आम्ही आज चार वर्षे संपूर्ण महाराष्ट्रभर या टोकापासून त्या टोकापर्यंत फिरत आहोत. आम्ही जिथे जिथे जातो तिथे शेतकरी संघटनेच्या सभेला येणारी माणसे येताना त्यांचा विचार, भावनांची ठेवण, त्यांचा जो एक दृष्टिकोन असतो तो मनात ठेवून येतात. पण ते एकदा सभेला येऊन बसले आणि त्यांनी शेतकरी संघटनेचे विचार ऐकले की ते शेतकरी संघटनेचे नक्कीच होऊन जातात. त्यांतील प्रत्येक माणूस परत जाताना तो आलेला असतो तसा रहात नाही. त्याच्या अंतःकरणातले विचार अजिबात बदललेले असतात. अशा विचारांवर चर्चा ज्या सभेत होणार आहे अश्या सभेला तुम्ही लोक आला आहात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेली चार वर्षे शेतकरी संघटनेच्या विचारांनी शेतकऱ्यांच्यात जागृती निर्माण करण्याचे काम चालले आहे, समुद्रमंथनाचे काम चालले आहे ते कशासाठी? माझी शेतीच्या धंद्यात ३४ वर्षे गेलीत. कुठल्याही राजकीय पक्षाचा चार आणे सभासद मी झालो नाही. इमानेइतबारे आपली शेती करावी असे वाटायचे. शेती करताना यंदा नाही साधले तर पुढच्या वर्षी साधेल अशी आशा असायची. कष्ट करताना कधी रात्र नाही पाहिली, दिवस नाही पाहिला; उन्हाळा, पावसाळा, हिवाळा काही पाहिले नाही; वेळेवर कधी भाकरी नाही खाल्ली. सारखा एकच ध्यास – कधीतरी भाग्य उजळेल. पण प्रत्येक वर्षी काही ना काही विघ्न यायचेच. तरीही मनाची समजूत घालायची यंदा नाही साधले, पुढच्या वर्षी साधेल; पुढच्या वर्षी नाही साधले, – त्याच्या पुढच्या वर्षी साधेल. पण कधी थंडी पडली, कधी गारा आल्या, कधी मंदी आली, कधी आणखी काही झाले; साधले मात्र काही नाही. शरद जोशींची गाठ पडली तोपर्यंत ते कष्ट, ते हाल, ते दारिद्र्य, त्या अडचणी, तो कर्जाचा हिमालय – सगळ्याला मोठ्या आनंदाने तोंड देत होतो. कष्ट करीत रहायचे, सुख कधी ना कधी भेटेल ही आशा मात्र पक्की घर करून बसलेली होती. आणि त्या धाग्यावर मी लढाई लढत होतो.

ज्या वेळी शरद जोशी मला भेटले आणि त्यांनी सांगितले की, माधव, हे असं नाही. तुला जे वाटतंय की आज नाही उद्या तुझी परिस्थिती सुधारेल ते खोटं आहे. तुझी परिस्थिती कधीच सुधारणार नाही. तुम्हा शेतकऱ्यांना या कर्जाच्या डोंगराखाली दारिद्र्यात खचतच ठेवायचं हे सरकारचं धोरण आहे. तेव्हा मी म्हटले, या शरद जोशीचं काय डोकंबिकं फिरलं की काय? हा असं कसं बोलतो की तुमच्या शेतीमालाला भाव द्यायचा नाही हे सरकारचं धोरण आहे?

