ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका यांना ‘ब्रिक्स देश’ असे म्हटले जाते. या देशांतील पायाभूत प्रकल्पांना मदत करण्यासाठी ‘ब्रिक्स’ बँकेची स्थापना करण्यात आली होती. या बँकेचे पहिले अध्यक्ष म्हणून कुंडापूर वामन कामत (के व्ही कामत) यांची नेमणूक करण्यात आली आहे. कामत यांची महत्त्वाची कामगिरी म्हणजे एक छोटी बँक असलेली आयसीआयसीआय बँक त्यांनी देशातील दुसरी मोठी बँक म्हणून नावारूपास आणली.
भारतात राजकीय नेते व कंपन्या यांचे समर्थन लाभलेल्या मोजक्या बँकरपैकी कामत एक आहेत. दूरदृष्टी, आशावाद, भारतीय अर्थव्यवस्थेच्या गुणवैशिष्टय़ांची जाण हे त्यांचे विशेष पैलू आहेत. कामत यांचा जन्म मंगळुरू येथे २ डिसेंबर १९४७ रोजी झाला. विशेष म्हणजे त्यांची मातृभाषा कोकणी आहे. कर्नाटकातील ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या संस्थेतून ते मेकॅनिकल इंजिनीयिरगमध्ये पदवीधर झाले, नंतर अहमदाबादच्या आयआयएममध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. त्यांची कारकीर्द आयसीआयसीआय बँकेत सुरू झाली. नंतर त्यांनी मनिला येथे आशियाई विकास बँकेत काम केले, तो त्यांचा पहिला आंतरराष्ट्रीय अनुभव होता. १९९६ मध्ये ते पुन्हा आयसीआयसीआय बँकेत आले. इन्फोसिस कंपनीत त्यांनी विविध पदांवर काम केले. त्यांनी आयसीआयसीआय बँकेत असताना चंदा कोचर यांच्यासारख्या महिला बँकर्सना घडवले. २००८ मध्ये भारत सरकारने ‘पद्मभूषण’ देऊन त्यांचा गौरव केला आहे. ब्रिक्स बँकेचे मुख्यालय शांघायला असणार आहे. या बँकेत चीनचे भांडवल अधिक म्हणजे १०० अब्ज डॉलर असणार आहे, त्यामुळे सर्वच देशांचे हित जपताना भारताच्या पायाभूत प्रकल्पांना मदत करण्याची कसरत त्यांना करावी लागणार आहे. चीनचे भारताशी असलेले संबंध हे निखळ मैत्रीचे नसल्यामुळे राजकीय अर्थशास्त्र सांभाळताना त्यांना निष्पक्षपाती आंतरराष्ट्रीय बँकरची भूमिका पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे त्यांना राजनैतिक कौशल्येही दाखवावी लागतील. एकीक डे जुन्या जागतिक अर्थव्यवस्थेला आव्हान देण्याची चीनची महत्त्वाकांक्षा व दुसरीकडे उदयोन्मुख देशांसाठी अर्थसाह्य़ाची नवी प्रारूपे तयार करणे व आर्थिक प्रशासनात भारताचा ठसा उमटवणे या पंतप्रधान मोदी यांच्या अपेक्षा, अशा दोन्ही गोष्टी त्यांना कराव्या लागतील. शिवाय या बँकेला आशियाई पायाभूत गुंतवणूक बँकेचे आव्हान असेल. कारण त्यात सामील होण्यासाठी जर्मनी, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया हे देश रांग लावून आहेत. या बँकेचे मुख्यालयही चीनमध्येच असणार आहे.