महेश सरलष्कर

प्रश्न- हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये आता परिस्थिती कशी आहे?

येचुरी- मणिपूरचे जणू दोन तुकडे पडले आहेत. एका राज्यात दोन राष्ट्रे आहेत असे जाणवत राहते. त्यांनी सीमा तयार केली असून ती ओलांडून मैतेई आणि कुकी एकमेकांच्या भागांमध्ये जाण्याचे धाडस करत नाहीत. सीमेच्या एका बाजूला मैतेईंनी तर, दुसऱ्या बाजूला कुकींनी स्वयंसेवक तैनात केलेले आहेत.

आमच्या पक्षाचा राज्यसचिव मैतेई आहे, मैतेईबहुल भागांमध्ये तो आमच्या सोबत होता. पण, आम्ही कुकी भागामध्ये भेटीगाठींसाठी गेलो तर, तो आला नाही. तिथल्या दोन्ही समाजाला ‘माकप’ची राजकीय भूमिका माहिती आहे, तरीही राज्यसचिवाने सीमा ओलांडण्याचे धाडस केले नाही.

फक्त पंगाल दोन्ही बाजूंना जाऊ शकतात. पंगाल हे मुस्लिम. (मैतेई भाषेत मुस्लिमांना पंगाल म्हणतात) पंगालांशी ना मैतेईंचे ना कुकींचे शत्रुत्व, पंगालांना सगळीकडे वाट मोकळी. माझ्या कारचा चालक, सुरक्षा रक्षक दोघेही पंगाल. या पंगालासोबत मी फिरलो, अन्यथा मला मणिपूरमधील परिस्थिती पाहता आली नसती.

प्रश्न- तरीही केंद्राने सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवलेले नाही…

येचुरी- केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवून तिथल्या लोकांना विश्वासात घेतले गेले असते तर हिंसा थांबली असती. पूर्वी काश्मीरमध्ये दगडफेक, लष्कराकडून पॅलेटगनचा वापर या घटनांमुळे वातावरण तंग झाले होते. तेव्हा तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन काश्मीरला गेलो होतो. हे मोदी सरकारच्या काळातच घडले होते. मग, मणिपूरमध्ये का होऊ शकत नाही?

प्रश्न- केंद्राच्या आडमुठेपणाचे कारण काय?

येचुरी- मणिपूरमधील असंतोषाला कुकी जबाबदारी असून ते सर्व म्यानमारमधून आलेले घुसखोर असल्याचे विधान मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी केले होते. त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनीही दुजोरा दिला होता. कुकींनी मुख्यमंत्र्यांवर पक्षपातीपणाचा गंभीर आरोप केलेला आहे. सर्वच कुकी घुसखोर नाहीत, ते कित्येक शतके पहाडी भागांमध्ये राहात आहेत. या विधानामुळे कुकींमधील अस्वस्थता वाढत गेली.

कुकी बंडखोर संघटनेच्या म्होरक्याने २०१९ मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवलेल्या पत्रामधील आरोप तर अधिक गंभीर आहे. २०१७ मधील मणिपूरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मदतीचे आवाहन करण्यासाठी आसामचे मुख्यमंत्री (हिमंत बिस्वा-शर्मा) आणि ईशान्येकडील राज्यांचे भाजपचे तत्कालीन प्रभारी (राम माधव) या दोघांनी काही कुकी बंडखोर संघटनांच्या नेत्यांची भेट घेतल्याचा दावा पत्रात केलेला होता. या संघटनांची मदत घेऊन भाजप मणिपूरमध्ये सत्तेवर आला, कुकी आमदारांच्या पाठिंब्याने बिरेन सिंह मुख्यमंत्री बनले, आता याच कुकींना त्यांनी घुसखोर ठरवले आहे.

प्रश्न- मणिपूरमधील असंतोषामागे उद्योग-आर्थिक हितसंबंध कारणीभूत असू शकतील का?

येचुरी- पहाडी भागांमध्ये कुकी-नागांची वस्ती आहे. तिथल्या वन भागांमध्ये खनिजसंपत्ती भरपूर आहे, पाचव्या अनुसूचीनुसार इथल्या आदिवासी जमिनींना संरक्षण असल्यामुळे तिची खरेदी-विक्री होऊ शकत नाही. तिथली खनिजसंपत्ती ताब्यात घ्यायची असेल तर जमिनीही ताब्यात घ्याव्या लागतील. मग, त्यासाठी कायदे-नियम बदलावे लागतील. पहाडी भाग बिगर-आदिवासी म्हणून घोषित करावा लागेल.

दुसरा मार्ग म्हणजे मैतेईंना आदिवासी म्हणून घोषित करावे लागेल. मग, ते जंगलजमिनी खरेदी करू शकतील. उच्च न्यायालयाने चार महिन्यांपूर्वी मैतेईंना आदिवासी घोषित केले. इथल्या खनिज उत्खननाच्या उद्योगांमध्ये कॉर्पोरेटचे हितसंबंध गुंतलेले असू शकतात.

इथे अमली पदार्थांचा अवैध व्यापार जोमाने सुरू आहे. अफूची शेती केली जाते. म्हणून भाजप कुकींना ‘नॉर्को टेरेरिस्ट’ म्हणतात. या धंद्यावर नियंत्रण ठेवायचे असेल तर अफूची शेती ताब्यात घ्यावी लागेल. अशी वेगवेगळी कारणे असू शकतात.

