सलील जोशी
भारतात एकपात्री किंवा स्टॅण्डअप कॉमेडी हा प्रकार प्रचारात येऊन आता दशकभर तरी झाले असेल. परंतु इंटरनेटवरील विनोदी स्टॅण्डअप म्हणून जे कार्यक्रम बघायला मिळतात ते आठवडी किंवा दररोज केले जात नाहीत. त्यांची पोहोचसुद्धा एका विशिष्ट वर्गापर्यंत किंवा वयोगटापर्यंत असावी. तसेच हे कार्यक्रम बहुतांशी सत्ताधारी नेत्यांवर किंवा अतिशय प्रख्यात व्यक्तींवर ‘गमतीत’ टीका करणारे असल्याने कदाचित त्याला फारसा भाव मिळत नसावा. अशा कार्यक्रमातून वापरलेली भाषा ही असभ्यतेकडे झुकणारी अशी असल्याने त्याला तरुण वर्गाशिवाय प्रेक्षक मिळत नसावा. किंबहुना थोडी असभ्य भाषा वापरली नाही तर विनोदच करता येत नाहीत असाही समज या विनोदकारांचा झाला असावा. कारण काहीही असो पण हा विनोदाचा प्रकार, त्यातून होणारे विडंबन व बातमीचे वा माहितीचे सत्य-दर्शन किंवा एकंदरीत ‘टवाळकी’ला कुठल्याही लोकशाहीत भरपूर वाव आहे.
अमेरिकी दूरचित्रवाणी तसेच केबल वाहिन्यांना अशा कित्येक ‘टवाळांनी’ समृद्ध केले आहे. या वाहिन्यांवर ‘लेट नाइट शोज’ची परंपरा जुनी आहे. प्रख्यात नेते, अभिनेते, खेळाडू किंवा व्यावसायिकांची मुलाखत; पण त्याआधी अशा कार्यक्रमाच्या सूत्रधारांनी खुमासदार शैलीत राजकीय वा सामाजिक सद्या:स्थितीवर केलेली व्यंगात्मक टिप्पणी, असे या कार्यक्रमांचे स्वरूप. अशा कार्यक्रमांचे जनक म्हणून जॉनी कार्सन (१९२५-२००५) यांना ओळखले जाते. मुलाखत घेण्याची कार्सन यांची शैली, नर्मविनोदी स्वभाव, लाघवी हास्य तसेच त्यांचे स्त्रीदाक्षिण्य ही त्यांची वैशिष्ट्ये असल्याची साक्ष देणाऱ्या अनेक मुलाखती यू-ट्यूबवर आजही बघावयास मिळतात. त्यांच्या ‘शो’साठी निमंत्रण मिळणे हाही सन्मानाचा भाग असे. ‘एनबीसी’ वाहिनीवरील या कार्यक्रमाची धुरा त्यांच्यानंतर ज्ये लेनो यांनी सांभाळली. तोवर अमेरिकी भांडवलशाहीच्या नियमाला अनुसरून इतरही वाहिन्यांनी आपापले ‘लेट नाइट शो’ सुरू केले होते, त्यांतून ‘सीबीएस’ वाहिनीवरील डेव्हिड लेटरमन यांचा प्रभाव टिकला.
ही सारीच मंडळी मुरब्बी विनोदकार. त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीची ५-१० मिनिटे ते काय बोलतात याकडे साऱ्यांकडे लक्ष असे. तरीसुद्धा अगदी हल्लीपर्यंत चार घटका करमणूक तसेच मूळ मुलाखत सुरू होण्याआधीची एक धमाल यांव्यतिरिक्त त्याचा फारसा अर्थ कोणी घेत नव्हते. यात एखाद्या नेत्याची, अभिनेत्याची वा घटनेची फिरकी घेतली गेली तरी, ही मंडळी राजकीय विचारसरणीने प्रेरित कधीच वाटली नाहीत. राजकीय बाजू घेतली म्हणजे ते चार लोकांना आवडणार तर दहांना नाही- म्हणजे त्यात प्रेक्षकांना दुखावणे आलेच जे चॅनेल्सना परवडण्यासारखे नसायचे, हेही कारण यामागे असावे.
