बहारिनचे महावाणिज्यदूत मोहम्मद अब्दुलअली अल खाजा यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा मुंबईत दाखल झाला, परंतु राजकीय संरक्षणामुळे त्यांना अटक झाली नाही, असे वृत्त ‘लोकसत्ता’त (२६ डिसेंबर) वाचले होते. लगेच २८ डिसेंबर रोजी ते तडकाफडकी भारत सोडून गेल्याचे वृत्तही आले (लोकसत्ता, २९ डिसें.).
एका महिला व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून खाजा यांच्या विरोधात विनयभंग तसेच शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली, असे पहिल्या वृत्तात म्हटले होते; परंतु हा पराक्रम करून ते बहारिनला परत गेल्यावर त्यांचे कसे स्वागत झाले किंवा त्यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या तक्रारीचे भारतात पुढे काय होणार ते कळलेले नाही. कदाचित राजकीय सुरक्षेशिवाय ते भारतात कधी येऊ शकणार नाहीत; परंतु त्यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या आरोपासाठी तेवढेच होणार असेल, तर या प्रकरणातील पीडित महिलेला न्याय मिळाला, असे आपण कसे काय म्हणू शकतो ?
आता महिलांच्या तक्रारीत भारतातील निवृत्त न्यायाधीशसुद्धा चौकशीपासून सुटू शकत नाहीत हे आपण पाहात आहोत. राजनतिक अधिकाऱ्यांबाबतीत मात्र पीडित महिलांवर दबाव आणून तक्रार मागे घेण्यास भाग पाडण्याचा आटोकाट प्रयत्न होतो. खरे तर अशा परिस्थितीत गुन्ह्य़ाचे स्वरूप पाहता गुन्हा करणारी व्यक्ती राजनतिक सुरक्षा प्राप्त असली तरी विनाचौकशी सुटू शकणार नाही अशी व्यवस्था सर्वच देशांनी करणे न्यायोचित ठरेल असे वाटते. अन्यथा ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना न्याय मिळाला असे होणारच नाही आणि ती मानवाधिकाराची पायमल्ली ठरणार नाही काय?
मुकुंद नवरे, गोरेगाव (मुंबई)

शेरॉनकौतुक कोणत्या मूल्यांसाठी?
‘आरियल शेरॉन यांची विचारसरणी सततच्या युद्धाला पाठिंबा देणारी होती. इस्रायलचे शत्रू हे कोणत्याही पशूपेक्षा अधिक दर्जाचे नव्हते आणि जेव्हा जेव्हा एखादा इस्रायली सनिक एखाद्या पॅलेस्तिनीला मारतो, जेव्हा इस्रायली वसाहती उभ्या राहतात; इस्रायलमध्ये सबळ (बेने इस्रायलींची किंवा झायोनिस्ट) लोकशाही निर्माण करण्याची गरज असताना एखादा देश स्वत:चेच नियम तोडतो; स्वत: अनेक आंतरराष्ट्रीय नियम धाब्यावर बसवतो तेव्हा त्यामागे हाच दृष्टिकोन असतो.’
मूळच्या इस्रायली असलेल्या, पण अमेरिकेत वास्तव्य केलेल्या एमिली हौसर या लेखिकेचे हे उद्गार आहेत. इस्रायल सोडून अमेरिकेला स्थलांतर करण्यामागे शेरॉन यांच्या राजकीय कारकिर्दीतील घडामोडींचा महत्त्वाचा वाटा आहे, असं हौसर यांचं म्हणणं आहे.
आपल्याकडचे प्रवीण तोगडिया हे शेरॉन यांचे खंदे पुरस्कत्रे आहेत आणि त्यांनी शेरॉन यांची तुलना श्रीकृष्ण आणि शिवाजी यांच्याशी करण्यापर्यंत मजल मारली होती हे लक्षात घेतलं, तर ज्या मूल्यांचा ही मंडळी पुरस्कार करतात त्यांची कल्पना येते.
अशोक राजवाडे, मालाड.

