श्रीलंकेने विश्वचषकाला १९९६ साली गवसणी घातली तेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नभांगणात त्यांनी आपला ठसा उमटवला. कर्णधार अर्जुन रणतुंगाने तो संघ बांधला होता. या विश्वचषकानंतर संघातील एकामागून एक तारे निखळले, पण त्यानंतरही संघाची वेस्ट इंडिजसारखी दुरवस्था झाली नाही. श्रीलंकेने आपली पत कायम राखत आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा कायम ठेवला आणि याला संघातील काही नावाजलेल्या खेळाडूंपैकी कारणीभूत ठरला तो कुमार संगकारा. कसोटी, एकदिवसीय किंवा ट्वेन्टी-२० क्रिकेट असो, प्रत्येक प्रकारामध्ये त्याने आपली छाप पाडली. त्याला हवे तेवढे ग्लॅमर आणि प्रसिद्धी नक्कीच मिळाली नाही. पण काही दिवसांपूर्वी पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने २२१ धावांची खेळी साकारत कारकिर्दीतले दहावे द्विशतक लगावले. त्याचबरोबर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये १९० धावांपेक्षा जास्त धावा १३ वेळा करत ६६ वर्षांपूर्वीचा सर डॉन ब्रॅडमन यांचा विश्वविक्रम मोडीत काढला.
वयाच्या २२व्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर कसोटी पदार्पण केले आणि दोन वर्षांमध्येच त्याने पहिले द्विशतक झळकावले. एक खेळाडू म्हणून संघातील आपले स्थान निश्चित करत असतानाच त्याने कर्णधारपदही भूषवले. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये कर्णधारपद भूषवताना त्याने संघाला बरेच विजयही मिळवून दिले. ज्या निडर पद्धतीने तो फलंदाजी करतो, तसेच त्याच्या यष्टिरक्षणामध्येही कसलीही कमतरता नाही. श्रीलंकेला मिळालेला आतापर्यंत महान खेळाडू म्हणून त्याचे नाव घेणे वावगे ठरणार नाही. संगकारा हा आक्रमक फलंदाज नसला तरी तो मैदानावर उतरल्यावर गोलंदाजांना नक्कीच धडकी भरते. कारण तंत्रशुद्ध फलंदाजीबरोबर त्याच्या भात्यामध्ये विविध फटके भरलेले आहेत आणि बेमालूमपणे तो त्यांचा वापर करतो. त्याच्या फलंदाजीमध्ये सहजता आहे, पदलालित्य वाखाणण्याजोगे आहे. कट आणि पूलचे फटके एवढय़ा शिताफीने मारतो, की त्यामधली नजाकत डोळ्यांचे पारणे फेडते. यष्टिरक्षणही एवढय़ा चोखपणे करतो, की सध्याच्या युवा खेळाडूंनी त्याच्याकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे. संघाला त्याने बरेच विजय मिळवून दिले, संघाला बऱ्याचदा तारले आणि त्यामुळेच मराठीत त्याची ओळख ‘संघतारा’ अशीही केली जाते. मैदानात उतरल्यावर शांत चित्ताने खेळाडूंना मार्गदर्शन करत तो संघाला विजयापर्यंत घेऊन जातो. २०१४चा ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलत त्याने या प्रकारामधून निवृत्ती पत्करली. आता २०१५चा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकणे हे त्याचे स्वप्न असणारच. ही स्वप्नपूर्ती करतानाच क्रिकेटजगताने आपली दखल घ्यावी एवढी त्याची माफक अपेक्षाही असेल.
संग्रहित लेख, दिनांक 13th Aug 2014 रोजी प्रकाशित
कुमार संगकारा
श्रीलंकेने विश्वचषकाला १९९६ साली गवसणी घातली तेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नभांगणात त्यांनी आपला ठसा उमटवला. कर्णधार अर्जुन रणतुंगाने तो संघ बांधला होता.
First published on: 13-08-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kumar sangakkara sets world record