शेती म्हणजे सतत आव्हानांचा मुकाबला. आस्मानी – सुल्तानी संकट नेहमी डोक्यावर उभे. कधी पावसाचे संकट, कधी दराची मारामार. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील सचिन आवटे या जिद्दी तरुण शेतकऱ्याने मिश्र पिकांच्या केलेल्या यशस्वी शेतीची ही कथा.

टोमॅटो आणि कारले या दोन्ही पिकांचे रंग, रूप, गंध, चव, आकार हे भिन्न. पण या दोन्ही प्रकारची पिके एकाच शेतात घेतली. कारल्यासोबत झेंडूची फुलेही पिकवली. चांगली उगवण झाली. परिणामी खासगी कंपनीची नोकरी सोडून शेतीत रमलेल्या उच्चशिक्षित सचिन आवटे या तरुणाने या पिकांच्या माध्यमातून चांगली आर्थिक कमाई केली. विशेष म्हणजे दरानेही चांगला हात दिल्याने टोमॅटोची प्रतिदिन १५ हजारांचे उत्पन्न मिळत गेले. उत्तम कमाई मुळे आता टोमॅटोचे क्षेत्र दुप्पट करण्याचा निर्णय आवटे कुटुंबीयांनी घेतला आहे.

शेती म्हणजे सतत आव्हानाचा मुकाबला. आस्मानी – सुलतानी संकट नेहमी डोक्यावर उभे. कधी पावसाचे संकट, कधी दराची मारामार तर कधी अन्य काही ना काही. पारंपरिक पिकांपेक्षा फळभाज्यांमध्ये चांगला नफा मिळतो, हे ओळखून कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथील सचिन काकासाहेब आवटे या जिद्दी तरुणाने गेल्या ८ वर्षांपासून फळभाजी शेतीकडे लक्ष पुरवले आहे. आधुनिक तंत्रज्ञान वापरत सुरू केलेल्या शेतीतून कारले आणि टोमॅटोचे उत्पादन घेत दिवसाला १५ ते २० हजारचे उत्पन्न घेत आहेत. दर चांगला मिळाल्याने एका पिकातून सहा महिन्याला सरासरी ७ ते ८ लाखांचा भरघोस नफा होत राहिला.

हेही वाचा >>>जमिनीची मशागत की नासधूस?

हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली हे आवटे कुटुंबीयांचे गाव. येथील सचिन काकासो आवटे यांनी एम.ए. पर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांना एमआयडीसीमध्ये एका खासगी कंपनीत नोकरी देखील लागली. दोन वर्ष काम करून देखील तूटपुंजा पगार मिळत होता. यामुळे सचिन यांनी नोकरी सोडून शेती व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. सचिन यांचे वडील काकासाहेब आवटे हे पूर्वीपासून त्यांच्या एक एकर दहा गुंठे शेतीमध्ये पारंपरिक ऊस पिकाचे उत्पन्न घ्यायचे. ऊस शेतीमधून मिळत असलेला नफा कमी असल्याने सचिन आवटे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत अत्याधुनिक शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. वडिलांशी त्यांनी चर्चा केली. त्यांना अत्याधुनिक शेतीचे महत्त्व पटवून दिले. यामुळे वडिलांचीही त्यांना साथ मिळाली आणि २०१५ पासून त्यांनी फळभाज्यांचे उत्पन्न घेण्यास सुरुवात केली. टोमॅटोकडे त्यांनी लक्ष पुरवले.

शेतकरी टोमॅटो लागवड हे नगदी पीक घेण्यास सुरुवात करतात पण लागवडीची योग्य माहिती नसल्याने चुका होत राहतात. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या भागांत खूप मोठय़ा प्रमाणात टोमॅटो लागवड केली जाते. यामधून त्या ठिकाणचे शेतकरी उत्पन्न देखील चांगल्या प्रकारचे कमावतात. टोमॅटो हे पीक एक प्रमुख पीक म्हणून देखील महाराष्ट्रमध्ये ओळखले जाते. टोमॅटो पिकापासून असंख्य प्रकारची उत्पादने बाजारामध्ये विक्री केली जातात. त्यामुळे टोमॅटोचा बाजारभाव देखील शेतकऱ्याला प्रत्येक हंगामात चांगला मिळत असतो. या बाजू टोमॅटो पीक घेण्यास कारणीभूत ठरल्या.