प्रश्न- आत्ता तेथील लोकांची अवस्था कशी आहे?

येचुरी- तिथे ६० हजार लष्करी जवान तैनात आहेत. पण, त्यांना कारवाईचे आदेश दिले नसतील, तर ते काय करणार? हा निर्णय राजकीय नेतृत्वाने का घेतला नाही, हे कोणालाही माहिती नाही. ज्यांनी शस्त्रांची लूटमार केली, ते मोकाट सुटले, त्यांना अडवणारे कोणी नाही. त्यांनी घडवलेल्या हिंसाचाराचे दुष्परिणाम निष्पाप लोकांना भोगावे लागले. आम्ही मैतेई आणि कुकींच्या प्रत्येकी दोन निर्वासित छावण्यांमध्ये गेले होतो, त्यांची अवस्था कल्पना करता येणार नाही, इतकी भीषण होती. लोकांकडून ऐकलेल्या कहाण्या अमानुष होत्या. त्यांची घरे, मालमत्ता सगळेच आगीत खाक झालेले आहे. त्यांना परत जायचे असेल तरी जाणार कुठे? त्यांच्या पुनर्वसनाची योजना राज्य सरकारने आखलेली आहे का? या छावण्यांमध्ये जन्मलेल्या नवजात बालकांचे लसीकरण कसे आणि कधी होणार, मातांना पौष्टिक आहार कुठून मिळणार? त्यांना वैद्यकीय मदतदेखील मिळत नाही.

प्रश्न- तिथली परिस्थिती निवळण्याऐवजी अधिक गंभीर का होऊ लागली आहे?

येचुरी- आम्ही मणिपूरमध्ये असताना नागाबहुल भागातील हिंसाचारात तीन कुकी मारले गेले. या घटनेमुळे आत्तापर्यंत तटस्थ राहिलेल्या नागा संतप्त झाले. चार महिन्यांमध्ये पहिल्यांदाच नागाबहुल भागात वांशिक हिंसाचार झाला. आमच्या भागांमध्ये हिंसाचार झाला तर आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा नागांनी दिला आहे. नागांमुळे परिस्थिती पुन्हा स्फोटक बनण्याचा धोका आहे. केंद्र सरकारने नागा शांतता करार केला त्यामागे नागांच्या २९ वर्षांच्या संघर्षाचा इतिहास आहे. या शांतता करारावर पाणी फेरले गेले तर काय करणार? मणिपूरच्या वांशिक हिंसाचारामध्ये शेजारील मिझोराम आधीच ओढले गेले आहे. मैतेईची दोन्ही राज्यांमध्ये जा-ये होत आहे. तिथेही केंद्राने मिझो शांतता करार केली आहे. त्याचे काय होणार? मणिपूरचा वांशिक हिंसाचार थांबवला नाही तर अख्ख्या ईशान्य भारतात हिंसाचारची आग पसरत जाईल. आगीशी खेळ खेळला जात असताना केंद्र आणि राज्य सरकार शांतपणे खेळ बघत बसले आहे. ईशान्येतील विविध समुदायांशी केलेल्या शांती करारांचे भवितव्य काय असेल? मणिपूरमधील हिंसाचाराचा या करारांवरही परिणाम होऊ शकतो.

हिंसाचारामुळे मणिपूरमधील महामार्ग आणि इतर रस्ते बंद झाले आहेत. कुकींना वळसा घालून मिझोरामची राजधानी आयझोलला यावे लागते. १४ तासांच्या प्रवासात भाजीपाला टिकणार कसा? मैतेईंचीही अशीच फरफट होते. जीवनावश्यक वस्तूंची चणचण आहे. दैनंदिन गरजा भागल्या नाहीत तर परिस्थिती स्फोटक होणारच. त्याचे कुठलेच भान केंद्र व राज्य सरकारांना नाही.

प्रश्न- भाजपचा राजकीय लाभ काय होणार?

येचुरी- देशभर धार्मिक ध्रुवीकरण होत असल्याचे पाहतोय. इथे हिंदू-मुस्लिम असा संघर्ष नाही. मैतेईंना ते हिंदू मानतात, बहुतांश कुकी ख्रिश्चन आहेत. चर्च जाळली गेली, मंदिरांवर हल्ले झाले. मणिपूरमध्ये चार महिने हिंसाचार सुरू आहे, असेच सुरू राहिले तर संपूर्ण ईशान्य भारत या आगीत होरपळून जाईल. ईशान्येकडील लोकसभेच्या २५ जागांसाठी हा खेळ खेळला जात असेल तर भाजप देशाचे नुकसान करत आहे. विभाजनवादी संघर्ष आणखी तीव्र होईल.

प्रश्न- मणिपूरमधील परिस्थितीमुळे राज्यपाल अनुसुया उईके देखील अस्वस्थ असल्याचे बोलले जाते…

येचुरी- राज्यपालांमध्ये अस्वस्थता असल्याचे जाणवले. राज्यपाल केंद्राला काही गोष्टी सांगू शकतात. राष्ट्रपती राजवट लागू करण्याची गरज होती. पण, हे निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घ्यायला हवेत.

mahesh.sarlashkar@expressindia.com