लोकमानस : प्राचीनतेला आधुनिकतेची प्रमाणपत्रे कशाला?

भीष्मांनी शांतीपर्वात, म्हणजे त्यांच्या अखेरच्या काळात, युधिष्ठिराला उपदेश करताना ‘शासकाचे  सुख त्याच्या प्रजेच्या सुखात असते..’ वगैरे सांगितले असले, तरी तो निव्वळ ‘आदर्श’ झाला.

Loksatta readers response letter

loksatta@expressindia.com

‘आमची धार्मिक लोकशाही’ हा जयंत सिन्हा यांचा लेख (‘पहिली बाजू’- १० मे) वाचला. थेट  रामराज्य, महाभारतातील भीष्म, युधिष्ठिर, कौटिल्याचे अर्थशास्त्र आणि  बुद्धांची शिकवण अशांच्या साक्षी देऊन आपल्याकडे पूर्वापार जणू काही आधुनिक, सांविधानिक ‘लोकशाही’च अस्तित्वात होती, असे दाखवण्याचा प्रयत्न अनावश्यक आणि हास्यास्पद आहे.

(१) भीष्मांनी शांतीपर्वात, म्हणजे त्यांच्या अखेरच्या काळात, युधिष्ठिराला उपदेश करताना ‘शासकाचे  सुख त्याच्या प्रजेच्या सुखात असते..’ वगैरे सांगितले असले, तरी तो निव्वळ ‘आदर्श’ झाला. प्रत्यक्षात तसे कधीच नसते, ही वस्तुस्थिती खुद्द भीष्मांच्या आयुष्यातही महाभारतातच बघायला मिळते. युवराजपदासाठी युधिष्ठिर दुर्योधनापेक्षा सर्वार्थाने जास्त योग्य असूनही, प्रजेलाही तो प्रिय असूनही, धृतराष्ट्राच्या आंधळय़ा पुत्रमोहापुढे हतबल होऊन भीष्मांनाही त्याबाबतीत काहीही करता आले नाही. म्हणजे प्रजेपेक्षा राजाला काय आवडते, तेच महत्त्वाचे ठरले, आणि तसेच झाले.

(२) सर्व सजीवांचा आदर करणारी, मानवी हक्कांकडे घेऊन जाणारी, स्वातंत्र्याच्या मूलभूत पाश्चात्य संकल्पनेशी थेट जोडलेली ‘अहिंसा’ इथे महाभारत काळापासून होती, असे म्हणणे दिसायला कितीही अभिमानास्पद वाटले, तरी वस्तुस्थिती तशी नाही. कोणाचेही स्वातंत्र्य हिरावून घेणे, हे हिंसक कृत्य ‘अहिसेंच्या तत्त्वाविरुद्ध’ असल्याचे सांगताना खुद्द महाभारतातले असंख्य प्रसंग चक्क नजरेआड केले गेलेले दिसतात! उदाहरणार्थ, खुद्द पांडव राजपुत्र, द्यूतात आपले ‘स्वातंत्र्य’ गमावून बसल्याने, कौरवांचे ‘दास’ होऊन भर दरबारात  हतबलपणे बसून राहतात, पुढे आपल्या पत्नीचा भयंकर अवमानही हताशपणे बघत राहतात. याचा अर्थ मुळात ‘दास्यत्व’ ही संकल्पना, ही प्रथा त्या काळी इथल्या समाजात होती. वेळप्रसंगी राजपुत्रांवरही दास्यत्व स्वीकारण्याचा प्रसंग आल्यास ते त्याचा विरोध करू शकत नव्हते !

‘(३) ‘अहिंसा परमो धर्म:’ हा गीतेतला वाक्प्रचार म्हणून घोषित करताना, – ‘विनाशाय च दुष्कृताम्’ , ‘हतो वा प्राप्स्यसि स्र्वग जित्वा वा भोक्ष्यसे महिम’, ‘तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय:’अशा अनेक गीतावचनांचा विसर पडलेला दिसतो. अहिंसा हे कितीही शाश्वत मूल्य मानले, तरी ‘धर्म संस्थापनेसाठी वेळ पडल्यास अधर्माशी लढावेच लागते,’ हाच गीतेचा संदेश आहे.

आपली प्राचीन संस्कृती, परंपरा यांची सांगड आधुनिक लोकशाही मूल्यांशी  जाणीवपूर्वक (जबरदस्तीने?) घालून उगीचच ‘आमची धार्मिक लोकशाही’ वगैरे म्हणणे, अनावश्यक आहे. आमची प्राचीन संस्कृती, जी होती, जशी होती, ती तशीच अभिमानास्पद आहे, असे म्हणायला काय हरकत आहे ? तिच्या श्रेष्ठतेला आधुनिकतेचे उसने प्रमाणपत्र जोडण्याची मुळीच गरज नाही.

– श्रीकांत पटवर्धन, कांदिवली (मुंबई)

‘सत्यमेव जयते’ म्हणत सत्याचे धिंडवडे..

