लोकमानस : निवडणुकांपेक्षा जनतेचे आरोग्य महत्त्वाचे…

निवडणूक प्रचारासाठी प्रत्यक्ष सभा आणि वाहनांच्या फेऱ्या, रोड शो, पदयात्रा काढण्यावरील बंदीची मुदत येत्या ३१ जानेवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला ही गोष्ट अत्यंत चांगली आहे.

Loksatta readers response letter

‘निवडणूक सभाबंदीस पुन्हा मुदतवाढ’ ही लोकसत्तामधील (२३ जानेवारी) बातमी वाचली. निवडणूक प्रचारासाठी प्रत्यक्ष सभा आणि वाहनांच्या फेऱ्या, रोड शो, पदयात्रा काढण्यावरील बंदीची मुदत येत्या ३१ जानेवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला ही गोष्ट अत्यंत चांगली आहे. कारण देशातील करोनाचा प्रसार अजूनही कमी झालेला नाही. कालचाच एक दिवसाचा करोनाबाधितांचा आकडा ३ लाख ३४ हजारापर्यंत गेलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात होणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकांसाठी प्रत्यक्ष सभा, रोड शो, पदयात्रा यांच्यावरील बंदी ३१ जानेवारीपर्यंत वाढवून निवडणूक आयोगाने स्वत:ची खंबीर भूमिका दाखवून दिली आहे. मागील वर्षी झालेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी प्रत्यक्ष सभा, रोड शो, पदयात्रा या निवडणूक प्रचाराच्या साधनांवर बंदी नव्हती. भाजप, तृणमूल काँग्रेससहित सगळ्याच पक्षांनी याचा गैरफायदा उठवून प्रचारात अगदी धुडगूस घातला होता, त्यामुळे निवडणुकांनंतर त्या राज्यात करोनाबाधितांची संख्या वाढण्यास खतपाणी घातल्यासारखे झाले होते. या वेळी आयोगाने निवडणूक सभाबंदीस मुदतवाढ दिल्याकारणाने करोनाचा प्रसार रोखण्यास मदत होईल. निवडणुका जाहीर झाल्यापासून ही बंदी १५ जानेवारी, २२ जानेवारी आणि आता ३१ जानेवारीपर्यंत तिसऱ्यांदा वाढवली आहे. खरेतर ही बंदी यापुढे १० फेब्रुवारीपर्यंत, म्हणजेच निवडणुकीची पहिली फेरी होईपर्यंत आणि नंतर निवडणुकीचे मतदान पूर्ण होईपर्यंत वाढवणे गरजेचे आहे. देशासाठी निवडणुका महत्त्वाच्या असल्या तरी त्याच देशातील जनतेचे आरोग्य जास्त महत्त्वाचे आहे हे निवडणूक आयोगाच्या लक्षात आले, हेही नसे थोडके! – शुभदा गोवर्धन, ठाणे.

जल्पकांचीच संख्या वाढतेय…

‘जल्पकांसमोर हवी सत्याग्रहींची फौज!’ हा  ‘देश काल’ सदरातील योगेन्द्र यादव यांचा लेख (२१ जानेवारी ) वाचला. त्यांनी मांडलेल्या आणि ते आग्रही असणाऱ्या सत्याग्रहींची फौज कशी उभी करणार आहेत? कारण सध्या सरकारच्या कोणत्याही धोरणाबाबत विरोध केला की तो राष्ट्रद्रोहच ठरवला जात आहे. खोटे इतके वेळा बोला की ते खरे वाटेल ! गोबेल्स नीतीचा वापर सुरू आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही.

पंजाबात घडलेल्या प्रकाराबाबत दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि रस्ता मोकळा ठेवण्यात ज्या त्रुटी होत्या त्या समजल्याच पाहिजेत. पण भारतात पंतप्रधानांचा जीव धोक्यात हे जनतेत पसरून येथील पोलिसांचे आणि सुरक्षा व्यवस्थेचे मन खच्चीकरण करण्यात काय आनंद आहे?  जल्पकांनी शिव्यांची लाखोली वाहिली, म्हणून ‘शववाहिनी गंगा’ ही वस्तुस्थिती खोटी ठरणार आहे काय ? तरीही चिंता याची वाटते की, सर्वच क्षेत्रांत जल्पकांची संख्या वाढतच आहे. मग सत्याग्रही कसे तयार होणार?  – संतोष ह. राऊत, लोणंद (जि. सातारा)

