‘समाजकारणी!’ हा  ‘अन्वयार्थ’ तसेच गिरीश फोंडे यांचा ‘पुरोगामी चळवळीचे विद्यापीठ’ हा लेख (दोन्ही १८ जानेवारी) वाचले. देशात महाराष्ट्राची पुरोगामी राज्य अशी ओळख आहे.  ही ओळख या राज्याला मिळाली ती महात्मा जोतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांमुळे. सामान्य माणूस हा या विभूतींच्या राजकारणाचा केंद्र्बदू होता. अज्ञान, गरिबी, विषमता, जातीयता या मानवतेच्या शत्रूंविरुद्धचा लढा हे यांच्या कार्याचे समान सूत्र होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या महामानवांच्या पश्चात जे लोक उपरोक्त पुरोगामी परंपरा कृतिशीलपणे जगले त्यामध्ये नारायण ज्ञानदेव पाटील अर्थात एनडी पाटील होते. शोषित कष्टकरी वर्गाचा, राज्यातील पुरोगामी चळवळीचा ते आधारवड होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने ही परंपरा खरोखरच पोरकी झाल्याची जाणीव होते आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव तर सर्वच घेतात. दररोज पक्ष बदलणारे,  या महामानवांनी ज्या प्रवृत्ती विरोधात लढाई लढली त्याच प्रवृत्तींचा पुरस्कार करणाऱ्यांना तर फारच जोरजोरात या महामानवांचा जयजयकार करताना आपण पहातो.  स्वीकारलेला पक्ष आणि झेंडा सुमारे पाऊणशे वर्षे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत जपणारे, श्रमिक-कष्टकरी वर्गाच्या हिताचे राजकारण करणारे आणि महामानवांचा विचार कृतिशीलपणे जगणारे एनडी आजच्या काळात विरळाच! – राजकुमार कदम, बीड

निष्ठेचा आदर्श हीच आदरांजली ठरेल… 

प्राध्यापक एन.डी.पाटील हे पाच वेळा आमदारपदी निवडून येऊनही, सत्तेचे दुर्गुण कधीही त्यांना चिकटलेले नाहीत, साधी राहाणी व उच्च विचारसरणीचा अंगीकार त्यांनी आयुष्यभर केला, अनेक संस्थांचे अध्यक्षपदी असताना, एकदाही त्यांनी नियमबाह्य वर्तन केले नाही, स्वच्छ चारित्र्याचे व शेवटच्या श्वासापर्यंत साम्राज्यावाद व धर्मांधता याविरुद्ध लढा उभारतानाच, आपल्या ओघवत्या भाषेतून ‘माक्र्सवादी दृष्टिकोन’ सोप्या शब्दात समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कठीण काम, त्यांनी अगदी लीलया केले,  आयुष्यभर शेतकरी व कामगार यांच्यावरील होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले, असे हे सेनापती म्हणजे अत्यंत दुर्मीळ व्यक्तिमत्त्व होते. आजच्या बकाल राजकारणातील राजकीय नेत्यांनी त्यांचा आदर्श ठेवणे, हीच त्यांच्या कार्यशक्तीला व विचारधारेला आदरांजली ठरावी.  – प्रदीप करमरकर, ठाणे</strong>

बिरजू महाराजांचा ‘सवाई’ आविष्कार…

 ‘काहे छोड मोहे…’ हे कथ्थक गुरू पं. बिरजू महाराज यांना आदरांजली वाहणारं संपादकीय (१८ जानेवारी) वाचलं. नृत्यातून कथा सांगण्याची ‘कथ्थक’रीत अथकपणे पं. बिरजू महाराजांनी त्यांच्या सातत्यपूर्ण अभ्यासातून रसिकांपर्यंत शेवटपर्यंत पोहोचवली. याचा ‘याचि देही याचि डोळा’ प्रत्यय घेतल्याचं मला स्मरतं. जानेवारी २०११ मध्ये भारतरत्न पं.भीमसेन जोशी निवर्तल्यानंतर त्यांना आदरांजली वाहणारा एक संगीतमहोत्सव सवाई गंधर्व महोत्सवाच्या नेहमीच्या जागी भरवला गेला होता. त्यावेळी पं.बिरजू महाराजांनी बसल्याबसल्या एक बंदिश स्वत: म्हणत, त्याचा शब्दश: अर्थ दृगोच्चर करणाऱ्या भावमुद्रा, नेत्रपल्लवी आणि हस्तमुद्रांनी कथ्थक नृत्यशैलीचा साक्षात्कार प्रेक्षकांना घडवून मंत्रमुग्ध केलं होतं. त्यानंतर झालेला टाळ्यांचा कडकडाट अजूनही कानात घुमतो आहे. कलेच्या बाबतीत नवनवे प्रयोग करून पण मूळ नृत्यकलेशी कुठलीही प्रतारणा न करता नंदकिशोर कपोतेंसारखे असंख्य शिष्य निर्माण करणाऱ्या या अवलिया कथ्थक गुरूला विनम्र आदरांजली.  – श्रीपाद पु. कुलकर्णी,  पुणे</strong>

भाषेची सूत्रे अपरिवर्तनीय नसतात!

  ‘भाषासूत्र’ मधला ‘उंडगं उठलं, पिठलं हाटलं’  हा डॉ. माधवी वैद्य यांचा लेख (लोकसत्ता, १८ जानेवारी)  वाचला. पाच तज्ज्ञांकडून पाच दिवस चालणाऱ्या या सदराच्या अन्य लेखिका यास्मिन शेख यांच्या अनुस्वाराच्या वापरनियमांच्या लेखाला एका प्रकारे, डॉ. वैद्य यांच्या या लेखाच्या शीर्षकापासूनच छेद जातो आहे!

‘उंडगा / उंडगी’ असे स्पष्टपणे र्पुंल्लगी / स्त्र्रींलगी शब्द असल्याचे लेखात म्हटले आहे.  तरीदेखील, म्हणीत मात्र ‘उंडगं’ असा शब्द वापरला आहे. म्हणजेच, म्हणीच्या ‘चटपटीतपणा’करिता ‘उंडगे’ असा नपुंसर्कंलगी शब्द गृहीत धरून त्याचं ‘उंडगं’ असं रूप वापरण्यात आलं आहे! याचाच अर्थ, अनुस्वार वापराचे काही ढोबळ नियम आणि प्रघात असतात, असं जरी मानलं, तरी त्याला वेळोवेळी छेद देणारी उदाहरणे प्रसंगोपात्त सापडूच शकतात!

भाषेची सूत्रे भौतिक/रसायनशास्त्राच्या सूत्रांप्रमाणे ठाशीव नसतात, हेच खरे…!  – परेश वसंत वैद्य, गिरगाव (मुंबई)

खरेच आपला समाज ‘बाजारसाक्षर’ आहे का?

‘बाजाराच्या ‘पुढल्या हाका’ हा संजीव चांदोरकर यांचा लेख (१८ जाने.) भांडवली बाजाराची प्राथमिक माहिती पुरविणारा व किरकोळ गुंतवणूकदारांना सावध करणारा वाटला. कोविडकाळात घरी काही काम नव्हते म्हणून अनेक उत्साही मंडळी मोठ्या जोमाने या बाजारघाईत  उतरलेली आहेत. म्हणूनच बहुधा, या दोन वर्षांत ‘डी-मॅट’  खातेधारकांची संख्या जवळपास तीनेक कोटींनी वाढली आहे . परंतु या नवनवलनयनोत्सवी पौगंडांना भांडवली बाजाराच्या पर्वत-खाईंविषयी काही जुजबी ज्ञानसुद्धा नाही. म्हणूनच अक्षरश: अवसायनात  गेलेल्या (अगदी उत्पादन बंद पडून कर्जाच्या खाईत बुडालेल्या) कंपन्यांचे समभाग गेल्या दीड वर्षांत दहा-दहा पट वाढल्याचेही दिसले आहे. त्यांच्या किमती दहा-वीस रुपयांच्या आत असल्यामुळे या नवगुंतवणूकदारांनी, ‘स्वस्त ते पौष्टिक’ या भावनेने धडाधड खरेदी केले!

दुसरी किमान माहिती म्हणजे कंपन्यांचे ताळेबंद वाचता येणे. या प्रांतात तर बहुतेकांचे बौद्धिक टाळे बंदच असते. कोणत्याही समभागांचे किंमत-उत्पन्न  गुणोत्तर हे त्या समभागांची वाजवी किंमत दर्शवत असते. ते साधारण १० ते १५ या मर्यादेत असेल तर तो समभाग खरेदीयोग्य असतो असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. आज मात्र या हौशी बाजारबुणग्यांच्या बेधुंद खरेदीमुळे काही समभागांचे हे गुणोत्तर ५०० ते ६०० पर्यंत पोहोचले आहे. बरे या बाजारात प्रवेशाला कोणतीही शैक्षणिक पात्रता लागत नाही. ऑनलाइन  डी-मॅट  खाते उघडले की झाले. त्या सहभागी इच्छुकांचे उत्त्पन्नस्रोत, या जोखीमयुक्त बाजारात उतरण्यायोग्य  तरी आहेत  काय, हेसुद्धा पहिले जात नाही. सध्या तर ‘एलआयसी’  ही सरकारी विमा कंपनी वर्तमानपत्रांत मोठमोठ्ठया जाहिराती देऊन, तिच्या पॉलिसीधारकांना डी-मॅट  अकाउंट उघडण्याचा ‘सल्ला’ देत आहे. ही अशी  जाहिरात करणे एखाद्या विमा कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वात बसते काय ? कारण काय तर तिला बाजारात आयपीओ आणायचा आहे आणि आधीच विश्वास ठेवलेल्या पॉलिसीधारकांच्या माथी मारायचा आहे; तोही महागड्या प्रीमियमवर? ‘पेटीएम’सारखी एखादी फिनटेक कंपनी एक रुपयाच्या दर्शनी मूल्याच्या समभागांचे २१५० रुपये मागते व गोळाही करते. लोक आंधळे, तो भावही या कंपनीला  देतात… मग महिन्याभरातच किंमत अर्धीसुद्धा उरत नाही. या ‘आयपीओ’च्या प्रीमियम आकारणीवर सेबीचे नियंत्रण का नाही, हे कळावयास मार्ग नाही.

 याच अंकात (१८ जाने ) ‘विश्लेषण’ सदरात लिहिल्याप्रमाणे – मागील दोन वर्षांत, भारतातील लोक अधिक गरीब झाले, परंतु अब्जाधीशांची संख्या ४० ने वाढून १४२ वर पोहोचली, याला बऱ्याच अंशी हे बाजारवीरसुद्धा हातभार लावत  आहेत. श्रीमंतांना अधिक श्रीमंत करण्याचा विडा सरकारने उचललाच आहे, त्यात आपलाही खारीचा वाटा असावा, असे त्यांना वाटत असेल तर हासुद्धा राष्ट्रीय कार्यक्रम होऊन जाऊ द्या!  – पृथ्वीराज जाधव, आळंदी देवाची ( जि. पुणे)

जोकोव्हिच : वर्गलढ्याचाही पदर 

प्रख्यात टेनिसपटू जोकोव्हिच याला स्पर्धेत खेळू न देता ऑस्ट्रेलियन सरकारने माघारी पाठवले कारण त्याचे लसीकरण झाले नव्हते. ही बाब ‘अवैज्ञानिकांचे तिमिर जावो’ (१७ जानेवारी) या संपादकीयात चर्चिली आहे.   त्यातून काही पदर अनुल्लेखित राहिले आहेत असे वाटते. जोकोव्हिच सर्बिया म्हणजे तुलनेने गरीब देशातला व तळागाळातून वर आलेला खेळाडू आहे. ‘आहे रे’ वर्गातील फेडरर व नदाल यांना त्याने अतिशय समर्पक टक्कर दिलेली आहे . त्याला विक्रम करण्यापासून परावृत्त करण्यासाठी त्याच्या या चुकीचा भरपूर फायदा उचलला गेला आहे, असे मला वाटते. हा वर्गलढ्याचा  पदर दुर्लक्षिला गेला आहे असे वाटते.  – विजय दांगट, सॅन फ्रान्सिस्को 

गरज सरो आणि वैद्य मरो?

राज्यातील वैद्यकीय अस्थायी सहायक प्राध्यापक गेले तीन दिवस मुंबईत जे.जे. रुग्णालयाच्या आवारात साखळी उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यात सरकारने चालढकल केल्याने त्यांनी ही टोकाची भूमिका घेतली असून काहींनी आपले राजीनामे सादर केले आहेत. या अस्थायी सहायक प्राध्यापकांनी गेली दोन वर्षे करोना साथीत आपल्या जिवाची बाजी लावून रुग्णसेवा केली असून अद्याप साथ संपलेली नाही. सरकारने केवळ कामापुरते वापरून घेतल्याची त्यांची भावना झाली असल्यास नवल नाही. ‘कोविड योद्धे’ म्हणून गौरविण्यात येऊनही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असून शासनाने त्यांना त्वरित न्याय द्यावा. आधीच मनुष्यबळ कमी असल्याने बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. परिणामी त्यांच्या मागण्यांचा योग्य तो निर्णय घेणे गरजेचे आहे. अन्यथा गरज सरो आणि वैद्य मरो असेच म्हणावे लागेल. – पांडुरंग भाबल, भांडुप

loksatta@expressindia.com

मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokmanas poll opinion reader akp 94
First published on: 19-01-2022 at 00:13 IST