Santosh Parab attack case,
संतोष परब हल्ला प्रकरण : नितेश राणे यांना मंजूर जामीन रद्द करा, राज्य सरकारच्या याचिकेवर उच्च न्यायालयाची राणे यांना नोटीस
ashok gehlot son vaibhav loksabha election
भाजपाने पेपर फुटी प्रकरणाचा मुद्दा तापवला, अशोक गहलोतांच्या कार्यकाळातील मुद्द्यामुळे सुपुत्र अडचणीत?
Gaurav Gogoi alleges that BJP wants a Russian-style oligarchy
“रामाच्या नावाचा वापर ही लांच्छनास्पद बाब; भाजपाला रशियासारखीच अल्पाधिकारशाही हवीय”; काँग्रेस नेते गौरव गोगोईंचा भाजपावर आरोप
Why Are the Rajput community angry at the statement of Union Minister Rupala
गुजरातमध्ये भाजपच्याच नेत्यामुळे भाजप अडचणीत? केंद्रीय मंत्री रुपाला यांच्या विधानावर रजपूत समाज संतप्त का?

दाभोलकरांविषयी पूर्वग्रहदूषितच असणे, हाही ‘लोकशाही हक्क’?
न्यायमूर्ती हेमंत गोखले यांचे वक्तव्य ‘क्लेशकारक’ आहे, अशी टीका करतानाच त्यांची मते पूर्वग्रहदूषित ठरवणारे पत्र ‘लोकमानस’मध्ये (१४ जाने.) वाचले. ‘दाभोलकर यांचे खुनी न सापडणे ही पोलीस खात्याची नामुष्की आहे, याबद्दल आता लोकांत पोलीस खाते हतबल आहे, अशी शंका येऊ लागली आहे’ हे न्या. गोखले यांच्या भाषणातील वाक्य होते. एखादी व्यक्ती वा संस्था यांना दाभोलकर यांच्यावर टीका करण्याचा ‘लोकशाहीदत्त अधिकार आहे’ हे मान्य केले, तरी ज्या संस्था व प्रवृत्ती दाभोलकर यांना जिवे मारण्याच्या धमक्या देत होते व हत्या झाल्यानंतरही अशा प्रवृत्तींनी जी घृणास्पद विधाने केली हे जगजाहीर आहे, त्यांच्या पदरात त्यांचे माप घातल्यास त्यात पूर्वग्रह कोठे येतो?
दाभोलकरांनी मुलाचे नाव ‘हमीद ठेवले यातच दाभोलकरांचा ढोंगीपणा’ असल्याचा कांगावा काही मंडळी करतात, तेव्हा दाभोलकर यांना हमीद दलवाई आदर्श वाटत हे विसरले जातेच. ‘हमीद दलवाई यांनी त्याच्या धाकटय़ा मुलीचे नाव इला असे ठेवले’ हा मुद्दा तर ‘इथे गैरलागू’ ठरवण्यास ही मंडळी तयार असतात.
अशा परिस्थितीत, न्या. गोखले यांच्यावर ‘पूर्वग्रहदूषित’ असा आरोप करणाऱ्यांची प्रागतिक, पुरोगामी चळवळी व त्यातील व्यक्तींबाबत असणारी मते ही पूर्वग्रहदूषित नाहीत हे कसे म्हणावे?
विवेक पुरंदरे, पुणे</strong>

मुख्यमंत्री तरुण लाभल्याने भले होत नाही!
‘लखनऊचे नीरो-नबाब’ हा उपरोधिक ‘अन्वयार्थ’ (१३ जाने.) वाचला! स्वतला वेगळे समजणारे आणि मोदींना दंगलीसाठी आरोपीच्या िपजऱ्यात उभे करणारे समाजवादी पक्षाचे नेते मुजफ्फरनगर दंगलीमागे मात्र कट होता म्हणतात.  राज्यात थंडीचा कहर असतानाही मदत शिबिरात पुरेशी काळजी घेण्यात यंत्रणा कमी पडली हे मान्य न करता त्यावर तत्त्वज्ञान पाजळणे हे जनाची-मनाची सर्व काही कोळून प्यायल्याचे लक्षण आहे. निव्वळ तरुण मुख्यमंत्री लाभल्याने राज्याचे काहीही भले होत नाही हे उत्तर प्रदेशाकडे पाहिले की जाणवते.
माया हेमंत भाटकर, चारकोप गाव.

