हारून शेख

एकेकाळी पैगंबरांनी सांगितलेल्या शिकवणुकीवर वेगवेगळ्या अंगांनी चर्चा, वादविवाद होत असत. इस्लाममध्ये ज्ञानाची, त्याच्या आदानप्रदानाची देदीप्यमान परंपरा होती. कुठं गेलं ते सगळं? मुस्लिमांनी ते मागं का टाकलं?

उदयपूरमध्ये कन्हैयालाल या शिंपीकाम करणाऱ्या माणसाचा कट्टर माथेफिरू मुस्लीम तरुणांनी निर्घृण खून केला. ही घटना २८ जूनची. माणुसकीला काळिमा फासणारं हे क्रूर दहशतवादी कृत्य. कुठल्याच अंगानं या घटनेचं समर्थन होऊ शकत नाही. असल्या क्रूर घटना घडतात तेव्हा समाज प्रचंड ढवळला जाऊन त्यावर तीव्र भावनिक प्रतिक्रिया उमटते तशी ती या वेळीही उमटली. अनेक प्रश्न ऐरणीवर आले आणि त्या प्रश्नांतले अनेक प्रश्न मुसलमानांनी स्वत:च स्वत:ला विचारावेत, अशी वेळ येऊन ठेपली आहे.

जगाची एकचतुर्थाश लोकसंख्या मुस्लीम आहे. त्यापैकी १० टक्के भारतात राहते. त्या लोकसंख्येत ‘ईशिनदा करणाऱ्याला किंवा पैगंबरांचा अपमान करणाऱ्याला मृत्यू हीच शिक्षा योग्य आहे (गुस्ताखे नबी कि एक सजा, सर तन से जुदा सर तन से जुदा)’ असं मानणारे मुसलमान संख्येने कमी असले तरी ते नाहीतच असं म्हणणं हे वाळूत तोंड खुपसून बसण्यासारखं आहे. आपल्यापेक्षा वेगळा धर्म, वेगळी संस्कृती, वेगळी मूल्यं, वेगळय़ा परंपरा, वेगळे आचारविचार असलेल्या लोकांसोबत राहताना अनेक तडजोडी कराव्या लागतात. इसवी सनाच्या सहाव्या शतकापासून म्हणजे अगदी इस्लामच्या प्रारंभीच्या काळापासून भारतीय मातीशी मूळ जोडून असलेल्या मुसलमानांना या तडजोडी नव्या आहेत असं म्हणता येत नाही. इतक्या मोठय़ा कालखंडात अनेक राजवटी, अनेक स्थित्यंतरं, अनेक बदल, सुख-दु:खं, भांडण-तंटे, धक्केधपाटे खात भावा-भावासारखे ते इथेच नांदले आहेत. स्वातंत्र्यलढय़ात त्यांचा सहभाग होता आणि देशात लोकशाही आणतानाही होता. लोकशाही आली की तिच्याबरोबर लोकशाही जिवंत ठेवणारी मूल्यंही स्वीकारावी लागतात त्यापैकी मतस्वातंत्र्य/ अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे एक महत्त्वाचं मूल्य. हे समजून घेण्यात, रुजवून घेण्यात भारतीय मुसलमानांना अवघडलेपण येऊ नये खरं तर. पण तसं झालं आहे. याचं कारण आहे कट्टर विचारसरणीचा वाढता प्रसार.

सुरुवातीस इस्लाम धर्म म्हणून पसरला तेव्हा त्यात मोहम्मद पैगंबरांच्या साधुशील वागण्याचा वाटा सर्वात जास्त होता. त्यांच्या सत्शील चारित्र्याकडे आकर्षित होऊन मुस्लीम धर्म स्वीकारणारे खूप लोक होते. उदाहरणार्थ, ‘रोजच्या वाटेवर पैगंबरांच्या अंगावर नेमानं घाण फेकणारी ज्यू बाई एकदा आजारी पडली असता ‘आज ती का आली नाही’ अशी काळजी लागून ते त्या बाईची विचारपूस करायला तिच्या घरी पोहोचले,’ ही मी लहान असताना वाचलेली गोष्ट! अशी अनेक उदाहरणं आपल्याला मोहम्मद पैगंबरांच्या चारित्र्यात सापडतात. पैगंबरांना सर्वोच्च आदराचं स्थान देणाऱ्या कट्टर मुस्लिमांना, पैगंबरांच्याच अशा साधुशील वागण्याच्या उदाहरणांतून काहीच शिकावंसं का वाटत नाही?

