एअर मार्शल भूषण गोखले
देशासाठी सर्वाधिक काळ सेवा बजावणारी ‘मिग-२१’ लढाऊ विमाने आजपासून (२६ सप्टेंबर) हवाई दलाच्या ताफ्यातून निवृत्त होत आहेत. देशाचे रक्षण करण्यामध्ये या विमानांचे योगदान अतुलनीय आहे. नवी विमाने हवाई दलात दाखल होणे आणि लढाऊ विमानांच्या स्क्वाड्रन्सची संख्या वाढण्याबरोबरच इंजिनाच्या बाबतीत स्वयंपूर्णता ही आगामी काळातील आव्हाने आहेत.

देशाच्या हवाई दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावे, असे मानाचे पान म्हणजे ‘मिग-२१’. इतरही विमाने हवाई दलात होती. पण, १९६०च्या दशकापासून हवाई दलामध्ये असलेल्या या विमानाचा अनुभव लढाऊ वैमानिकांच्या अनेक पिढ्यांनी घेतला. अनेक युद्धांत आणि सीमा रक्षणामध्ये महत्त्वाची भूमिका या विमानाने बजावली. १९७१च्या युद्धाला कलाटणी देण्याची कामगिरी केली. अपघातामुळे या विमानावर टीकाही झाली. मात्र, त्यामागील कारणे वेगळी आहेत. ६० वर्षांहून अधिक कार्यकाळामध्ये हवाई दलाच्या जडणघडणीचेही साक्षीदार हे विमान राहिले.

पार्श्वभूमी

देशाची फाळणी झाली, तेव्हा पाकिस्तानकडे लढाऊ विमानांच्या साडेतीन स्क्वाड्रन्स, आपल्याकडे सात स्क्वाड्रन्स होत्या. स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे व्हॅम्पायर, कॅनबेरा अशी ब्रिटिश विमाने होती. आपण नंतर फ्रान्सची लढाऊ विमानेही घेतली. तुफानी, मिस्टिअर आणि अर्थातच आपल्याकडे हंटर विमानेही होती. हंटर विमाने अतिशय उत्तम होती. मला ही विमाने चालविण्याची भरपूर संधी मिळाली. १९७१ मध्येही या विमानांचा वापर झाला. स्वातंत्र्यानंतर अशा प्रकारे पाश्चिमात्य विमानांच्या प्रणालीशी हवाई दलाने जुळवून घेतले होते.

पाश्चिमात्य आणि पूर्वेकडील विमानांच्या प्रणालीमध्ये मोजमापाच्या पद्धतीत बदल असतो. पाश्चिमात्य विमानांमध्ये अंतर फुटात, वजन पौंडात आणि वेळ सेकंदात मोजतात. तर, पूर्वेकडील म्हणजेच रशियामधील विमानात वजन किलोग्रॅममध्ये, अंतर किलोमीटरमध्ये आणि वेळ सेकंदात मोजतात. तोपर्यंत पाकिस्तान सेंटोसारख्या करारामध्ये सामील झाला होता. त्यामुळे पाकिस्तानला अमेरिकी विमानेही मिळाली होती. त्या वेळी कोरियाचे युद्ध, व्हिएतनामच्या युद्धामध्ये मिग-१५, मिग-१७ अशी रशियाची लढाऊ विमाने पाहायला मिळाली होती. या युद्धांत या विमानांनी चांगली कामगिरी बजावली होती.

भारतीय हवाई दलाच्या इतिहासाला महत्त्वाचे वळण मिळाले, ते १९६२च्या भारत-चीन युद्धामुळे. आपण या युद्धात हवाई दलाचा लढाईमध्ये वापर केला नाही. मालवाहू आणि इतर विमानांचा रसद पुरवठ्यासाठी वापर केला. यांचाही वापर मर्यादितच होता. पण, युद्धात लढाऊ विमानांचा वापर झाला नाही. हे दुर्दैवी होते. या युद्धात आपण आपला काही भूभाग गमावला. या वेळी जगामध्ये शीतयुद्ध सुरू होते. ‘क्युबान मिसाइल क्रायसिस’ने सारे जग तणावात होते. चीनने याच आंतरराष्ट्रीय स्थितीचा फायदा उचलला होता.

