समाज विज्ञान आणि मानव्य विज्ञान शाखा यामध्ये केवळ अर्थशास्त्र या शाखेतील अतुल्य योगदानासाठी दरवर्षी अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी तज्ज्ञांची निवड करत असताना त्यांच्या संशोधनाचा आवाका, त्याची प्रस्तुती आणि सामाजिक दृष्टीने त्याची उपयुक्तता इत्यादी निकषांचा विचार करून हा पुरस्कार देण्यात येतो. आजवर ९० पेक्षा जास्त अर्थतज्ज्ञांना हा पुरस्कार मिळालेला असून काही अपवाद वगळता इंग्लंड, अमेरिका इत्यादी देशातील विद्यापीठात संशोधनाचे कार्य करणाऱ्या प्राध्यापक संशोधनकर्त्यांचा या पुरस्कारावरील पगडा स्पष्टपणे जाणवतो. अर्थशास्त्रातील विविध शाखा ज्या वेगाने विकसित झाल्या ते पाहता या नवीन विद्याशाखांत संशोधन कार्य करणाऱ्या अर्थतज्ज्ञांना नोबेल पुरस्कारासाठी निवडले गेले. असे असले तरीही आर्थिक विकास, आर्थिक विचारांचा इतिहास, गणितीय अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धान्त या विद्याशाखांचे प्रभुत्व प्रकर्षाने जाणवते. यालाच अनुसरून यंदाच्या अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्कारांकडे बघावे लागेल.
यंदाचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक जोएल मोकर, फिलिप अॅगिअन आणि पीटर होविट यांना प्रदान करण्यात आले आहे. या तीन अर्थतज्ज्ञांना यावर्षीचा नोबेल पुरस्कार विभागून देण्यात आला. परंतु या पुरस्काराची समान विभागणी न करता जोएल मोकर यांना पुरस्काराची अर्धी रक्कम तर इतर दोन अर्थतज्ज्ञांमध्ये अर्धी रक्कम असे या पुरस्काराचे विभाजन झाले आहे. जोएल मोकर हे अर्थशास्त्रातील इतिहासकार व संशोधक आहेत. ते अमेरिकेच्या नॉर्थवेस्ट विद्यापीठात अध्यापन व संशोधनाचे कार्य करतात. त्यांच्या मते मानवी समाजाचा भविष्यात विकास होण्यासाठी विज्ञान, समाज व तंत्रज्ञानाची एकत्रित प्रगती होणे आवश्यक आहे. फिलिप अॅगिअन हे फ्रेंच अर्थतज्ज्ञ असून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे कार्यरत आहेत. बाजारातील स्पर्धा, आर्थिक स्वातंत्र्य आणि संशोधनासाठी गुंतवणुकीची भूमिका या विषयांवर त्यांनी अभ्यास केलेला आहे. पीटर होविट हे अॅगिअन यांचे सहकारी असून ते ब्राऊन विद्यापीठात कार्यरत आहेत. आर्थिक वृद्धीचा सिद्धान्त, मौद्रिक अर्थशास्त्र या विषयात त्यांनी संशोधन केले असून नवोन्मेषाची गरज आणि ‘विनाश पर्यवसायी सर्जन’यावर त्यांनी गणितीय प्रतिमान मांडले आहे.
या तीनही अर्थतज्ज्ञांच्या अभ्यास व संशोधनातील समान धागा म्हणजे या तीनही अर्थतज्ज्ञांनी आर्थिक विकासातील सातत्य आणि त्यावर प्रभाव पाडणाऱ्या घटकांचा विविध अंगांनी विचार केलेला आहे. नोबेल पुरस्कार निवड समितीच्या निरीक्षणानुसार जोएल मोकर यांचा अभ्यास तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आर्थिक वृद्धीच्या पूर्व अटी तपासणे या घटकावर आधारित असून फिलिप अॅगिअन आणि पीटर होविट यांनी विनाश पर्यवसायी सर्जनशीलता या विषयावर भर दिला असून सर्जनशीलतेतून विनाश ही संकल्पना मांडण्यासाठी गणितीय प्रारूपाचा वापर केलेला आहे. या तीनही अर्थतज्ज्ञांच्या अभ्यासातून निघणारा समान निष्कर्ष म्हणजे मानवी समाजात मागच्या दोन शतकांमध्ये पहिल्यांदाच सातत्यपूर्ण आर्थिक वृद्धी होत असून परिणामी खूप मोठी लोकसंख्या ही पराकोटीच्या दारिद्र्याच्या दुष्टचक्रातून बाहेर पडत आहे. तंत्रज्ञान, नवोन्मेष या घटकांच्या साहाय्याने मानवी समाजाला हे आर्थिक वृद्धीतील सातत्य राखणे शक्य होत आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नवनवीन उत्पादने सातत्याने बाजारात येत असून त्यातून एक अखंड अशी साखळी निर्माण होते आहे आणि त्यासाठी नवनवीन कल्पना पुढे येत आहेत आणि अशा या सुष्टचक्राच्या परिणामी गुणकतत्वाचा प्रभाव वाढून उत्पन्नात वाढ होते आहे आणि दारिद्र्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे.
