अलौकिक व्यक्तिमत्त्व पृथ्वीवर अवतीर्ण होतात, पण ती इथल्या मोहमायेच्या पलीकडे असतात. अखिल ब्रह्मांडाची चिंता वाहणाऱ्या या व्यक्तिमत्त्वांना त्यातील एखाद्या बिंदुएवढ्या ग्रहावरच्या घडामोडींत गुंतून पडणं शक्यच नसतं… तर झालं असं की या पृथ्वी नामक ग्रहावरच्या भारतनामे देशात निवडणुकीची धामधूम सुरू आहे, हे तर आपण जाणताच. या भारतातलं एक छोटंसं नगर- पुरी. कृष्ण भक्तांच्या मनात या शहराला अद्वितीय स्थान. या पुरी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणारे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संबित पात्रा यांच्या एका विधानाने देशभर खळबळ माजली… विधान असं होतं की साक्षात जगन्नाथ म्हणजेच कृष्ण हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भक्त आहेत… टीकेची झोड उठताच पात्रांनी मी चुकून म्हणालो, वगैरे स्पष्टीकरण दिलं. तीन दिवस उपवास करून प्रायश्चित्त घेणार असल्याचंही जाहीर केलं, मात्र विरोधक काही अद्याप हा मुद्दा सोडण्यास तयार नाहीत. सोडतील तरी कसा? दिवस-रात्र टीव्ही वाहिन्यांवर राईचा पर्वत करणारा नेता असा कचाट्यात सापडल्यावर विरोधक त्याला सोडणे कठीणच. पण संबित पात्रांची जिभ खरोखरच चुकून घसरली असावी, यावर विश्वास ठेवला, तरीही मोदींच्या अलौकिक असण्याचा दावा दुर्लक्ष करण्याजोगा नाही. कारण याआधी भाजपच्या अनेक नेत्यांनी मोदींना देवस्थानी ठेवलं आहे. आता तर खुद्द नरेंद्र मोदींनाही, तसा अनुभव येऊ लागल्याचं, त्यांनी स्वतःच एका मुलाखतीत सांगितलं आहे.

मोदींच्या पंतप्रधानपदाच्या कालावधीत त्यांच्या देवत्वाविषयी कोण काय म्हणालं ते पाहूया… २६ मार्च २०१६ रोजी तत्कालीन केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडूंनी मोदींचं वर्णन देवाने भारताला दिलेली भेट या शब्दांत केलं होतं. ते गरिबांचे मसीहा आहेत, असं सांगत त्यांनी मोदींवर स्तुती सुमनांचा वर्षाव केला होता. नायडूंच्या या वक्तव्याची री त्याच्या पुढच्याच महिन्यात एप्रिल २०१६मध्ये तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी ओढली. त्यांनीही मोदी ही भारताला लाभलेली देवाची देणगी आहेत, असं म्हटलं. ऑक्टोबर २०१८मध्ये भाजपचे प्रवक्ते अवधुत वाघ यांनी एक ट्वीट केलं होतं. त्याचा आशय असा की, मोदी हे विष्णुचा ११वा अवतार आहेत. देशाला देवासारखे पंतप्रधान लाभले आहेत. मध्यप्रदेशचे कृषिमंत्री कमल पटेल यांनी जानेवारी २०२२मध्ये म्हटलं होतं की जगात कृष्णकृत्य वाढली की देव मानवी अवतार धारण करून पृथ्वीवर जन्म घेतो. राम व कृष्णही असेच अवतार होते. काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचार, जातीभेद वाढला, देशाच्या संस्कृतीवर घाला घातला गेला त्यामुळे मोदींच्या रूपाने देवानेच पृथ्वीवर अवतार धारण केला आहे. संबित पात्रांप्रमाणेच वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणत्या अभिनेत्री कंगना रानौत यांनी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश केला आणि लगोलग मंडीतून खासदारकीसाठीचं तिकीटही मिळवलं. ३ एप्रिल २०२४ रोजी प्रचारादरम्यान त्यांनी म्हटलं की मोदी हे राम आणि विष्णुचा अंश आहेत.

