स्पष्टवक्तेपणाबद्दल प्रसिद्ध असलेल्या आचार्य गिरिराज किशोर यांना त्यांच्या आयुष्यात स्वत:साठी काहीच मिळवायचे नव्हते. लहानपणीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात ते दाखल झाले. तेव्हा झालेल्या संस्कारांच्या मुशीतून ते वयाच्या ९४ व्या वर्षांपर्यंत कार्यरत राहिले. केंद्रात संघाच्या विचारांचे सरकार स्थापन व्हावे, ही त्यांचीही जबरदस्त आकांक्षा होती. ती फलद्रूप झाल्याचे त्यांना पाहायला मिळाले. मात्र ज्या मुद्दय़ांवर भारतीय जनता पक्षाला देशात सर्वाधिक खासदार निवडून आणता आले, ते मुद्दे गिरिराज किशोर यांच्या बौद्धिक पटलावर इतक्या वरच्या क्रमांकाने नव्हते. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीच्या वेळी हमखास पुढे आणला जाणारा रामजन्मभूमीचा मुद्दा या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जाणूनबुजून बाजूला ठेवला. देशातील सर्व व्यवस्थांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराने पुरते दमून गेलेले भारतीय मतदार नरेंद्र मोदी यांच्या ‘अच्छे दिन आयेंगे’ या कल्पनेवर विश्वासले आणि त्यामुळेच सत्तासोपान चढणे भाजपला सोपे झाले. संघाने किशोर यांना विश्व हिंदू परिषदेचे काम करण्याचा आदेश दिला आणि तो शिरसावंद्य मानून त्यांनी पुढील वाटचाल केली. मग प्रश्न धर्मातराचा असो, की गोहत्याबंदीचा असो. किशोर यांनी या सगळ्या मुद्दय़ांवर सातत्याने रोखठोक भूमिका घेतली. १९९२ मध्ये बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्याच्या मोहिमेत गिरिराज किशोर यांचा सहभाग असल्याची नोंद लिबरहान चौकशी समितीच्या अंतिम अहवालात करण्यात आली आहे. १९९० पासून भाजपच्या राजकारणाशी जवळचा संबंध आल्यानंतरही त्यांनी प्रत्यक्ष राजकारणात कधीही सक्रिय सहभाग घेतला नाही. विहिंपचे नियोजित कार्य करण्यातच ते मग्न राहिले. त्यानुसार धर्मसंसदा भरवणे, गोवंश हत्याबंदी विधेयक आणि राम मंदिर उभारणीबाबत सरकारकडे पाठपुरावा करणे हे काम ते करीत राहिले. निवडणुकीच्या राजकारणासाठी भाजपने यंदा यातील एकाही मुद्दय़ाचा आधार घेतला नाही, हे एका परीने बरेच झाले, याचे कारण ९२ नंतरच्या बहुतेक निवडणुकांत भाजपने तोच मुद्दा केंद्रस्थानी ठेवला होता आणि त्यामुळे त्या पक्षाला अपेक्षेएवढेही यश मिळाले नव्हते. फक्त किशोरच नव्हे, तर विश्व हिंदूू परिषदही याबाबत आग्रही होते, हे मात्र खरे. परंतु त्यांनी तो विषय कधीच प्रतिष्ठेचा केला नाही. विहिंपनेही त्याबाबत सावध पवित्रा घेतला, यामागे गिरिराज किशोर यांचे प्रयत्न कारणीभूत होते. मदर तेरेसा यांचे अन्त्यविधी सरकारी इतमामाने करण्यास त्यांनी विरोध दर्शवला होता. तेरेसा यांनी धर्मप्रसाराचेच काम केले, त्यात समाजसेवा असलीच, तर ती दुय्यम होती, असे स्पष्ट मत त्यांनी त्या वेळी व्यक्त केले होते. पोप जॉन पॉल यांच्याबद्दल ‘ते जगातील सर्वात मोठे डाकू आहेत,’ असे विधान करून गिरिराज किशोर सार्वजनिक टीकेचे लक्ष्य झाले होते. आपले मत बिनदिक्कतपणे मांडण्याची त्यांची ही शैली विश्व हिंदू परिषदेतील अनेक नेत्यांनी भ्रष्टपणे घेतल्याचे आपण पाहतो आहोत. किंबहुना ठिकठिकाणी बोकाळलेल्या सेना, संघटनांमुळे विहिंपची चांगलीच पीछेहाटही गेल्या दशकभरात झाली आहे. किशोर यांना असे होणे अपेक्षित नसावे. एके काळी भाजपच्या राजकीय भूमिकांच्या केंद्रस्थानी असलेला विहिंप याच काळात मागे पडत गेलेला दिसतो. किशोर यांनी राजकारण आणि समाजकारण यामध्ये सहसा होत असलेली गल्लत स्वत: कधी केली नाही. नि:संग-निरिच्छ राहून काम करण्याची हातोटी फार थोडय़ांकडे असते. राजकारणाला स्वत:च्या अंगभूत सामर्थ्यांने उभे राहता यायला हवे, त्यासाठी अन्य संस्था-संघटनांनी पूरक राहणे अधिक आवश्यक असते. स्वत: किशोर यांनीही याच भूमिकेचा आग्रह धरला. त्यांच्या निधनाने असा एक सेवाव्रती आणि अनुभवी नेता हरपल्याने विहिंपचे समाजकारण आणखीच कालबाह्य़ होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Giriraj kishore a hard core worker of r s s
First published on: 15-07-2014 at 01:03 IST