हेही वाचा… राजकारणापासून दूर राहण्याची माधवराव मोरे यांची भूमिका कायम चर्चेत

मला वेड लागायची पाळी आली. मी काहीच बोललो नाही. माझ्या डोळ्यासमोर मी आणि माझ्या कोट्यवधी भावांनी आयुष्यभर उपसलेले कष्ट आणि भोगलेले हाल उभे राहिले. तरीही शरद जोशींच्या म्हणण्यावर माझा विश्वास बसत नव्हता. पण त्यांनी केंद्र सरकारच्या एका कमिटीचा अहवाल दाखवला. त्यात म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला त्याच्या उत्पादनखर्चावर आधारित भाव द्यायचे झाले तर त्या शेतकऱ्याची आई, बायको, मुलगी, त्याच्या घरातील जे जे नातेवाईक शेतीवर काम करतात, जे शेतीवर रात्रंदिवस बारा महिने कष्ट करतात त्यांची मजुरीसुद्धा त्यात धरावी लागेल. आणि ती मजुरी जर त्यात धरायची ठरली तर शेतीमालाचे भाव इतके वाढवून द्यावे लागतील की असे करणे अव्यवहार्य आहे.

हे पाहिल्यावर मात्र मी मलाच म्हणालो, माधव, असा मोडीच्या भावात मरू नकोस. मग मी ठरवले की आपली तर फसवणूक झालीच आहे पण आपण सबंध महाराष्ट्रभर फिरून आपल्या सर्व भावांना जागे करू.

मला माहीत आहे की हे आम्हाला तुडवून मारणार आहेत. पण, मरताना निदान एक भावना राहील की आम्ही मरतो आहोत हे काही आमचे दुर्दैव नाही, हा निसर्गाचा कोप नाही तर हे नीच कारस्थान आहे. आम्ही शेतकरी आयुष्यभर टाचा घासून आज मरून राहिलो आहोत, आमचे बापजादेही असेच गेले याला कारण हे हरामखोर राज्यकर्ते आणि हे नमकहराम अर्थशास्त्रज्ञ आहेत जे केंद्र सरकारला त्यांच्या कमिट्यांवर बसून सल्ले देतात.

पण परमेश्वराला दया आली आणि आम्हा शेतकऱ्यांना शरद जोशी भेटले. त्या वेळेपासून मी डोक्यात राख घालून हे एकच व्रत घेतले आहे. मला तर काही काही वेळा वाटते की परमेश्वर नसलाच पाहिजे आणि असलाच तर फार दुष्ट असला पाहिजे. ३५ वर्षे या महाराष्ट्रावर राज्य केले कुणी? ९५ टक्के शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत. त्यांचे बापजादे शेतकरी आहेत. यांनी इतकी इलेक्शने लढवली, आमच्याकडून पेट्या भरभरून मते घेतली; जातीच्या नावावर, पातीच्या नावावर शेतकऱ्यांचे राज्य आहे, अमुक आहे, तमुक आहे अश्या हजारो लाखो थापा मारून मते घेतली. आम्ही त्यांना विचारतो, तुम्ही इतकं सगळं बोललात पण ही एकच गोष्ट तेवढी गेल्या ३५ वर्षांत का नाही कुणी बोलला तुमच्यापैकी ? या हरामखोरांजवळ या प्रश्नाचे उत्तर नाही.

शरद जोशी हा माणूस भेटला नसता तर? काय झाले असते? आम्ही असेच टाचा घाशीत मेलो असतो!

तुम्ही पुणेकर मंडळी, तुमच्याबद्दल मनात कुठेही वैराची द्वेषाची भावना नाही हे परमेश्वराला स्मरून सांगतो. पण अंतःकरणाची आग होते. तुमचं रहाणीमान आम्ही बघतो; जो साहेब म्हणतो की यांच्या बायकामुलांची मजुरी देऊ नका त्या दिल्लीवाल्याचंही बघतो. यांच्या घरी एक दिवस जर धुणेभांडीवाली आली नाही, स्वयंपाकीण आली नाही तर या साहेबाच्या, जो म्हणतो की शेतकऱ्यांच्या बायकापोरांची मजुरी देऊ नका, त्याच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. हा चिडून ऑफिसात बोलतो, अहो, आज आमच्या मिसेसला फार त्रास झाला हो. आज आमची धुणेभांडीवाली आलीच नाही. तिला काही लाज नाही, शरम नाही. त्यामुळे आमच्या मिसेसला फार त्रास झाला. यांच्या मिसेसला त्रास झाला म्हणजे काय झाले? तीन पोळ्या लाटायला लागल्या आणि याची अंडरपँट धुवावी लागली फक्त! आणि तीही किती? फक्त एक दिवस आणि हा हरामखोर साहेब सांगतो, शेतकऱ्याची बायकामुलं शेतावर राबतात त्यांची मजुरीसुद्धा धरू नका. जगात या पराकोटीचा अन्याय नसेल.

