गांधीवादी, समाजवादी डॉ. जी. जी. पारीख यांचं गुरुवारी, गांधी जयंतीच्या दिवशी देहावसान झालं. १०१ वर्षांच्या या सच्च्या गांधीवाद्याचा महात्मा गांधींच्या १५६ व्या जयंतीदिनी मृत्यू होणं, हा योगायोग असला तरी त्याला एक विशेष महत्त्व आहे. गांधींवरील जीजींचं प्रेम, श्रद्धा अफाट होती. खादीचे कपडे जीजींची ओळख होती. १२-१३ व्या वर्षांपासून त्यांनी खादीचे कपडे घालायला सुरुवात केली होती. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की खादी हे फक्त कापड नाही, तर खादी हा विचार आहे. तो स्वदेशीचा विचार आहे. त्याच्या प्रसार आणि प्रचाराचे काम जीजींनी केले. त्यांना सगळे जीजी असे संबोधत. त्यांचं पूर्ण नाव गुणवंतराय गणपतलाल पारीख होतं. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी कानपूर येथे महात्मा गांधी यांना पाहिलं होतं. तेव्हापासून गांधीजींनी, गांधीविचारांनी त्यांच्या मनात बीजे पेरली असावीत. जीजी शेवटपर्यंत सामाजिक-राजकीय कार्यात सक्रिय होते. स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता आणि या आंदोलनाचा ते चालताबोलता इतिहास होते. मृत्यूनंतरही आपल्या देहाचा समाजाला उपयोग व्हावा म्हणून त्यांनी देहदान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे पार्थिव जे. जे. रुग्णालयाकडे सोपवण्यात आले.

डॉ. शांती पटेल, जीजी यांच्यासारखे अनेक स्वातंत्र्यसैनिक दरवर्षी ९ ऑगस्टला ‘चले जाव’ आंदोलनाची आठवण म्हणून ग्रँट रोड येथील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात जात. २०१४ मध्ये वयाच्या ९३ व्या वर्षी शांती पटेल यांचं निधन झालं. २०२३ च्या ९ ऑगस्टला जीजी यांना ऑगस्ट क्रांती मैदानाकडे जाताना पोलिसांनी अडवलं होतं. याच ऑगस्ट क्रांती मैदानात जीजी यांनी तरुण अरुणा असफअली यांना तिरंगा फडकवताना पाहिलं होतं. लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करताना आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडताना त्यांनी पाहिल्या होत्या. अशा ९९ वर्षांच्या माणसाला ९ ऑगस्टच्या क्रांतिदिनी ध्वजवंदनासाठी जात असताना अडवणं यातून सत्ताधारी किती असंवेदनशील आहेत, हेच दिसते. भारतात अश्रुधुराच्या नळकांड्या सगळ्यात पहिल्यांदा ऑगस्ट क्रांती मैदानात फोडण्यात आल्या होत्या असं सांगितलं जातं. गुजरातमध्ये जन्मलेले जीजी तेव्हा मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शिकत होते. ब्रिटिशांनी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह काँग्रेसच्या जवळपास सर्व नेत्यांना अटक केली होती. ऑगस्ट क्रांती मैदानात करण्यात आलेल्या लाठीचार्जमुळे तरुण जीजी अस्वस्थ झाले होते. तो काळच तसा होता. तरुणांमध्ये देशासाठी बलिदान करण्याची तयारी होती. दुसऱ्या दिवशी जीजी आणि त्यांच्या सोबतच्या विद्यार्थ्यांनी सरकारचा निषेध म्हणून महाविद्यालय बंद करण्याची विद्यार्थ्यांना विनंती केली. तिला प्रचंड प्रतिसाद मिळाला. महाविद्यालय बंद केल्यानंतर ते सगळे चर्चगेट स्टेशनकडे गेले. ट्रेन अडवण्याचा त्यांचा विचार होता. तेवढ्यात जीजी व काही जणांना पोलिसांनी पकडले. जीजी यांना वरळी येथील तात्पुरत्या तुरुंगात ठेवण्यात आले. दहा महिन्यांच्या तुरुंगवासातून जीजी सुटून बाहेर आले तेव्हा त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. जीजी तेव्हा मुंबईतल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले होते. १९४७ मध्ये स्टुडंट्स काँग्रेसचे ते मुंबईचे अध्यक्ष होते. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या विद्यार्थी आंदोलनात स्टुडंट्स काँग्रेसची महत्त्वाची भूमिका होती. १९४२ नंतर जीजींनी मागे वळून पाहिले नाही. स्वत:ला सत्तेपासून लांब ठेवून त्यांनी सामाजिक-राजकीय कार्यात झोकून दिले.

