डॉ. व्यंकटराव घोरपडे
भारतात अनादी काळापासून गोपालन केले जात आहे. भौगोलिक आणि नैसर्गिक परिस्थितीनुसार देशात विविध प्रकारचे गोवंश विकसित झाले. एकेकाळी गोधनाची संख्या कुटुंबाच्या समृद्धीचे प्रतीक मानली जात होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, तत्कालीन परिस्थितीचा विचार करून अधिक दूध देणाऱ्या संकरित (हायब्रिड) गोवंशावर भर देण्यात आला, ज्यामुळे भारत जागतिक दूध उत्पादनात प्रथम क्रमांकावर पोहोचला. मात्र, प्रतिव्यक्ती दूध उत्पादनात आपण अजूनही मागे आहोत. आता पुन्हा एकदा देशी गोवंशाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवला जात आहे, कारण त्यात भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आहे. रोगप्रतिकारशक्ती उत्तम आहे आणि कमी खर्चात चांगले उत्पन्न देता येते.
भारतात एकूण ५१ देशी गोवंश नोंदणीकृत आहेत आणि महाराष्ट्रात खिलार, डांगी, देवणी, लाल कंधारी, गवळाऊ यांसारख्या स्थानिक जाती आहेत, ज्यांचा विकास तेथील हवामान, पर्यावरण आणि गरजांनुसार झाला आहे. अलीकडेच कोकण कपिला आणि कठाणी या दोन जातींनाही मान्यता मिळाली आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख देशी गोवंश आणि त्यांची वैशिष्ट्ये
खिलार: पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर आणि सीमाभागातील बेळगाव, विजापूर येथे आढळणारा हा गोवंश कमी पर्जन्यमान असलेल्या भागासाठी योग्य आहे. हा गोवंश काटक आणि चपळ असून, पंधराव्या शतकापासून दळणवळण आणि शेतीच्या कामांसाठी वापरला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही या गोवंशाचा वापर केल्याचे उल्लेख आढळतात.
गवळाऊ: वर्धा जिल्ह्यातील या गोवंशाचा उपयोग मराठ्यांनी डोंगराळ प्रदेशात सामान वाहून नेण्यासाठी केला. हा गोवंश काटक, चपळ आणि वेगाने धावणारा आहे. दुष्काळात कमी पाणी आणि निकृष्ट चारा खाऊनही तो दूध उत्पादन देऊ शकतो. बैलगाडी शर्यतींमध्ये याची विशेष मागणी असते.
डांगी: नाशिक आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये आढळणारा हा गोवंश जास्त पावसाच्या प्रदेशात तग धरतो. त्याच्या त्वचेखालील तेलाच्या ग्रंथींमुळे तो सततच्या पावसातही काम करू शकतो. त्याचे पाय मजबूत असल्यामुळे डोंगरदऱ्यांमध्ये आणि भातशेतीत काम करण्यासाठी तो उपयुक्त आहे.
देवणी: मूळ लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात आढळणारा हा गोवंश, स्थानिक आणि गीर जातीच्या संकरातून विकसित झाला आहे. हा शेतीच्या कामांसाठी उपयुक्त असून, इतर जातींच्या तुलनेत जास्त दूध देतो. शुद्ध देवणी गाय एका वेतात १००० ते १२०० लिटरपर्यंत दूध देऊ शकते.
लाल कंधारी: नांदेड, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांत आढळणारा हा गोवंश शेतीच्या कामासाठी उत्कृष्ट मानला जातो. त्याचे दूध उत्पादन कमी असले तरी, त्याची उत्तम रोगप्रतिकारशक्ती आणि कमी व्यवस्थापन खर्चामुळे मराठवाड्यातील शेतकरी त्याला प्राधान्य देतात.
कोकण कपिला: कोकण भागातील ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यांत आढळणारा हा गोवंश कमीत कमी खर्चात जगू शकतो. हा उष्ण हवामान सहज सहन करतो आणि कुटुंबाची रोजची दुधाची गरज पूर्ण करतो.
कठाणी: नुकताच प्रमाणित झालेला हा गोवंश चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत आढळतो. चांगल्या गुणवत्तेच्या दुधासाठी ही जात ओळखली जाते आणि उष्ण हवामानाशी जुळवून घेण्यास ती सक्षम आहे.
सद्यस्थिती आणि उपाययोजना
महाराष्ट्रातील देशी गोवंश स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेणारे आणि शेतीच्या कामासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. तथापि, वाढलेले यांत्रिकीकरण, कमी होत चाललेली जमीन आणि चराऊ कुरणांच्या अभावामुळे त्यांची संख्या झपाट्याने घटत आहे. गेल्या २२ वर्षांत देशी जनावरांची संख्या ४० टक्क्यांनी कमी झाली आहे, ज्यामुळे त्यांच्या संवर्धनाची तातडीची गरज निर्माण झाली आहे.
देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. प्रथम, त्यांच्या दूध उत्पादन, रोगप्रतिकारशक्ती आणि इतर गुणांविषयी अचूक माहिती संकलित करणे आवश्यक आहे. या सर्व देशी गोवंशाची नोंद इनाप या संगणकीय प्रणालीवर व्हायला हवी. त्यासाठी पशुपालकांनीदेखील सहकार्य करायला हवे. पशुसंवर्धन विभागाच्या अनुवंशिक सुधारणा कार्यक्रमाकडे संबंधितांनी लक्ष देणे अपेक्षित आहे. त्यामध्ये ज्या सुधारणा करणे आवश्यक आहे, त्या सुधारणा करून त्याची अंमलबजावणी करावी लागेल. या माहितीच्या आधारावर, उत्तम अनुवांशिक गुणधर्म असलेल्या गाई-बैल निवडता येतील. त्यातील उच्च अनुवांशिकतेच्या वळूंचे वीर्य वापरून पैदास सुधारणा कार्यक्रम योग्य पद्धतीने राबवणे शक्य आहे. अलीकडेच लागू झालेल्या महाराष्ट्र गोजातीय प्रजनन (विनियमन) अधिनियम २०२४ ची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि निकृष्ट वळूंचे खच्चीकरण करणेदेखील महत्त्वाचे आहे. जगातील अनेक गोवंश हे स्थानिक पशुपालकांच्या समावेशाने स्थापन झालेल्या जातीसंवर्धन संस्थांच्या माध्यमातून विकसित झाल्या आहेत. त्यासाठी स्थानिक जाती संवर्धन संस्थांना प्रोत्साहन देणे, गोशाळांना केवळ अनुदान न देता त्या स्वयंपूर्ण व्हाव्यात यासाठी मदत करणे आवश्यक आहे. देशी आणि संकरित गोवंशांमध्ये संघर्ष टाळून, दोघांचेही महत्त्व पशुपालकांना समजावून सांगणे आवश्यक आहे. जिल्हा स्तरावर देशी गोवंशांची प्रदर्शने आयोजित करणे, विजेत्यांना बक्षिसे देऊन प्रसिद्धी देणे आणि त्यांचे कौतुक करणे हेदेखील महत्त्वाचे आहे.
इतर राज्यातील जास्त दूध देणाऱ्या जाती सरसकट महाराष्ट्रात आणण्याऐवजी, आपल्या स्थानिक जातींचेच दूध उत्पादन कसे वाढवता येईल यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. या सर्व प्रयत्नांतूनच देशी गोवंश पुन्हा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतील आणि त्यांचे संवर्धन होईल.
डॉ. व्यंकटराव घोरपडे
(लेखक सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन आहेत)