काय जिणे जगतोय आम्ही शेतकरी? मला तर या चार वर्षांत असे वाटायला लागले आहे की जे दुःख पहायलासुद्धा मोठी ताकद लागते, ते सहन कसे केले असेल? पण त्याचा परिणाम असा झालेला आहे, मी गावोगाव हिंडत असताना पहातो की या दुःखाने शेतकऱ्याचा मेंदू पार बधीर होऊन गेला आहे. आम्हाला दुःख कशाला म्हणायचे हेच कळेनासे झाले आहे. या दुःखाची इतकी सवय झाली आहे की दुःख हे दुःख वाटतच नाही. ज्या शेतकऱ्यांची चाळीसचाळीस, पन्नासपन्नास वर्षे शेतीत गेली आहेत आणि जे आता पन्नाशीत आणि साठीत आहेत त्यांना कशाचाच राग येत नाही. गावात कुणी दोन रुपयांचा किराणा उधार दिला नाही, कापडवाल्याने पाच रुपयाचे कापड उधार दिले नाही किंवा खताच्या एखाद्या गोणीसाठी सोसायटीच्या सेक्रेटरीने ‘पायरी उत्तर खाली’ म्हटले तर त्याचे त्याला काही वाटत नाही. एवढेच काय, याच्या घरी याच्या बायकोच्या अंगावर तीन दंडांचे लुगडे आहे याचे त्याला काही वाटत नाही, त्याच्याही पलीकडे वाईटातली वाईट गोष्ट म्हणजे, स्वातंत्र्य मिळून ३५ वर्षे झाली तरी अजून आमच्या आयाबहिणींना उघड्याने रस्त्यावर जनावरासारखे परसाकडे बसावे लागते. त्यांना साधा संडासही आम्ही बांधून देऊ शकलो नाही की आंघोळीला निवारा करून देऊ शकलो नाही. असे दोन पायांच्या जनावरांचे जिणे या राज्यकर्त्यांनी आम्हाला जगायला लावले आहे. आजच्या जगात दहा हजारांपैकी नऊ हजार नऊशे नव्याण्णव शेतकऱ्यांच्या बाया रस्त्यावर परसाकडे बसणाऱ्या असा हा आपलाच देश असेल. जगात दुसरा असा देश सापडणार नाही कुठे!

अर्थशास्त्रज्ञ वि. म. दांडेकर याच मंचावर उपस्थित आहेत. त्यांनी फक्त आमच्या मायबहिणींसाठी संडास बांधून देता येतील अशी ताकद त्यांच्या अर्थशास्त्रातून आम्हाला काढून द्यावी. आम्ही आमच्या कातड्याचे जोडे तुम्हाला शिवू. आम्ही फार काही मागत नाही. फक्त त्या मायमाऊलींना परसाकडेतरी निवाऱ्याला बसू द्या. हे लोक इंदिरा गांधीचा जयजयकार करतात. पण आम्ही महाराष्ट्रभर सभांतून या बाईला सांगितले आहे की, आतापर्यंत अनेक अतिरथीमहारथींना अगदी यशवंतराव चव्हाणांपासून जगजीवनराम, मोरारजी कोण असतील त्यांना धुळीस मिळविलेस. पण याद राख, आम्ही आता जागे झालो आहोत. तू आणि तुझ्या बापाने आम्हाला ३५ वर्षे फसवले, तू सगळ्यांशी भांडलीस, आमच्याशी भांडू नकोस. तुझा सत्यानाश झाल्याशिवाय रहाणार नाही. आणि याचे प्रत्यंतर आंध्र आणि कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी दिले आहे. आणि महाराष्ट्रातला शेतकरीसुद्धा या फसवणाऱ्या राजकारण्यांना आणि अर्थशास्त्रज्ञांना तुडवल्याशिवाय रहाणार नाही.

मी अशा ठिकाणातला शेतकरी आहे की माझ्या तालुक्याला पाच धरणांचे पाणी मिळते. सबंध हिंदुस्थानात असा दुसरा तालुका नाही की ज्याला पाच धरणांचे पाणी मिळते. माझ्या तालुक्यात १०० टक्के इलेक्ट्रिफिकेशन झाले आहे. तालुक्यातून हायवे जातो, रेल्वे जाते, चार तासांवर बंदर आहे. हवामान अनुकूल आहे, सगळी पिके होतात. एवढा उत्कृष्ट तालुका असूनसुद्धा गेल्या ३५ वर्षांत माझ्या गावच्या सोसायटीत असा एकही शेतकरी झाला नाही की मरताना सोसायटीच्या सेक्रेटरीला बोलावले, सोसायटीची बाकी भरली आणि मग मेला; सोसायटी चुकती करून मेला अशी एकही केस नाही. दांडेकरसाहेब, बसवा कोणत्या अर्थशास्त्रात बसते ते! ३५ वर्षांत आमचा हा रोग दिसलाच नाही कुणाला?

एखाद्या माणसाला कॅन्सर झाला आहे, त्याला टाटा मेमोरियलला घेऊन जा असे डॉक्टरने सांगितले की आपण त्याला मुंबईला घेऊन जातो. आणि, तिथल्या डॉक्टरने त्याला अॅडमिट करून घेतले आणि त्याचे नाव तिथल्या डायरीत नोंदवले गेले की त्या माणसाच्या मरणाची वाट पहाण्यापलीकडे आपण काही करू शकत नाही; तो कितीही तरूण असो, त्याच्या आईवडिलांना, बायकोपोरांना त्याची कितीही जरूरी असो, आपले काही चालत नाही. कारण त्या रोगावर अजून औषधच निघालेले नाही. तसेच, आमच्या मायबाप सरकारने या गावोगाव ज्या सोसायट्या काढून ठेवल्या आहेत ना, त्या आम्हा शेतकऱ्यांच्या ‘टाटा मेमोरियल हॉस्पिटल’ आहेत. एकदा त्या सोसायटीच्या डायरीत नाव लिहिले गेले की तो मेला. माझा बाप सोसायटीच्या कर्जात मेला आणि मीसुद्धा त्याच्यातच मरणार. लाखालाखांच्या सभेतून आम्ही आवाहन करतो की, तुम्ही वेगवेगळ्या गावांतून आलात. सगळ्यामधून एकतरी उदाहरण असे सांगा, एकातरी शेतकऱ्याचे नाव सांगा की ज्याने सोसायटी पूर्णपणे चुकती केली आणि तो मेला. सगळीकडे भयाण शांतता पसरते, सगळे अवाक होऊन जातात.

हेही वाचा… Maharashtra News Live: अंधेरी पोटनिवडणुकीसाठी सकाळपासून मतदानाला सुरूवात; महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स एका क्लिकवर!

आजवर ही बाजू त्यांना कुणी कधी समजावूनच सांगितलेली नाही. तो सभेहून जाऊ लागतो तेव्हा स्वतःचेच प्रेत चितेवर चढवून आणि ढणाणा पेटवून निघाल्यासारखा उदासपणे, जड पावलांनी आपल्या घरी जातो. इतक्या भयाण परिस्थितीत आम्ही जगत असताना पुण्यातली मंडळी आमच्याबद्दल तिरस्काराने बोलायला लागली की अंतःकरण भळभळा वाहायला लागते. निदान खरेतरी बोला! तुम्ही बोलता, पण दुसऱ्या बाजूला किती माणसे जिवंत मरण रोज जगून राहिलीत याचा कधी विचार केला आहे का?

आम्ही शेतकऱ्यांना सांगतो की ही लढाई तुम्हाला लढावीच लागणार आहे. चार वर्षांपूर्वी मी शरद जोशींबरोबर फिरायला लागलो त्या वेळेला मला असे वाटले होते की या मुद्दयावर वाद होण्याचे कारण काय! आपले सगळे राज्यकर्ते, सगळी बाकीची आपली माणसे या गोष्टीला कबूल होतील. पण प्रत्यक्षात जेव्हा रिंगणात उतरलो, आम्ही शेतकरी उठाव करू लागलो तेव्हा लाठीमार आणि गोळीबार करून राज्यकर्त्यांनी आम्हाला चिरडून टाकले. आणि हे राज्यकर्ते बोलायला लागले, साल्या हो, आधी तुम्हाला अक्कल नव्हती आणि आता प्रॉडक्शन कॉस्ट काढायला लागले काय ? शरद जोशी भेटला म्हणता काय? ठीक आहे, तुमचा शरद जोशी आणि शेतकरी संघटना यांनासुद्धा आम्ही मातीत घालू. आणि, अश्या शर्थीने ते कामाला लागले. अजिबात लाजायला तयार नाहीत. आणि सगळ्यात दुःखाची गोष्ट वाटते – पाण्यालाच आग लागली हो की, हे आमदार, खासदार, मंत्री, पुढारी आहेत ना ते सगळे भरगच्च झालेत गेल्या ३५ वर्षांत. पेटवले तर दहा पिढ्या विझणार नाहीत. पण यांच्या काळजाची भूक एवढ्याने भागत नाही. यांचे बंगले झाले, गाड्या झाल्या, इस्टेटी झाल्या; सगळे झाले पण त्यांना गरीब शेतकऱ्यांचे सलाम पाहिजेत, सलाम! शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी प्यायल्याशिवाय यांची तहान भागत नाही. आणि हे सगळे शेतकऱ्यांचेच म्हणवणारे आणि त्यातल्या त्यात मराठा जातीचे पुढारी पाहून माझे काळीजच फाटून गेले. न्यायचे कुठे हे दुःख?

या पुढाऱ्यांचा विरोध का? ज्या वेळी अंतुल्यांनी आम्हाला भाव वाढवून दिले तेव्हा सगळीकडे चित्रे पालटायला लागली. आमच्या प्रल्हाद पाटलांच्या फॅक्टरीत, आज तीस वर्षांचा रेकॉर्ड आहे की, दर शनिवारी डायरेक्टर बोर्डाची मीटिंग असली की तीनचारशे शेतकरी हातात चतकोर कागदावर लिहिलेला अर्ज घेऊन पैसे मागायला आलेले असायचे. कुणाची बायको बाळंत व्हायची आहे, कुणाची पोरगी आजारी आहे, पोरीचे लग्न आहे, अमके झाले तमके झाले अश्या संसाराच्या अनेक अडचणींनी गांजलेले ते शेतकरी आशाळभूतपणे जमत. बाजार भरलेला असायचा लाचारांचा! आणि ज्या वेळी कांद्याला साठ ते पंच्याहत्तर रुपयांचा भाव मिळाला, उसाला २०० रुपये अॅडव्हान्स् आणि पुढे ३०० रुपयांचा भाव मिळाला त्या वर्षी कुत्रसुद्धा येईना या पुढाऱ्यांना विचारायला फॅक्टरीवर. सगळे बंद. ही जी परिस्थिती निफाडच्या त्या कारखान्यात झाली तशीच सगळ्या महाराष्ट्रात झाली, त्या काळात. आणि ही परिस्थिती पाहिल्याबरोबर हे हरामखोर पुढारी अंतुलेकडे गेले आणि म्हणाले, अरे मामू, तुमने ये क्या किया? अरे साला, ऐसा करेंगे तो राज किसके उपर चलाएंगे? खरे आहे. तुमचे कल्याण करतो म्हणून सांगायला दुसरी गधडी जमात आणायची कुठून? ते काय प्रभात रोड, टिळक रोड आणि डेक्कन जिमखान्यावर येऊन सांगणार आहेत काय की आम्हाला तुमचे कल्याण करायचे आहे? तुम्ही पुणेकर मंडळी सांगाल, बावळीच्या तुझे धोतर सांभाळ, आमचे कल्याण आम्हाला माहीत आहे. पण ही शेतकरी मंडळी म्हणजे बिनडोक प्रजा. ही शहाणी झाली आणि यांचे दारिद्र्य जर दूर झाले तर आणखी दोन वर्षांनी या पुढाऱ्यांना थोबाड काढायला जागा रहाणार नाही. तुमचे कल्याण करतो म्हणून कोणाला सांगणार ते? कापड व्यापाऱ्यांना सांगणार का हॉटेलवाल्यांना सांगणार का दुसरे इतर धंदे करणारांना सांगणार?

आम्ही दूध आंदोलन केले त्या वेळी सगळे म्हणाले, दूध आंदोलन फसलं, शरद जोशी संपला आणि शरद जोशीची संघटना संपली. नका असे अभद्र बोलू. संघटना संपली का नाही ते काळ ठरवीलच. आज आम्ही खंदकात बसलो आहो. हे सरकार महाडँबीस आहे. ज्या दिवशी दुपारी दीड वाजता आम्ही दूध आंदोलन मागे घ्यायचा निर्णय घेतला आणि त्याची बातमी ताबडतोब रेडिओवर दुपारी दोन वाजता आली आणि मग सकाळी जे सातच्या बातम्यांपर्यंत सांगत होते की मुंबईचा दूधपुरवठा जो ८ लाख १८ हजार लिटर रोजचा होता तो ९ लाख १७ हजार लिटर झाला म्हणजे आंदोलनकाळात… तेच आंदोलन मागे घेतल्यावर संध्याकाळच्या बातम्यांत काय सांगतात? की आज चार दिवस झाले, मुंबईतील होल दुधाचा पुरवठा आम्ही बंद केला होता तो उद्यापासून पूर्ववत चालू होईल. अश्या तऱ्हा आहेत एकेक !

सगळ्या महाराष्ट्राला मिलिटरी कँपचे रूप आणले होते. एक अर्धा का पाव भरलेला दुधाचा टँकर, जश्या काय त्यातून रिझर्व बँकेच्या नोटा चालल्यात अश्या पद्धतीने नेला जात होता – पुढे दोन पोलीस इन्स्पेक्टरच्या जीप, मागे एस. आर. पी.च्या चौदा गाड्या मधे ते दुधाचे डबडे घेऊन चालल्या होत्या.

कुठल्याही क्षेत्रातील अनेक विद्वान माणसे या पुण्यात आहेत. तुम्ही आमच्यापेक्षा खूप चांगल्या परीने जगत आहात. तुम्ही पुणेकर मंडळी ज्या तऱ्हेने जगताहात त्या तऱ्हेने आम्ही शेतकऱ्यांनी जगायचे ठरवले तर आम्हाला अजून शंभर वर्षे लागतील. आम्ही कसे जगतो तुम्हाला समजून घ्यायचे आहे? आपटे रोडला किंवा प्रभात रोडला तुमच्या कुटुंबियांसह आठ दिवस बसा परसाकडेला म्हणजे मग तुम्हाला कळेल. म्हणजे मग आमचे अर्थशास्त्रज्ञांनी ठरवलेले श्रममूल्य आणि शेतकऱ्याला भाव वाढवून देण्याइतकी वाईट गोष्टच नाही अशा प्रकारची विधाने यांचे काय दुःख होते याची थोडीशी झलक तुम्हाला मिळेल.

कोणताही मार्ग काढा. आमचे बापजादे कर्जात मेले. निदान आता आम्हाला तरी या नुकसानीतून बाहेर पडू द्या. चिंचवडपासून पर्वतीच्या पायथ्यापर्यंत अनेक प्रकारच्या अनेक फॅक्टऱ्या आहेत. त्यातला एकतरी व्यवसाय असा सांगा की ज्यातील १०० पैकी १०० माणसे कर्जबाजारी आहेत; कर्जातच जगतात, कर्ज वाढतच रहाते आणि कर्जातच मरतात. आमचे एकच मागणे आहे. आम्हाला लखपती नका करू पण आज १९८३ साल आहे. त्यात जग कुठे आहे, तुम्ही कुठे आहात आणि आम्ही कुठे आहोत याचा विचार करा.

