पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघातात मोटार चालक अल्पवयीन मुलाला जागेवरच पकडणाऱ्या तेथील नागरिकांचे कौतुक करायला हवे. तो मुलगा पळूनच गेला असता, तर परिस्थिती अवघड होण्याची शक्यता होती. ज्या पोर्शे मोटारीतून ताशी सुमारे दीडशे किमी वेगाने जात हा अपघात झाला, त्या मोटारीला परिवहन खात्याचा क्रमांक मिळाला नव्हता. म्हणजे, त्या क्रमांकावरून मोटारचालकापर्यंत तातडीने पोहोचणे अवघडच झाले असते. पावणेदोन कोटी रुपये इतक्या किमान किमतीची ती महागडी मोटारगाडी कुणा धनिकाची असणार, हे उघडच. मात्र ती चालवणारा त्या धनिकाचा मुलगा वाहन चालवण्याचा परवाना मिळण्यापूर्वीच मोटार चालवतो, याचे त्या धनिक बापाला अतिरेकी कौतुक असणे शक्य आहे. मूल पहिल्यांदा उभे राहू लागल्यानंतर पालकांना होणाऱ्या आनंदाएवढाच हाही आनंद. पण आपण आपल्या मुलाच्या हाती मोटार देताना त्याच्याकडे परवाना नाही, हे पालकास माहीत असणारच. तरीही ‘त्यात काय? मी आहे ना!’ अशी प्रवृत्ती बळावते, ती पैशाने आपण काहीही मिळवू शकतो, या मनोवृत्तीतून. श्रीमंती ओसंडून वाहू लागली की असे घडते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या अपघाताच्या बातम्या येऊ लागल्यानंतर, प्रत्येकाच्या मनात हे प्रकरण नक्की दडपले जाणार, अशी अटकळ बांधली जाऊ लागली. समाजमाध्यमात सामान्यांना न्याय कसा मिळत नाही, येथपासून ते पब संस्कृती कशी हद्दपार करायला हवी, इथपर्यंत सर्व विषयांवर चर्चा सुरू झाल्या. या प्रकरणात अपघात करणाऱ्या मुलाने मद्य घेतले होते, याचे व्हिडिओ समाजमाध्यमात दिसू लागले. तो कोणत्या पबमध्ये गेला होता आणि तिथे त्याला अल्पवयीन असतानाही मद्य कसे दिले गेले, अशा प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. हे सगळे प्रश्न गेली अनेक वर्षे अनेकांच्या मनात आहेत, त्यांची या निमित्ताने जाहीर वाच्यता झाली. निवडणुकांचा काळ असल्याने या अपघाताबाबत राजकीय पुढाऱ्यांनी लगेच पुढाकार घ्यायला सुरुवात केली. कुणा आमदाराने अपघात झाल्यानंतर लगेच पोलीस ठाण्यात जाऊन त्या मुलाची रदबदली केल्याची बातमी आली. मोटार तो मुलगा चालवतच नव्हता, असा युक्तिवाद झाल्याची चर्चा सुरू झाली. मुलाचे पालक पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक असल्याने अन्य अनेक प्रकरणांप्रमाणे हेही प्रकरण दडपले जाईल, अशी शंका व्यक्त होऊ लागली. मग मात्र सगळ्या राजकीय पुढाऱ्यांनी पोलिसांना आदेश द्यायला सुरुवात करत, कुणाचीही हयगय करू नका, अशी तंबी दिली. पोलिसांनी घटना घडल्यानंतर पबमधील मद्य देणाऱ्यांसह मुलाच्या वडिलांनाही अटक केली. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने, मुलाला अल्पवयीन ठरवलेच आहे तर त्याला रिमांड होममध्ये ठेवण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयाला केली, मात्र न्यायालयाने त्यास जामीन दिला.