नरेंद्र मोदी सरकार पहिल्यांदा २०१४ मध्ये सत्तेत आलं, त्यानंतर अनेकांनी जीजींना वेगवेगळ्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून वेगवेगळ्या मोर्चांचं नेतृत्व करताना पाहिलं. समाजवादी विचारांची बैठक पक्की असल्याने समता, धर्मनिरपेक्षता यांसारख्या मूल्यांवर त्यांचा विश्वास होता. समाजात सामाजिक सौहार्द कायम राहावं, यासाठी ते सतत प्रयत्नशील होते. सरकारला त्यांचा विरोध मूल्यांवर, मुद्द्यांवर असायचा. त्यामुळे १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात त्यांना १८ महिन्यांचा तुरुंगवास झाला होता. त्यांना सत्तेशी तडजोड करणं मान्य नव्हतं. आजच्या भारतात स्वातंत्र्यलढ्याची मूल्यं कायम राहतील की नाही, याची त्यांना शेवटपर्यंत चिंता होती. २०२३ च्या डिसेंबर महिन्यात मुंबई प्रेस क्लबने आयोजित केलेल्या ‘रेड इंक पुरस्कार’ समारंभात त्यांचा बहुमान करण्यात आला होता. माध्यमांच्या स्वातंत्र्याबद्दल तेव्हा जीजी यांनी चिंता व्यक्त केली होती. ‘घोषित आणीबाणीपेक्षा अघोषित आणीबाणी अधिक धोकादायक असते’, असं तेव्हा त्यांनी म्हटलं होतं. १९४६ मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘जनता साप्ताहिका’चे ते संपादक होते. समाजवादी विचारांशी या साप्ताहिकाची बांधिलकी आहे. सुरुवातीला ते दिल्लीहून निघत असे आणि त्याची जबाबदारी जयप्रकाश नारायण आणि अरुणा असफ अली यांच्यावर होती. १९४९ मध्ये अच्युत पटवर्धन संपादक झाले तेव्हा कार्यालय मुंबईत आणण्यात आलं. १९७१ पासून आतापर्यंत जीजी त्याचे संपादक होते.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अंतर्गत जयप्रकाश नारायण, डॉ. राम मनोहर लोहिया, आचार्य नरेंद्र देव इत्यादींनी १९३४ मध्ये काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची स्थापना केली होती. त्यांच्या विचारांचा जीजींवर प्रभाव होता. स्वातंत्र्यानंतर १९४८ मध्ये या पक्षाचं रूपांतर सोशलिस्ट पार्टीत करण्यात आले. जीजीही सोशालिस्ट पार्टीत सामील झाले. त्यांच्यावर युसुफ मेहेरअली यांचा विशेष प्रभाव होता. युसुफ मेहेरअली हे ‘चले जाव’ या घोषणेचे जनक होते. तेव्हा ते मुंबईचे महापौर होते. दुसरं महायुद्ध सुरू होतं. स्वातंत्र्य आंदोलनासाठी महात्मा गांधीजी योग्य घोषणा शोधत होते. ‘चले जाव’ आंदोलन सुरू होण्याच्या काही दिवस आधी युसुफ मेहेरअली यांनी मुंबईत गांधीजींना ही घोषणा सुचवली. गांधीजींना ती खूप आवडली. ८ ऑगस्ट १९४२ पासून ‘चले जाव’ आंदोलन सुरू झालं. भारताला स्वातंत्र्य मिळण्यात ‘चले जाव’ आंदोलनाचा खूप मोठा हात होता. १९२८ मध्ये घटनात्मक सुधारणा सुचविण्यासाठी आणि १९१९ चा भारत सरकारच्या कायद्याची समीक्षा करण्यासाठी ब्रिटिशांनी सायमन कमिशन पाठवलं होतं. त्याचे सर्व सभासद ब्रिटिश होते. देशभरात सायमन कमिशनच्या विरोधात वातावरण निर्माण झालं होतं. युसुफ मेहेरअली यांनी तेव्हा ‘सायमन गो बॅक’ ही घोषणा दिली होती. त्या घोषणेने संपूर्ण भारताला एक केलं. लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली सायमन कमिशनच्या विरोधात लाहोर रेल्वे स्टेशन येथे ३० ऑक्टोबर १९२८ ला निदर्शनं करण्यात आली. त्यात पोलिसांनी केलेल्या लाठीमाऱ्यात लाला लजपतराय जखमी झाले. १७ नोव्हेंबरला त्यांचा मृत्यू झाला. देशभर शोककळा पसरली. सायमन कमिशनच्या विरोधात संतापाची लाट उसळली.

जीजी आठ वर्षांचे असताना त्यांनी महात्मा गांधींना सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं होतं. महात्मा गांधींनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि आशीर्वाद दिले होते. त्यानंतर महात्मा गांधींना त्यांनी ऑगस्ट क्रांती मैदानात पाहिलं होतं. गांधीजींचं एक वैशिष्ट्य असं होतं की त्यांना भेटणारी व्यक्ती त्यांच्याकडे आपोआप आकर्षित व्हायची आणि त्यांच्या विचारांनुसार वाटचाल करायचा प्रयत्न करायची. जीजी यांच्यावरही महात्मा गांधींचा प्रभाव कायम राहिला. सत्तेपासून लांब राहून सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याची नैतिक ताकद त्यांच्याकडे होती. जीजी अडचणीचे प्रश्न विचारत, पण त्यांना काही सांगण्याची हिंमत सत्ताधाऱ्यांना होत नसे. अशी नैतिक ताकद असलेले लोक आता किती आहेत, हा प्रश्न आहे.

कानपूर येथेही जीजी यांचं थोडं शिक्षण झालं होत. स्वातंत्र्य चळवळीत कानपूर महत्त्वाचं केंद्र होतं. गणेश शंकर विद्यार्थी यांनी येथूनच ‘प्रताप’ नावाचं दैनिक सुरू केलं होतं. विद्यार्थी हे त्या काळातले अतिशय प्रभावी संपादक होते. शहीद भगतसिंग त्यात अधूनमधून लिहीत. विद्यार्थी हे राष्ट्रीय काँग्रेसचे नेतेही होते. गांधीजी आणि भगतसिंग या दोघांशी विद्यार्थी यांचे जवळचे संबंध होते. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना २३ मार्च १९३१ रोजी ब्रिटिशांनी लाहोर येथे फाशी दिली. त्यानंतर देशभर ब्रिटिशांच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले. ब्रिटिशांनी लोकांचा संताप इतर गोष्टींकडे वळवण्यासाठी हिंदू-मुस्लीम दंगली घडवून आणल्या. त्या थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थी यांची हत्या करण्यात आली. विद्यार्थी यांच्या हत्येने संपूर्ण देश हादरला. लोक दंगलीमुळे अस्वस्थ झाले होते. जीजी यांच्यावरही त्याचा परिणाम झाला होता. हिंदू-मुस्लीम या दोन्ही समाजांमध्ये सामाजिक सौहार्द असलं पाहिजे, असं सर्वांना वाटत होतं.

स्वातंत्र्यानंतर जीजींनी सामाजिक-राजकीय प्रश्न, ग्राहक सहकारी चळवळ, सामाजिक समता, आरोग्य तसंच ग्रामीण विकास याकडे अधिक लक्ष दिलं. १९६१ मध्ये त्यांनी आणि त्यांच्या पत्नी मंगला पारीख यांनी पनवेलजवळ तारा येथे ग्रामीण विकासाच्या प्रयोगाला सुरुवात केली. १९६६ मध्ये तेव्हाचे उप-राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांनी युसुफ मेहेरअली सेंटरचे औपचारिक उद्घाटन केलं होतं. जीजी यांच्यावर युसुफ मेहेरअली यांचा प्रभाव असल्यामुळे तारा येथील केंद्राचं नाव युसुफ मेहेरअली सेंटर ठेवण्यात आलं होतं. स्वातंत्र्यासाठीच्या समाजवादी आंदोलनात युसुफ मेहेरअली यांची महत्त्वाची भूमिका राहिली होती. मुस्लीम समाजातून आलेल्या समाजवादी नेत्याचा विचार, त्याचं जीवन लोकांना कळावं आणि त्यांनी केलेला त्याग लोकांना प्रेरणादायी ठरावा, हा विचार जीजींनी या केंद्राला युसुफ अली यांचं नाव देताना केला असणार. दुर्दैवाने युसुफ मेहेरअली यांच्या कामाची फारशी माहिती आज लोकांना नाही. आज देशातल्या जवळपास ११ राज्यांमध्ये सेंटर सक्रिय आहे. गुजरातच्या कच्छ इथंही या केंद्राचं काम चालतं. काही वर्षांपूर्वी वयोमानामुळे शक्य नसतानाही जीजी ट्रेनने कच्छला गेले होते. त्यांची जीवनशैली एकदम सरळ, साधी होती. सामान्य माणसांशी ते अत्यंत प्रेमाने, आपुलकीने बोलत असत. सामाजिक चळवळीच्या अनेक कार्यकर्त्यांशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. जीजींच्या एकूण व्यक्तिमत्त्वाने आणि सामाजिक-राजकीय बांधिलकीने अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली आहे.

सामाजिक-राजकीय-आर्थिक समतेसाठी देशभरात संघर्ष करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांना जीजी यांचा आधार होता. उत्तर भारतातील अनेक कार्यकर्ते जीजी यांना भेटण्यासाठी आणि त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी यायचे.
आता ते कोणाकडे जाणार?
jatindesai123 @gmail.com
लेखक पत्रकार, शांततावादी कार्यकर्ते आहेत.