त्यांना प्रोत्साहन द्यायचे की नाउमेद करायचे

 सर्वोत्कृष्ट शिक्षकाचा जागतिक सन्मान मिळविलेले महाराष्ट्रातील शिक्षक रणजिर्तंसह डिसले यांनी अमेरिकेत जाऊन संशोधन करण्यासाठी मागितलेली रजा प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी नाकारली हीे खेदजनक गोष्ट आहे. डिसले यांचे  शिक्षणक्षेत्रातील योगदान हे वादातीत आहे. खरे तर शैक्षणिक दर्जा आणि विद्यार्थ्यांचे गुणवत्तेसाठी प्रयत्न करणाऱ्या डिसले यांना प्रोत्साहित करायला हवे. अशा शिक्षकांना अधिक शिकायचे असते तेव्हा शिक्षणधुरिणांनी विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी पर्यायी व्यवस्था करणे अपेक्षित आहे. थोडक्यात, रणजिर्तंसह यांना सरकारी यंत्रणा आणि नियमावलीमध्ये बंदिस्त करणे अयोग्य वाटते.  -अरविंद बेलवलकर, अंधेरी (मुंबई)

मनात रेंगाळत राहणाऱ्या गुलजारजींच्या गोष्टी

‘उत्तम, पण तहान वाढवणारे!’ हे गुलजार यांच्या ‘अ‍ॅक्च्युअली… आय मेट देम’ या पुस्तकाचे गिरीश कुबेर यांच्या  ‘बुकअप’ सदरातील परीक्षण वाचले. गुलजारजी हे सगळे सांगत असताना, माझा त्यात कसा वाटा होता, मी किती मोठेपणा केला असा मीपणा त्यात र्यंत्कचितही जाणवत नाही. मला वाटते की,  यातच या पुस्तकाचे आणि गुलजारजी यांचे मोठेपण आहे. पुस्तकातली छायाचित्रेही विलोभनीय आहेत. हृषिकेश मुखर्जी हे दोन शॉट्सच्या मध्ये कसे चेस खेळायचे, संजीव कुमार यांनी ‘परिचय’मध्ये जया भादुरीचे वडील आणि ‘कोशिश’मध्ये पती या भूमिका करताना केलेली तक्रार आणि त्याला एन. सी. सिप्पी यांनी दिलेले छान उत्तर, ‘मीरा’ चित्रपटातील भजनासाठी रविशंकर यांनी दाखववेली सर्जनशीलता वाचायला मजा येते. आपल्या परममित्र पंचमदांविषयी लिहिताना गुलजारजी भावुक होतात आणि आपल्या मनात  त्यांची कविता मनात रेंगाळत राहते.

‘ देर तक पटरियों पे बैठे हुए । ट्रेन का इंतज़ार करते रहे

ट्रेन आई, ना उसका वक्त हुआ, और तुम यों ही दो कदम चलकर,

धुंधपर पाँव रख के चल भी दिए । मैं अकेला हूँ धुंध में पंचम!’  – मयूर कोठावळे, मुंबई

‘संगीत स्वरसम्राज्ञी’ला आदरांजली

‘स्वरसम्राज्ञी कीर्ती शिलेदार यांचे निधन’ ही बातमी (२३ जानेवारी) वाचून सहा दशके नाट्यरंगभूमी गाजवलेल्या, संगीत नाटकांचं पुनरुज्जीवन करण्यात आघाडीवर असलेल्या, जयराम-जयमाला शिलेदार या नाटकासाठी आयुष्य वाहिलेल्या दाम्पत्याची ‘सुरेल’ कन्या कीर्ती शिलेदार यांचं त्यांच्या उमेदीच्या काळात पाहिलेलं ‘संगीत स्वरसम्राज्ञी’ हे नाटक आठवलं; जे जणू त्यांच्यासाठीच विद्याधर गोखले यांनी लिहिलेलं असावं. गाजलेल्या ‘माय फेअर लेडी’चा हा आणखी एक मराठी नाट्याविष्कार. ‘एकला नयनाला विषय तो झाला’, ‘कशी केलीस माझी दैना’, ‘हरीची ऐकताच मुरली’ सारखी प्रेमातुर ललनेची पदं असोत किंवा ‘रे तुझ्यावाचुन काही येथले अडणार नाही’ असं ठसक्यात स्वाभिमानानं सांगणारी रांगडी ‘स्वरसम्राज्ञी’… कीर्ती शिलेदारांचं गाणं त्यांच्या अंगप्रत्यंगातून उमललेलं वाटायचं आणि भावमुद्रांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारं असायचं. ‘खरा तो प्रेमा, ना धरी लोभ मनी’ या त्यांच्या हसतमुख चेहऱ्याने म्हटलेल्या गाण्याप्रमाणेच त्या नाट्यसृष्टीच्या प्रेमात राहिल्या आणि प्रेक्षकांचा लोभ त्यांना न मागता मिळत राहिला. संगीत रंगभूमीसाठी जीवन वाहिलेल्या या विदुषीला भावपूर्ण आदरांजली. – श्रीपाद पु. कुलकर्णी, बिबवेवाडी, पुणे

जातिभेदाला सरकारी उत्तेजन कशाला ?

मी अलीकडेच एका लेखात असे वाचले की अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगीर गावातले मागील दोन पिढ्यातील लोक जात न मानता, ‘अजातीय’ बनून हयात घालवीत आहेत. वास्तविक हा अभिनंदनाचा विषय असायला हवा. त्याऐवजी त्या लोकांना आता त्रास होत आहे. या गावातील शाळेच्या पूर्वीच्या दाखल्यावर ‘अजातीय’ असा शिक्का असे. पण आता जात लिहिली नाही, तर सुविधा मिळणार नाहीत असे समजते. सरकारी कागदांवर जात लिहायला हवी अशी त्यांची माहिती आहे. म्हणजे दोन पिढ्या जातिभेद संपवण्यासाठी घातल्यावर पुन्हा तो ठळक करायचा? अलीकडे पुण्यातही बालवाडीत प्रवेश मिळवताना लहान बालकांना धर्म व जात यांची माहिती द्यावी लागते हे समजल्यावर मला फार दु:ख झाले. सरकारी नियम जातिभेद पक्के करायला उत्तेजन का देतात ? जातिभेद हा हिंदू समाजावर असलेला कलंक आहे, त्यामुळे अनेक लोकांवर पिढ्यान् पिढ्या अन्याय झाला आहे हे आम्ही शाळेत असल्यापासून शिकत आहोत. हा कलंक दूर करायला हवा हे पटते. पण शिक्षण आणि प्रत्यक्ष जीवन यातला फरक सतत जाणवत असतो. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली, तरी जातीनिहाय आरक्षण ठेवण्यात राजकारणी लोकांना रस आहे. त्यासाठी मोर्चे काढायला, कोर्ट कचेऱ्या करायला भरपूर पैसे व वेळ खर्च करणारे लोक आहेत. पण खरोखर जातिभेद नष्ट करायला उत्तेजन देणारे किती लोक आहेत? मंगरूळ दस्तगीरमधील लोकांचा अनुभव सुधीर भारती यांनी अन्य प्रकाशनातील एका लेखाद्वारे मांडला, तो खरेच फार खिन्न करणारा आहे.

    या पार्श्वभूमीवर देवेंद्र राक्षे या तरुणाशी अलीकडे झालेले दूरध्वनी संभाषण दिलासादायक ठरले. त्याने त्याची मुलगी इरा हिला शाळेत प्रवेश घेताना तिचा धर्म ‘माणुसकी’ आणि जात ‘माणूस’ अशी नोंद केली असे सांगितले. अर्थात हे करायला देवेंद्र व त्याची पत्नी यांना थोडा त्रास झाला, पण ते पुण्यात तरी साध्य झाले. शिवाय त्याच्या श्रीगोंदे या अहमदनगर जिल्ह्यातील गावी लोक जातिभेद पाळत नाहीत, धर्मभेददेखील फारसा नाही असे समजले. श्रीगोंदे या गावाने बाबूमिया बँडवाले, संतश्री शेख महंमद हे सुफी संत, सद्गुरू वामनराव पै यांचे गुरू नानामहाराज श्रीगोंदेकर यांच्यासारखी नररत्ने दिली. आजही शेख महंमद यांच्या मठात वेद आणि कुराण या दोन्हींचे एकाच वेळी पठण होते. जाती आणि धर्म यामुळे समाजाचे विभाजन टाळणे श्रीगोंदे गावात जे जमले, ते अनेक गावांत झाले पाहिजे, त्यासाठी उत्तेजन दिले पाहिजे. जनसामान्यांनीच आपल्याला जातिभेद नको असे पक्के ठरवायला हवे. मग विशिष्ट जातीला आरक्षण मिळवून देत त्या जातीचा तारणहार होण्याची स्वप्ने राजकारण्यांना पडणार नाहीत. 

     निदान ज्या लोकांना जातीनिहाय आरक्षण नको आहे, त्यांना तरी जात ‘माणूस’ लिहिता आली पाहिजे. ज्यांना हिंदू धर्म ठेवायचा आहे, पण जातिभेद पाळायचा नाही, त्यांना आवश्यक असेल तिथे धर्म ‘हिंदू’ आणि जात ‘माणूस’ अशी नोंद करता आली पाहिजे. जातिभेद नाहीसे किंवा निदान कमी करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल असेल. सरकारी कागदपत्रात अशी नोंद करण्याची मुभा हवी. यासाठी कायदे जाणणारे लोक मदत करतील का?  – मंगला नारळीकर, पुणे

loksatta@expressindia.com

मराठीतील सर्व लोकमानस ( Lokmanas ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lokmanas poll opinion reader akp 94

Next Story
लोकमानस : ‘सत्ता दाखवून देण्या’चे मध्ययुगीन प्रकार…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी