आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्हय़ामध्ये पोलिसी गोळीबारात झालेला २० मजुरांचा मृत्यू ही चकमक नसून ते अत्यंत थंड डोक्याने केलेले हत्याकांड होते, हे आता पुरेसे स्पष्ट झाले आहे. आमचे इंग्रजी भावंड ‘इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केलेल्या बातम्यांनुसार पोलिसांनी पद्धतशीर पूर्वनियोजन करून हे हत्याकांड केले. यात मृत्युमुखी पडलेल्या सात मजुरांना तर हत्याकांडाच्या आदल्या दिवशी एका बसमधून अटक करण्यात आली होती. त्यांच्याबरोबरच बसमध्ये असलेला, परंतु अन्यत्र बसल्यामुळे पोलिसांच्या नजरेस न पडलेल्या एका मजुराने तशी साक्ष दिली आहे. परिस्थितीजन्य पुरावेही पोलिसांच्या चकमक सिद्धांताच्या विरोधात आहेत. एकंदर हे शासकीय हत्याकांडच असून त्याची योग्य चौकशी आणि निषेध झालाच पाहिजे. चौकशीतून काय सिद्ध होईल, पोलीस दोषी ठरतील का, हे पुढचे प्रश्न. मात्र यानिमित्ताने पुन्हा एकदा ज्याला खोटी चकमक म्हणतात त्या शासकीय हत्याकांडाचा मुद्दा समोर आला आहे. ही घटना केवळ गुन्हेगारी स्वरूपाची नाही. तिला देशातील नागरिक आणि दंडसत्ता यांतील संबंधांचीही किनार आहे. याकडे दुर्लक्ष करून केवळ सरकारी पक्ष सांगतो तीच बाजू खरी मानून चकमकींच्या बाजूने बोलणाऱ्या तथाकथित राष्ट्रवाद्यांची कमतरता आपल्याकडे नाही. एरवी पोलीस यंत्रणा कमालीची भ्रष्ट आहे असे म्हणत मेणबत्त्या घेऊन हिंडणाऱ्या या मंडळींना अशा वेळी पोलिसांचा खूपच पुळका येतो. आताही माध्यमे न्यायदानाचे काम करीत आहेत अशी टीका होतच आहे. परंतु मुळात माध्यमे तसे काही करीत नसून, तथ्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि या घटनेतील वस्तुस्थिती पोलिसी वृत्तान्ताच्या विपरीत असल्याचे परिस्थितीजन्य पुरावेच आहेत. आंध्रातील रक्तचंदनाचे तस्कर माजले आहेत. ते पोलिसांनाही जुमानत नाहीत. उलट हल्लेच करतात. हे खरेच आहे. मात्र त्याला कारणीभूतही तेथील राजकीय, पोलिसी आणि न्याय व्यवस्थाच आहे हे विसरता येणार नाही. चंदनतस्कर वीरप्पन नावाचा राक्षस कोणी आणि कसा तयार केला याच्या कहाण्या सर्वानाच ठाऊक आहेत. आता रक्तचंदनाच्या तस्करीला आळा घालता येत नाही हे दिसून आल्यानंतर त्यातील सहभागी सर्वाच्याच मनात धडकी बसविण्याच्या हेतूने हे हत्याकांड करण्यात आले अशी चर्चा आहे. येथे ते चंदनतस्कर आहेत. इतरत्र ते माफिया असतात वा दहशतवादाचे आरोपी. पद्धत, धोरण मात्र सर्वत्र समानच असते. ‘अशा समाजकंटकांना धडा शिकविण्यासाठी व इतरांच्या मनात भय निर्माण करण्यासाठी पोलिसांनी दोन-चार जणांना ‘ढगात’ पाठविले तर त्याबद्दल एवढा गहजब करण्याचे कारण काय?’, ‘गुंडांच्या गोळ्यांना, नक्षलवाद्यांच्या सुरुंगांना पोलीस बळी पडतात तेव्हा हे मानवाधिकारवाले कोठे जातात?’ अशा सवालांमुळेच देशातील पोलीस यंत्रणांचे फावले आहे. पोलिसांना खोटय़ा चकमकी कराव्या लागतात हे त्या यंत्रणेचे अपयश आहे आणि त्याला जबाबदार पोलीस व सरकार आहे हेच आपण लक्षात घेत नाही. भ्रष्ट व सुसंघटित पोलीस यंत्रणेचे बळी तुमच्या-आमच्यासारखे सर्वसामान्यही असू शकतात. गुंडांपासून आपल्याला वाचविण्याचे काम पोलिसांचे असते. सवाल हा आहे की, अशा पोलिसांपासून आपल्याला कोण वाचवणार? पोलिसांच्या प्रत्येक चकमकीची न्यायदंडाधिकाऱ्यांकरवी चौकशी करावी, असे सर्वोच्च न्यायालयास गतवर्षी सांगावे लागले त्याचे कारण हेच आहे. याच कारणामुळे नागरी समाजाने आंध्रातील शासकीय हत्याकांडाचे समर्थन करता कामा नये, अशा हत्याकांडांनी आपणास फिल्मी समाधान मिळत असले तरी!