याचाच अर्थ असा की लोकांचे जीवनमान, आरोग्य आणि शैक्षणिक गुणवत्ता यातही सुधारणा होत असून हे आता वैश्विक स्तरावर निरीक्षणास येते आहे/ या अर्थतज्ज्ञांच्या अभ्यासानुसार सातत्यपूर्ण विकास हा गृहीत धरता येत नाही. तो कधीही उत्स्फूर्तपणे घडून येत नाही. कारण बाजारातील मक्तेदारी, स्वयंनिर्णयाच्या स्वातंत्र्याचा अभाव, माहितीचे असमान वितरण आणि सामाजिक बंधने या सर्व गोष्टींचा विचार करता आर्थिक वृद्धीला चालना देण्यासाठी काहीएक प्रकारचे बदल हे घडून यावे लागतात. या अंतर्गत विरोधांना तोंड देण्यासाठी नवे तंत्रज्ञान आणि त्याचे सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी विस्तृत असे उपयोजन घडवून आणावे लागते. तरच आर्थिक वृद्धीतील सातत्य टिकवून ठेवणे शक्य होते. संशोधन आणि विकासासाठी सातत्यपूर्ण अशी गुंतवणूक आणि गुंतवणुकीला प्रोत्साहक अशा आर्थिक धोरणांचा अवलंब हेदेखील या प्रक्रियेत अपेक्षित असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तीन अर्थतज्ज्ञांपैकी जोएल मोकर यांच्या संशोधनानुसार इतर भौतिक साधनांच्या बरोबरीनेच आर्थिक वृद्धीसाठी पूरक असा ज्ञानप्रवाहदेखील महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यांच्या मते ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेमध्ये वर्णनात्मक आणि सूचनात्मक अशा दोन प्रकारचे ज्ञान प्रवाह आढळून येतात. नैसर्गिक व्यवस्थेचे योग्य प्रकारे वर्णन करून त्याचा प्रत्यक्षाशी सांधा जुळवून आर्थिक वृद्धीसाठी अनुरूप असे सूचन करणारी सूचनात्मक व्यवस्था ही विकासातील सातत्य राखून ठेवते आणि त्यासाठी समाजामध्ये नवीन विचारांचा खुलेपणाने स्वीकार करणे आणि नव्या पद्धतीने उपयोजित करून दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी नवोन्मेषाला चालना देणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठीच जोएल मोकर यांनी शास्त्रीय पद्धती आणि त्यावर आधारित नवोन्मेष याला विकासाचा कारक घटक असे म्हटले आहे.
अभिजातवादी अर्थतज्ज्ञ जोसेफ शुम्पीटर यांनी ‘नफ्याचा सिद्धांत’ मांडत असताना ‘विनाश पर्यवसायी सर्जनशीलता’ ही संकल्पना सर्वप्रथम वापरात आणली होती. त्यांच्या मते कुठल्याही अर्थव्यवस्थेमध्ये नवोन्मेष हा विकासासाठी पूरक घटक असतो. मात्र अशा पद्धतीने विकास होत असताना अनेक प्रकारचे चढ- उतार व चक्रीय बदल हे अपरिहार्य असतात आणि म्हणूनच आर्थिक विकासाचा दर हा कधीही स्थिर नसतो. त्यात बदल होत राहतात. म्हणूनच विकास हा एकरेषीय स्वरूपात दाखवता येत नाही तर त्यात होणारे चढ- उतार तसेच स्थितिशीलता या घटकांचादेखील विचार करावा लागतो. जागतिक अर्थव्यवस्थेच्या इतिहासाचा विचार करता दोन महायुद्धे, त्यादरम्यान आलेली जागतिक महामंदी यांच्या पार्श्वभूमीवर जागतिक विकास दर हा स्थितिशील असल्याची अनेक उदाहरणे दाखवता येतील. परंतु दोन शतकांच्या इतिहासाचा हा पट लक्षात घेतला तर सद्या:स्थितीमध्ये आर्थिक विकास हा वेगाने घडून येत असून विकास दरातील स्थितिशीलता इतिहास जमा झाली आहे. अनेक देशांमध्ये आर्थिक वाढ, भरभराट घडून येताना दिसत आहे. आणि ही वाढ केवळ तात्पुरती किंवा अल्पकालीन नसून ती सातत्यपूर्ण अशा पद्धतीने घडून येत आहे. अतिदीर्घकालीन विकासाचा विचार करता आर्थिक वृद्धीतील हे सातत्य हे चांगलेच लक्षण म्हणावे लागेल. अर्थात आर्थिक वृद्धीच्या विविध प्रतिमानांचा धांडोळा घेऊन या निष्कर्षाप्रत येण्यासाठी या तीनही अर्थतज्ज्ञांनी प्रामुख्याने युरोप, इंग्लंड, अमेरिका इत्यादी अर्थव्यवस्थांचा विकास दर लक्षात घेतला आहे ही बाब येथे लक्षात घेण्यासारखी आहे. आर्थिक विकासाच्या बाबतीत ‘ग्लोबल साउथ’ किंवा तत्कालीन विकसनशील अर्थव्यवस्थांचा विकास दर हा एक वेगळाच संशोधनाचा विषय असून बहुतांश वेळा युरोपीय व अमेरिकादि देशांच्या विकास दरावरून भारतासारख्या देशांमध्ये आर्थिक विकासाचा अंदाज लावणे हे दिशाभूल करणारे ठरू शकते. अर्थात तंत्रज्ञानाधारित आर्थिक विकास केवळ पाश्चात्त्य देशांमध्ये घडून येत नसून तंत्रज्ञानाच्या प्रसाराचा वेग पाहता जगातील सर्वच देशांमध्ये नवनव्या तंत्रज्ञानाच्या लाटा विकासाचा वेग, दर आणि पद्धती पूर्णपणे बदलून टाकत असल्याचे लक्षात आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर आलेली तंत्रज्ञानाची नवी लाट आणि त्याचे मानवी जीवनावर आणि पर्यायाने आर्थिक विकासावर होणारे परिणाम हे याचे ताजे उदाहरण ठरावे.
