सत्ता समोर दिसू लागली, की स्वप्नांचे धुमारे आणखीनच फुलू लागतात. आपापल्या त्यागाचे, मोठेपणाचे आणि कर्तृत्वाचे स्वरचित पोवाडे स्वमुखाने गाण्याची स्पर्धाही सुरू होते आणि सभोवतीच्या साऱ्यांनी हे पोवाडे कानात साठवत माना डोलवाव्यात, अशा अपेक्षाही वाढू लागतात. मग राजकारणाचे आणि राजकीय नैतिकतेचे सारे धडे काही काळापुरते मिटल्या पुस्तकासारखे पानबंद होतात आणि आपापले घोडे पुढे दामटण्यासाठी अहमहमिका लागते. गेल्या जवळपास वर्षभरापासून सुरू असलेल्या सत्ताबाजाराचा निर्णायक अंक आता काही तासांवर येऊन ठेपला असताना, अशी दृश्ये अधिकच ठळक होत आहेत. मोदीमय भाजपला आणि भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सत्तास्थापनेची संधी सर्वाधिक असल्याचे स्पष्ट निष्कर्ष निघाल्याने, बुजुर्गापासून नवनेत्यांपर्यंत साऱ्यांच्या नजरा सत्तेच्या खुर्चीकडे लागल्या आहेत. ‘प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि अखेर व्यक्ती’ ही भाजपची आवडती उक्ती असली, तरी येत्या काही दिवसांत याचा विसर पडेल अशा परिस्थितीची चिन्हेही दिसू लागली आहेत. निवडणुकीच्या निकालाआधीच मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या रचनेची खलबतेही सुरू झाल्याने, ‘आधी व्यक्ती, मग पक्ष व अखेर राष्ट्र’ अशा उलटय़ा क्रमाने नाराजीनाटय़ांचे प्रयोग रंगणार अशा शंकेची स्पष्ट चाहूल लागण्यास सुरुवातही झाली आहे. महाराष्ट्रात भाजपच्या निवडणूक रणनीतीचे नेतृत्व केलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी बेरजेच्या राजकारणातून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतपेढय़ांना धडका देत प्रचारनीतीवर आपला वरचष्मा राखला. आता निवडणुकीच्या निकालानंतर केंद्रात स्थापन होणाऱ्या सत्तापदाचा आणि विजयाच्या श्रेयाचा मोठा वाटा आपल्या पदरी यावा अशी गोपीनाथ मुंडे यांची अपेक्षा असली, तरी आपल्या राजकीय कुंडलीतील सत्तास्थानातच गेल्या काही वर्षांपासून गडकरी, तावडे यांच्यासारखे ग्रह पीडाकारक ठरत असल्याच्या भावनेने ग्रासलेल्या मुंडे यांची अस्वस्थता लपून राहिलेली नाही. त्यातून त्यांचे नाराजीनाटय़ अनेकदा उफाळून येत असते. अशा कोणत्याही नाराजीनाटय़ाचे दोन ठळक परिणाम असतात. पहिला म्हणजे, रुसवा सुरू होताच, तो घालविण्यासाठी कोण किती धावपळ करतो हे स्पष्ट होऊन पक्षांतर्गत वजन अजमावणे शक्य होते आणि दुसरा म्हणजे, आपल्याला हवे ते पदरात पाडून घेण्याचे दबावतंत्र किती प्रभावी आहे, हेदेखील स्पष्ट होत असते. नितीन गडकरी हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून मुंडे यांनी या नाटय़ाचे अनेक एकपात्री प्रयोग केले आणि महाराष्ट्रातील आपल्या नेतृत्वस्थानाचा खुंटा हलवून बळकट करून घेतला. आता केंद्रात सत्ता येणार असे दिसू लागताच, ती पीडास्थाने पुन्हा जागृत झाल्याच्या भावनेने मुंडे यांना पुन्हा पछाडले आहे. कार्यकारिणीच्या निमंत्रणात नाव नसल्याने त्यांच्या नाराजीला वाचा फुटली. असे काही केल्याशिवाय आपले राजकीय वजन आणि स्थान बळकट होणार नाही, ही समजूत राजकारणात खोलवर रुजू लागली आहे. भाजपमध्ये तर, लालकृष्ण अडवाणींसह अनेक नेत्यांनी अशा रीतीने पक्षाला जेरीस आणून स्वत:च्या मोठेपणाचा मान मिळविण्यासाठी पक्षशिस्तही वेठीला धरत अन्य नेत्यांना धावपळ करावयास लावली होती. सत्तेचे दिवस दिसू लागताच स्वहिताचा जप करण्याच्या या प्रकाराचा मोह बुजुर्गानादेखील आवरता आलेला नाही, हे भाजपमध्ये अनेकवार दिसून आले आहे. त्याच पावलांवर मुंडे यांची पावले उमटू लागली आहेत. सत्तेच्या किंवा नेतृत्वाच्या फळीत मिळणारे स्थान केवळ उपद्रवशक्तीवर अवलंबून नसते. कर्तृत्वाचे मोजमाप करणारी यंत्रणा पक्षात असेल, तर त्यानुसार आपोआपच आपले माप आपल्या पदरात पडते. पण हे लक्षात घेण्यापुरते भान बाळगायला हवे..
संग्रहित लेख, दिनांक 16th May 2014 रोजी प्रकाशित
रुसवानाटय़ाची स्वहितसंहिता..
सत्ता समोर दिसू लागली, की स्वप्नांचे धुमारे आणखीनच फुलू लागतात. आपापल्या त्यागाचे, मोठेपणाचे आणि कर्तृत्वाचे स्वरचित पोवाडे स्वमुखाने गाण्याची स्पर्धाही सुरू होते आणि सभोवतीच्या साऱ्यांनी हे पोवाडे कानात साठवत माना डोलवाव्यात, अशा अपेक्षाही वाढू लागतात. मग राजकारणाचे आणि राजकीय नैतिकतेचे …

First published on: 16-05-2014 at 03:19 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gopinath mundes displeasure for selfie