अमेरिकेला समजून चुकले होते, की कम्युनिस्टांना दूर ठेवण्यासाठी त्यांच्या कथित मन्रो सिद्धांतासारख्या संकल्पनांचा काही फारसा उपयोग होणार नाही. याची जाणीव झाल्यानंतर अमेरिकेने भारताला मदत देऊ केली. भारताच्या लढाऊ वैमानिकांना प्रशिक्षणासाठी बोलावले. काही बॅचेसमध्ये आपले वैमानिक प्रशिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाले. ‘एफ-८६ सेबर’ विमानांवर त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. अमेरिकेने आपल्याला ‘एफ ८६ सेबर’ विमान देऊ केले होते. पण, ‘सेंटो’ करारामध्ये समावेश असलेल्या पाकिस्तानला मात्र अमेरिकेने ‘एफ १०४ स्टार फायटर’ हे सुपरसॉनिक विमान देऊ केले होते.

आपण कुठल्याही करारामध्ये नसल्यामुळे अमेरिका आपल्याला हे विमान देत नव्हती. अशा वेळी तत्कालीन सोव्हिएत संघाने भारताला ‘मिकोयान गुव्हेरिच’ अर्थात ‘मिग २१’ विमाने देऊ केली. ही वेळ कलाटणी देणारी ठरली. रशियाने भारताला केवळ ‘मिग-२१’ हे सुपरसॉनिक विमानच नव्हे, तर हे विमान तयार करण्याचा कारखानादेखील भारतात उभारण्याची तयारी दर्शवली. पुढे यथावकाश आवश्यक ते करार झाले आणि ही विमाने भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला.

आफ्रिकेतील लिबियापासून व्हिएतनामपर्यंत अनेक ठिकाणी या विमानांनी रणभूमीवर आपली कुशलता सिद्ध केली आहे. सर्व योद्ध्यांनी या विमानाचे कौतुक केले आहे. जगात सर्वाधिक उत्पादन या विमानाचे झाले आहे. जगात विविध ठिकाणी ५० हजारांहून अधिक ही विमाने बनविली गेली. केवळ भारतातच जवळपास हजार विमाने तयार करण्यात आली. यात ‘मिग-२१’ बरोबरच या विमानाच्या इतर प्रकारांचाही समावेश होता. या विमानाच्या आधारावरच चीनने एफ-६ ही त्यांची स्वत:ची विमाने बनविली.

देशात उत्पादन सुरू

पुण्यापासून २०० किलोमीटर अंतरावर ओझरजवळच या विमानांचे उत्पादन सुरू झाले. तेथे कारखान्याची स्थापना करण्यात आली. विमानांची बांधणी भारतात होत असे. तत्कालीन सोव्हिएत संघामधून विमानांचे सुटे भाग येत असत आणि आपण भारतात सुटे भाग एकत्रित करून विमाने तयार करीत असू. या विमानांच्या इंजिनसाठी ओडिशामधील कोरापूत येथेही कारखाना उभारण्यात आला. ‘मिग-२१’ च्या उत्पादनात नंतर वाढ झाली. युद्धभूमीवर आघाडीवर लढण्याचे ते विमान होते.

‘तुफानी’, ‘मिस्टिअर’ या जुन्या पाश्चिमात्य विमानांच्या स्क्वाड्रन्सची जागा या विमानांनी घेतली. चीनबरोबरील १९६२ च्या युद्धानंतर लढाऊ विमानांच्या स्क्वाड्रन्स वाढविण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले. सरकारने नियुक्त केलेल्या तत्कालीन टाटा समितीने हवाई दलासाठी ५५ लढाऊ स्क्वाड्रन्सची गरज व्यक्त केली होती. पण, नंतर ४० स्क्वाड्रन्स तरी असतील, असे ठरविण्यात आले. लढाऊ विमानांची कमतरता ‘मिग-२१’ विमानांनी भरून काढली.

हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या स्क्वाड्रन्स या काळात वाढल्या. १९७१ च्या युद्धाला तोंड फुटले, तेव्हा अपेक्षित ४० स्क्वाड्रन्सच्या जवळपास एकूण विमानांची संख्या होती. इतकी संख्या नंतर आजपर्यंत कधीच झाली नाही. स्क्वाड्रन्सच्या संख्येत सातत्याने घट आता होत आहे. आज आपल्यासमोर पूर्वेकडच्या आघाडीवरही आव्हान आहे. त्यामुळे विमानांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. आता आपण २८ स्क्वाड्रन्सपर्यंत खाली आलो आहोत.