हेही वाचा : विदर्भाचे नेते विदर्भाच्या प्रश्नांवरच बोलत नाहीत…

ही झाली केवळ वक्तव्य, पण देव म्हटला की त्याचं मंदिरही हवंच. ही अटही मोदींबाबत पूर्ण झाली. गुजरातमध्ये अहमदाबादजवळ मोदींचं मंदिर बांधण्यात आलं होतं. २०१६मध्ये तब्बल सात लाख रुपये खर्च करून ओम ट्रस्ट नावाच्या संस्थेने हे मंदिर उभारल्याची वृत्तं प्रसिद्ध झाली होती. माझी मंदिरं बांधण्याऐवजी स्वच्छ भारत अभियानात योगदान द्या, असं आवाहन त्यावेळी मोदींनी केलं होतं. तरी डिसेंबर २०१९मध्ये तमिळनाडूतील तिरुचिरापल्लीपासून काही किलोमीटरवर असलेल्या येरकु़डी गावातल्या पी. शंकर यांनी आपल्या शेतात मोदींचं मंदिर बांधल्याची वृत्तं प्रसारित झाली.

राम मंदिर- बाबरी मशीद हा वाद तर एकोणीसाव्या शतकापासून सुरू आहे. त्यासाठी देशभरातील अनेकांनी आयुष्यभर लढा दिला. विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. अखेर जानेवारी २०२४ मध्ये जेव्हा राममंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली, तेव्हा मोदीजी रामलला को लेके आये असा प्रचार मोदींच्या समर्थकांनी व्हायरल गाणी, मीम्सच्या माध्यमातून केला. मोदी बाल श्रीरामाला बोट धरून मंदिराच्या दिशेने निघाल्याची चित्र प्रसारित केली गेली. अयोध्येच्या रस्त्यांवर अशी अवाढव्य कटाउट्स लावली गेल्याची छायाचित्र त्याकाळात प्रसिद्ध झाली होती.

हेही वाचा : हिंदू-मुस्लीम भेद करत नाही, असा खुलासा मोदींनी कशासाठी केला असावा?

भारत आजही भावनांवर चालणारा देश आहे. खेळाडू असो वा अभिनेता, त्यांची मंदिरं बांधल्याची, पूजा केल्याची उदाहरणं जागोजागी आढळतात. चाहते, अनुयायी, समर्थक असं करतातच. त्यामुळे त्याविषयी फार चिंता करण्याची गरज नसते. मोदींचे अनुयायीही स्वतःला मोदी भक्त म्हणतात, तर त्यांचे विरोधक त्यांना अंधभक्त म्हणून हिणवतात. राजकारणात असं प्रतिमासंवर्धन आणि अशी प्रतिमाभंजन सामान्य आहेत. जोवर नेता स्वतः स्वतःबद्दल असे काही दावे करत नाही, तोवर या बाबी फार गांभीर्याने घेण्याची गरज नसते. पण जेव्हा सर्वोच्च पदावरची व्यक्ती स्वतःच असे दावे करू लागते, तेव्हा मात्र ते दुर्लक्ष करण्यासारखे नसतात.

मोदींनी लोकसभा निवडणुकीचे शेवटचे दोन टप्पे शिल्लक असताना एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्याला परमात्म्याने काही विशेष कार्य करण्यासाठी पाठवलं असल्याचा विश्वास व्यक्त केला आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. आई जिवंत होती तोवर आपण बायोलॉजिकली जन्माला आलो आहोत, असं वाटत होतं, मात्र तिच्या निधनानंतर आणि मला येणारे अनुभव पाहता, आता माझा यावर विश्वास बसला आहे की मला परमात्म्याने पाठवलं आहे. माझ्यात जी ऊर्जा आहे ती कोणत्याही जैविक शरीरात असू शकत नाही. त्याआधी ३० एप्रिल रोजी महाराष्ट्रात लातूरमध्ये झालेल्या सभेत त्यांनी म्हटलं होतं की ‘भगवानने मुझे मॅन्युफॅक्चर किया तब मेरे दिमाग मे छोटा चिप लगायाही नही, बडा चिप ही लगाया…’

हेही वाचा : नेतान्याहू- हमास म्होरक्यांच्या अटकेपेक्षा ‘मानवतेच्या कायद्या’ची चिंता…