मुस्लीम जगतात पैगंबरांच्या शिकवणीवर टीकाटिप्पणी झाली नाही, असंही नाही. मुस्लीम धर्माच्या तत्त्वज्ञानाचा (कुरान)/ पैगंबरांनी सांगितलेल्या शिकवणीचा (हदीस) निरनिराळा अर्थ लावणारे अनेक पंथ/ उपपंथ आजवर निर्माण झाले. मुस्लीम धर्म जो मुस्लिमेतरांना एकसाची वाटतो, तसा तो मुळीच नाही. इतकी विविधांगी बहुविधता आणि मतामताचा गलबला या धर्मात आहे की ज्याचं नाव ते. त्यातही विसंगती अशी की, प्रत्येकाला तो लावत असलेला मुस्लीम धर्माच्या तत्त्वज्ञानाचा/ पैगंबरांनी सांगितलेल्या शिकवणीचा अर्थच काय तो बरोबर वाटतो. या सगळय़ांचं सहअस्तित्व गुण्यागोविंदानं नसलं तरी इतकी शतकं टिकून आहेच. प्रश्न तेव्हा निर्माण होतो जेव्हा यातली एखादी कट्टर विचारसरणी, राजकीय विचारधारा धार्मिक शिकवणीच्या बुरख्याआडून हातपाय पसरायला, फोफावायला सुरुवात करते. बुद्धिभेद करणारा प्रचार मूळ धरतो. कट्टरता वाढते, पर्यायानं असहिष्णुता वाढते. या कट्टर विचारधारा वेळीच ओळखून त्यांना अटकाव केला तर पुढचे अनेक अनर्थ टळतात. समस्या हीच की इस्लामच्या बाबतीत ते होत नाहीये.

हे न होण्याचं मला दिसणारं कारण म्हणजे कधीकाळी मुस्लीम धर्माच्या तत्त्वज्ञानाचा/ पैगंबरांनी सांगितलेल्या शिकवणीचा निरनिराळय़ा अंगांनी विचार करून अर्थनिष्पत्ती करणारी वादसंवादप्रिय परंपरा पूर्ण खंडित झाली आहे. एके काळी ज्ञानाची देदीप्यमान परंपरा मुसलमानांनी चालवली होती. ग्रीकांचं विज्ञान, तत्त्वज्ञान, साहित्य, अभियांत्रिकी यांचा परिचय अरबांनीच युरोपियनांना करून दिला. पूर्वेकडच्या कित्येक देशांतलं ज्ञान अरबांनी सर्वदूर पोहोचवलं. त्यात पंचतंत्राच्या गोष्टींपासून, बुद्धिबळापर्यंत आणि मसाल्यांच्या पदार्थापासून शून्याच्या संकल्पनेपर्यंत कितीतरी गोष्टी होत्या. मुसलमानांनी ज्ञानाच्या खुल्या आदानप्रदानावर आधारित एक मोठी संस्कृती निर्माण केली होती. विज्ञान, तत्त्वज्ञान, कला, खगोल, रसायन, भौतिक, स्थापत्य, वैद्यक, तर्क, साहित्य, कविता, सुलेखन, न्याय अशा अनेक ज्ञानशाखांमध्ये अफाट निर्मिती मुस्लीम करत होते, तसं ते आता होताना दिसत नाही. मुस्लीम विद्वानांनी जे प्रयत्न इस्लामला आधुनिक जगाशी जुळवून घेण्यासाठी करायला हवे होते तसे झालेच नाहीत. त्यासाठी आवश्यक असणारी वैचारिक आंदोलनं मुस्लीम जगतात अपवादानंच दिसली. कुरान/ हदीसच्या आज्ञा त्या जेव्हा दिल्या गेल्या त्या प्रसंगांच्या संदर्भचौकटीत न बघता अधिकाधिक मुळाबरहुकूम आणि शब्दश: आहे तशाच मानणाऱ्या सलाफी पंथाचं वर्चस्व वाढत गेलं. हे शब्दप्रामाण्य धोकादायक आहे. त्यात विरुद्ध मत ऐकून विचारांचे आदान-प्रदान होण्याच्या सर्व शक्यता संपतात. मुस्लीम तरुणांचा या शब्दप्रामाण्यावर आधारित बुद्धिभेद केला जातो आहे. विचार न करता दिलेली आज्ञा पाळणारी फौज तयार होत जाते. मरण्या-मारण्यासाठी हे तरुण मग मागेपुढे पाहात नाहीत.

