प्रसाद माधव कुलकर्णी ‘‘धर्माने मनुष्य निर्माण केलेला नाही, मनुष्याने धर्माला जन्म दिलेला आहे. धर्माला वाटेल ते वळण देण्याचा अधिकार मनुष्याच्या हाती आहे..’’ हे ठामपणे सांगणाऱ्या प्रबोधनकार ठाकरे यांच्या पन्नासाव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने.. सोमवार, २० नोव्हेंबर २०२३ रोजी प्रबोधनकार ठाकरे यांचा पन्नासावा स्मृतिदिन आहे. १७ सप्टेंबर १८८५ रोजी पनवेल येथे त्यांचा जन्म झाला. आणि २० नोव्हेंबर १९७३ रोजी ते मुंबईत कालवश झाले. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पनवेल व देवास येथे झाले. मराठी व इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे महाराष्ट्राच्या प्रबोधन चळवळीतील एक अग्रेसर नाव आहे. आपल्या सात दशकांच्या सामाजिक, वैचारिक जीवनात प्रारंभी त्यांनी काही काळ सरकारी नोकरी केली. नंतर टंकलेखक, छायाचित्रकार, जाहिरात लेखन, विमा कंपनीचे प्रचारक, नाटय़ कंपनीचे चालक अशा विविध भूमिका निभावल्या. खंदा पत्रकार, घणाघाती लेखक, समाजसुधारक, इतिहासकार, पुरोगामी चळवळींचा मार्गदर्शक अशा अनेक नात्यांनी त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली. राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, लोकहितवादी, आगरकर ही त्यांची प्रेरणास्थाने होती. शाहू महाराजांच्या ब्राह्मणेतर चळवळीचे ते पुरस्कर्ते होते. प्रबोधनकार ठाकरे समतेच्या विचारांचे, सामाजिक न्यायाचे कट्टर पुरस्कर्ते होते. ‘सत्यशोधक समाजाची तळपती तलवार’ म्हणूनही ते ओळखले जात. ‘खरा ब्राह्मण’, ‘विधिनिषेध’, ‘टाकलेले पोर’ ही नाटके, ‘माझी जीवनगाथा’ हे आत्मचरित्र यासह त्यांनी ‘कुमारिकांचे शाप’, ‘भिक्षुकशाहीचे बंड’, ‘प्रतापसिंह छत्रपती’ आणि ‘रंगो बापुजी’, ‘ग्रामण्याचा साद्यंत इतिहास’, ‘हिंदूवी स्वराज्याचा खून’, ‘कोदंडाचा टणत्कार’, ‘रायगड’, ‘संत गाडगेबाबा’, ‘पंडिता रमाबाई’, ‘संत रामदास’, ‘जुन्या आठवणी’ आदी अनेक पुस्तके लिहिली. धारदार लेखणी आणि तडफदार वाणी ही त्यांची वैशिष्टय़े होती. ‘सारथी’, ‘लोकहितवादी’, ‘प्रबोधन’ यांसारखी काही नियतकालिके त्यांनी काढली. ‘प्रबोधन’मधून सामाजिक व धार्मिक अन्यायाविरुद्ध, गुलामगिरीविरुद्ध घणाघाती लेखन केले. प्रबोधनाच्या या भूमिकेमुळे त्यांना ‘प्रबोधनकार’ हे सन्मानाचे बिरुद मिळाले. हेही वाचा >>>राबणारे राबतील नाही तर मरतील..! प्रबोधनकार ठाकरे यांच्या धारदार लेखणीने आणि तडफदार वाणीने अनेकांचे वस्त्रहरण झाले. धर्म, रूढी, परंपरा, श्रद्धा यांच्या नावावर चुकीचे विचार लादून बहुजन समाजाला फसवणाऱ्या ठकांविरुद्ध त्यांनी तोफ डागली. अंधश्रद्धेपासून लोकशाहीपर्यंत विविध विषयांवर त्यांनी टोकदार मते मांडली. ‘प्रस्थान’ या पुस्तकात ते स्वातंत्र्याविषयी म्हणतात, ‘‘सामाजिक व धार्मिक गुलामगिरीत कडक सीलबंद ठेवून राजकीय स्वातंत्र्य मिळवण्याची शेखी मारणारे लोक एक तर मूर्ख असले पाहिजेत अथवा अट्टल लुच्चे असले पाहिजेत. यापेक्षा तिसरी भावना संभवत नाही.’’ या एकाच वाक्याने त्यांची सामाजिक- धार्मिक सुधारणांविषयीची आग्रही भूमिका ध्यानात येते. सामाजिक क्रांतीशिवाय राजकीय क्रांती फोल आहे, असे ते म्हणत. १९२३ साली ‘प्रबोधन’मध्ये त्यांनी ‘धर्माचा बाप मनुष्य’ या नावाचा एक लेख लिहिला होता. त्यात ते म्हणतात, ‘‘धर्माने मनुष्य निर्माण केलेला नाही मनुष्याने धर्माला जन्म दिलेला आहे. अर्थात धर्माचे कर्तव्य मनुष्याच्या हाती आहे. धर्माला वाटेल ते वळण देण्याचा अधिकार मनुष्याच्या हाती आहे. धर्माला मनुष्यावर अरेरावी गाजवता येणार नाही.’’ ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’ या पुस्तकात त्यांनी म्हटले आहे, ‘‘भारतात धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडात देवळांचा नंबर पहिला लागतो. देवळाची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या बारशाला खास झालेली नाही. हिंदू धर्माची ती अगदी अलीकडची कमाई आहे. देऊळ हा देवालय या शब्दाचा अपभ्रंश आहे. देवाचे जे आलय म्हणजे देवालय. देवाचे वसतिस्थान ते देवालय. आमचे तत्त्वज्ञान पाहावे तर देव चराचराला व्यापून आणखी वर दशांगुळे उरला आहे. अशा सर्वव्यापी देवाला चार भिंतींच्या आणि कळसबाज घुमटांच्या घरात येऊन राहण्याची जरूरच काय पडली होती?’’ पुढे ते म्हणतात, ‘‘बौद्ध धर्म हिंदूस्थानातून परागंदा होईपर्यंत तरी (म्हणजे इसवीसनाचा उदय होईपर्यंत तरी) भारतीय इतिहासात देवळांचा कोठेच काही सुगावा लागत नाही. मग तोपर्यंत आमचे हिंदू देव थंडीवाऱ्यात कुडकुडत आणि उन्हातान्हात धडपडत पडले होते काय?’’ अशी बिनतोड घणाघाती भाषा हे प्रबोधनकारांचे वैशिष्टय़ होते. प्रबोधनकार ठाकरे हे मानवी तत्त्वांचे उपासक होते. व्यक्तिपूजेपेक्षा विचारपूजा त्यांना फार महत्त्वाची वाटत असे. त्यांनी आपल्या जीवनात विभूतीपूजा, ग्रंथप्रामाण्य यांना काडीमात्रही स्थान दिले नाही. त्यांनी १ नोव्हेंबर १९२२ च्या ‘प्रबोधन’च्या अंकात लिहिले होते, ‘‘निर्मळ सत्य प्रतिपादनाच्या आड प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्यालाही लाथ हाणून अप्रिय सत्याची तुतारी फुंकण्यात सत्यवादी वीर कधीच मागेपुढे पाहत नाही.’’ कर्मवीर भाऊराव पाटील यांनी प्रबोधनकारांच्या एकसष्टीच्या समारंभात म्हटले होते की, ‘‘रयत शिक्षण संस्थेची कल्पना माझी असली तरी त्या बीजाला चैतन्याचे, स्फूर्तीचे नि उत्साहाचे पाणी घालून त्याला अंकुर फोडणारे आणि सुरुवातीला संकटाच्या प्रसंगी धीर देऊन विरोधाचे पर्वत तुडवण्याचा मार्ग दाखवणारे माझे गुरू फक्त प्रबोधनकार ठाकरे आहेत. ते माझे गुरू तर खरेच पण मी त्यांना वडिलांप्रमाणे पूज्य मानतो. का मानू नये? मी एका प्रसंगी निराशेच्या आणि संतापाच्या भरात असताना चित्त्यासारखी उडी घेऊन ठाकरे यांनी माझ्या हाताची बंदूक हिसकावून घेऊन माझे डोके ठिकाणावर आणले नसते तर कुठे होता आज भाऊराव आणि त्याचा कार्याचा पसारा?’’ हेही वाचा >>>नारायण मूर्ती सर, शिक्षकांना काहीच कळत नाही, असं तुम्हाला का वाटतं? ‘ग्रामण्याचा साद्यंत इतिहास’ या ग्रंथात ते म्हणतात, ‘‘दिव्याच्या उजेडाच्या इतिहासाबरोबरच त्याच्या अंधाराचाही इतिहास पुढे आला पाहिजे. नाहीतर आमच्या इतिहासाचे एक अंग अर्धागवायूने लुळे पडलेले आहे. इतके तरी उघडपणे संकोच न धरता शिरोभागी नमूद करून ठेवले पाहिजे. मग असला लुळापांगळा एकांगी इतिहास असला काय आणि नसला काय सारखाच. चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टी मनावर विशेष परिणाम करतात. कॉमेडीपेक्षा ट्रॅजिडीच जास्त परिणामकारक होते. आपल्या राष्ट्रीय इतिहासातील चांगला भाग अधिकाधिक उज्ज्वल करणे जसे आपले कर्तव्य आहे त्याचप्रमाणे त्यातले वाईट भाग आपल्या प्रत्यक्ष वर्तनाने सुधारून त्याऐवजी सत्कृत्यांची भर घालणे हेही आपले अनिवार्य कर्तव्यच आहे. राष्ट्राचा किंवा समाजाचा इतिहास सर्वागसुंदर करण्याचा हाच एक मार्ग आहे. दोष लपवून सद्गुणांचाच नेहमी पाढा वाचणे हा नव्हे. गतकाळातील सामाजिक किंवा राजकीय पातकांना चव्हाटय़ावर आणण्याचे नीतिधैर्य ज्या राष्ट्राला नाही, त्याने आजन्म सुधारक राष्ट्राच्या कोपरखळय़ा खातच कोठेतरी कानाकोपऱ्यात पडून राहिले पाहिजे.’’ प्रबोधनकार ठाकरे यांनी वर्णाश्रम व्यवस्था, जातीव्यवस्था, स्त्री-पुरुष समानता, धर्म, धर्मद्वेश, अंधश्रद्धा, शिक्षण, सामाजिक न्याय व नैतिकता, श्रमांचे महत्त्व आणि प्रतिष्ठा, शेती आणि शेतकरी, व्यक्तिपूजा की विचारपूजा, लोकभाषा, लोकराज्य, लोकशाही, ज्योतिषाची भोंदूगिरी अशा अनेक विषयांवर मूलभूत स्वरूपाचे टोकदार लेखन केले आहे. त्यांच्या लेखनात बुद्धिप्रमाण्यवाद दिसून येतो. सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रत्येकाने प्रबोधनकार ठाकरे यांचे समग्र लेखन वाचण्याची आणि त्यापासून प्रेरणा घेण्याची, त्यांचा विवेकवाद स्वीकारण्याची आज नितांत गरज आहे. महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेतील या बुद्धिप्रामाण्यवादी निर्भीड प्रबोधकाला विनम्र अभिवादन.. (लेखक समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजीचे कार्यकर्ते आणि ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती’ मासिकाचे संपादक आहेत.)