भारतीयच काय जगभरातील जवळपास प्रत्येक संस्कृतीत देवाला सर्वोच्च स्थान आहे. त्याच्या वर कोणीही नाही. त्याचा प्रतिवाद होऊ शकत नाही. त्याला प्रश्न विचारले जाऊ शकत नाहीत, त्याला पदावरून खाली उतरविण्याचा विचारही केला जाऊ शकत नाही आणि त्याच्यावर टीका तर होऊच शकत नाही. पंतप्रधानपदाबाबत असं म्हणता येत नाही. देवाने सर्वांना निर्माण केलं, अशी श्रद्धा बहुसंख्य भारतीयांच्या मनात आहे. पण लोकशाही ही मानवाने निर्माण केलेली व्यवस्था आहे, हे तर कोणीही मान्य करेल. पंतप्रधानपदही माणसानेच त्याच्या सोयीसाठी निर्माण केलं. या पदाभोवती एक खास वलय असतंच, त्याबद्दल वादच नाही. पण ती व्यक्ती जनतेला उत्तरदायी असते. तिला प्रश्न विचारले जाऊ शकतात, तिच्या निर्णयांवर- ध्येयधोरणांवर कायद्याची चौकट न ओलांडता टीका करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य नागरिकांना असतं. भारतात ते आजवर होतं आणि आजही आहे. या पदावरच्या व्यक्तीला जाब विचारला जाऊ शकतो आणि पायउतार होण्यास भाग पाडलं जाऊ शकतं. देवाच्या बाबतीत अजिबात संभव नसलेल्या या सर्व कृती पंतप्रधानांच्या बाबतीत शक्य आहेत. पंतप्रधान देव किंवा देवाचा अंश किंवा देवाचे दूत असतील, साक्षात परमात्म्याने त्यांना पाठवलं असेल, तर हे सारं शक्य होईल का? की या सर्व शक्यताच पुसून टाकण्यासाठी हे अंश, दूत, अवताराचं कथानक रचलं जात आहे?

आचारसंहितेच्या काळात धार्मिक आधारावर मतं मागू नयेत, तसं केल्यास कारवाई होऊ शकते… वगैरे आता केवळ अंधःश्रद्धा वाटू लागल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधानांनी स्वतःला परमात्म्याचा दूत म्हटल्यामुळे आचारसंहितेचं उल्लंघन झालं वगैरे दावे फोलच ठरतात. पण मुद्दा हा आहे की देश का चौकीदार आणि प्रधानसेवक अशा स्वतःच स्वतःला बहाल केलेल्या बिरुदांपासून सुरुवात करणारे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी परमात्म्याचा दूत किंवा अंश म्हणून स्वतःला जनतेपुढे सादर करू पाहत आहेत का?

हेही वाचा : ‘धम्म’ स्वीकारानंतरचे आत्मभान

मोदींच्या दाव्यात तथ्य असेल, तर रातोरात लादलेल्या नोटाबंदीमुळे झालेले हाल, कोविडमध्या वैद्यकीय सुविधांअभावी झालेले मृत्यू, मणिपूरमधला अद्यापही पुरता न शमलेला हिंसाचार, महिला कुस्तीगिरांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष, चीनच्या अतिक्रमणाकडे डोळेझाक, टोकाच्या ध्रुवीकरणामुळे भरडली जाणारी कुटुंब, महागाई, बेरोजगारी, गरिबी माध्यम स्वातंत्र्यापासून आनंदी नागरिकांपर्यंत विविध जागतिक निर्देशकांवर घसरत जाणारी देशाची कामगिरी ही सारी देवाची इच्छा आहे, असं त्यांना म्हणायचं का? १४० कोटी भारतीयांनी ‘असेल माझा हरी…’ म्हणत देव मोदींना कधी आदेश देणार आणि या समस्या कधी दूर होणार याची वाट पाहत बसणं अपेक्षित आहे का?

मोदीजी जर परमात्म्याचे दूत असतील, तर ते कोणत्याही पदावर नसतानाही केवळ आपल्या प्रभावाने देशातल्या सर्व समस्या चुटकीसरशी दूर करू शकतात. सकाळ-संध्याकाळ प्रचारसभा घेऊन मंगळसूत्रापासून म्हशीपर्यंत काय-काय हिसकावून घेतलं जाईल, हे सांगून मतदारांना घाबरविण्याऐवजी परमात्म्याला साकडं घालून या सर्वांचं रक्षण करू शकतात. कपील सिब्बल यांनी तर त्यांना प्रत्येक भारतीयाच्या खात्यात लगोलग १५ लाख रुपये ट्रान्स्फर करून टाकण्याची विनंतीही केली आहे.

हेही वाचा : पुण्यातला अपघात हा तिहेरी गुन्हाच; पण त्यामागे काय काय आहे?

असो… मोदींची आश्वासनं, धोरणं, योजना, भाषणं, जाहीरनामा इत्यादी पाहून तर कधी कधी ते खरंच परमात्म्याचा दूत असावेत, असा भास होऊ लागतो. कारण तसं नसतं, तर त्यांना थेट २०४७ पर्यंतची दूरदृष्टी कशी लाभली असती? पंतप्रधानपदी सलग एक दशक विराजमान असलेल्या व्यक्तीने खरंतर आपण केलेल्या कामांच्या मुद्यावर मतं मागणं अपेक्षित असतं. पण लौकिक जगातले नियम अशा अलौकिक व्यक्तिमत्त्वाला कसे लागू पडतील?

vijaya.jangle@expressindia.com