पुरोगामी, निधर्मीवादी भूमिका ही सांविधानिकच!

‘पूर्ततेनंतरची पोकळी!’ हा अग्रलेख (५ ऑगस्ट) वाचला. राम मंदिराच्या उभारणीची सुरुवात करणे आणि कलम ३७० रद्द करणे या दोन्ही घटना स्वतंत्र नाहीत, हे खरेच आहे. रथयात्रेनंतरचे राजकारण त्यामागे आहे. त्यापेक्षा संघाच्या स्थापनेनंतर केलेल्या राजकारणाला आलेली ती फळे आहेत, हे म्हणणे अधिक योग्य होईल. यापुढील भाग स्पष्ट करायला हवा की, या दोन्ही घटनांच्या मागे (एक मागे आणि दुसरा पुढे असे नाही) केवळ धर्म नाही, तर धर्माचा केलेला राजकीय उपयोग आहे. अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे, या दोन्ही घटना कायद्यास धरून झाल्या असे म्हणता येणार नाही. या दोन्ही घटनांचा कार्यकारणभाव पाहिल्यास लक्षात येते की, धर्म आणि राजकारण यांचा कौशल्याने, चलाखीने उपयोग करण्यात आला. आधुनिक प्रचारतंत्राचा विधिनिषेधशून्य वापर हे फार मोठे साधन हाताशी असल्यावर बाकी इतर गोष्टी सहजपणे साध्य करण्यात आल्या. यामागे धर्माचा वापर मुक्तपणे झाला हे रथयात्रेनंतरच्या घटना, वक्तव्ये, दंगली इत्यादींचा मागोवा घेतला तर दिसून येते.

१९९०च्या पूर्वी दंगली झाल्या, पण त्यांचा आवाका स्थानिक होता आणि त्यामागील हेतूचे फारसे उदात्तीकरण झाले नव्हते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, रथयात्रेनंतर ध्रुवीकरण अधिक खोलवर आणि विस्तृत झाले. त्यापूर्वीचे राजकारण अल्पसंख्याककेंद्रित होते आणि त्याचे कारण पुरोगामी/ काँग्रेस वगैरे होते, हा मुख्यत्वे हिंदुत्ववादी प्रचाराचा भाग झाला. न्या. राजेंद्र सच्चर यांच्या समितीने त्यांच्या अहवालात दाखवून दिले होते की, मुस्लिमांचा अनुनय वगैरे निव्वळ ‘बोलाचा भात बोलाची कढी’ असा प्रकार आहे. मुस्लिमांच्या सुधारणेसाठी- आर्थिकदृष्टय़ा किंवा शैक्षणिक- असे फारसे काम झालेले नाही. अजानसाठी परवानगी किंवा रस्त्यावर नमाजासाठी परवानगी यांसारख्या गोष्टी करणे याला अनुनय/ लांगूलचालन म्हणायचे असेल, तर राजीव गांधी यांनी शहाबानो प्रकरणात घेतलेली भूमिका चुकीची होती. बहुतेक पुरोगाम्यांनी त्याबद्दल रोखठोक भूमिका घेतली होती. बुद्धिजीवी आणि पुरोगाम्यांची निधर्मीवादी भूमिका ही खरे तर सर्वात महत्त्वाची होती. बहुतेक लेखक-कलावंतांनी ती बजावलीदेखील. कारण पुरोगामी, निधर्मीवादी, वैज्ञानिक भूमिका ही सांविधानिक भूमिका आहे. फक्त सोयीनुसार टिंगलटवाळी करून, क्षुल्लकीकरण करून, त्याचप्रमाणे प्रचारतंत्राचा वापर करून असांविधानिक धर्मवादी राजकीय भूमिका पसरविण्यात यश मिळाले एवढेच.

डॉ. हेडगेवार एके काळी काँग्रेसमध्ये होते हे खरे; पण त्यांना काँग्रेसचे राजकारण पटले नाही म्हणूनच त्यांनी संघाचे राजकारण सुरू केले. त्यांचा वारसा पूर्णपणे वेगळा आहे. त्याच धार्मिक, संकुचित, एककेंद्री राजकारणाची परिणती आजच्या भाजपच्या राजकारणात झाली आहे. बहुसंख्य हिंदू समाज आजही बहुसंख्याकवादी राजकारणाच्या विरोधात आहे.

– डॉ. अनिल केशव खांडेकर, पुणे

देवालयाला जोडून विधायक केंद्रे उभारावीत..