निव्वळ  प्रसिद्धीसाठी?
देवयानी खोब्रागडे यांची अमेरिकेने भारतात पाठवणी केल्यानंतर ‘त्या’ प्रकरणावर पडदा पाडणे आवश्यक होते, पण त्या वादग्रस्त प्रकारानंतर देवयानी दिल्लीमाग्रे मुंबईत येणार असून आपल्या कन्येचे शक्तिप्रदर्शन करून जोरदार स्वागत करण्याचा बेत त्यांच्या पिताश्रींनी (उत्तमरावांनी) केला असल्याची बातमी (लोकसत्ता, १४ जाने.) वाचली.
वास्तविक देवयानी यांचे मायदेशी आगमन हे क्रीडा, कला किंवा अन्य क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त होऊन झालेले नाही. उलट त्यांच्यावर अमेरिकेत खटला प्रलंबित आहे. असे असताना अशा प्रकारचे शक्तिप्रदर्शन कशाला?
काही दिवसांपूर्वी वांद्रे-कुर्ला संकुलातील अमेरिकेच्या वकिीलातीसमोर एकटय़ाने निषेध करणाऱ्या निवृत्त सनदी अधिकारी उत्तमराव खोब्रागडे यांच्यामागे कसलीही संघटना नव्हती असे दिसले. ‘आदर्श’मध्ये अगोदरच अडकलेल्या सनदी पित्याने वादग्रस्त ठरलेल्या कन्येस सोबत घेऊन थिल्लर प्रसिद्धीच्या मागे लागणे विस्मयकारक नाही का?
श्रीराम गुलगुंद, चारकोप, कांदिवली

रिंगणातच गरागरा फिरत राहण्याचा खेळ..
‘मनमोराचा पिसारा’ सदरातला ‘भिरभरणारा भोवरा’ भावला. त्यानं अनेक जुन्या आठवणी जाग्या केल्या. जेव्हा लहान मुलांच्या खेळात भोवरा फिरवण्याची चुरस लागायची तेव्हा नियम ठरवले जात. भिरभिरणारा भोवरा जमिनीवर आखलेल्या रिंगणाबाहेर गेला तर काय शिक्षा ते निश्चित व्हायचं. बहुधा ती भोवऱ्याच्या कपाळमोक्षाचीच असायची. एखादा मरतुकडा (किंवा नवा कोरा तरतरीतही) भोवरा रिंगण सोडून वारंवार बाहेर जाऊ लागला म्हणजे तो किंवा ते बाद ठरायचे. एकदाही रिंगण न सोडणारा भोवरा विजेता, अजिंक्य ठरायचा. त्याला पराभूत भोवऱ्यांची हत्या करण्याचा अधिकार मिळायचा. त्याच्या वतीनं त्याचा मालक आणि इतर भिडू एकेक पराभूत भोवरा जमिनीवर आपटून, दगडांचा यथेच्छ मारा करून, विजेत्या भोवऱ्याच्या अणकुचीदार आरीनं बिचाऱ्या पराभूत भोवऱ्यांची सामूहिक व सार्वजनिक कत्तल करायचे. त्याची पार शकलं होऊन तो गतप्राण होईपर्यंत बच्चे कंपनीला उसंत नसायची! तेव्हा भोवऱ्याचा मालक सोडून इतरांच्या डोळ्यांत ‘खुनशीपणा’ तरळायचा!  असहाय मालक सदऱ्याच्या बाहीला आसवं टिपायचा. असा हा क्रूर जीवघेणा खेळ गल्लोगल्ली रंगायचा.
त्या काळात गावोगावी हेल्याची मिरवणूक काढून त्याला वेशीवर बळी देण्याची प्रथादेखील होती. तिचंच प्रतिबिंब भोवऱ्याच्या खेळात होतं. जोपर्यंत आपण उभे असतो, आखून दिलेल्या रिंगणातच गरगर फिरत असतो, तोवर सगळं जग आपलं कौतुक करतं. रिंगणाबाहेर जाऊन मर्यादा सोडली, की कारावास, एकांतवास किंवा विजनवासात जावं लागतं, हा दाहक अनुभव जनसामान्यांपेक्षा राजकारणी जनांना यापुढील काळातही मोठय़ा प्रमाणात घ्यावा लागणार आहे!
– विजय काचरे, पुणे