प्रतिक शिंदे, स्नेहल काळे
आज भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. पण हीच तरुण पिढी आज विद्यार्थी दशेत मानसिक दबाव, तणाव आणि असुरक्षिततेच्या जाळ्यात अडकलेली आहे. ‘मी आता फक्त जेवतो आणि अभ्यासच करतो’ हे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याचं वाक्य असलं तरी ते आज कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं कटु वास्तव झालं आहे.
देशाचा विचार केला तर दरवर्षी भारतात तब्बल सहा कोटी विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी आपले सर्वस्व पणाला लावतात. नीट, जेईई, एमपीएससी, यूपीएससी यासह अन्य काही कठीण परीक्षांसाठी दिवस -रात्र कठोर मेहनत करतात. पण या रणांगणात यश मिळवणाऱ्यांचा टक्का अत्यल्प असतो, हे वास्तव आहे. मेडिकल प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट परिक्षेतून २४ लाख परीक्षार्थींपैकी फक्त १.०८ लाख विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो, जेईई परीक्षेतून १२ लाख विद्यार्थ्यांमधून फक्त १६ हजार जागा उपलब्ध होतात. तर यूपीएससीच्या दहा लाख उमेदवारांतून निवड फक्त एक हजारच्या आसपास उमेदवारांची होते. म्हणजेच ९९ टक्के विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षेतून अपयशाचा सामना करावा लागतो, हे अत्यंत कटू सत्य समोरे येते.
शेतकऱ्यांपेक्षा विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचा आकडा मोठा..
स्पर्धा परीक्षांमधील या अपयशासोबतच येतो ताण, चिंता आणि मानसिक थकवा. जागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार मानसिक आरोग्य म्हणजे अशी स्थिती जिथे व्यक्ती स्वतःच्या क्षमता ओळखून तणावावर मात करते आणि समाजासाठी उपयोगी ठरते. पण भारतातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे चित्र वेगळं आहे. राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार ६५% विद्यार्थ्यांना झोपेच्या समस्या आहेत, ५२% विद्यार्थी चिंतेत आहेत, ४५% विद्यार्थी नैराश्यग्रस्त आहेत, तर २०% विद्यार्थ्यांना सातत्याने आत्महत्येचे विचार येतात. सन २०१३ ते २०२२ दरम्यान विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमध्ये तब्बल ६४% वाढ झाली असून २०२४ मध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचा आकडा शेतकऱ्यांच्या आत्महत्या पेक्षाही जास्त होता.
विद्यापीठांचे अपयश, संकटाचे मूळ :
भारतीय शिक्षण व्यवस्थेची सर्वात मोठी समस्या अशी आहे की जितके जास्त शिक्षण, तितकी जास्त बेकारी! अशिक्षितांमध्ये फक्त ३% बेकारी आहे, तर पदवीधरांमध्ये ती २९% आहे — जवळजवळ दहापट जास्त. आपल्या विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना उद्योगासाठी कौशल्ये दिली जात नाहीत. त्यामुळे पदवी घेतल्यानंतरही नोकरी मिळत नाही. जेव्हा पदवीनंतरही नोकरी मिळत नाही, तेव्हा विद्यार्थी पुन्हा स्पर्धा परीक्षांकडे वळतात.
अशी मुले एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग, रेल्वे यासह अन्य परीक्षांच्या तयारीला झपाटून लागतात. त्यामुळे स्पर्धा आणखी तीव्र होते आणि मानसिक दबाव वाढतो. विद्यापीठे रँकिंग आणि प्लेसमेंट टक्केवारीच्या मागे धावतात, पण खरी कौशल्यविकासाची प्रक्रिया मागे पडते. परिणामी, देशाची तरुणांची शक्ती सरकारी नोकऱ्यांच्या तयारीत अडकून राहते. परिणामी उद्योजकता, नवकल्पना आणि संशोधन या सर्व गोष्टींमध्ये प्रगती होत नाही. हे एक दुष्टचक्र तयार झालं आहे. हे संकट केवळ परीक्षा व्यवस्थेचा परिणाम नसून, संपूर्ण शैक्षणिक तंत्राच्या अपयशाचा परिणाम आहे.
यश न मिळणं हा नेहमी विद्यार्थ्यांचा दोष नसतो. अनेकदा परीक्षा प्रणालीच अपयशी ठरते. २०२४ मध्ये नीट पेपरफुटी, जेईई परीक्षा पुढे ढकलली गेली आणि व्यवस्थेतील त्रुटींमुळे लाखो विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झाला. जेव्हा मेहनत, पैसा आणि भविष्य सगळं एका परीक्षेवर अवलंबून असतं आणि त्या परीक्षेत गडबड होते, तेव्हा विद्यार्थ्यांच्या मनात नैराश्य आणि राग निर्माण होतो.
मानसिक आरोग्याविषयी बोलणं आजही भारतात ‘कमकुवतपणा’ मानलं जातं. चार कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मानसिक साहाय्याची गरज असूनही त्यांना योग्य उपचार मिळत नाहीत. हा जगातील सर्वात मोठा ‘ट्रीटमेंट गॅप’ आहे.
विद्यार्थ्यांतील मानसिक बदल :
तणावग्रस्त विद्यार्थी अनेकदा एकटे पडतात, मित्रांपासून दूर राहू लागतात. कोचिंग सेंटर्समधील दडपण, स्पर्धा आणि अपयशाची भीती यामुळे वर्तन बदलते. झोपेची कमतरता, सतत थकवा, डोकेदुखी, पचनाच्या तक्रारी ही सामान्य लक्षणे ठरतात. अभ्यासात लक्ष केंद्रित होत नाही, आत्मविश्वास कमी होतो. या अवस्थेकडे दुर्लक्ष झाल्यास नैराश्य आणि आत्महत्येपर्यंत स्थिती पोहोचते. कोटा सारख्या शहरात दरवर्षी डझनभर विद्यार्थी या ताणामुळे जीवन संपवतात.
मानसिक तणावाची कारणे
१. वैयक्तिक घटक : परिपूर्णतेची भावना, चुका करण्याची भीती, झोपेचा अभाव आणि भावनिक स्थैर्याचा अभाव.
२. कौटुंबिक दबाव : पालकांच्या अवास्तव अपेक्षा, “बाकीच्यांना जमलं मग तुला का नाही?” असा दृष्टिकोन.
३. शैक्षणिक वातावरण : गुणांवर आधारित मूल्यांकन, सतत तुलना आणि कोचिंगमधील यांत्रिक पद्धती.
४. सामाजिक घटक : समाजात यशाचं मोजमाप फक्त नोकरी आणि पैशावर होतं, त्यामुळे मानसिक आरोग्य दुय्यम ठरतं.
आता युवा पिढीचे विशेषता स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य बिघडू नये म्हणून काय उपाययोजना करण्याविषयी तीन टप्प्यात विचार होणे गरजेचे आहे.
१) तात्काळ हस्तक्षेप: प्रत्येक कोचिंग संस्थेत समुपदेशक असावा, विद्यार्थ्यांसाठी चोवीस तास हेल्पलाइन उपलब्ध असावी. मानसिक आरोग्य तपासणी आणि संवाद सत्रे नियमितपणे आयोजित करावीत.
२) दीर्घकालीन प्रणाली सुधारणा: शिक्षणात एकाच यशमार्गावर (इंजिनिअरिंग, मेडिकल, एमपीएससी यूपीएससी) लक्ष केंद्रित करण्याऐवजी विविध करिअर मार्ग, कौशल्याधारित नोकऱ्या आणि उद्योजकतेस प्रोत्साहन द्यावं.
३) सांस्कृतिक बदल: ‘टॉपर संस्कृती’ पासून बाहेर पडून आनंदी, संतुलित शिक्षण प्रणाली तयार करणं गरजेचं आहे. पालक, शिक्षक आणि माध्यमांनी मानसिक आरोग्याविषयी खुला संवाद साधावा.
निष्कर्ष
भारतात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांकडून दरवर्षी सुमारे १२ लाख कोटी रुपये इतका खर्च होतो, पण या मेहनतीचा मोठा भाग अपयशात जातो. जर ही उर्जा मानसिक आरोग्य, कौशल्य आणि नवोन्मेषाकडे वळवली, तर भारत जगातील ‘नाविन्याचे पावर हाऊस’ बनू शकतो. खरं यश हे केवळ पदवी, गुण किंवा नोकरीत नव्हे, तर जीवनाचा समतोल, मानसिक शांतता आणि स्वप्न जगण्याचं स्वातंत्र्य आहे. ज्या दिवशी भारतीय विद्यार्थी म्हणतील, “मी फक्त अभ्यासच करत नाही, तर मी जगतो, शिकतो आणि आनंद घेतो”, त्या दिवशीच भारत तरुण आणि विकसित राष्ट्र म्हणून पुढे येईल.
snehalkale1814@gmail.com
shindepratik8468@gmail.com