‘आमची धार्मिक लोकशाही!’ हा जयंत सिन्हा यांचा लेख आणि त्यातील विसंगती उघडय़ा पाडणारा  ‘धर्मनिरपेक्ष ‘भारतीय’ हेच उत्तर’ हा डॉ. यशवंत मनोहर यांचा लेख (लोकसत्ता, १० मे) वाचल्यावर जयंत सिन्हा यांच्या लेखाविषयी काही मुद्दे सुचतात –

सत्ताधारी भाजप आणि संघ परिवार यांना असलेले संविधानातील धर्मनिरपेक्षतेचे वावडे आणि त्यावर ते वेळोवेळी ते करत असलेले प्रहार हे सर्वाना ज्ञात आहे. ते पुरेसे नाही म्हणून की काय, आता लोकशाहीलाच ‘धार्मिक’ बनवून धर्मनिरपेक्षता संपवण्याचे काम या लेखात दिसते.   

अपरिहार्य मानवी हक्कांचे पहिले लोकशाही तत्त्व भारतीय सभ्यतेतील सर्वात महत्त्वाच्या नैतिक गुणातून थेट प्रवाहित होते. ते असेही म्हणतात की जागतिक संस्कृतींमध्ये भारतीय सभ्यता अद्वितीय आहे. परंतु, इतिहास मात्र हे दर्शवितो की हजारो वर्षे कोटय़वधी अस्पृश्यांचे आणि शूद्रांचे मानवी हक्क निरंतर पायदळी तुडवले गेले आहेत आणि आजही तुडवले जात आहेत. अशी सभ्यता खरोखरच जगात ‘अद्वितीय’ असेल का?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या बाबतीत केलेला बौद्ध धम्माचा उल्लेख हे दाखवून देतो की त्यांनी या धम्माची जी मानवी मूल्ये संविधानात स्वीकारली आहेत. त्याच वेळेस त्यांनी हिंदु धर्माचा अविभाज्य अंग आणि आधार असलेली वर्ण/जातीव्यवस्था, अस्पृश्यता हा भाग संविधानात अजिबात स्वीकारलेला नाही. राम, लक्ष्मण, सीता (आणि अन्य धर्मीयांचीदेखील) चित्रे संविधानाच्या मूळ प्रतीत आहेत ती भारताची सांस्कृतिक विविधता दाखविण्यासाठी. त्यावरून संविधान किंवा लोकशाही धार्मिक आहे असा निष्कर्ष काढता येणार नाही.  स्वातंत्र्योत्तर काळातील राजधर्मावर लिहिताना लेखक म्हणतात, ‘कितीही श्रीमंत असो वा गरीब, दुर्बल असो वा ताकतवान असो, आम्हा सर्वाना धर्माचे पालन करण्याची आज्ञा आहे’,  हे दिशाभूल करणारे आहे. कारण धर्माचे पालन करण्याची आज्ञा संबंधित धर्म देत असले तरी संविधान तशी आज्ञा देत नाही. उलट कलम २५ अनुसार संविधान प्रत्येक नागरिकास धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देते. या अधिकाराचा वापर करून नागरिक आपल्या धर्माचे पालन करू शकतात आणि नको असलेला धर्म त्यागून अन्य कोणताही धर्म किंवा विचार स्वीकारू शकतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदु धर्म त्यागून बौद्ध धम्म स्वीकारला हे त्याचे उदाहरण आहे.

‘..सरंजामशाही सत्तेवर केवळ ‘राजधर्मा’चाच नव्हे तर पौरजनांची सभा आणि विद्वज्जनांच्या (पुरोहितांच्या) माध्यमातून लागू केलेल्या नियंत्रण आणि संतुलनाचा देखील नैतिक अंकुश होता.. ’ असेलही. परंतु, भारतातील सरंजामशाहीमध्ये सत्ताधारी होण्याचा किंवा ‘पुरोहित’, ‘विद्वज्जन’ होण्याचा अधिकारच शूद्र/अतिशूद्र या बहुसंख्याक जनतेला नव्हता.

‘सत्यमेव जयते’चा उल्लेख करून लेखक म्हणतात, ‘ज्यांच्याकडे कार्यकारी अधिकार आहेत त्यांना त्यांच्या कृतींबद्दल सत्य सांगावे लागेल’. परंतु गेल्या सात-आठ वर्षांत या सत्याचे किती िधडवडे निघत आहेत हे आपण आपल्या पंतप्रधानांच्या आणि त्यांच्या ‘परिवारा’ने वेळोवेळी केलेल्या वक्तव्यांवरून दिसून येते. कोविड मृतांच्या संख्येवरून विश्व स्वास्थ्य संघटनेसोबत सध्या सुरू असलेला वाद हे याचे ताजे उदाहरण.