पण नव्वदीच्या दशकात अमेरिकी पत्रकारितेला केबल न्यूज नावाच्या रोगाची लागण होऊ लागली. याची सुरुवात चॅनेल्सनी एका विशिष्ट विचारधारेच्या बातम्या देण्यापासून; तर परिणती त्या विचारधारेच्या जवळील राजकीय पक्षाशी संलग्नच असण्यात होऊ लागली. बातमी काय आहे यापेक्षा ती कशाची तयार व प्रदर्शित करायची याची चढाओढ सुरू झाली. याच सुमारास ‘कॉमेडी सेंट्रल’ या २४ तास विनोदाला वाहिलेल्या वाहिनीवरील ‘द डेली शो’चे सूत्रसंचालन तेव्हा फार प्रसिद्ध नसलेले जॉन स्टेव्हर्ट करू लागले. ही वाहिनी व हा कार्यक्रम याआधी उथळ पाण्याच्या खळखळाटाप्रमाणेच होता; पण जॉन स्टेव्हर्ट या अवलियाने काही वर्षांतच या कार्यक्रमाची रूपरेषा बदलण्यास सुरुवात केली. महत्त्वाचा बदल म्हणजे जॉन स्टेव्हर्ट यांचे खुमासदार राजकीय भाष्य. मग मात्र कार्यक्रमाने काही वर्षांत चांगलाच जोर धरला. बिल क्लिंटन यांच्या विरुद्धचा महाभियोग तसेच सन २००० मधील बुश वि. गोर यांची गाजलेली निवडणूक अशा अनेक घटना जॉन स्टेव्हर्टने आपल्या कार्यक्रमात बातमीसदृश दाखवून, त्यावर भाष्य करायला सुरुवात केली. हे करत असताना त्याने कधीच एका पक्षाची किंवा एका विचारसरणीची बाजू घेतली नाही. अर्थात त्याची लिबरल विचारशैली ही काही लपून राहण्यासारखी गोष्ट नव्हती.
मग हळूहळू इतर वाहिन्यांवरही, विनोदाची पेरणी केलेल्या अशाच बातम्यांचे कार्यक्रम लोकांना आवडू लागले. त्यात सन २००० पासूनची जॉर्ज बुश यांची कारकीर्द तर अशा अनेक कार्यक्रमांसाठी पर्वणीच ठरली. रोज रात्री समोर असलेल्या प्रेक्षकांपुढे येऊन सरकार वा सरकारी धोरणांवर घणाघाणी टीका करायची, तीही विनोदातून- हे खायचे काम नव्हे. दररोजच्या घडामोडींवर सातत्याने मजेशीर टीका करत त्या घटनेची उकल करायची- तेही कुणाच्या भावना ‘फार न दुखावता’ – अशी ही कसरत होती. हा जमाना इंटरनेटपूर्वीचा. अमेरिकेतील दूरचित्रवाणीवर अगदी तोपर्यंत काही निष्पक्षतेचे मापदंड (फेअरनेस डॉक्ट्रीन्स) पाळले जात. त्यानुसार जॉन स्टेव्हर्ट आपल्या कार्यक्रमात दोन्ही बाजूंची चांगली खरडपट्टी काढत. पाश्चिमात्य संस्कृतीत शिव्यांचे सोवळे आधीच कमी. त्यामुळे एखाद्या विनोदाच्या समेवर यायला एखादी हासडावीच लागली तरी चालत असे. अर्थात याचा कधी अतिरेक होत नव्हता.
‘सप्टेंबर ११’च्या अतिरेकी हल्ल्यानंतर झालेले कार्यक्रम अजरामर असेच म्हणावे लागतील. कोणी तरी म्हटले आहे की, शोकांतिकेत थोडा काळ मुरला की विनोद निर्मिती होऊ शकते. सप्टेंबर ११ नंतरच्या शोजना दु:खाची एक किनार होती, पण स्टेव्हर्ट आणि अन्य अनेकांनी साश्रू नयनांनी सादर केलेले स्वगत व तशात केलेली हळुवार विनोद निर्मिती हे कार्यक्रमांची उंची तर वाढवून गेलेच, पण या कार्यक्रमांना एक प्रकारची मान्यताही देऊन गेले.
