अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून ‘‘माझी हिंदू संस्कृती निराळी होती’’ ही कवी विष्णू खरे यांनी व्यक्त केलेली खंत (४ फेब्रु.) देशातली सद्य:स्थिती पाहता तंतोतंत खरी आहे. मात्र आपल्या उदात्त गतसंस्कृतीचे गोडवे अहोरात्र समाजमाध्यमांवर तसेच अन्यत्र गाणारे अभिजन हस्तीदंती मनोऱ्यातच राहत असून त्यांनी वास्तवापासून फारकत घेणे हीच बांधिलकी असल्याची स्वत:ची धारणा करून घेतली असल्याचे पदोपदी जाणवते. आजच्या आपल्या सणासमारंभांना आलेले विकृत अन् बाजारी स्वरूप पाहता आपला प्रवास संस्कृतिऱ्हासाच्या दिशेने चालल्याचे ठळकपणे जाणवते अन् याविरुद्ध आवाज उठविणे म्हणजे झुंडशाहीच्या पुंडाईला आमंत्रित करण्यासारखेच असल्यास्तव विवेकी माणूस गप्प राहणेच पसंत करतो. ही स्थिती आपला प्रवास अराजकाच्या वाटेवर चालल्याचे दर्शविते. तेव्हा आपल्या प्रथा, आचरण यात कालसुसंगत बदल करणे हीच संस्कृतिरक्षणाची खरी निकड आहे याची जाणीव आपल्याला जेव्हा होईल तोच आपला सुदिन.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– डॉ. किरण गायतोंडे, चेंबूर (मुंबई)

 

संमेलनाध्यक्षांचे भाषण आटोपशीर हवे

डोंबिवली येथे  मराठी साहित्य संमेलन पार पडले. उद्घाटन समारंभात  मुख्यमंत्र्यांसह सगळ्याच वक्त्यांनी आपले मुद्दे जोरकसपणे मांडले. प्रथेनुसार संमेलनाच्या अध्यक्षांचे भाषण सर्वात शेवटी होते. उद्घाटन सोहळ्यात संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे हे त्यांचे  मनोगत व्यक्त करण्यासाठी कार्यक्रम सुरू झाल्यानंतर सुमारे अडीच तासांनी उभे राहिले. दुपारपासून हजर असलेले साहित्यरसिक एवढा वेळ बसून कंटाळून गेले होते. संमेलनाच्या अध्यक्षांना त्यांची भूमिका मांडावयाची असते हे मान्य केले तरीही अध्यक्षांनी छापील भाषण वाचून दाखविण्याऐवजी त्याच्या प्रती उपलब्ध करून देऊन त्यांच्या मनोगतामधील प्रमुख मुद्दे थोडक्यात मांडायला हवे होते असे वाटते. छापील भाषण वाचून संपेपर्यंत उपस्थितांमधील अस्वस्थता दिसून येत होती.

– अ‍ॅड. सुरेश पटवर्धन, कल्याण</strong>

 

उणिवा झाकणारी ओरड सर्वासाठीच सोयीची

‘असे साहित्य, असे साहित्यिक’ या संपादकीयाबाबत (४ फेब्रु.) काही विचार मांडावेसे वाटतात. साहित्यिक हे समाजाचे मन आणि बुद्धी या दोहोंचे प्रतिनिधित्व कळत-नकळत करीत असतात. त्यामुळे जे साहित्य वाचकाच्या मनातले आणि बुद्धीतले नीटसे व्यक्त न झालेले पण जाणवलेले अस्पष्ट, धूसर असे काही तरी स्पष्ट, ठळक आणि रेखीव स्वरूपात व्यक्त करते ते वाचकाला चटकन भावते, मग ते त्याच्या मातृभाषेत असो किंवा त्याला येत असलेल्या दुसऱ्या कोणत्याही भाषेतले किंवा काळातले असो. म्हणून तर ऑर्वेल किंवा त्याच्यासारख्या लेखकांची लोकप्रियता ओसरत नाही. अक्षर वाङ्मय स्थळकाळाची बंधने तोडून टिकून राहते एवढेच नव्हे तर भाषेच्याही मर्यादांवर मात करते. म्हणून तर विविध युरोपीय देशांतील वाङ्मय इंग्रजीत त्याच्या झालेल्या अनुवादातूनदेखील आपण वाचतो आणि ते ज्या मूळ भाषेत लिहिले गेले त्या भाषेतल्या  वाचकांएवढेच ते आपल्याला आवडते. वाचनाची सवय कमी होत चालली आहे असा गळा काढणाऱ्या लेखक, प्रकाशकांना आपली पुस्तके वाचली जात नाहीत आणि त्याहीपेक्षा विकली जात नाहीत याचे जास्त वाईट वाटत असते, ही खरी व्यथा व्यक्त करायची असते हे लक्षात घ्यायला हवे. मराठी पुस्तके का खपत नाहीत याची खरी कारणे शोधण्यापेक्षा अलीकडे वाचनसंस्कृती लोपत चालली आहे हे म्हणणे आपल्या उणिवा झाकणारे म्हणून सोयीचे, सोपे असते.

– गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर (मुंबई)

 

दोन्ही परिघांबाहेरच्या आवाजापुढील यक्षप्रश्न

‘असे साहित्यिक, असे साहित्य’ हा अग्रलेख, ‘दाभोलकरांचे मारेकरी पकडाच’ हे पत्र व त्यावरचे ‘डॉक्टरबाजी जास्त हानिकारक’ हे प्रतिक्रियात्मक पत्र (३ व ४ फेब्रु.) एकाच मुद्दय़ाची दोन रूपे दर्शवतात. ‘ट्रम्पकाळ आला तरी कसा’ हे जाणून घेण्याचा प्रयत्न अनेक लोक विविध पुस्तके वाचून करत आहेत असे अग्रलेखात म्हटले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची कठोर अंमलबजावणी सनातनविरोधात करा असे आग्रही प्रतिपादन एका पत्रात आहे. ९५% लोक दाभोलकर आणि सनातन या दोन्ही परिघांच्या बाहेर आहेत आणि त्यांना पोलिसांची ऊर्जा समाजात बोकाळलेल्या गुंडगिरीविरोधात वापरली जावी असे वाटते असे दुसऱ्या पत्रात म्हटले आहे. त्या ९५% लोकांपुढे असा दोन्ही परिघांबाहेरचा खरा/ प्रामाणिक पर्याय आहे का, हा यक्षप्रश्न आहे. जो स्वत:ला तसे भासवू पाहतो तो प्रत्यक्षात तसा नाही हे त्या ९५% लोकांना स्पष्ट दिसते. त्यांना मुळात श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरकाचा कीस काढत अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणलाच का हेच समजलेले नाही. श्रद्धा जेव्हा सध्याच्याच कायद्यातील कलम ४२०, ३०२, ३५२ किंवा तत्सम कलमे ओलांडते तेव्हा ती अंधश्रद्धा होते आणि त्यावर त्याच सध्याच्या कायद्यांखाली कारवाई जरूर करावी असे ते ९५% लोक मानतात. इतकी सोपी व्याख्या असताना पूजाअर्चा, नवससायास, कोण स्वत:ला कोणाचा अवतार म्हणवते आणि लोकांना फसवते यावर वेगळ्या कायद्याची उठाठेव करण्यामागचा खरा हेतू काय, हा प्रश्न मग त्यांना पडतो. जे धर्मपीठ ‘अधिकृतपणे’ चमत्कार करण्याच्या क्षमतेवरच धर्मगुरूंची उतरंड सध्याच्या काळातही ठरवते त्याला ‘प्रगत’ पाश्चात्त्य जगातही चक्क राष्ट्राचा दर्जा कसा हेही त्या ९५% लोकांना प्रश्नात पाडते.

असेच काही यक्षप्रश्न अमेरिकेसारख्या देशातील जनतेलाही वेगळ्या संदर्भात नक्कीच पडले असावेत. तसे ते पडले की निवड करायला आपल्यापुढे पर्यायच नाही हेसुद्धा लक्षात येते आणि मग ट्रम्पकाळच त्यातल्या त्यात जास्त बरा वाटतो. इतके हे सारे सोपे आहे. त्याकरिता अमेरिकन जनता इतकी पुस्तके का वाचते आहे हासुद्धा एक यक्षप्रश्नच!

– प्रसाद दीक्षित, ठाणे

 

अंनिसचा सर्वच अंधश्रद्धांना विरोध

‘बुवाबाजीपेक्षा ‘डॉक्टरबाजी’ जास्त हानिकारक’ हे पत्र (लोकमानस, ४ फेब्रु.) वाचले. पत्रलेखकाची ही प्रतिक्रिया ‘अंनिस’ तसेच वस्तुस्थितीविषयीच्या पूर्णत: अज्ञानातून आलेली दिसते. तसेच त्यात विसंगतीसुद्धा आहे. समाजात गुंडगिरी वाढलेली असताना सनातनच्या आश्रमावर धाडी घालणे, झडती घेणे हे प्रस्तुत लेखकास अनावश्यक वाटते. पण या धाडी पोलिसांनी का घातल्या, त्या धाडीत काय सापडले, याविषयी ते सोयिस्कर मौन बाळगतात. आरोपी गुन्हेगारांवरील गुन्हा सिद्ध करण्यासाठी, पुरावे गोळा करण्यासाठी, त्याची चौकशी करणे, धाडी घालणे हे पोलिसांचे कामच आहे. हे कामच प्रस्तुत लेखकांस अनावश्यक वाटते हे अत्यंत धक्कादायक आहे. ते नाही केले तर गुन्हेगारांवरील आरोप सिद्ध कसे होणार, गुंडगिरी कमी कशी होणार?

ते स्वत:ला अशा ९५ टक्के लोकांपैकी एक मानतात जे दोन्ही परिघांच्या बाहेर आहेत. परंतु प्रतिक्रियेच्या पुढील भागात अंनिसवर बिनबुडाची टीका करून ते कोणत्या परिघात आहेत ते दाखवून देतात. पशुबळी ही प्रथा जशी काही मुस्लिमांतच आहे असा पत्रलेखकाने ग्रह करून घेतला आहे. तरीही, बकरी ईद (मुसलमानांचा सण)च्या वेळी, पशुबळीला विरोध म्हणून अंनिस रक्तदान शिबीर घेते हे मात्र लेखकांस माहीतच नसावे हे आश्चर्यकारक आहे. अंनिसने वसईच्या ख्रिश्चन बाबाच्या विरोधात उभारलेली मोहीम व त्याला करविलेली अटक ही सर्वश्रुत आहे. बुवाबाजीच्या गुन्ह्य़ात अटक केलेल्या बुवांपैकी जवळपास ४० टक्के बाबा मुस्लीम आहेत. अंनिस सर्वच अंधश्रद्धांना विरोध करते. कुणाला आपुलकी वाटावी यासाठी अंनिस काम करीत नाही. मजेची बाब म्हणजे ‘हिंदूंनाच डोस कशासाठी’ म्हणून गळा काढणारे लोक ज्या वेळी अंनिस इतर धर्मीयांच्या अंधश्रद्धांविरुद्ध काम करते तेव्हा मात्र घाबरून लपून बसलेले असतात किंवा तात्पुरत्या मौनात जातात. अंनिसच्या खांद्याला खांदा लावून लढायला ते पुढे येत नाहीत.

– उत्तम जोगदंड, कल्याण

 

निर्दोष सुटणाऱ्यांसाठी पुरस्काराची तरतूद आहे ?

‘गुजरात दंगलीतील आरोपी मुक्त’ ही बातमी (४ फेब्रु.) वाचली. गोध्रा कांडातील हे २८ आरोपी होते. जाळपोळ, दंगल माजविणे आणि अल्पसंख्याक समाजाच्या मालमत्तेचे नुकसान करणे आदी आरोप या २८ जणांवर होते. आरोपींसमवेत तडजोड करण्यात आल्याने आता आपल्या मनात कोणाबद्दलही अढी नसल्याचे साक्षीदारांनी न्यायालयास सांगितले. किती छान झाले. आज देशात १३८७ तुरुंग असून त्यांची क्षमता ३,५६,५६१ इतकी आहे. प्रत्यक्षात आज घडीस ४,१८,५३६ जण तुरुंगात आहेत. जे. कृष्णमूर्तीनी म्हटले आहे की, कुणी स्वत:हून तुरुंगात किंवा शाळेत जात नाही. शाळेचे जाऊ  द्या, कुणी कशाला तुरुंगात जावे हो? बातमीत म्हटले आहे की, साक्षीदारांनी मनाचा मोठेपणा दाखवून ‘तडजोड’ केली व प्रश्न निकालात निघाला. त्यांनी तडजोडीच्या अटी व दरपत्रक जाहीर केले असते तर फार छान झाले असते. असे झाले तर कोर्टावरील भार किती कमी होईल. आधीच या देशात हजारो दावे प्रलंबित आहेत, तशात न्यायमूर्तीच्या नेमणुकीचा वाद आहे. निर्दोष सुटणाऱ्यांसाठी पद्म पुरस्काराची काही तरतूद आहे का हो भाऊ ?

– फादर फ्रान्सिस दिब्रिटो, वसई

 

ही कडू गोळी पचवावी लागणार

‘ट्रम्पकाळ : पहिले तेरा दिवस’ या संकलनामधील (रविवार विशेष, ५ फेब्रु.) ‘व्हिसा धोरणात बदल..’ ही चौकट वाचून आणि त्याचे भारतावर होणारे परिणाम वाचून पटकन वाटले की, हे कधी ना कधी होणारच होते. कारण गेली अडीच दशके मुलगा/ मुलगी एमएस करायला यूएसला जाणे, मग तिथेच नोकरी, लग्न करून स्थायिक होणे हा भारतात पायंडा पडलेला होता. उरलेले मग इन्फोसिस, विप्रो, टीसीएसच्या माध्यमातून तिथे जायचे. एकूण काय, डेस्टिनेशन यूएस हा युवावर्गाचा आणि त्यांच्या पालकांचा ध्यास असायचा. ज्यांची मुले हे ‘कर्तृत्व’ दाखवू शकली नाहीत त्यांना व त्यांच्या पालकांना पराभव झाल्यासारखे वाटायचे/ वाटते. आता व्हिसाचे नियम बदलल्यावर हे चित्र नक्कीच बदलणार यात वाद नाही. भूमिपुत्रांना प्रथम प्राधान्य हवे असे आपण म्हणतो तेच ट्रम्प म्हणत आहेत तेव्हा ही कडू गोळी आपल्याला पचवायलाच लागणार.

– माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)

 

मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta readers letter
First published on: 06-02-2017 at 00:05 IST