सुरेश नाईक
डॉ. विक्रम साराभाई यांचे निकटचे सहकारी, उपग्रह तंत्रज्ञानाचा उपयोग लोकसंपर्क, शिक्षण, शेती, पाणी व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापनात व्हावा म्हणून मोलाचे योगदान देणारे ‘पद्माभूषण’ प्रा. एकनाथ चिटणीस उद्या (२५ जुलै) शंभर वर्षांचे होतील. भारत अंतराळ क्षेत्रात नवनव्या क्षितिजांचा वेध घेत असताना या क्षेत्राचा पाया रचण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या शास्त्रज्ञाविषयी…
भारताच्या अंतराळ विज्ञान क्षेत्रातील एक दूरदर्शी विचारवंत आणि विज्ञान धोरणाचे शिल्पकार प्रा. एकनाथ वसंत चिटणीस हे उद्या २५ जुलै २०२५ रोजी शंभर वर्षांचे होतील. आज अंतराळ संशोधन क्षेत्रात भारत नवनवे टप्पे गाठत आहे. भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला अलीकडेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील (आयएसएस) मोहीम यशस्वी करून परतले.
आयएसएसमध्ये जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर ठरण्याचा मान त्यांनी मिळवला. चंद्रयान आणि मंगळयान मोहिमांनंतर भारत आता गगनयान या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमेसाठी तयारी करत आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय अंतराळ कार्यक्रमाच्या पायाभरणीत मोलाची भूमिका बजावलेल्या प्रा. चिटणीस यांची जन्मशताब्दी साजरी करणे, त्यांच्या योगदानाविषयी जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

प्रा. चिटणीस यांनी पुणे विद्यापीठातून भौतिकशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. याच कालखंडात त्यांच्या मनात अंतराळ व कण भौतिकशास्त्राविषयीची (स्पेस आणि पार्टिकल फिजिक्स) जिज्ञासा वाढू लागली. ही जिज्ञासाच त्यांना पुढील संशोधन प्रवासासाठी अहमदाबादमधील ‘फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी’ (पीआरएल) येथे घेऊन गेली. ही संस्था डॉ. विक्रम साराभाई यांनी स्थापन केली होती. १९५२ ते १९६१ या काळात प्रा. चिटणीस पीआरएलमध्ये वैश्विक किरणांचा वर्षाव विशेषत: विषुववृत्तीय प्रदेशांमधील त्यांचे स्वरूप आणि परिणाम या विषयावर संशोधन करत होते. त्यांच्या प्रयत्नांना डॉ. साराभाई यांच्या मार्गदर्शनाने दिशा गवसली.

या विषयावर भारतात संशोधन केल्यानंतर प्रा. चिटणीस यांना अमेरिकेतील ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (एमआयटी) येथे काम करण्याची संधी मिळाली. एमआयटी येथे त्यांनी वैश्विक किरण व वातावरणीय भौतिकशास्त्र यावर आधारित माहितीचे विश्लेषण आणि प्रायोगिक संशोधन केले. तेथील संशोधनाचा अनुभव त्यांना आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांच्या समुदायाशी जोडणारा ठरला. यासाठी त्यांनी कोडाईकॅनाल येथे जाऊन निरीक्षणे गोळा केली व त्यांचे विश्लेषण एमआयटीच्या संगणकावर केले. त्या वेळी भारतात कोलकाता येथे एकमेव संगणक होता. तो प्रा. एकनाथ चिटणीस यांनी वापरायचा ठरवला असता तर त्यावर अन्य काही काम करता आले नसते इतका वेळ प्रा. चिटणीसांना त्यावर काम करावे लागले असते.

याच दरम्यान, डॉ. विक्रम साराभाई यांनी भारतात एका नवीन प्रयत्नाला सुरुवात केली होती. या भारतीय अंतराळ कार्यक्रमासाठी त्यांनी भारतात परत यावे या साराभाईंच्या आवाहनानुसार प्रा. चिटणीस १९६२ मध्ये परतले. प्रा. चिटणीस हे डॉ. विक्रम साराभाईंचे निकटचे सहकारी होते. त्यांनी भारतीय राष्ट्रीय अंतराळ संशोधन समितीच्या (इन्कोस्पार) सुरुवातीच्या काळात अत्यंत मोलाची भूमिका बजावली. भारतातील पहिले रॉकेट प्रक्षेपण ठिकाण- थुंबाची निवड करताना चिटणीस यांची दूरदृष्टी स्पष्टपणे दिसून आली. १९६३ मध्ये ‘नाईकेअपाचे’ रॉकेट त्यांच्या देखरेखीखाली प्रक्षेपित करण्यात आले होते. हे रॉकेट दिवाळीच्या फटाक्यांपेक्षा थोडे मोठे होते.

इस्रोमध्ये (अहमदाबाद) रुजू होणाऱ्या नव्या शास्त्रज्ञांना ते नेहमीच प्रोत्साहन देत. महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देत. नवख्या शास्त्रज्ञांकडे नेतृत्वाची धुरा देत. तरुणांना वैचारिक स्वातंत्र्य देणे, आवश्यक ती मदत व उत्तेजन देणे ही त्यांची कामाची पद्धत होती. विक्रम साराभाईंनी रुजवलेल्या संशोधन संस्कृतीचा वारसा त्यांनी पुढे नेला. १९७०च्या दशकात प्रा. चिटणीस यांनी उपग्रह तंत्रज्ञानाचा उपयोग लोकसंपर्क व शिक्षणासाठी व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रम संचालक या नात्याने त्यांनी ‘साईट’ (सेटलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन) ही योजना राबवली.