खऱ्या व्यावसायिक कलाकाराचे यश हे त्याच्या प्रसिद्धी किंवा कमाईपेक्षा, त्याने आपल्यासारखे किती कलाकार तयार केले यावरून मोजावयास हवे. कार्सन, लेनो, लेटरमन वा स्टेव्हर्ट ही मंडळी आता पडद्याआड गेली आहेत. (कार्सन तर काळाच्यासुद्धा). पण त्यांचे कार्यक्रम त्यांच्यानंतरही अगदी जोमात सुरू आहेत. अर्थात याचे श्रेय फक्त व्यक्तिगत नसून त्यामागल्या लेखकांचेही आहे. पण स्टेव्हर्टच्या कार्यक्रमात सहकलाकार असलेले स्टीफन कोलबेर्ट, हसन मिन्हाज, जॉन ऑलिव्हर, ट्रेव्हर नोआ ही ‘टवाळांची’ टोळी आता आपापल्या शोंमधून मनोरंजनातून बातम्या देत असते, धुमाकूळ घालत असते. आज इंटरनेटमार्फत ही मंडळी जगभर प्रसिद्ध झाली आहे. एवढेच नव्हे तर अमेरिकेतील गेल्या दशकांतील राजकीय परिवर्तन हे जॉन स्टेव्हर्ट यांना पुन्हा तोच कार्यक्रम सुरू करायला भाग पाडते, विनोदवीर म्हणजे नुसता थिल्लर या समजाला फाटा देत स्टेव्हर्ट एक संघटना स्थापन करतात आणि सप्टेंबर ११ मधील हल्ल्यानंतर त्या जागेची सफाई करणाऱ्या लोकांच्या हक्कासाठी थेट अमेरिकी काँग्रेसपुढे जातात, हे कौतुकास्पदच होते.
नव्या पिढीतील कॉनन ओब्रायन, जिमी किमेल, जिमी फलॉन आणि ‘सॅटरडे नाइट लाइव्ह’ या कार्यक्रमातील अनेक मंडळी नित्यनेमाने विनोदी कार्यक्रम करताहेत. अमेरिकी लोकशाहीला सद्या परिस्थितीत असलेल्या चुकीच्या माहितीच्या धोक्यापासून हे विनोदवीर वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. करोना महामारीत ही सगळी मंडळी त्यांचे शोज् स्वत:च्या घरातून, कमीत कमी साधनांत, तरीही गुणवत्तेशी कुठेही तडजोड न करता पार पाडत.
अशा कार्यक्रमांना बातमीचा स्राोत समजायचे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण एखाद्या घटनेचा अर्थ लावायचा तर या कार्यक्रमांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अशा कार्यक्रमांच्या यशामागे समाजाची प्रगल्भ राजकीय विनोदबुद्धी व राजकारण्यांची प्रसंगी वाईट विनोदालासुद्धा हसून दाद देण्याची मानसिकता, यांचेही श्रेय आहेच. एवढ्या-तेवढ्याने भावना दुखावल्या जात नाहीत, राजकीय नेत्यांना देवघरात बसवण्याऐवजी त्यांचे मूल्यमापन करण्याकडे जनतेचा कल असतो, ही परिस्थिती अमेरिकेतही झपाट्याने बदलत चालली आहे. काहींना व्यवस्थेचा त्रास झाला, त्यापैकी काहींनी वाहिन्यांऐवजी ओटीटीवर कार्यक्रम सुरू केला.
महाराष्ट्रात जेव्हा विनोदाने वातावरण तंग होते तेव्हा वॉशिंग्टनमध्ये, जॉन. एफ. केनेडी सेंटरतर्फे देण्यात येणाऱ्या ‘मार्क ट्वेन विनोद- पुरस्कारा’चा सोहळा रंगत होता. याच सेंटरच्या कार्यकारिणीच्या काही सदस्यांना अति-डाव्या विचारसरणीचे म्हणून नुकताच सत्ताधाऱ्यांकडून नारळ दिला गेला असून राष्ट्राध्यक्ष हेच त्या कार्यकारिणीचे अध्यक्ष असणार आहेत. या सावटाखाली झालेल्या यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात प्रत्येक विनोदवीराने अमेरिकेच्या अध्यक्षांवर भरपूर तोंडसुख घेतले. डेव्हिड लेटरमन यांनी या कार्यक्रमाला ‘प्रतिकाराचा आतापर्यंतचा सगळ्यात मनोरंजक मेळावा’ असे म्हटले; कारण कार्यक्रमातील प्रत्येक विनोद सभ्य नसेलही, पण बोचणारा होता. याच सोहळ्यातल्या एका प्रहसनात स्टीफन कोलबेर्ट चिकन-विंग्स खात स्टेजवर आला. कॅमेऱ्याकडे पाहत म्हणाला, ‘मित्रहो, जॉन एफ केनेडी सेंटरच्या नवीन अध्यक्षांना मी सांगू इच्छितो की मी खात असलेल्या सगळ्या विंग्स या ‘राइट विंग्स’ असून त्यातील दोन-तीन अतिशय जहाल आहेत!’
सलील जोशी
बॉस्टनस्थित महाराष्ट्रीय
salilsudhirjoshi@gmail.com