 – उत्तम जोगदंड, कल्याण

कौटिल्यवचने पाळायची, तर ही कूटनीती सोडा

भाजपचे लोकसभा सदस्य जयंत सिन्हा यांचा ‘आमची धार्मिक लोकशाही’ हा लेख (१० मे) वाचला. ‘शासकाचे सुख त्याच्या प्रजेच्या सुखात असते. राज्यकर्त्यांस काय आवडते हे महत्त्वाचे नाही,’ हे चाणक्यांचे  विचार कृतीत आणायचे झाल्यास ‘सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर खर्च करण्याऐवजी गॅस सिलिंडरच्या गगनाला भिडलेल्या किमतींमध्ये सवलत द्या’ असा आग्रह त्यांनी धरायला हवा. ‘राजाने शक्ती आणि सामर्थ्य पुत्राबाबत किंवा शत्रूबाबत त्यांच्या गुण-दोषांच्या प्रमाणात निष्पक्षतेने वापरावे,’ या कौटिल्याच्या वचनाचा अंगीकार करायचा झाल्यास, ‘टूलकीट’ची नोंद प्रसृत करणाऱ्या तरुणीला बंगळूरुतून बेकायदा अटक करून दिल्लीत आणणाऱ्यांनी धर्मसंसदेत प्रक्षोभक, चिथावणीखोर भाषण करणाऱ्यांची तसेच ‘गोली मारो सालों को’ अशी हिंसक चिथावणी देऊन उजळ माथ्याने फिरणाऱ्या मंत्र्यांच्या कृत्यांचीही दखल घ्यावी. अनेक चेहरे बाळगून प्रसंगाला सोईस्कर चेहरा पुढे करायचा ही कूटनीती हा पक्ष सोडेल ?

– प्रभा पुरोहित, जोगेश्वरी (मुंबई)

शिवसेनेच्या राडेबाज रिंगणात फडणवीस?

‘भाजपच्या रिंगणात शिवसेनेचा खेळ’ हा मधु कांबळे यांचा लेख (९ मे) वाचून काही प्रश्न पडले. बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्याचे श्रेय राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप-संघ परिवाराकडे घेतले. इतकेच नव्हे, ते घेताना- लेखात म्हटल्यापेक्षाही विखारी शब्द वापरले. अभ्यासू (?), सुसंस्कृत (?), सभ्य (?) वगैरे असलेल्या फडणवीसांनी असे वक्तव्य करणे, म्हणजे शिवसेनेला आपल्या रिंगणात आणण्यापेक्षा भाजपलाच शिवसेनेच्या राडेबाज रिंगणात घेऊन जाण्यासारखे नव्हे काय? जाहीर सभेत रेकून मशिदींवरील भोंगे काढण्याच्या मागणीवरून शिवसेनेला टोमणे मारणाऱ्या फडणवीसांनी स्वत: मुख्यमंत्री असताना या मागणीची अंमलबजावणी का केली नाही? बरे, फडणवीसांची ही सभा ज्या दिवशी  झाली, तो महाराष्ट्र दिन होता! महाराष्ट्राची उज्ज्वल, विवेकी, बुद्धिवादी परंपरा एकवेळ राहू द्या; पण विखारी वक्तव्ये करताना, फडणवीसांना राम कापसे, रामभाऊ म्हाळगी वगैरेंचीही आठवण आली नाही का? बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्याचा अभिमान सांविधानिक मूल्यांमध्ये बसतो?

गेली पाच वर्षे फडणवीस हे महाराष्ट्र भाजपचे एकमेव कर्तेधर्ते आहेत. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांनी कोणाची नेमणूक केली, तर भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आगंतुक प्रवीण दरेकरांची! भाजपमधील माधव भांडारी वगैरे अभ्यासू मंडळी त्यांना का जवळ करावीशी वाटत नाहीत? आता फडणवीसांभोवती वावरणारे कोंडाळे पाहिले, तर काय वकुबाची माणसे ते भाजपच्या, मुख्य म्हणजे महाराष्ट्राच्या माथी मारताहेत या विचाराने खंत वाटते.

राहिला प्रश्न शिवसेनेचा. ‘बहुजनवादी हिंदुत्व’ हाच या पक्षाचा ‘डीएनए’ आहे. यातून अंतिम फायदा शिवसेनेचाच होणार. दुसरे म्हणजे, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला महाविकास आघाडी करताना, शिवसेनेचा हा हिंदुत्ववाद ठाऊक नव्हता असे समजणे बालिशपणा ठरेल. भोंग्यांवरून दंगलसदृश वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न हाणून पाडून शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने ‘किमान समान कार्यक्रम’च तर पाळला. आणि यापुढेही तो पाळण्याचा त्यांचा निश्चय दिसतो आहे, मग त्यांनी वाचाळवीरांकडे दुर्लक्ष केले तर त्यात आश्चर्य का वाटावे? काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे मौन तात्कालिक का असेना, महाराष्ट्रहिताचेच आहे!

– श्रीरंग के. भाटवडेकर, ठाणे

मराठीतील सर्व लोकमानस ( Lokmanas ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lokmanas loksatta readers opinion loksatta readers reaction ysh 95

Next Story
लोकमानस : ‘एमपीएससी’ने यापुढे तरी नामुष्की टाळावी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी