दत्तप्रसाद दाभोळकर

सामाजिक- सांस्कृ़तिक पाळेमुळे घट्ट झालेली वर्णव्यवस्था आणि आर्थिक पायावरली वर्गव्यवस्था यांचा विचार विवेकानंदांसह अनेकांनी केला होता. मराठा आरक्षणासाठीची जरांगे यांची मागणी त्या प्रश्नांकडे पुन्हा पाहायला लावणारी कशी, हे सांगणारे दहा मुद्दे …

Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
Udayanraje Bhosale
“चुका करणारे लोक…”, ईडीच्या कारवायांवरुन उदयनराजेंचं वक्तव्य; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत म्हणाले…
25 prominent politicians joined BJP
आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ‘कलंकित’; भाजपमध्ये येताच ‘चकचकीत’
hemant patil
भाजपहट्टापुढे शिंदेसेना हतबल; हिंगोली, यवतमाळचे उमेदवार बदलण्याची नामुष्की

मराठ्यांचे आरक्षण हा महाराष्ट्रातील कळीचा प्रश्न आहे आणि जरांगेंच्या आंदोलनामुळे तो ज्वालाग्राही बनून केंद्रस्थानी आला आहे. जरांगेना मराठा समाजातून मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. हे आंदोलन आणि त्याला मिळालेला विश्वास बसू नये एवढा प्रतिसाद या दोन गोष्टी आपणाला पुन्हा या देशातील सनातन जातिव्यवस्थेकडे घेऊन जातात. या देशाच्या अवनतीचे एकमेव किंवा प्रमुख कारण जातिव्यवस्था हे आहे, असे गौतम बुद्ध आणि विवेकानंद या दोघांनीही सांगितले आहे. या जाती व्यवस्थेचा पिरामिड किंवा चक्रव्यूह यांना थोडासा तरी धक्का बसावा म्हणून आरक्षण सुरू झाले. जातिअंताच्या लढाईतील ते पहिले पाउल होते- मात्र जरांगेंच्या आंदोलनामुळे आपण जे आरक्षणाचे पाऊल उचलले त्यामुळे आता जातिव्यवस्था खिळखिळीत न होता ती अधिकाधिक बळकट होते आहे का हा प्रश्न आपल्यापुढे येतो. यावर साधकबाधक चर्चा होणे गरजेचे वाटते. त्यामुळे खालील मुद्दे चर्चेसाठी पुढे मांडत आहे.

१) समाजाच्या ठसठसणाऱ्या वेदनेवर आपण नेमके बोट ठेवले, तर तो सारा समाज झपाटून तुमच्या मागे उभा राहतो. तरुणपणी बाळ ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली, त्यावेळी आपण हे पाहिलेले आहे. मात्र, या अशा आंदोलनातून प्रश्न थोडाफार सुटला असे वाटले, तरी तो फार थोडा सुटलेला असतो आणि या अशा आंदोलनांसाठी किमान त्यांच्या सुरुवातीच्या दिवसात पैसा आणि व्यवस्थापन पुरविणारी एक आपल्याला फारशी लक्षात न येणारी एखादी चाणाक्ष शक्ती असते. शिवसेना ही प्रथम वसंत सेना होती आणि आजच्या जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार आहेत, की अमित शहा याबाबतही खासगीत चर्चा होते.- अर्थात आजचा हा प्रश्न समजावून घेण्याचा प्रयत्न करताना हा मुद्दा आपण विचारात घेऊ नये, असे मला वाटते. त्याचप्रमाणे शिवसेनेच्या वेळी मराठी तरुण आणि दक्षिणेतील तरुण, जे दोघेही हताश होऊन नोकरीच्या शोधात हिंडत होते. त्यांच्यात कटुता निर्माण झाली. त्याचप्रमाणे आज मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यात कडवटपणा वाढतो आहे, मात्र आपल्या चर्चेत हे विचारात न घेता- वर्णव्यवस्था आणि वर्गव्यवस्था यांच्यामधील अंगारे- कंगोरे समजावून घेता येतील का? त्यावर चर्चा करता येईल का हे प्रथम पाहिले पाहिजे.

हेही वाचा >>>यहाँ सब ग्यानी है..! सौरभ शुक्ला

२) माणसाने व्यवसाय बदलला तर त्याची जात बदलते का? म्हणजे एखाद्या ब्राह्मणाने लॉन्ड्री काढली, तर तो धोबी किंवा वैश्य होऊ शकतो का? एखाद्या क्षत्रिय व्यक्तीने फर्निचरचे दुकान काढले, तर तो सुतार किंवा वैश्य होऊ शकेल का?

३) साम्यवादी पक्षातून बाहेर पडून ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ हा पक्ष स्थापन करताना, शरद् पाटील यांच्यापुढे नेमका हाच विचार होता. मात्र, डांगे आणि मधू लिमये या दोघांनाही ‘वर्गलढा यशस्वी झाला तर वर्णव्यवस्था आपोआप कोसळेल,’ असे त्या वेळी वाटत होते. अगदी विंदा करंदीकरसुद्धा ‘सारे वर्ण शेवटी सुवर्णात विलीन होतील’ असे म्हणत होते. 

४) उच्चवर्णीयांना दलितांच्या ओबीसींच्या यातना कधी लक्षातच येत नव्हत्या का? आगरकरांनी ‘मंदिर प्रवेश’, ‘एक गाव एक पाणवठा’ असल्या काही गोष्टींचा फारसा विचार केलेला नाही. त्यांच्या समोरचे प्रश्न होते उच्चवर्णीयांचे!- त्यांचे नाव न घेता विवेकानंद म्हणाले होते, ‘विधवा विवाह’ हा प्रश्न प्रमुख म्हणून हे लोक चर्चा का करताहेत? हा प्रश्न या देशातील मुठभर उच्चवर्णीयांचा आहे. ब्राह्मण आणि क्षत्रिय सोडून सर्व समाजात विधवा विवाह, पाट लावून लग्न असे प्रकार आहेत. म्हणजे केवळ आपल्याच प्रश्नांचे तुणतुणे वाजवत उच्चवर्णीय बसले होते का? आपण परिमल राव यांचे ‘द फौंडेशन ऑफ द टिळक्स् नॅशनॅलिझम’ हे पुस्तक वाचले तर कुणबी आणि स्त्रिया यांच्याबद्दल ‘मराठा’मध्ये जे लेख आणि अग्रलेख लिहिले जात होते ते किती भयंकर होते हे आपणाला समजते. त्यांनतर लोकमान्य टिळकांना ‘तेल्यातांबोळ्यांचे पुढारी’ का म्हटले गेले हा प्रश्न आपणाला पडतो.

५) ते असो! जरांगेचे आंदोलन ‘सारे वर्ण शेवटी सुवर्णात विलीन होतील’ असे काही आपणाला सांगते का? आम्ही मराठे नाही, आम्ही कुणबी आहोत असे ते सांगत नाहीत. त्याचे सांगणे आम्ही मराठा- कुणबी आहोत. व्यवसाय बदलून जात बदलते का? महात्मा गांधींनी दोन ब्राह्मणांना आजन्म सफाईकाम (तत्कालीन शब्द भंगीकाम) करायला आणि एकाला मेलेल्या जनावरांचे कातडे काढावयास लावले, मग त्यांची जात बदलून त्यांच्यानंतरच्या सर्व रक्तसंबंधातील नातलगांना दलितांना मिळतात, त्या सवलती देता येतील का? द्याव्यात का?

६) मुसलमान राजवटींनी हिंदू धर्म आणि जातीव्यवस्था समजावून घेण्याच्या नोंदी करताना काही विचार केला असेल का? निजामी राजवटीत ब्राह्मणांची यादी हिंदूच्या मध्ये नाही तर वेगळी ब्राह्मण म्हणून केलेली आहे.

हेही वाचा >>>देश श्रीमंत होतोय आणि लोक गरीब होताहेत…

७) मात्र जरांगे जर आम्ही क्षत्रिय म्हणजे मराठा नाही तर आम्ही कुणबी आहोत, असे म्हणाले तर वर्गव्यवस्था, वर्णव्यवस्थेला नाकारत पुढे येत आहे, असा त्याचा अर्थ होईल आणि ते जातिअंताचे पहिले आश्वासक पाऊल असेल.

८) वर्णव्यवस्था वर्गव्यवस्थेत विलीन होईल, असे केवळ डांगे आणि मधू लिमयेंनाच वाटत नव्हते. तर अस्वस्थ होऊन वर्ण व्यवस्थेचा विचार करणाऱ्या विवेकानंदांनाही वाटत होते. ७ ऑगस्ट, १८८९ रोजी म्हणजे वयाच्या २६ व्या वर्षी पूज्यपादांना पत्र पाठवून विवेकानंदांनी सांगितले, ‘आपल्या देशातील प्राचीन मतानुसार जातीविभाग हा वंशगत मानलेला आहे. याबद्दल माझ्या मनात शंका नाही. त्याचप्रमाणे स्पार्टा देशातील गुलामांच्यावर आणि अमेरिकेतील नीग्रोंच्यावर जेवढे अत्याचार झालेत त्याहून अधिक आपल्या देशातील शूद्रांच्यावर झाले आहेत.

 ९) या सर्वावरचा उपाय सांगताना विवेकानंदांनी कुंभकोणम येथे ब्राह्मण तरुणांच्या सभेत भाषण देताना सांगितले, ‘ब्रह्मवृंदहो, आपण सांगितले पाहिजे, आम्ही उच्चवर्णीय आहोत. आम्ही अर्थार्जनासाठी एकही नोकरी करणार नाही. आम्ही शंभर टक्के आरक्षण शूद्रांना देऊ. मात्र शंभर टक्के आरक्षण देऊनही त्यांचा काहीही फायदा होणार नाही. कारण आपण त्यांना अनेकशतके शिक्षणापासून वंचित ठेवलेय. म्हणजे आपल्याला एक शिक्षक लागत असेल, तर त्यांना सात शिक्षक लागतील. त्यांच्यासाठी आपल्याला सातपट अधिक चांगल्या शिक्षणाची सोय करावी लागेल.’ मात्र, स्वातंत्र्यानंतर नकळत यात एक नेमके उलटे चक्र सुरू झाले. पंडितजींनी देशाच्या चार कोपऱ्यांत जगातील प्रगत अशा चार देशांकडून सहकार्य घेऊन जागतिक दर्जाच्या ‘आयआयटी’ सुरू केल्या. अगदी माफक फी आणि वंचितांना त्यातही शैक्षणिक मदत देणे सुरू केले. काही वर्षे हे सुरळीत होते. मात्र, आज ‘आयआयटी’ आणि स्पर्धा परीक्षा यांचे श्रीमंतांनी – खरेतर उच्चवर्णीयांनी – बाजारीकरण करून दाखवले. यांच्या प्रवेश परीक्षांत उत्तीर्ण व्हावयाचे असेल, तर अजिबात परवडणार नाहीत अशा मार्गदर्शक क्लासेसमध्ये एक वर्ष लाखो रुपये खर्च करून जावे लागेल, ही आता पूर्वअट आहे! – अजूनही कोणीही ‘दर वर्षी विद्यार्थ्यांचा फक्त ‘आयक्यू’ आणि अनेक विषयांची नेमकी जाण याची परीक्षा घेणारी चाचणी परीक्षा हवी आणि दरवर्षी या चाचणीपरीक्षा पूर्णपणे वेगळ्या हव्यात,’ असे अजिबात म्हणत नाहीत.- आज विवेकानंदांना अभिप्रेत होते, त्यांच्या नेमके उलटे आपण करत आहोत.

 १०) त्याचवेळी ‘वर्गव्यवस्था आपण झपाट्याने बदलली, तर वर्णव्यवस्थेला सुरुंग लागण्याची शक्यता आहे,’ हे विवेकानंद आपल्या शिष्यांना सांगत आहेत. २ नोव्हेंबर, १८९३ च्या पत्रात ते लिहितात ‘आज जगातील स्पर्धा आणि संघर्ष यांच्यामुळे जातीभेद हे कसे झपाट्याने नाहीसे होत आहेत, हे जरा नीटपणे समजावून घ्या. तो दूर करण्यासाठी आता खरोखरच धर्माची काही आवश्यकता नाही. उत्तर हिंदुस्तानात दुकानदारी करणारे ब्राह्मण, जोडे विणणारे ब्राह्मण, दारू गाळणारे ब्राह्मण अगदी सगळीकडे आढळतात! हे असे का होते आहे? हे जरा नीटपणे लक्षात घ्या. संघर्ष आणि स्पर्धा हे यामागचे एकमेव कारण आहे. सध्याच्या राजवटीत आपले पोट भरण्यासाठी कोणताही माणूस कोणताही व्यवसाय करू शकतो. याचा परिणाम असा झाला आहे, की सगळीकडे तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे. हे जरा नीटपणे समजावून घ्या. समाजात आज असे बहुसंख्य लोक आहेत, की ज्यांच्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रांत सर्वोच्च स्थान मिळविण्याची क्षमता आहे. मात्र आपल्या जातिव्यवस्थेमुळे आणि वर्णव्यवस्थेमुळे ते लोक तळागाळात खितपत पडले होते. मात्र आज जी संधी मिळाली आहे. जो अवकाश मिळाला आहे. त्यामुळे आता हे लोक तळागाळात खितपत न पडता सर्वोच्च स्थान मिळविण्यासाठी धडपड करून ते मिळवताहेत. त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे.’

आरक्षणाची गरज एवढ्या स्पष्ट स्वच्छ शब्दात अधोरेखित करणारे विवेकानंदाचे हे पत्र जरांगेंचे आंदोलन सुरू होण्यापूर्वी १३० वर्षापूर्वीचे आहे.- ब्राह्मण, क्षत्रिय, मराठा हे जातिव्यवस्थेत भरडले गेलेले नव्हेत, तर त्यात सर्वोच्च स्थान मिळालेले आहेत. ज्ञानेश्वरांच्या भाषेत, ‘आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण । हे द्विज जन्मे तिन्ही वर्ण । तयांचे पालन पोषण । ते शूद्र कर्म’ (१८.८४)

हा वर्णाश्रमधर्म बदलता येणार नाही. कारण हा वर्णाश्रमधर्म ‘गोंरीया अंगे जैसे, गोरेपण’ असा अंगभूत आहे. (१८.९०६) आणि जे हा वर्णाश्रमधर्म पाळणार नाहीत त्यांचे काय होईल हे सांगताना ज्ञानेश्वरांनी सांगितलंय ‘म्हणोनी स्वधर्म जो सांडील। तयाते काळू दंडील । चोरू म्हणोनी हरील । सर्वस्व तयाचे’ (३.११२)

ते असो! जरांगेच्या अभूतपूर्व प्रतिसाद मिळालेल्या जनआंदोलनाकडे आपण परत जाऊ.- वर्णव्यवस्था थोड्याफार किंवा फार थोड्या प्रमाणात हादरत असतांना उच्चवर्णीयांच्यामधील काहीजण गरीब बनले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्यांना ‘गरीबी हटाव’ या नव्या रचनेमधून आश्वासन आणि आरक्षण मिळाले पाहिजे. हा समाज १० ते १५ टक्के आहे. आज त्यांना हे आरक्षण दहा टक्के आहे. ते वाढवून देता येते का? हे सुद्धा पाहिले पाहिजे. मात्र जरांगे ज्यावेळी ‘मराठा कुणबी’ असा शब्द वापरतात आणि कुणबी म्हणून ओबीसीमध्ये आरक्षण मागतात, त्यावेळी ते जातिअंताची लढाई मागे नेतात. ‘आम्ही मराठा नाही, आम्ही कुणबी आहोत,’ असे ते म्हणत नाहीत. ‘आम्ही मराठा आहोत आणि कुणबीसुद्धा आहोत. त्यामुळे या वर्गासाठी वेगळे आरक्षण द्या’ असेही ते म्हणत नाहीत. त्यांचे म्हणणे आम्हाला कुणबी म्हणून ओबीसीमध्ये आरक्षण द्या असा आहे.- हे भयावह आहे का? – वर्णव्यवस्थेत, जातिव्यवस्थेत आमच्या मागे असलेले समाजगट पुढे चालले असताना आरक्षणाचा लाभ घेऊन आम्ही त्यांना अडवणारच असा अर्थ यातून निघतो का?- तो तसा निघू नये, जातिव्यवस्था अधिक बळकट न होता जातिअंताची लढाई पुढे जावी, असे त्यांना वाटत असेल, तर आमची आता एक नवी जात आहे, असे त्यांनी जरूर म्हणावे, आर्थिक- सामाजिक पायावर जातींचे नवे विभाजन हीच कदाचित, जातिअंताची लढाई पुढे नेणारी रचना ठरू शकते.

dabholkard155@gmail.com