मला जे मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळायला हवं या भावनेने अनेक पालक आज आपल्या मुलांना संघर्षापासून दूर नेत आहेत. श्रमप्रतिष्ठा रूजेल असे श्रम मुलांना पडतच नाही. सगळ्या सुख सुविधा अनेक प्रकारच्या शिकवण्या, अनेक प्रकारचे क्लासेस ते मुलांना उपलब्ध करून देत आहेत, त्यामुळे मुलांना स्वतःचा असा वेळ मिळत नाही. उसाच्या चरकात ऊस जसा बाहेर चिपाड होउन येतो, तसं मुलांचं काही प्रमाणात होत आहे.
मुलांना कुठे स्वातंत्र्य आहे आज? व्यक्तिमत्व विकास ही आतून उमलणारी क्रिया आहे. सृजनाचा अंकुर स्वतः स्वतःतून उमलतो, अनुकूल व विपरीत परिस्थितीतही. झाडांनाही जास्त पाणी देऊन चालत नाही. आजच्या मुलांनाही इतकं काही आयतं दिल्या जात आहे की त्याची गरज ही नाही. संघर्षाचं बोट धरूनच हर्षाचं आपल्या जीवनात आगमन होत असतं.
मुलांचं आज अभ्यासाचं वेळापत्रक नसतच. कार्टून, आयपीएल, गेम खेळणं व नंतर अभ्यास असा प्राधान्यक्रम वेळापत्रकाचा असतो. वळण लावणारे घटक नसले की आयुष्य एका वेगळ्याच वळणावर येऊन थांबतं, जिथे कडेलोटाशिवाय पर्याय नसतो. मुले स्वतःच्या कोषात इतकी गुरफपटलेली असतात की समाजात ते स्वतःच समायोजन करू शकत नाहीत.
पालकांच्या इच्छा आकांक्षांचा दबाव मुलांवर इतका वाढत असेल तर ते एक तर मृत्यूला कवटाळतात किंवा सुखासीनतेकडे वळतात. पालकांच्या इच्छेचा कोटा पूर्ण करण्यासाठी मुलांना कोटा ही स्मशानभूमी वाटत आहे. भवताल बिघडल्यानंतर आयुष्याच्या ताल सांभाळणं कठीण होत जातं.
समूह संपर्क साधनें आता केवळ निर्जीव राहिलेली नाही तर ती सजीवाप्रमाणे आमच्या जीवनावर हावी झाली आहेत. आमची मुले रोज टीव्हीवर गोळीबाराचीची दृश्यं पाहत आहेत. स्नेहसंमेलनात प्रेमाच्या व अश्लील गाण्याच्या तालावर थिरकत आहेत. गेम कार्टूनच्या विश्वात ती अखंड बुडाली आहेत. शाळा ही संस्काराची आगार असते, पण अनेक शाळांमधून आज शिस्त, संस्कार हद्दपार झाल्याचे दिसत आहे. अनेक शाळांमधून मारामारीचे प्रकार, धमकावण्याचे प्रकार रॅगिंग, जे पूर्वी महाविद्यालयात होत असे ते आता शाळेतूनच होत आहे, ही परिस्थिती फारच चिंताजनक आहे. मूल्यं शिक्षण शाळेतून हद्दपार झाले आहे की काय अशी शंका येण्याइतपत परिस्थिती निर्माण झाली आहे. याला केवळ शाळा जबाबदार नसून कुटुंब व्यवस्थेपासूनच मुले मोबाईलच्या आहारी गेल्यामुळे एकलकोंडी झाली आहेत व त्यांच्यासमोर संस्कृती ऐवजी फक्त विकृतीच येत असेल तर ते त्याचंच अनुकरण करणार.
एका शाळेत निरोधची पाकिटे व सीरींज सापडली आहेत, शिक्षक सर्वेक्षणात व इतर अशैक्षणिक कामात गुंतलेले असतात तेंव्हा अशी भयानक परिस्थिती शाळेत निर्माण होत आहे. मुलांचे दप्तराचें ओझे अजून कमी होत नाही. मुलांची झोप पूर्ण होत नाही. घरात मुलांसाठी कोणालाच वेळ नाही. कुटुंबात संवाद नसतील व वाद होत असतील तर त्याचा परिणाम मुलांच्या मनस्वास्थ्यावर होउन ती चिडखोर व एकलकोंडी होत आहेत.