हेही वाचा : आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी…

अपघात हा अपघात असतो. तो प्रत्येकवेळी ठरवूनच घडतो असे नाही, हेही खरे. परंतु तो जेव्हा ठरवून घडतो, तेव्हा तो गुन्हा ठरतो. कल्याणीनगरमध्ये घडलेली घटना ही सरळसरळ गुन्हा ठरते. याचे कारण मद्य प्यायल्यानंतर वाहन चालवण्यास भारतीय कायद्यानुसार बंदी आहे. मेंदूवरील ताबा सुटल्यामुळे या मुलाने रस्त्यात येणाऱ्या वाहनांना घडका दिल्या आणि त्यातच मोटारसायकलवरून चाललेल्या युवक- युवतीचा मृत्यू झाला. हा मृत्यू देशभरात, रस्ते अपघातात वर्षभरात मृत्यू पावणाऱ्या पावणेदोन लाखांपैकी एक नाही. तो घडवून आणलेला गुन्हा आहे. बारावी झालेल्या या मुलाने वाहन क्रमांक नसलेल्या मोटारीतून कोणत्या तरी पबमध्ये जाऊन मद्य प्राशन करावे आणि आपल्याला काहीही झालेले नाही, असा समज करून घेऊन वाहनचालक असतानाही स्वत:च मोटार चालवण्याचा हट्ट धरावा, हा बिनडोकपणा म्हणायला हवा. आपले पुत्ररत्न असे काही करू शकते, याचा अंदाज पालकांना नसेल, तर त्याचा अर्थ एवढाच की, ते आपल्या पैशाच्या धुंदीत मग्न आहेत. रस्त्यावर वाहन चालवताना कितीही काळजी घेतली, तरी समोरून येणाऱ्या वाहनाने अंगावरच मोटार आणली, तर जीव वाचवण्यासाठी क्षणाची तरी उसंत कशी मिळणार? या अपघातात हकनाक मृत्यू पावलेले अनिष दुधिया आणि अश्विनी कोस्टा यांना ती मिळाली नाही. प्रत्येकच अपघात दुर्दैवी असतो, मात्र केवळ दुसऱ्याच्या हलगर्जीमुळे जीव गमावणे अधिक क्लेशदायक ठरते.

हेही वाचा : बलाढ्य पराभवाच्या दिशेने…

या प्रकरणात वाहन परवाना नसताना वाहन चालवणे हा पहिला गुन्हा, तर मद्य पिऊन वाहन चालवणे हा दुसरा गुन्हा. परिवहन खात्याचा वाहन क्रमांक मिळण्यापूर्वीच वाहन रस्त्यावर आणणे हा तिसरा गुन्हा तर मद्य पिण्याची परवानगी देणारा परवाना नसतानाही ते प्राशन करणे हा चौथा गुन्हा. पालकांनी आपल्या पाल्यावर किती प्रेम करावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न. मात्र आपला पाल्य इतरांच्या जिवावर उठणार असेल, तर त्याच्यावर कोणते संस्कार करायला हवेत, याचे भान नसणे, हाही गुन्हाच. आताची पिढी कशी बिघडली आहे, हे सिद्ध करण्यासाठी अशा घटनांचा उपयोग समाजमाध्यमी चर्चेपुरता होतो आहेच. शिक्षणाचे महत्त्व, कुटुंब आणि संस्कार, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या, पालकांची जबाबदारी अशा अनेक प्रश्नांभोवती सध्या चर्चा सुरू आहे. त्याचा लंबक पब संस्कृतीच नष्ट करण्याच्या मागणीपर्यंत पोहोचला आहे. मुळात मद्य पिण्यासाठी परवाना लागतो आणि तो जागेवर बसून संगणकाच्या साह्याने मिळवता येतो, हेच बहुतेकांना ठाऊक नाही. बरे हे माहीत असलेले मद्य विकणारे त्याबाबत कधीच आग्रही का बरे नसतात? ऐन करोना काळातही मद्यविक्री करणाऱ्या दुकानांसमोर लागलेल्या रांगा आठवल्या आणि देशात वर्षाकाठी ६०० कोटी लिटर मद्य प्राशन होत असल्याची माहिती समजली, की या सगळ्या प्रश्नांकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण होते. एवढे मद्य रिचवणाऱ्या कितीजणांकडे तो परवाना असेल, याची आकडेवारी तर अधिकच रंजक ठरणारी असेल. पुणे शहरात नाताळ आणि नववर्षाचे स्वागत या काळात एक ते दीड लाख तात्पुरते मद्य परवाने नागरिक घेतात. तर वर्षभरात देशी-विदेशी मिळून सुमारे सव्वा कोटी लिटर मद्याची विक्री होते.

हेही वाचा : सुनील छेत्री आम्हाला समजलाच नाही…

कायदे आणि नियम कागदावर असून चालत नाही. जोवर त्याची अंमलबजावणी होत नाही, तोवर त्यांना अर्थ नसतो. त्यामुळे मद्याला दोष देण्यापेक्षा नियमांच्या अंमलबजावणीकडे लक्ष देणे अधिक गरजेचे, हे मान्य करण्यास समाजमन धजावत नाही. वाहन परवाना नसताना वाहन चालवण्याबद्दल तसेच किती गुन्हे दाखल होतात, किती जणांना शिक्षा किंवा जबर दंड होतो, अशी तपासणी करण्यासाठी पोलीस खाते किंवा आरटीओ यांच्याकडे किती मनुष्यबळ आहे? असे सगळेच प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर यायला हवेत. अन्यथा रोज रस्त्यावर अपघातात मृत पावणाऱ्या हज़ारो निष्पापांचे क्षणभंगुर जगणे मातीमोलच ठरेल आणि हे न सुटणारे प्रश्न आहेत, असे समजून व्यवस्थाही मूग गिळून गप्प बसेल!

((समाप्त))

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune kalyani nagar porsche car accident loopholes of system police and politicians css
First published on: 22-05-2024 at 08:31 IST