इस्लामच्या तत्त्वज्ञानाचा कालसुसंगत अर्थ लावणाऱ्या, टोकदार कट्टर संकल्पना बोथट करत निष्प्रभ करणाऱ्या, कला, विज्ञान, तत्वज्ञान आणि राजकारणात सहभागी होऊन इस्लामी जीवनपद्धतीचं आणि पर्यायानं मुसलमान लोकांचं अधिकाधिक लोकशाहीकरण व्हावं यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या मुस्लीम कलाकारांची, विद्वानांची, विज्ञाननिष्ठांची, राजकीय नेतृत्वाची, समाजसुधारकांची, युवकांची या क्षणी नितांत गरज आहे.

इस्लाम हा धर्म आहे. धर्माचा उद्देश सर्वमान्य नैतिक, सामाजिक चौकटीत राहून आध्यात्मिक उन्नती साधली जावी हा असतो. पण बहुतेक वेळा धार्मिक आणि राजकीय नेते धर्माला एका राजकीय विचारधारेत बंदिस्त करून स्वार्थासाठी त्याचा उपयोग करतात. कट्टर नेत्यांनी इस्लामचा असाच वापर करून घेतला आहे. कुठे साधनसंपत्ती ओरबाडण्यासाठी, कुठे साम्राज्यवाद पुन:प्रस्थापित करण्यासाठी, कुठे वसाहतवादाला विरोध करण्यासाठी, कुठे निव्वळ जे जे पाश्चात्त्य, आधुनिक ते ते त्याज्य ठरवण्यासाठी. या स्वार्थ साधण्याच्या प्रक्रियेत सर्वात जास्त नुकसान मात्र मुस्लीम धर्मातल्या स्वभावत: सज्जन, शांततेत आयुष्य जगू इच्छिणाऱ्या लोकांचं झालं. ते गप्प बसले आणि धर्माच्या नावावर कट्टरवाद फोफावताना त्यांनी विरोध केला नाही (काहींना काय चालू आहे हेच कळलं नाही) आणि आता गोष्टी टोकाला गेल्या. हाताबाहेर गेल्या. अस्तित्वाचाच प्रश्न होऊन बसला. उदयपूरमधली क्रूर घटना हे खूप मोठय़ा आजाराचं लक्षण आहे.

आत्मपरीक्षणाची मुस्लिमांना कधी नव्हे इतकी आज गरज आहे. लोकशाहीतलं धार्मिक स्वातंत्र्य उपभोगत असताना इतर लोकांचं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य पायदळी तुडवता येणार नाही. वहाबी किंवा सलाफी या कट्टर विचारधारांना नाकारत अधिक व्यापक अधिक सहिष्णू परंपरांचा आधार घेत पुढे जावं लागेल. ‘तुमचं मत भले मला मान्य नसेल पण तरीही ते मांडण्याचं स्वातंत्र्य आणि अधिकार तुम्हाला असावा यासाठी मी मरेपर्यंत लढा देण्यास तयार आहे,’ असं सांगणारा व्होल्टेअर हा विचारवंत लोकशाहीचं सारच थोडक्यात सांगून गेला आहे. त्याचा हा विचार लोकशाही मानणाऱ्या देशाचा आदर्शच ठरावा, पाहिजे असा आहे. लोकशाही व्यवस्थेत राहणाऱ्या भारतातल्या कट्टर मुसलमानांना हे समजून घ्यावंच लागेल.

जागतिकीकरणामुळे सांस्कृतिक संघर्ष तीव्र झाले आहेत पण अधिक लवचीक, अधिक उदार बनलो तर यातून मुसलमानांना शिकण्यासारखं, मिळवण्यासारखं खूप आहे. आपल्या चुकांसाठी इतरांना दोष देण्यानं मनाला समाधान होईल पण समस्या आहे तशीच राहील. कट्टरांच्या तुलनेत विवेकी आवाज बुलंद करावा लागेल. वादसंवादाची जी परंपरा एके काळी मुसलमानांनी चालवली होती ती लवचीक, उदार असल्यामुळेच. त्या परंपरेचं पुनश्च आवाहन, पुनस्र्थापना करण्याची ही महत्त्वाची वेळ आहे.