राम मंदिराची पायाभरणी झाली. मात्र हे सर्व बाबरी मशीद उद्ध्वस्त न होता झाले असते तर ते सहिष्णू हिंदू संस्कृतीला शोभेसे झाले असते. आता निर्माण होणारे मंदिर भव्यदिव्य होईल यात संशय नाही, पण ते केवळ देवालय न राहता त्याला जोडून अनेक विधायक केंद्रे निर्माण करता येतील. संस्कृत विद्यापीठ, वेदाभ्यास आणि संशोधन, रामायण संशोधन, सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास करणारे केंद्र, शिल्पकला, मूर्तिकला यांचे प्रशिक्षण देणाऱ्या कार्यशाळा, ग्रंथालय, भारतशास्त्र (इंडॉलॉजी) शिक्षण केंद्र.. अशा अनेक गोष्टी उभारून हे केवळ धार्मिक स्थळ न राहता सांस्कृतिक केंद्र करता येईल. या सर्व गोष्टींसाठी एक जागतिक दर्जाचे श्रीराम अयोध्या विद्यापीठ उभारल्यास जगभरातून व्यासंगी अभ्यासक इथे येत राहतील.

– डॉ. शरद अभ्यंकर, वाई (जि. सातारा)

लोकशाहीची भारतीय शौर्यगाथा!

‘पूर्ततेनंतरची पोकळी!’ हा अग्रलेख (५ ऑगस्ट) वाचला. राम मंदिर भूमिपूजनानंतर भारतीयांच्या शौर्याची आणि न्यायबुद्धीची ख्याती आता संपूर्ण जगात दुमदुमेल. कारण बाबरच्या मृत्यूच्या पाचशे वर्षांनंतर त्याला (मोगल सम्राट!) हरविणे इतर कुणालाही शक्य नव्हते, ते भारतीयांनी करून दाखवले. त्याच्या नावाने असलेली, पण त्याने स्वत: न बांधलेली बाबरी मशीद उद्ध्वस्त करून! जवळपास साडेतीनशे वर्षांनंतर औरंगजेबाच्या नावाने असलेल्या रस्त्यांची नावे बदलून त्याला (मोगल सम्राट!) चारीमुंडय़ा चीत करण्याच्या पराक्रमाची गौरवशाली नोंदही भारतीयांच्या नावेच झालेली आहे. लोकशाही मूल्यांवर असीम विश्वास असणारे भारतीय आता आर्थिक मंदी, करोना, टाळेबंदी, चीन-पाकिस्तान-नेपाळ-भूतान-बांगलादेश हे विषयही चर्चेतून लवकरच बाद करतील, हेही ओघाने आलेच!

– सय्यद मारुफ सय्यद महेमूद, नांदेड

भावनिक राजकारणाने मूलभूत प्रश्न सुटत नाहीत

‘पूर्ततेनंतरची पोकळी!’ हे संपादकीय (५ ऑगस्ट) वाचले. जम्मू-काश्मीर संदर्भातील कलम ३७० रद्द करताना त्या राज्याच्या विधानसभेची परवानगी न घेणे किंवा कायदा पाळण्याचे प्रतिज्ञापत्र दिले असतानाही बाबरी मशीद पाडणे यातून कायदा आणि सांविधानिक मूल्यांप्रति भाजपला किती आदर आहे हे दिसून येते. बहुसंख्याकांचा लोकानुनय केला की अशा गोष्टींबद्दल जाब विचारणारे अल्पमतात जातात. मग हव्या त्या गोष्टी तडीस नेणे अगदी सोपे होऊन जाते. तेच नेमके भाजप सध्या करत आहे. हे जरी खरे असले तरी शेवटी शिक्षण, रोजगार, आरोग्य- विशेषत: करोना संकट यांसारख्या दैनंदिन आणि जीवनावश्यक समस्यांकडे किती दिवस दुर्लक्ष करणार? अर्थव्यवस्था सावरणे आणि मुख्यत्वे बँकिंग क्षेत्रातील पडझड थांबवणे याबद्दल मोदी सरकार अनभिज्ञच दिसत आहे.

राम मंदिराबद्दलचे भक्तिमय वातावरण दोन-चार दिवसांत ओसरेल; त्यानंतर सर्वागीण-सर्वसमावेशक तसेच भौतिक आणि विकासात्मक प्रश्नांकडे लक्ष देणे याला सरकारची प्राथमिकता असली पाहिजे. कारण भावनिक आणि धार्मिक राजकारण करून सर्वसामान्य जनतेचे मूलभूत आणि दैनंदिन प्रश्न सुटत नसतात.

– सचिन वाळीबा धोंगडे, अकोले (जि. अहमदनगर)

कुंपणावरच्या मतदारांची जाणीव भाजपने ठेवावी!