‘मिग-२१’चे महत्त्व

‘मिग-२१’ विमानांनी १९७१ च्या युद्धात अतुलनीय कामगिरी केली. पूर्वेकडे तेजपूर येथे या विमानांची स्क्वाड्रन तैनात होती. पाकिस्तानबरोबरील युद्ध शिगेला पोहोचले असताना तत्कालीन पूर्व पाकिस्तानमध्ये ढाका येथे चार ‘मिग-२१’ विमानांनी गव्हर्नरच्या घरावर हल्ला केला होता. गव्हर्नर तेथून पळून गेला आणि त्याने एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आश्रय घेतला. त्यानंतर एक-दोन दिवसांतच पाकिस्तानने शरणागती पत्करली आणि बांगलादेशची निर्मिती झाली.

‘मिग-२१’ अनेक अर्थाने उपयोगी होते. डावपेचात्मक पातळीवर सहाय्य, इंटरसेप्टर, जमिनीवरील सैन्याला सहाय्य अशा अनेक ठिकाणी या विमानांनी आपली उपयुक्तता सिद्ध केली. ‘मिग-२१’ हे भारताच्या सामरिक शक्तीमधील महत्त्वाचे लढाऊ विमान बनले होते. या विमानाचे कौतुक करतानाच ‘मॅन बिहाइंड द मशीन’ अर्थात लढाऊ वैमानिकांचे कौशल्यही तितकेच महत्त्वाचे असते, हे विसरून चालणार नाही.

‘मिग २१’ विमानाने ६० वर्षांहून अधिक काळ सेवा बजावली. हे विमान हवाई दलाचा कणा होते. १९६०च्या दशकात दाखल झालेल्या या विमानाचे आयुष्य वाढविण्यासाठी अनेकदा त्यात अद्ययावत सुधारणा करण्यात आल्या. सुरुवातीला ‘टाइप-७७’ हा प्रकार होता. ‘मिग-२१’ विमानांचे हे सर्वांत पहिले असे मूळ रूप होते. त्यानंतर ‘टाइप-९६’ हे विमान होते. जमिनीवर हल्ला, छायाचित्रे घेणे, टेहळणी करणे यासाठी प्रामुख्याने याचा उपयोग झाला. त्यानंतर आपल्याकडे या विमानांचा ‘बिझ’ प्रकार आला. हे विमान मी चालवले आहे.

नंतर ‘मिग-२१ बायसन’ हा आणखी एक अद्ययावत प्रकार आला. या विमानावर प्रशिक्षणासाठी रशियाला वैमानिक पाठविण्यात आले. या विमानामध्ये जवळपास संपूर्ण अशा अंतर्गत सुधारणा केल्या गेल्या. नवी शस्त्रे, रडार, नेव्हिगेशन सिस्टीम बसविण्यात आली. या विमानांच्या दोन स्क्वाड्रन्स नंतर झाल्या. ‘मिग-२१’ च्या विविध सुधारणांमध्ये विशेष नमूद करायची बाब म्हणजे पाश्चिमात्यांची शस्त्रे आपण सोव्हिएतच्या विमानावर बसविण्यात यशस्वी झालो. या विमानाची भेदकता त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाढली. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे विंग कमांडर अभिनंदन यांनी मिग-२१ बायसन विमानातून पाकिस्तानचे पाडलेले अमेरिकी एफ-१६ विमान.

लढाऊ वैमानिकांचे प्रशिक्षण

लढाऊ वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी ‘बेसिक’, ‘इंटरमिजिएट’ आणि ‘ॲडव्हान्स’ अशा तीन प्रकारची विमाने लागतात. या तीन प्रकारच्या विमानांवर यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच प्रत्यक्ष लढाऊ विमानांवर वैमानिकांना प्रशिक्षण द्यावे, असा एक आदर्श नियम आहे. पण, आपल्याकडे अशा तीन प्रकारची विमाने स्वदेशात बनविण्याचे आणि मुबलक स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न अपयशी ठरले असल्यामुळे आपल्याला इतर देशांतून विमाने आयात करावी लागली.

माझे सुरुवातीच्या काळात प्रशिक्षण झाले, तेव्हा ‘एचटी-२’ प्रशिक्षण विमाने होती. नंतर ‘टी-६ जी’ हे अमेरिकन विमान आले. नंतर ‘व्हॅम्पायर’ लढाऊ विमाने आम्ही चालविली. १९७१च्या युद्धातही त्याचा वापर झाला. अगदी पुण्यातही आम्ही ती चालविली. नंतर ही विमाने निवृत्त झाली. व्हॅम्पायर विमाने निवृत्त झाल्यावर पोलंडमधून ‘इस्क्रा’ हे विमान घेण्यात आले. मात्र, त्या विमानांची संख्याही कमी होती. या काळात भारतीय बनावटीचे किरण विमान आपण इंटरमिजिएट प्रशिक्षणासाठी वापरत होतो. पण, लढाऊ स्क्वाड्रनमध्ये जाण्यापूर्वी ‘ॲडव्हान्स जेट ट्रेनर’वरचे (एजेटी) प्रशिक्षण फार महत्त्वाचे असते. ते मात्र आपण बनवू शकलो नाही.

