युरोपीय महासंघातून ब्रिटन बाहेर पडल्यानंतर (ब्रेग्झिट) त्याची व्यापार आणि परदेशी गुंतवणूक घटली आहे. करोना साथीने तिजोरीत खडखडाट निर्माण केला आहे. विकासगती आणि चलनवाढ अन्य सर्व पाश्चात्त्य औद्योगिक देशांपेक्षा अत्यंत वाईट आहे. आता, तर इतर सर्व गोष्टींपेक्षा प्रत्येक ब्रिटिश कुटुंबाला आणि व्यावसायिकाला विजेच्या वाढत्या बिलाची तीव्र चिंता आहे. आरोग्यसेवा, फौजदारी न्याय आणि शिक्षण यांसह अनेक महत्त्वाच्या सरकारी सेवांचा बोजवारा उडाला आहे. देशांतर्गत तसेच अनेक आंतरराष्ट्रीय आव्हाने संकटे म्हणून उभी असताना ब्रिटनचा कारभार ‘नवख्या पंतप्रधान’ आणि ‘नवा राजा’ यांच्या हाती आला आहे.

ब्रिटनच्या राजकीय नेतृत्वाला आर्थिक समस्या, महागाई-दरवाढीबरोबरच युरोपशी असलेल्या ‘ब्रेग्झिट’पश्चात तणावपूर्ण संबंधांचा प्रश्न हाताळावा लागणार आहे. देश आता राणी एलिझाबेथ यांच्या सक्षम नेतृत्वाविना भविष्याला सामोरा जाणार आहे. राणीचे निधन झाल्यानंतर लगेचच अनेक राजकीय विश्लेषक आणि निरीक्षकांनी ‘स्थैर्य’ आणि ‘सातत्य’ ब्रिटनला अत्यंत आवश्यक असल्याचे म्हटले आहे. राणी किंवा राजा देशात स्थैर्य आणू शकत नाहीत, कारण त्यांची भूमिका औपचारिक असते. त्यामुळे हे काम अर्थातच राजकारण्यांनी करणे अपेक्षित असते. परंतु नव्या पंतप्रधान लिझ ट्रस यांचे सरकार आणि राजे चार्ल्स तिसरे देशाला कसा आकार देतील याबद्दल अनिश्चितता व्यक्त करण्यात येते. मात्र एलिझाबेथ यांना अखेरचा निरोप देत असताना ब्रिटिश नागरिकांमध्ये निर्माण होणारी सहानुभूतीची भावना पंतप्रधान ट्रस यांना लाभदायक ठरेल, असे निरीक्षण युरोपियन कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्सचे वरिष्ठ धोरणकर्ते निक व्हिटनी यांनी नोंदवले आहे.

हजरजबाबी आणि विनोदबुद्धी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजघराण्याची धुरा वाहताना राणी एलिझाबेथ यांनी आपली विनोदबुद्धीही जागृत ठेवली होती. त्यांच्या हजरजबाबी स्वभावाचा प्रत्यय अनेक राष्ट्रप्रमुखांना आला. अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज डब्लू बुश यांनी चुकून राणीचे वय २०० वर्षांनी वाढवले. त्यावेळी त्यांनी आपल्यावर टाकलेला प्रेमळ कटाक्ष हा एका ‘आई’चा होता, असे बुश यांनी नोंदवले . कॅनडाचे अध्यक्ष जस्टीन त्रुदो यांनी एलिझाबेथ यांच्या नेतृत्वाखालील ते १३ वे अध्यक्ष असल्याचे म्हटले. तेव्हा ‘वृद्ध झाल्याची आठवण करून दिली’ असे म्हणत त्यांनी हशा पिकवला. २०१२ लंडन ऑलिम्पिकच्या वेळी त्यांनी एका छोटय़ा ध्वनीचित्रफितीमध्ये ‘जेम्स बाण्ड’ डॅनियल क्रेगबरोबर काम केले. ‘बीबीसी’च्या एका कार्यक्रमात त्यांनी पॅडिंग्टन अस्वलासोबत घेतलेला ‘हाय टी’देखील प्रचंड गाजला होता.