आम्ही कुठे आहोत? आमच्या नाशिकपासून १८ मैलांवर एका गावी वसंत कानेटकर एका सभेला आले होते. दोन हजार वस्तीचे गाव. मी कानेटकरांच्या समक्ष गावकऱ्यांना विचारले की, का रे, गावात संडास किती आहेत? गावकरी म्हणाले, एकही नाही. तेव्हा मी कानेटकरांना म्हटले, साहेब, तुम्ही काही दंडकारण्यात आलेले नाही आहात, नाशिकपासून फक्त १८ मैलांवर आहात !

मी ३४ वर्षे या शेतीत राबलो, कष्ट केले. ते सगळे मातीत गेले. दांडेकरसाहेबांनीसुद्धा उभी हयात गोखले इन्स्टिट्यूटमध्ये घालवली. मला माहीत आहे की त्यांनी ती ऐषआरामात घालवलेली नाही, त्यांचा फार मोठा त्याग आहे त्यात. तेव्हा माझी दांडेकर साहेबांना विनंती आहे की यातून काहीतरी मार्ग दाखवा आम्हाला.

पुस्तकप्रकाशन हे निमित्त आहे, त्या निमित्ताने अंतःकरणातील घाव उघडून दाखवता आले. आता हे सहन होत नाही. आमचं कोणी राहिलेलं नाही. तुम्हाला वाटत असेल की हे राज्यकर्ते शेतकऱ्यांच्यातून आले म्हणजे ते त्यांचे आहेत. पण तुम्ही आम्हाला जर विचाराल की आमचा नंबर एकचा शत्रू कोण तर ते हे सत्ताधारी शेतकरी आहेत हेच त्याचे उत्तर आहे.

तेव्हा दांडेकर साहेबांना माझी विनंती आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचा अहंकार, मीपणा मनात न ठेवता जी काही वस्तुस्थिती आहे ती बघावी. कदाचित, हयातभर गोखले इन्स्टिट्यूटमध्ये राहूनसुद्धा तुमच्याकडून काही भाग दुर्लक्षिला गेला असेल, ध्यानात नसेल आलेला. तुमच्या ध्यानात न येण्याचे कारण आमचेच दुर्दैव असेल! समजा, तुम्हालाच वीसपंचवीस वर्षांपूर्वी बसून असा काही क्रांतिकारक विचार सुचला असता, जो शरद जोशींनी चार वर्षांपूर्वी मांडला, तर आजची ही वेळही आली नसती कदाचित. ठीक आहे. शरद जोशींचे काही चुकत असेल. पण त्यांचे बरोबर असेल ते आणि चुकत असेल ते बरोबर करून घेऊन आपल्याला रस्ता काढायचा आहे. तुम्ही, आम्ही काही आपल्या बापाचे नाव उजळण्याकरिता किंवा कुठल्या राजकारणाच्या मोहाने किंवा जनतेला लुटायचे आहे म्हणून, त्यांचे सलाम पाहिजेत म्हणून काही हे व्रत हातात घेतलेले नाही. तेव्हा आपण काही यातून मार्ग काढा.

काल वर्तमानपत्रांतून वाचले की, मोठी जुगलबंदी होणार आहे जोशी -दांडेकरांची. अरे, जुगलबंदी म्हणायला हा काय नाचणारणींचा तमाशा आहे की काय? अरे, आमच्या घराला आग लागली आहे आणि तुम्ही काय शब्द वापरता, जुगलबंदी? ही काय रवि शंकर, अलि अकबर यांची जुगलबंदी नाही. इथे कुणाचा राग नाही, कुणाबद्दल वैर नाही. आम्हाला फक्त मार्ग शोधायाचा आहे दैन्यातून – बाहेर पडायचा.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One of speech content of shetkari sanghatana former leader madhavrao more asj
First published on: 03-11-2022 at 16:15 IST