नंतरच्या काळात अशी विमाने नसल्याने वैमानिकांना ‘इंटरमिजिएट’ पातळीवरील प्रशिक्षणानंतर थेट ‘मिग-२१’ या लढाऊ विमानांवरच ॲडव्हान्स प्रशिक्षण घ्यावे लागे. ‘मिग-२१’ विमानांच्या जवळपास चार ते सहा स्क्वाड्रन्स ‘एजेटी’ म्हणून वापरण्यात आल्या. या विमानांवर प्रशिक्षण झाल्यानंतर जॅग्वार, मिग-२९, सुखोई अशा विमानांवर वैमानिक जाण्यायोग्य असायचा. ‘मिग-२१’ हे प्रशिक्षणासाठी तयार केलेले विमान नव्हते. अतिशय तंत्रकुशल आणि युद्धात आघाडीवर वापरण्याचे विमान होते. तांत्रिकदृष्ट्या अतिशय प्रगत अशा या विमानांबाबत थोडी चूकही महागात जाई. त्या काळात ‘मिग-२१’ विमानांचे बरेच अपघात झाल्याने हवाई दलावर खूप मोठे दडपण आले होते.

या विमानांचे झालेले अपघात आणि वैमानिकांचे झालेले मृत्यू दुर्दैवी असले, तरी या विमानाला अतिशय चुकीने एका इंग्रजी वृत्तपत्रातून ‘फ्लाइंग कॉफिन’ असे संबोधले गेले. याआधी अशीच टीका अमेरिकेमध्ये वृत्तपत्रांनी फँटम विमानांच्या वाढत्या अपघातानंतर केली होती. अशा टीकेचे आंतरराष्ट्रीय स्तरावर दूरगामी परिणाम होतात. यामुळे ‘मिग-२१’वर प्रशिक्षण घेणाऱ्या वैमानिकांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मनोधर्य खचू शकते. या सर्वांचे मनोधैर्य कायम राहावे आणि देशाला सुरक्षिततेचा संदेश मिळावा, यासाठी स्वतः हवाई दलाचे तेव्हाचे प्रमुख एअर चीफ मार्शल टिपणीस यांनी एकट्याने ‘मिग-२१’ विमान चालवले होते. नंतर तत्कालीन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनीही मिग-२१ ट्रेनरमधून उड्डाण केले होते.

विमानांचे आयुर्मान

विमानांचे आयुर्मान दोन प्रकारे मोजतात. एक म्हणजे ‘कॅलेंडर लाइफ’ आणि दुसरे म्हणजे ‘टोटल टेक्निकल लाइफ’. कॅलेंडर लाइफ म्हणजे एखादे विमान खरेदी करतो, तेव्हा योग्य निगा राखली आणि विमानांचा पूर्ण वापर झाला, तर साधारण हे विमान किती काळ सेवा देऊ शकते, तो काळ. काही वेळा विमानांचा वापर म्हणावा तितका होत नाही. अशा वेळी तंत्रज्ञानाच्या मदतीने विमानांच्या सर्व भागांची तपासणी केली जाते. सर्व परिपूर्ण तपासण्या केल्यानंतर विमानांची ‘कॅलेंडर लाइफ’ वाढविली जाते. विमानाच्या ‘टोटल टेक्निकल लाइफ’शी सुसंगत अशी ही वाढ असते. पण, विमानांची संख्याच अपुरी असेल, तर बऱ्याचदा ही ‘टोटल टेक्निकल लाइफ’ही वाढवावी लागते. त्याला पर्याय नसतो. नवी विमानेच दाखल होत नसल्याने हे उपाय करावे लागतात. हेच मिग-२१च्या बाबतीत घडले. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत जगात भारत हा एकमेव देश असा होता, की इथे मिग-२१ वापरात होते. आज (२६ सप्टेंबर) ते निवृत्त होत आहे.

नव्या-जुन्या विमानांची सांगड गरजेची

एकदा सिंगापूर येथील हवाई दलाच्या प्रमुखांना मी भेटलो होतो. त्यांनी सांगितले, की त्यांच्याकडे ३३, ३३, ३३ टक्के असे सूत्र आहे. ३३ टक्के जुनी आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने कालबाह्य होणाऱ्या विमानांचा यात समावेश होतो. ३३ टक्के विमाने परिपक्व अशी असतात. या विमानांचा प्रत्यक्ष वापर होत असतो आणि आम्हाला या विमानांबाबत पूर्ण खात्री असते. ३३ टक्के विमानांची नव्याने खरेदी केली जाते. हे चक्र सुरू राहते. त्यामुळे मनुष्यबळ आणि नवे तंत्रज्ञान यांची उत्तम सांगड घातली जाते.

