– प्रा. डॉ. भगवान वाघमारे

भारतीय परिवर्तन वादाला, क्रांती -प्रतिक्रांतीचा वैचारिक इतिहास आहे. बळीराजाच्या मूल्यवर्धित नि अधिकार संपन्न समाज व्यवस्थेपासून ते मनुस्मृतीची पेरणी, रुजवणी, आणि उगवणीपर्यंतचा इतिहास हा प्रतिक्रांतीचा इतिहास आहे. ती बहुजनांच्या जय-पराजयाची लढाई आहे. बळीराजाच्या परिवर्तनवादी क्रांतीवर वैदिकांनी प्रतिक्रांती केली तर वैदिकांच्या प्रतिक्रांतीवर बुद्धांच्या परिवर्तनवादी तत्त्वज्ञानाने क्रांती केली. बहुजन हिताय-बहुजन सुखाय ही बुद्धाची परिवर्तनवादी क्रांती, बदलत्या सामाजिक स्थित्यंतरामध्ये आपण नीट पेलू शकलो नाही. परिणामी मनुस्मृतीने प्रतिक्रांती केली. आजही मनूस्मृतीची मुळे सामाजिक संस्कृतीत खोलवर रुजलेली दिसतात. तर काही मुळे उघडपणे आणि काही अतिसूक्ष्मपणे आजही भारतीय समाजाला पोखरुन टाकत आहेत हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही.

Cyber ​​thieves rob senior citizen who advertised for remarriage Pune news
Pune Cyber Crime: पुनर्विवाहासाठी जाहिरात देणाऱ्या ज्येष्ठाला सायबर चोरट्यांचा गंडा
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
State Government approved one time transfer for Community Health Officers under National Health Mission
आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार
kalyan session and district court verdict on mandir masjid issue at durgadi fort
कल्याणमधील दुर्गाडी किल्ला शासनाच्या मालकीचा; न्यायालयाने मुस्लिम संघटनेचा दावा फेटाळला
nagpur 6 662 tuberculosis cases were found but municipal corporation reduced death rate
बाप रे…नागपुरात क्षयरूग्णांची संख्या साडेसहा हजारांवर…मोदी यांनी दिलेली क्षयरोगमुक्तीची हाक…
Rise and Spread of Naxalite Movement in telangana
विश्लेषण : तेलंगणात नक्षलवादी पुन्हा सक्रिय का झाले?
amendment of the constitution of india right of constitution amendment
संविधानभान : काळाबरोबर ‘चालणारे’ संविधान
only 600 objections and suggestions filed on thane development plan
ठाण्याचा विकास आराखडा निवडणुकांमुळे पडद्याआड? दोन महिन्यांत जेमतेम ६०० हरकती

या पारंपारिक सनातन प्रवृत्तीचा विचार करता, क्रांतीपिता महात्मा फुलेंनी भारतीय समाजाला समग्र क्रांतीची परिभाषा प्रदान करणारी, भारतीय समाजाला व्यापक परिवर्तनाची दिशा देणारी क्रांती २४ सप्टेंबर १८७३ साली, सत्यशोधक समाजाची स्थापना करून केली. “सत्यशोधक समाज” ही पारंपारिक देव-धर्म व्यवस्थेला धक्का देणारी देशातील पहिली सामाजिक संस्था होय. ती समाज जीवनाच्या चिंतनावर काथ्याकूट करणारी संस्था नव्हती, शूद्र -अति शुद्राच्या प्रश्नांवर फक्त चिंता व्यक्त करणारीही नव्हती, तर परिवर्तनाच्या मैदानात उतरून बहुजनांच्या चिंतेवर प्रत्यक्ष कृती करणारी संस्था होती. त्यापूर्वी महात्मा फुले यांनी १८५३ साली “सत्त्याचा शोध” आणि १८५४ मध्ये “मनुस्मृतीचा धिक्कार” या पुस्तिकांच्या माध्यमातून देशात प्रथमतः सत्यशोधकी विचारसरणी मांडली.

हेही वाचा – विवेकवादासमोरील आव्हान

महात्मा फुले यांचा सत्यशोधक समाज समजून घेताना लक्षात येते की धार्मिकतेचा उन्माद असणारी मनुस्मृती हा वैदिकांचा धर्मग्रंथ होय. १८५४ च्या कालखंडात मनुस्मृतीच्या विरोधात बोलण्या, लिहिण्यासाठी लागणारे धाडस हे शूरांचे, वीरांचे नि क्रांतिकारकांचेच होते. म्हणून त्या तत्कालीन सामाजिक परिस्थितीतील वैचारिक संघर्षाबरोबरच सामाजिक संघर्षही अभ्यासणे आवश्यक वाटते. कुठल्याही समाजहितार्थ आणि समाज परिवर्तनसाठी निर्माण झालेल्या सामाजिक संस्थेचे ध्येय हे शोषणमुक्त समाज, भयमुक्त समाज, अधिकारसंपन्न समाज आणि मूल्यांचे चिंतन नि जतन करणाऱ्या समाजाच्या निर्माणीची ती नांदी असते. या अन्वयार्थाने समजून घेणे गरजेचे आहे.

सत्यशोधक समाजाच्या निर्मितीचे मूळ आणि कूळ हे पारंपारिक भारतीय समाज व्यवस्थेच्या विचार – व्यवहारात सापडते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. भारतीय समाज कालही देव-धर्म -पंथ, दैव, जात-वर्गीय आणि कर्मकांडाचा गुलाम होता आणि आजही आहे. म्हणूनच, “सीपॉयाज रिव्होल्ट”चे लेखक हेन्री मिड यांच्या ग्रंथाच्या मराठी प्रस्तावनेत महात्मा फुले म्हणतात… या ग्रंथाचा मुख्य उद्देश असा आहे की, ब्राह्मण लोकांचे राज्य झाल्यापासून आज शेकडो वर्ष शुद्रादि-अतिशूद्र सतत दुःखे सोसत आहेत व नाना प्रकारच्या यातनेत आणि संकटात दिवस काढीत आहेत. तर या गोष्टी कडेस त्या सर्वांचे लक्ष लागून त्यांनी तीजविशी नीट विचार करणे यातून पुढे भट – ब्राह्मण लोकांचे अन्याय – जुलमापासून आपली सुटका कशी करून घेणे, हाच काय तो आहे.

या चिंतनाचा स्पष्ट अर्थ असा होतो, गेल्या हजारो वर्षांपासून भट – ब्राह्मणांचे वर्चस्व येथील शूद्र-अतिशूद्र आणि स्त्रिया या मानवी समूहावर देवाच्या अर्थात ईश्वराच्या नावाने निर्माण केलेला धर्म या थोतांडातून होते. म्हणून महात्मा फुलेंनी मनुस्मृतीचा धिक्कार करून त्यापासून सुटका करून घेणे हे कर्मप्राप्त मानले. भट – ब्राह्मणांचे देव – धर्म हे बहुजन मानवी समूहांचे हक्क – अधिकार आणि त्यांचे माणूसपण हिरावून घेऊन त्यांना कायमचे गुलाम बनवितात. ही ब्राह्मणी वृत्ती-प्रवृत्ती “ब्राह्मणाचे कसब” या खंडकाव्याच्या माध्यमातून क्रांतीपिता महात्मा फुलेंनी उघड केली आहे. ते म्हणतात सर्व भट – ब्राह्मण हे लोभी, भोगवादी, दुराचारी, मद्य, मांस, मैथुननादी पंचकर्माचा भोग घेणारे आहेत.

भट-ब्राह्मणासंबंधी महात्मा फुले लिहितात,

भूदेव होऊनि पाया पडवीती || पायथी पडती रांडांच्या हो ||
शुद्राला भोजन दुरून वाढती || मद्यपान घेती शक्तीमिषे ||
पाय धुवूनी शूद्रा तीर्थ देती || मुखरस पिती यवनीचा ||

भट-ब्राह्मणांचे वर्तन महात्मा फुलेंनी उघड केले असतानाही, भट- ब्राह्मणांच्या वर्तनामध्ये काडीचाही बदल झाला नाही, उलटपक्षी वैदिक धर्माचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी शूद्र -अतिशूद्र नि बहुजन समाजावर कायमची गुलामी लादली. कायमचे मुके, आंधळे, पांगळे बनविले नि अमानवी वागणूक दिली आणि अन्याय केला. या अन्यायाचे उच्चाटन करणे आणि सत्याची कास धरणारा मानवी समूह निर्माण करणे, हेच सत्यशोधक समाज निर्मितीचे मूळ आहे. सत्यशोधक समाज म्हणजे सत्याचा शोध घेणारा समाज होय.

