, महाराजांनी त्या काळात जातिभेद निर्मूलनासाठी केलेले कार्य, अगदी धनगर-मराठा आंतरजातीय विवाह लावून देण्याचे केलेले कार्य हे काळाच्या पुढचेच आहे. त्या काळातील महाराष्ट्राला न पेलवणाऱ्या अनेक बाबी महाराजांनी केल्या आहेत. त्यापैकीच आपण म्हणता ती कामे आहेत. क्षात्रजगद्गुुरूची नियुक्ती हा त्या सुधारणांचाच एक भाग होता. महाराज प्रस्थापित व्यवस्थेला पर्याय देऊ पाहात होते. त्यांच्या कार्याकडे राष्ट्रीय दृष्टीने पाहण्याची गरज आहे. आम्ही महाराजांच्या कार्याकडे धार्मिक नव्हे, तर सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून पाहतो. त्या अंगाने फुले, शाहू, आंबेडकरांचे कार्य हे नदीच्या प्रवाहाप्रमाणे आहे. सामाजिक न्यायाचा प्रवाह त्यातून या राष्ट्रात अखंडितपणाने वाहतो आहे, याची कृतज्ञ जाणीव आपल्याला सदैव बाळगावी लागेल.

शब्दांकन :  दयानंद लिपारे