फिलिप अॅगिअन आणि पीटर होविट यांच्या प्रतिमानाचा आर्थिक विकासाच्या धोरणांशी थेट संबंध असून संशोधन आणि विकास यासाठी दिली जाणारी अनुदाने, तसेच तंत्रज्ञानामुळे निर्माण होणारी बेरोजगारी या सर्वांचा विचार त्यांनी त्यांच्या गणितीय प्रतिमानात केलेला आहे. या अर्थतज्ज्ञांनी अमेरिका आणि चीन या देशांमधील नवोन्मेषाचा वाढता दर आणि तंत्रज्ञानात्मक नेतृत्वाची दरी तसेच युरोपीय देशातील सद्या:स्थिती या सगळ्याकडे लक्ष वेधले आहे. आर्थिक वृद्धी नव्हे तर स्थितिशीलता हे मानवी इतिहासाचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण असून सातत्यपूर्ण आर्थिक विकासाला अडथळा ठरणाऱ्या घटकांशी सामना करण्याचे कौशल्य मानवी समाजाला मिळवावेच लागेल. या दृष्टीने जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय व्यापारात सुरू असलेले कर युद्ध आणि जागतिकीकरणाचा विरुद्ध दिशेने सुरू असलेला प्रवास हे विकासासाठी अडथळा ठरणारे घटक आहेत, असे मत फिलिप अॅगिअन आणि पीटर होविट यांनी मांडलेले आहे. कारण त्यातून विचारांची देवाणघेवाण, तंत्रज्ञानाचे हस्तांतरण आणि स्पर्धात्मकता नष्ट होईल व पुन्हा एकदा जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास दर खालावण्याची भीती निर्माण होईल.
थोडक्यात, विकासाचे सातत्य राखण्यासाठी नव्या कल्पनांना बळ देणे व या कल्पना घाऊक प्रमाणावर राबवून बाजारात नवचैतन्य निर्माण करणे, रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे, त्या पद्धतीच्या गुंतवणुकी आणणे आणि या सर्वांसाठी अनुकूल अशी आर्थिक धोरणे राबवणे हाच विकासाचा शाश्वत मार्ग आहे असे म्हणावे लागेल. या दृष्टीने पाहता जगातील तथाकथित विकसित अर्थव्यवस्था उद्याोग, सेवा आणि इतर क्षेत्रात विकासाचे सातत्य राखण्यासाठी चाचपडत असताना चीन आणि भारतासारखे देश विकासाच्या बाबतीत स्वत:ची बलस्थाने अधिक बळकट करत वेगाने व संतुलित असा आर्थिक विकास घडवून आणत आहेत हे येथे लक्षात घ्यावे लागेल. लोकांचे जीवनमान उंचावणे, शिक्षण आणि आरोग्याच्या पुरेशा संधी उपलब्ध करून देणे हे शाश्वत विकासाचे उद्दिष्ट असते. या दृष्टीने पाहता जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारतात दारिद्र्य निर्मूलन आणि गुणवत्तापूर्ण आर्थिक विकास बरोबरीने घडून येत असून जगातील इतर देशांसाठी हे आदर्शवत प्रतिमान आहे हे इथे नमूद करणे गरजेचे आहे. शेवटी सातत्यपूर्ण आर्थिक विकास हा तंत्रज्ञानाच्या मार्गाने होत असला तरीदेखील त्याला मानवी चेहरा असणे आणि आर्थिक विकास हा मानवी कल्याणासाठी घडून येणे महत्त्वाचे आहे हे विसरून चालणार नाही आणि यंदाच्या नोबेल पुरस्काराने हे सत्य पुन्हा एकदा अधोरेखित होते.
झेवियर्स महाविद्यालयात अर्थशास्त्राच्या प्राध्यापक
aparna,kulkarni@xaviers.edu