पुणे सत्यशोधक समाजाचा दोन वर्षांचा अहवाल पाहता सत्यशोधक समाज निर्मितीचे मूळ कारण स्पष्टपणे जाणवते ते असे…

ब्राह्मणभट्ट, जोशी, उपाध्ये इत्यादिक लोकांच्या दहशतवादापासून शूद्र लोकांस मुक्त करण्याकरिता व आपल्या मतलबी ग्रंथांच्या आधारे आज हजारो वर्षे ते शूद्र लोकांस नीच मानून गफलतीने लुटीत आले आहेत, या वास्तव सदुपदेश व विद्याद्वारे त्यास त्यांचे वास्तविक अधिकार समजून देण्याकरिता म्हणजे धर्म व व्यवहारासंबंधी ब्राह्मणांचे बनावट व कार्यसाधक ग्रंथापासून त्यास मुक्त करण्याकरिता काही सूज्ञ शूद्र मंडळींनी हा समाज तारीख २४ माहे सप्टेंबर सन १८७३ इसवी रोजी स्थापन केला.

या चिंतनावरून जाणवते, की भट -ब्राह्मणाच्या धार्मिक क्लुप्त्या जगजाहीर व्हाव्यात आणि त्यांच्या मतलबापासून सर्व सामान्य, शूद्र- अतिशूद्र समाजाला मुक्त करणे, खरे- खोट्याची ओळख करून देणे, भट- ब्राह्मणांचे रूप उघडे करून, त्यांनी निर्माण केलेल्या देव-धर्मग्रंथाचे आणि त्यांच्या वर्तनाचे वस्त्रहरण करणे हा सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा मूळ उद्देश आहे. त्याही शिवाय शूद्र-अतिशूद्र अर्थात बहुजन खरे तर, पूर्व पार चालत आलेल्या ‘दलित’ या शब्दाची महात्मा फुलेंनी फोड केली. शूद्र – अतिशूद्र म्हणजे दलित असे जाहीरपणे मांडून दलित शब्दाची कोंडी फोडली. शूद्र म्हणजे ज्यांना वैदिक मंत्रोच्चाराचा अधिकार नाही ते क्षत्रिय, शेतकरी- कामगारवर्ग आणि इतर बहुजन तर अतिशूद्र अर्थात अस्पृश्य आणि स्त्रिया म्हणजे सर्वच अर्थाने बहिष्कृत, अधिकार शून्य, पशूपेक्षाही हीन. अशा बहुसंख्याक शूद्र-अतिशुद्रांना सत्य वर्तन, खरे-खोटे ओळखणे, बनावट देवधर्म, त्यांचे धर्मग्रंथ आणि भट -ब्राह्मणांच्या फसवेगिरीला आणि लबाडीला बळी न पडता सत्य-असत्याची पारख निर्माण व्हावी, हा हेतू होता. जे जे वास्तव, वस्तुनिष्ठ आणि विज्ञानवादी आहे ते ते बहुजन समाजाने स्वीकारावे, देव-धर्माच्या अधिपत्याखाली भरडल्या जाणाऱ्या शूद्र-अतिशूद्र समाजाला माणूस म्हणून स्वत्वाची ओळख करून देणे हा हेतू होता. भट – ब्राह्मणापासून मुक्ती देणे, ईश्वराने निर्माण केलेले पाखंडी धर्म आणि त्यांचे ईश्वर यांच्यापासून बहुजन समाजाला सावध करून, ते ग्रंथ नि त्यांच्या कर्मकांडापासून मुक्त करणे अर्थात मानव मुक्तीच्या आणि मूल्यांच्या निर्माणीसाठी स्थापन झालेला क्रांतीगामी विचाराचा सत्यशोधक समाज होय. हाही मूळ गाभा सत्यशोधक समाजाच्या निर्मितीचा मूलाधार आहे.

सत्यशोधक समाजाचा तिसरा मुलाधार म्हणजे हा समाज जात, धर्म, पंथ, वर्ग, वंश, भाषा, लिंग आणि प्रदेश या कुठल्याच सीमारेषेच्या आवर्तात अडकलेला नाही. ती सर्व आवर्त फोडून सत्य शोधणारा, सत्याचा शोध घेणारा सर्वसमावेशक समाज निर्माण व्हावा याच ध्येयापोटी सत्यशोधक समाज उदयास आलेला आहे. सत्यशोधक समाजाचा सदस्य सत्तेवर्तनी आणि सत्यशोधकीच असला पाहिजे. जसे की,

१. सत्यशोधक समाजाचा सदस्य विवेकी, वैज्ञानिक नि खऱ्या – खोट्याची समज असणारा असला पाहिजे.

२ भट-ब्राह्मणांच्या लबाडी आणि बतावणीला बळी न पडणारा मुक्त समाज निर्माण झाला पाहिजे.

३ भट- ब्राह्मणांच्या ब्राह्मणी धर्माला नाकारणारा, थोतांडी देवांना लाथाडणारा, त्याच्या कर्मकांडाला खोडणारा समाज असावा.

४ देवधर्म आणि कर्मकांड नि त्यांच्या पुरोहितशहीच्या नावाखाली लुबाडणाऱ्या दलालाला कायमची सोडचिट्टी देणारा समाज असावा.

५ त्याहीशिवाय, सत्यवचनी, सत्यवर्तनी, सत्यशोधकी, सत्य-असत्याला दडवणारा नसावा. तो फक्त आणि फक्त सत्यशोधकी असावा. त्याच उद्देश प्राप्तीसाठी सत्यशोधक समाजाचे कृष्णराव भालेकर, रावजी शिरोळे भांबुर्डेकर यांनी पुणे जिल्ह्यात सत्यशोधक समाजाची स्थापना करून सत्यशोधक समाजाचा उपदेश मानवी मूल्याच्या प्रतिष्ठापनेसाठी कसा उपयोगी आणि महत्त्वाचा आहे, हे माणसांच्या मना-मनामध्ये पेरले आणि अनेकांना सदस्य करून घेतले. त्याचबरोबर मुंबई शहरात, राजश्री रमय्या व्यंकय्या अय्यावारू, नरसिंगराव सायबु वडताळा, जया यल्लपा लिंगू आणि यंकू बाळोजी कालेवार आदी मंडळींनी आणि राजश्री गोविंदराव बापूजी भिलारे, जिल्हा सातारा यांनी गाव नि सभोतील गावाच्या लोकांना सत्यशोधक समाजाचे उद्देश आणि ध्येय पटवून देऊन सभासद करून घेतले .

सत्यशोधक समाजाचे कार्य –

१ शूद्र – अतिशूद्राच्या लग्नकार्यात सर्वसामान्य गरीब शुद्रांवर जोर जुलूम करून, भुलथापा देऊन द्रव्य लुटणाऱ्या भट-ब्राह्मणाला न बोलविता लग्न लावणे. लग्नातील ज्या अनिष्ट प्रथा आहेत, त्या बंद करण्याचे उपदेश करून अडाणी, सर्वसामान्य समाजात प्रबोधन आणि परिवर्तन घडविणे.

२ सत्यशोधक समाजाच्या मूळ उद्देशासाठी काम करणाऱ्या सत्यशोधकी कार्यकर्त्यांना प्रेरणा आणि संरक्षण देणे.
३ समाजात सत्यशोधक समाजाची सत्यशोधकी कार्य सिद्धीस जाण्यासाठी सर्वतोपरी मदत करणे, विविध कार्यात भट- ब्राह्मणांच्या पिळवणुकी संबंधात जनजागृती करणे. भट – ब्राह्मणांच्या फितवणुकीतून सत्यशोधकी कार्यास विरोध करणाऱ्यांचाही बंदोबस्त करणे.

४ ज्या सत्यशोधकी समाजाच्या कार्यकर्त्यांना भट – ब्राह्मणांच्या त्रासात नोकरी करावी लागते अशांना मदत करणे.

५ समाजात पुनर्विवाह घडवून आणणे. समाजाची सत्याच्या अधिष्ठानावर पुणर्बांधणी करणे.

७ कुमार्गी समाज बांधवास सुमार्गास लावणे.

८ शिकणाऱ्या शूद्र -अतिशूद्र मुला-मुलीस शिक्षणासाठी प्रेरणा देणे. मदत करणे, शिक्षणाचे महत्त्व शिक्षणशून्य समाजात पेरणे.

९ शिक्षणाचा लाभ सर्व समाज बांधवांना समान मिळावा म्हणून समाजातील सर्व सामान्य-उपेक्षित-गरीब विद्यार्थ्यास शिक्षणासाठी लागणारी फी भरण्यासाठी सत्यशोधक समाजाने प्रत्येक महिन्याला पाच रुपये खर्च करावे, असा सत्यशोधक समाजाच्या वतीने ठराव केला जातो.

१० अति-गरीब विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकासाठी प्रत्येक महिन्याला एक रुपया सत्यशोधक समाजाच्या फंडातून त्या गरीब विद्यार्थ्यास देणे आणि प्रत्येक महिन्याला त्या विद्यार्थ्याच्या वर्तणुकीसह अभ्यासाचा दाखला आणला पाहिजे. असे समाज उपयोगी आणि मुलगामी ठराव सत्यशोधक समाजाच्या वतीने घेतले जात होते.

११ एकोणिसाव्या शतकाच्या आठव्या दशकातील कालखंडात ज्या लोकांना दिवसा शिक्षण घेण्याची सवड नाही, अशा समाज बांधवांसाठी रात्रीची शाळा निर्माण करण्याचा ठराव सत्यशोधक समाजाच्या वतीने घेण्यात आला आणि ती सर्वस्व जबाबदारी रा. कृष्णराव यांच्याकडे देण्यात आली.

१२ ग्रामीण भागातील अर्थात खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी निवासी शाळा निर्माण करून, शिक्षण हीच सर्व सत्ता केंद्राची केंद्र असल्यामुळे सर्वव्यापी शोषणमुक्त समाज निर्मितीचे नि मानवी जाणीवांच्या सर्वभौमत्वाचे चिरंतन चिंतन केले.

१३ समाजातील धर्मभोळेपणा, अंधश्रद्धा, कर्मठपणा आणि अनिष्टप्रथाचे उच्चाटन करणे. अशा मूलगामी समाज परिवर्तनाचे कार्य १८७३ ते १९५० पर्यंत सत्यशोधक समाजाच्या वतीने कार्य कुशलतेने केले जात होते. हे सर्व समाज नवनिर्मितीचे कार्य प्राथमिक वाटत असले तरीही, त्या कालखंडात जो समाज गेल्या हजारो वर्षांपासून देव – धर्म आणि धर्म – मार्तंड नि कर्मकांडाच्या साखळदंडात कायमचा गुलाम म्हणून जगत होता, त्याच्यासाठी ते होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत मूल्यधिष्टीत समाज निर्मितीचे पायाभूत कार्य सत्यशोधक समाजाने केले. ते सोपे नव्हते. परंपरावाद्यांचा त्याला प्रचंड विरोध होता. त्या विरोधाला न जुमानता सतत क्रियाशीलत्त्वाने कार्यरत राहणे म्हणजे सत्यवर्तनी नि सत्यवादी नवा देश, नवी संस्कृती, नव समाज आणि नव्या माणसांच्या निर्मितीची करणे होते.

महात्मा फुले यांच्यानंतर सत्यशोधक समाजाची धुरा क्रांतीज्योती सावित्रीमाईंनी सांभाळली. त्यांच्यानंतर महाराष्ट्रातील नि देशातील अनेक सत्यशोधकांनी, या समाजाची पताका आपल्या खांद्यावर घेतली. सत्यशोधक समाज निर्मितीच्या चळवळीच्या जडणघडणीतून अनेक सत्यशोधक लेखक – विचारवंत निर्माण झाले. परंतु बदलत्या परिस्थितीच्या रेट्यात या चळवळीकडे दुर्लक्ष होत गेले आणि दुर्दैवाने सत्यशोधक समाजाचे काँग्रेस या राजकीय पक्षात विलीनिकरण झाले, हेही स्मरणात ठेवणे महत्त्वाचे आहे.

सत्यशोधक समाजाची १४ वी परिषद ८ व ९ मार्च १९३० रोजी, मुंबई येथे दामोदर ठाकूरसी हॉलमध्ये मुकुंदराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भरली. तर १५ वी परिषद ९ आणि १० नोव्हेंबर १९४० मध्ये मुंबई येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या रामचंद्र भट्ट हायस्कूलमध्ये भरली. या परिषदेचे स्वागताध्यक्ष जेष्ठ सत्यशोधक भास्करराव जाधव हे होते तर अध्यक्ष केशवराव विचारे होते. केशवराव विचारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सत्यशोधकांचे चिंतन मांडले. ते म्हणाले, धर्म आणि जातीभेदाने पोखरलेल्या या देशात बहुजन समाजाची चळवळ बहुजन समाजाने चालविण्याचे फार मोठे आव्हान या समाजाने सामर्थ्याने पेलले. कर्मकांड, अंधश्रद्धा, मूर्ती पूजेला विरोध केला. तरीही परिवर्तन का घडले नाही? कारण काही लोकांनी देव हेच एकमेव साधन ठरवून, अनंत काळापासून जातीय मालकी टिकवून उपभोगण्याकरिता किंवा पोट भरण्याकरिता ते उपयोगात आणले. ग्रामीण भागातील गरीब – भोळ्या भाबड्या अडाणी माणसांना अस्तित्वातच नसलेल्या देव-धर्माची भीती आणि धाक दाखवून नव्हे तर अनेक षड्यंत्र रचून धर्माचे कर्मकांड वाढविण्यासाठी त्यांचाच उपयोग करून घेतला. परिणामी मुलगामी परिवर्तन घडू शकले नाही.

सत्यशोधक समाजाने वर्णजातीस्त्रीदास्य व्यवस्थेला कडाडून विरोध केला. पृथ्वीतलावर निर्माण झालेले स्त्री – पुरुष हे समान आहेत. त्यांना त्यांचे निसर्गनिर्मित हक्क – अधिकार निसर्गदत्त प्रदान झालेले आहेत. जात, वर्ण, जन्म, कर्म, प्रतिष्ठा नि धनसंचेयातून जाती, वर्ण, श्रेष्ठ- कनिष्ठ ठरत नसतात. जन्मतः माणूस हा माणूसच असतो. हा नैसर्गिक विचारवाद सत्यशोधक समाजाने स्वीकारलेला आहे. सत्यशोधक समाजाने धर्म-देव-पंथ निर्मात्याचे, त्यांच्या मानसिकतेची सर्वश्रुत चिकित्सा केली. हे समजून- उमजून घेण्यासाठी म्हणून शिक्षण हेच जाणिवांचे हत्यार आहे, हे अचूक अस्त्र स्वीकारून सत्यशोधक समाजाच्या सदस्यांनी शूद्र -अतिशुद्रांना शिक्षणाच्या प्रेरणा दिल्या. बहुजन समाजाला शिक्षणासाठी उद्युक्त केले. शिक्षणासाठी साधनांची निर्मिती करून शूद्र – अतिशूद्रांना कृतीयुक्त शैक्षणिक प्रवाहात मार्गक्रमित केले. बहुजन समाजाला देव-धर्म -पंडितांच्या जोखडातून मुक्त करून सत्यशोधनाच्या आणि सत्यावर्तनाच्या प्रवाहात निर्गमित करणे हे सत्यशोधक समाजाचे कार्य म्हणजे शोषणमुक्त आणि एकजिनसी समाजव्यवस्था निर्माण करण्याची देशातील पहिली कृती आहे.

हेही वाचा – ‘भेदाभेद अमंगळ’ हेचि तो अर्थ ‘सनातन’!

शोषणमुक्त आणि एकजिनसी समाज व्यवस्थेच्या निर्मितीचे स्वप्न घेऊन चालताना, वाढताना नि लढताना आणि गरज पडेल तेथे विद्रोह करावाच लागतो. विद्रोह हे त्या त्या चळवळीचे अस्त्र आणि शास्त्रही असते. या अन्वयार्थाने माणूसकेंद्री बदलाची चळवळ सत्यशोधक समाजाच्या सर्वव्यापी कृतीची क्रांती आहे. जी व्यक्ती नि जो समाज विश्वबंधुत्वाची नाती स्वीकारतो आणि चिरंतन सत्याचा शोध घेतो ती व्यक्ती आणि तो समाज सत्यशोधकी आहे.
म्हणूनच, महात्मा फुले म्हणतात की,

ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणासी ||

धरावे पोटाशी || बंधुपरी ||

ही विश्वबंधुताची संकल्पना सत्यशोधक समाजाच्या ध्येयप्राप्तीची सम्यक प्रज्ञा आहे.

सत्य की जय हो!

संदर्भ –

१. महात्मा फुले समग्र वाङ्ममय – य. दि. फडके, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, २३ जानेवारी १९९१
(पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट, पेज – १९५ आणि सत्यशोधक समाजाची तिसऱ्या वार्षिक समारंभाची हकीगत पेज – २०७)

२. सत्यशोधकी साहित्याचा इतिहास खंड पहिला आणि खंड दुसरा – लेखक प्रा. डॉ. श्रीराम गुंदेकर.

लेखक महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा येथे वनस्पतीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख आणि सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्ते आहेत.

Story img Loader