‘पूर्ततेनंतरची पोकळी!’ हे संपादकीय वाचले. १९९२ ते २०२० या २८ वर्षांच्या काळात- अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यापासून ते राम मंदिराच्या पायाभरणीपर्यंत- कधीकाळी लोकसभेच्या फक्त दोन जागांपुरता मर्यादित राहिलेला भाजप २०१४ आणि २०१९ मध्ये बहुमताने सत्तेवर आला. याउलट काँग्रेसचा अध:पतनाकडे प्रवास सुरू झाला. आज काँग्रेस सततच्या पराभवामुळे खचलेली दिसते. तर भाजप विजयोन्मादामुळे भान हरपल्याने दिशाहीन होतो आहे की काय, असे वाटत आहे. अन्यथा करोनाकाळात राम मंदिराची पायाभरणी होतीच ना. भाजपमध्ये आयात केलेले भुरटे आमदार, खासदार जरा उबदार हवेची झुळूक लागताच काँग्रेसमध्ये कधी उडी घेतील याचा भरवसा नाही. कुंपणावर बसलेल्या मतदारांचीही तशीच खात्री नाही, हे भाजपने ओळखून असावे.

अयोध्येत राम मंदिर होणार हा नारा भाजपला सत्तेत घेऊन आला. आता यापुढे भाजप मतदारांना कसे आकर्षित करून ठेवतो की ‘सब का साथ सब का विकास’ हा नारा विसरतो, यावर सगळे अवलंबून आहे.

मतदार कधीपासूनच खऱ्या रामराज्याच्या प्रतीक्षेत आहेत. मतदारांवर असलेली धर्माच्या अफूच्या गोळीची नशा करोना, चीनचे आक्रमण व आर्थिक संकटाच्या तिहेरी चटक्यामुळे उतरायला वेळ लागणार नाही. स्वप्नपूर्तीनंतर पोकळी तर निर्माण झालेली आहे खरी, ती आता कशी भरून निघते हे भविष्यात बघावयाचे. जे वर जाते ते खाली येते व जे खाली जाते ते वर येणारच, हा नियम भाजप व काँग्रेस दोघांनाही लागू होतो!

– राघवेंद्र मण्णूर, डोंबिवली (जि. ठाणे)

डॉ. आंबेडकरांच्या भाषणात या धोक्याचे सूचन..

सध्या नव्या भारताची उभारणी होत आहे. भारतीय राज्यघटनेला धक्का न लावता, भारतीय गणराज्य हिंदुराष्ट्रवादी म्हणजे हिंदू बहुसंख्याकवादी होत आहे. त्यावर ‘राजमुद्रा’ उठवली गेली आहे! स्वातंत्र्य चळवळीचा वारसा झुगारून देणारा ‘नवा भारत’ निर्माण होतो आहे!

घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ४ नोव्हेंबर १९४८ रोजी घटना समितीपुढे केलेल्या पहिल्या भाषणात या धोक्याचा इशारा दिला होता. ते म्हणाले होते, ‘संविधानाच्या प्रारूपात काहीही बदल न करता निव्वळ प्रशासनाच्या प्रारूपात व यंत्रणेत बदल करून संविधान पूर्णपणे निष्प्रभ करणे शक्य आहे. त्यायोगे प्रशासन संविधानाच्या गाभ्याशी विसंगत व विरोधी बनवणेही शक्य आहे.’ त्यामुळे संविधानात्मक मूल्यांच्या प्रचार-प्रसाराचे काम जसे आवश्यक आहे, तसेच प्रशासनिक संस्था व प्रशासन यांचे प्रारूप संविधानाच्या प्रारूपाशी सुसंगत राहील यावरही नजर ठेवावी लागेल. अन्यथा त्रेतायुगातल्या जीवनमूल्यांचा आधुनिक हिंदू भारत अटळ आहे!

– मोहन भोईर, कोलेटी-पेण (जि. रायगड)

हृदयातला राम आता राजकीय व्यासपीठावर..

आजपासून देव्हाऱ्यातला राम राजकीय होणार. धनुष्य रामाच्या उजव्या की डाव्या खांद्यावर, तो मुकुटधारी असावा की दाढीमिशीवाला.. या ना त्या कारणाने भावना दुखावल्या जाणार. मूर्तिकाराच्या किंवा चित्रकाराच्या तोंडाला काळे फासण्यासाठी नवीन दल, ब्रिगेड नाही तर प्रतिष्ठान उगवणार. घरात दररोज उठता बसता ‘अरे रामा’ म्हणताना, उद्या कधी श्रीरामाच्या नावामागे प्रभू असावे की नावानंतर चंद्र की त्याचे संपूर्ण नावच श्री रामराव दशरथराव अयोध्येकर (क्षत्रिय) असे लिहावे म्हणून रास्तारोको झाला तर आश्चर्य वाटायला नको.

असा हा हृदयात असणारा आमचा राम आता राजकीय व्यासपीठावर जाणार. अशा या भविष्यात वाढून ठेवलेल्या परिणामांची जबाबदारी राजकीय नेतृत्व घेईल काय?

– शिवप्रसाद महाजन, ठाणे