ग्रामीण भागांतील दुर्गम गाव-पाड्यांपर्यंत शैक्षणिक कार्यक्रम पोहोचवणारा हा भव्य प्रयोग त्या काळात उपग्रह तंत्रज्ञानाचा सर्वांत मोठा सामाजिक उपक्रम ठरला. हा प्रकल्प १९७५-७६ मध्ये भारत सरकार व नासा यांच्या संयुक्त सहकार्याने प्रा. यशपाल यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसा आणि राजस्थान या मागासलेल्या चार राज्यांत राबवण्यात आला. प्रा. चिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमातून हजारो गावांपर्यंत शैक्षणिक व आरोग्यविषयक माहिती पोहोचवण्यात आली.

या प्रयोगातून मिळालेले अनुभव ‘इन्सॅट’ या भविष्यातील स्वदेशी प्रणालीसाठी मोलाचे ठरले. टेलिव्हिजन हे माध्यम केवळ करमणुकीचे असल्याने ते आपल्याला नको असे पंडित नेहरूंचे मत होते, पण त्यावर कृषीदर्शन व शैक्षणिक कार्यक्रम करता येतील हे समजल्यावर त्याला नेहरूंनी पाठिंबा दिला व नंतर इंदिरा गांधींनी त्याला अधिक प्रोत्साहन दिले.

पुढे अहमदाबाद येथील ‘स्पेस ॲप्लिकेशन सेंटर’चे संचालक म्हणून प्रा. चिटणीस यांनी दूरदृष्टीने अनेक महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांचे नेतृत्व केले. त्यांनी दूरसंचार आणि दूरसंवेदन या क्षेत्रांतील उपग्रह तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती, पाणी व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या राष्ट्रीय समस्यांवर व्यावहारिक आणि परिणामकारक उपाय प्रदान करण्याची क्षमता सिद्ध केली. त्यांच्या या विविधांगी व दूरगामी परिणाम असलेल्या योगदानाबद्दल त्यांना १९८५ मध्ये भारत सरकारकडून ‘पद्माभूषण’ हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात आला.

१९८९ नंतर प्रा. चिटणीस पुण्यात स्थायिक झाले व पुणे विद्यापीठात ‘शैक्षणिक मल्टिमीडिया संशोधन केंद्र’ (ईएमआरसी) स्थापनेत त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांनी शैक्षणिक तंत्रज्ञान, विज्ञान प्रसार आणि दूरशिक्षणाच्या माध्यमातून विद्यापीठाच्या उपक्रमांना नवीन दिशा दिली. पुढची दोन दशके ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, अध्यापन आणि विज्ञान-संवाद यामध्ये सक्रियपणे कार्यरत राहिले.

प्रा. चिटणीस शंभरीत प्रवेश करत असले तरी आजही त्यांचा आवाज बुलंद आहे, स्मृती उत्तम आहे आणि शारीरिक आरोग्यही त्यांनी राखले आहे. त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी २६ जुलै २०२५ रोजी पुण्याच्या आयसर संस्थेत ‘नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेटर्स’ आणि ‘आयसर’ या संस्थांच्या वतीने एक दिवसाची राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्याला इस्रोचे निवृत्त अध्यक्ष डॉ. किरण कुमार उपस्थित राहणार आहेत.

त्याशिवाय यात आयसरचे संचालक प्रा. सुनील भागवत, पुणे विद्यापीठातील कम्युनिकेशन स्टडीजच्या विभागप्रमुख प्रा. माधवी रेड्डी, स्पेस अॅप्लिकेशन सेंटर, अहमदाबादचे निवृत्त संचालक प्रमोद काळे, इस्रोचे निवृत्त संचालक डॉ. किरण कर्णिक, एमआयसीए, अहमदाबादचे निवृत्त संचालक प्रा. अरबिंद सिन्हा, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीचे संचालक प्रा. अनिल भारद्वाज, स्पेस ॲप्लिकेशन सेंटर, अहमदाबादचे सध्याचे संचालक डॉ. नीलेश देसाई, आयुकाचे निवृत्त संचालक प्रा. अजित केंभावी, आयआयटी मुंबईचे प्रा. वरुण भालेराव, इस्रोचे असोसिएट संचालक डॉ. के. कुमार आणि फ्रान्सच्या लुई पाश्चर लॅबोरेटरीचे शास्त्रज्ञ डॉ. चेतन चिटणीस भाग घेत आहेत. डॉ. चिटणीस यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आयोजित ही परिषद म्हणजे केवळ एका वैज्ञानिकाचा गौरव नसून भारताच्या अंतराळ क्षेत्राच्या वैचारिक प्रवासाची उजळणी आहे.

माजी समूह संचालक, स्पेस ॲप्लिकेशन सेंटर, अहमदाबाद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

srnaik39@gmail.com