सुरुवातीला आवटे यांना अत्याधुनिक फळभाज्यांची शेती कशी करावी याची कोणतीही माहिती नव्हती. त्यांनी परिसरात फळभाज्यांची शेती करणाऱ्या मित्रांकडून आणि गणेश कृषी सेवा केंद्र, तळंदगे येथील शेती मार्गदर्शक कीर्तिकुमार भोजकर यांच्याकडून फळभाज्यांच्या शेतीची माहिती घेतली. त्यानुसार एक एकरमध्ये फळभाज्यांची लागवड केली. त्याआधी त्यांनी दोडका, मिरची, वांगी या पिकांचे उत्पन्न घेतले होते. यातून त्यांना भरघोस नफा मिळाला. तर ऑगस्ट २०२३ मध्ये त्यांनी वीस गुंठय़ामध्ये टोमॅटो पीक तर उरलेल्या वीस गुंठय़ात प्रगती जातीची कारले पिकाची लागवड केली. पाणी कमी लागावे,  यासाठी त्यांनी ठिबक सिंचन आणि मलचींग पेपर तंत्रज्ञानाचा वापर केला. शिवाय कारले पीक लावण्यास त्यांनी मंडप पद्धतीचा अवलंब केला. यामुळे वेलीला फळ जास्त लागू लागले आणि काढणीही सोपी झाली यामुळे उत्पन्नातही वाढ झाली.

हेही वाचा >>>महाराष्ट्राचे राजकीय अधःपतन चिंताजनक!

सचिन आवटे यांनी टोमॅटो पीक घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा कोणते बियाणे असावे यावर विचार केला. तेव्हा त्यांना सल्ला मिळाला की,  कलश सीडचे साई २५ हे बियाणे चांगले आहे. त्यानुसार त्यांनी त्याची लागवड केली. खतांचे प्रमाण योग्य ठेवले. फवारणी, आळवणी, रोगप्रतिकारक शक्ती आदींकडे बारकाईने नजर ठेवली. त्यामुळे पीकही चांगल्या प्रकारे मिळाले. साई २५ याचे वैशिष्टय़ म्हणजे झाडांना जमिनीपासून अर्धा फुटावर फळ लागते. त्याला इतरांपेक्षा अधिक चमक आहे. साल जाड असते आणि इतरांपेक्षा खूपच चवदार आहे. हा टोमॅटो इतरांपेक्षा अधिक आठ दिवस टिकतो. शेतमाल म्हटले की, तो नाशवंत ही भीती असते, ती यामुळे काही प्रमाणात दूर होण्यास मदत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सचिन यांना रोप, बियाणे, नांगरणी, औषध, लागण यासाठी साधारण ८० हजार रुपये खर्च आला आहे. साधारण ६० ते ७० दिवसांनंतर दोन्ही पीक उत्पन्न देण्यास सुरुवात केली असून, रोज ७०० किलो टोमॅटो आणि ३०० किलो कारली ते एक एकरातून काढतात. त्यांचे दोन्ही भाज्या या कोल्हापूर आणि इचलकरंजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जातात. पीक चांगले आले असले आणि बाजारभाव कोसळला तर सारी मेहनत मातीत जाते. पण याबाबतीत सचिन यांना चांगला अनुभव आला. बाजारात यावेळी दर वधारले होते. येथे साधारण टोमॅटोला ३० ते ३५ रुपये तर कारल्याला २० ते २५ रुपये दर मिळत राहिला. सरासरी दर ६ महिन्याला ७ लाखांचा नफा होत राहिला. त्यांनी सुमारे १६ टनांपर्यंत उत्पन्न काढले. याच काळात अवकाळी पावसाने डोके वर काढले. उभे पीक पाण्यात गेले. अपेक्षेवर पाणी फिरले. मदतीसाठी शासकीय कार्यालयाचे दरवाजे ठोठावले. नियमाच्या जंजाळात अडकलेली यंत्रणा कसलीच मदत करू शकली नाही. पण सचिन यांची उमेद मात्र हरली नाही. शेतीमध्ये नव्याने सुरुवात करणाऱ्या युवकांनी पारंपरिक ऊस शेती सारखे आळशी पीक घेण्याऐवजी योग्य मार्गदर्शन घेऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेती केल्यास अधिक फायदा होऊ शकतो, असे सचिन आवटे सांगतात.