पालकांनी घरी आल्यानंतर मुलांना पालकांनी कवटाळणं, प्रेमाने जवळ घेणं अपेक्षित असतं. पण पालक जर आल्या आल्या मोबाईल हातात घेऊन त्याच्यातच गुंग होत असतील तर मुलेसुद्धा गुंग होण्यासाठी वेगळी साधने शोधतात.
आपण आपल्या घरात असुरक्षित आहोत, दुर्लक्षित आहोत ही भावना मुलांना वेगळ्या प्रलोभनाकडे खेचत आहे. नात्यांपासून मुलें कधीच अनभिज्ञ झाली आहेत. काका, मावशी आत्या, चुलत यांची ओळख तर सोडा हे शब्दही मुलांच्या कानावर जास्त पडत नाहीत.
भावना समजून घेणारं कोणी नाही, भावना व्यक्त करायला कोणी नाही. भावनांचा निचरा वेळच्या वेळी व्हायला हवा. मन मोकळं करणारऱ्या जागा नसतील तर व्यक्तिमत्व योग्य प्रकारे विकासित होत नाही. सध्या समाजात, राजकारणात असभ्य बोलण्याची, वागण्याची पद्धत रसातळाला गेली आहे. एकमेकांना टोमणे मारणे ही संस्कृती रुजत आहे. हे सर्व मुलें पाहतात. धमकावणे हा तरुणांच्या हिंसाचाराचा एक प्रकार आहे. धमकावण्यामुळे लक्ष्यित तरुणांना शारीरिक, मानसिक, सामाजिक किंवा शैक्षणिक हानीसह हानी किंवा त्रास होऊ शकतो. गुंडगिरीच्या सामान्य प्रकारांमध्ये हे समाविष्ट आहे. तंत्रज्ञानाद्वारे धमकावणे देखील होऊ शकते, ज्याला इलेक्ट्रॉनिक गुंडगिरी किंवा सायबर बुलींग म्हणतात.
युनायटेड स्टेट्समध्ये गुंडगिरी व्यापक आहे. धमकावणे हे सर्व तरुणांवर नकारात्मक रीतीने परिणाम करते. जे तरुण इतरांवर दादागिरी करतात आणि स्वतःला धमकावतात त्यांना सर्वात गंभीर परिणाम भोगावे लागतात आणि त्यांना मानसिक आरोग्य आणि वर्तणुकीशी संबंधित समस्यांचा धोका जास्त असतो.
हे सगळं रोखण्यासाठी विशेष परिश्रम करावे लागतील. मुलांनी वाचावं असं साहित्य त्यांच्या अवतीभवती हवं. भावनेचं पालनपोषण कुटुंबात व्हायला हवं ते नं झाल्यामुळे वागण्यात मुलं रूक्ष व कोरडी बनत आहेत. ज्या आई-वडिलांनी कष्ट घेऊन स्वतः अडचणीत राहून आपल्या मुलांना परदेशी पाठविले व त्यांच्या काळजीत सदैव ते असतात त्यांच्या अंतिम क्षणाला ही मुले उपस्थित राहू शकत नाहीत व अंत्यविधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारा पाहतात. करिअरच्या पुढे नाती दुय्यम ठरली आहेत.
आज अनेक आजी आजोबा एकटें राहत आहेत, कारण मुलें परदेशी आहेत, पैसा भरपूर आहे, पण अवतीभवती माणसांचा गोतावळा नाही. आजच्या चित्रपटातूनही भयंकर हिंसा, अश्लीलता झिरपत आहे. पूर्वीचे चित्रपट संस्कारासाठी होते आजचे चित्रपट विकारासाठी आहेत. पूर्वीच्या गाण्यांनी व पुस्तकांनी संस्कार केले व रूजवले. ‘श्यामची आई’ पुस्तकाने एक पिढी घडविली. ‘तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा इंसान की औलाद है इंसान बनेगा’ या गाण्याने सर्वधर्म समभाव शिकविला. आता कोणीच कोणाला शिकवत नाहीत, जमेल तसं बिघडवीत आहेत.
हे सर्वच आता बिघडले आहे व मूल्य शिक्षणापासून आपण दूर गेल्यामुळे त्याचं मूल्यं समाजाला चुकवावं लागत आहे. समाज सुधारायचा असेल तर सगळ्यांनाच विचार व आचार यावर काम करावं लागेल.
anilkulkarni666@gmail.com