नव्या तंत्रज्ञानाला अनुसरून नवे लढाऊ वैमानिक प्रशिक्षित होण्याबरोबरच हवाई शक्तीही पुरेशा प्रमाणात राखली जाते. भारताच्या हवाई दलाच्या बाबतीत विचार केला, तर ६० ते ७० टक्के विमाने जुनी आहेत. मिग-२१ ची जागा तेजस हे हलके लढाऊ विमान (एलसीए) घेणार आहे. मात्र, या विमानांच्या निर्मितीला सातत्याने उशीर झाल्याचे आपल्या सर्वांना माहीतच आहे. विमानाचे इंजिन हा या विमाननिर्मितीमधील मोठा घटक होता. आपण कावेरी इंजिन तयार केले. पण, ते तांत्रिकदृष्ट्या पूर्ण क्षमतेचे बनू शकले नाही. आता अमेरिकी इंजिन त्या विमानात आपण बसवत आहोत. नवी विमाने पूर्ण क्षमतेने आणि संख्येने नेमकी केव्हा दाखल होतील, हे आजही आपण नक्की सांगू शकत नाही.

विमानांच्या इंजिनसाठी आपला फ्रान्सबरोबर करार झाल्याचे वाचण्यात आले. भारतात विमानांचे इंजिन तयार करायला फ्रान्स तयार झाला आहे. इंजिनची संपूर्ण बांधणी आपण इथे करू शकलो, तरी इंजिनची निर्मिती ज्या पदार्थांपासून (मटेरियल) होते, तो या इंजिननिर्मितीतील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आपण त्या बाबतीत अन्य देशांवर अवलंबून आहोत. विमान उडताना इंजिनमध्ये जी उष्णता तयार होते, ती उष्णता सामावून घेण्याची क्षमता या मटेरियलमध्ये असते. विमान तंत्रज्ञान हे असे तंत्रज्ञान आहे, की सहसा कुठलाही देश ते दुसऱ्या देशाला देऊ इच्छित नाही. त्यामुळे आपल्याकडे सातत्याने नव्या विमानांना हवाई दलात दाखल होण्यास उशीर होत आहे.

थोडक्यात, विमानांचे तांत्रिक आयुष्य लक्षात घेऊन पुढचे विमान तयार ठेवणे, तसेच भारतामध्ये जेट इंजिन बनवणे या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये आपण अजूनही मागे आहोत. जगात विमान उत्पादकांची संख्या कमी आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय राजकारण त्यांच्याभोवती चालते. विमान उद्योगाचे महत्त्व ओळखून आपण पुढील पावले टाकायला हवीत.

विमानाच्या जडणघडणीत अनेकांचे योगदान

‘मिग २१’ लढाऊ विमान अखेर निवृत्त होत आहे. हे विमान माझ्यासह ज्यांनी ज्यांनी चालवले, त्यांचे मन आज निश्चितच थोडे भावनिक झाले असेल. १९७१चे युद्ध, कारगिल युद्धासह अनेक ठिकाणी या विमानांनी देशासाठी कामगिरी बजावली. अतिशय कमी वेळात उडण्यासाठी हे विमान सुसज्ज होत असे. नुकतेच बालाकोट येथील हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या प्रत्युत्तरामध्ये भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांनी ‘मिग-२१’ च्या सहाय्याने गाजवलेल्या पराक्रमाने या विमानांची आणि तितक्याच तोडीची लढाऊ वैमानिकाची कुशलताही दिसली होती. ‘मिग-२१’ने आताच्या अत्याधुनिक समजल्या जाणाऱ्या विमानाचा सामना केला. भारताची महत्त्वाची सामरिक शक्ती असणाऱ्या या विमानाला निरोप देताना थोडे जड जात आहे. या विमानांच्या वाटचालीत टीम म्हणून अनेकांचे योगदान आहे. हवाई दल चंडीगड येथे मोठा समारंभ करून २६ सप्टेंबर रोजी या विमानांना निरोप देईल.

(लेखक हवाई दलाचे निवृत्त उपप्रमुख आहेत.)

शब्दांकन – डॉ. प्रसाद श. कुलकर्णी

bingomeghana@gmail.com