‘उजडे हैं कई शहर..’ हा अग्रलेख (३१ मार्च) वाचला. नुकत्याच काही राज्यांतल्या विधानसभा तसेच राज्यातील नगरपालिका, जिल्हा परिषदा आदींच्या निवडणुका पार पडून सत्ताधारी पक्षाला अनपेक्षित यश मिळाले. जनताही चांगले दिवस येतील या अपेक्षेने सुखावली; पण कसचे काय? एकीकडे बँकांचे कर्जावरचे व्याजदर घटले असताना जनतेच्या ठेवीवरील व्याजदरही अडीच ते तीन टक्क्यांपर्यंत घसरून निव्वळ ठेवीवरील व्याजावर घरखर्च भागविणाऱ्या निवृत्तांचे नित्याचे जगणे असह्य़ होऊन बसले. दुसरीकडे व्याजदर कमी झाले म्हणून घरकुलाचे स्वप्न पाहणाऱ्या सामान्यांना वार्षिक बाजार मूल्यवाढीचा फटका कमी म्हणून की काय, तर महापालिकाही स्थावर मालमत्तेवर एक टक्का अधिभार लावू इच्छित आहे. म्हणजेच केंद्र, राज्य अन् पालिका अशा तिन्ही स्तरांवर अच्छे दिनाच्या स्वप्नांना सुरुंग लावण्याचे काम होत आहे. तेव्हा जनतेने किमान पाच वर्षे तरी ‘मना त्वांचि रे पूर्वसंचित केले, तयासारिखे भोगणे प्राप्त झाले’ या समर्थ रामदासांच्या उक्तीनुसार विरक्त राहावे हे खरे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. किरण गायतोंडे, चेंबूर (मुंबई)

 

हे लोकशाही व्यवस्थेसाठी अयोग्य

अलीकडे न्यायालय स्वत:चे न्यायदानाचे काम सोडून प्रशासनाचे, विधिमंडळाचेदेखील काम करताना दिसतात. बीसीसीआयपासून ते दुष्काळ निवारण करण्यासाठी काय करायचे हे स्वत:च ठरवतात. दुसरीकडे संसद, विधिमंडळे बँकेचे, आरबीआयचे काम बघण्यास उत्सुक आहेत (नोटाबंदी), तर माध्यमे रोज रात्री चर्चेच्या नावाने स्वत: न्यायदानाचे काम हाती घेण्यास उत्सुक दिसतात. न्यायमंडळ, विधिमंडळ, कार्यकारी मंडळ हे लोकशाहीतील तीन खांब मानले जातात, तर माध्यमे चौथा खांब मानला जातो. प्रत्येकच खांब दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करण्यात उत्सुक आहे. त्यात आता मुंबईची संस्कृती वा पत्रकारांचा पेहराव यावरदेखील न्यायालय टिप्पणी करू लागले आहे. ही सर्व येणाऱ्या काळात लोकशाही ठिसूळ करणारी लक्षणे आहेत, त्यात भर म्हणजे नव्याने सुरू झालेली ‘व्यक्तिपूजा’. हे सर्व संविधान व लोकशाहीला योग्य नाही.

आशुतोष बाफना, पुणे

 

शेतकऱ्यांच्या घामाचे मोल नाही..

खासदार राजू शेट्टी यांच्या ‘शेती : गती आणि मती’ सदरातील ‘प्रवृत्ती तशीच कशी?’ (२९ मार्च) हा लेख वाचून वाटले की, ‘या लोकसभेत नाही, या विधानसभेत नाही.. शेतकऱ्यांच्या घामाचे मोल कुठेच नाही’. आमदारांच्या पगारवाढीचे विधेयक एकमताने संमत होते आणि शेतकऱ्यांची वेळ आली की तिजोरीत खणखणाट असतो किंवा शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याची काळजी विरोधकांनीच घ्यावी, अशी सरकारची अपेक्षा असते! शेतकऱ्यांबद्दल पोटतिडिकीने बोलणारे शेट्टी यांच्यासारखे लोकप्रतिनिधी कमीच असतात.

योगेश पोटे, दर्यापूर (अमरावती)

 

अशी वाहन खरेदी हा निव्वळ बिनडोकपणा

सर्वोच्च न्यायालयाने, आज १ एप्रिलपासून बीएस-३ दर्जाच्या वाहनांची विक्री आणि नोंदणी करण्यावर प्रतिबंध घातल्याने वाहननिर्मात्या कंपन्यांचे धाबे दणाणले आणि ग्राहकांवर सवलतींचा पाऊस सुरू झाला. बीएस-३ दर्जाच्या वाहनांतून होणारे प्रदूषण रोखले जावे हा न्यायालयाचा उद्देश होता; पण त्यास हरताळ फासत काही तासांतच त्या वाहनांची विक्रमी विक्री होणे प्रदूषणवाढीस हातभार लावणारे आहे. आताच्या वायुप्रदूषणाने घुसमट तर होतच आहे, त्यात आता बीएस-३ वाहनांची अचानकपणे अधिकची भर पडल्याने वायुप्रदूषणाची पातळी उंचावल्याचे घातक परिणाम सोसावे लागणार आहेत. ज्यामुळे प्रदूषण वाढते ते माहीत असूनही सवलत मिळत असल्याने तिची खरेदी करणे म्हणजे निव्वळ बिनडोकपणा आहे. वाढत्या प्रदूषणापेक्षा प्रदूषण करणाऱ्या बीएस-३ दर्जाच्या वाहनाच्या घसरलेल्या किमती महत्त्वाच्या वाटल्या. याचा अर्थ हाच की, प्राणापेक्षा प्रदूषण प्रिय आहे, असाच विचार सवलतींवर उडय़ा मारणाऱ्या ग्राहकांनी केल्याने प्रदूषण कमी करण्यास नाही, तर ते वाढवण्यास कोणत्या पातळीला जाऊ  शकतात हे दाखवून दिले आहे. वाहननिर्मात्या कंपन्यांनी बीएस-३ दर्जाच्या वाहनांवर सवलत दिली, पण प्रदूषणाकडून तशी कोणतीच सवलत मनुष्याला मिळणार नाही.

मानसी जोशी, मुलुंड (मुंबई)

 

ईश्वरेच्छा बलियसी!

सर्व धार्मिक श्रद्धावंत, मग ते कोणत्याही धर्माचे असोत, असे मानतात की, जगातील प्रत्येक घटना देवाच्या, अल्लाच्या, प्रभूच्या इच्छेनेच घडते. त्याच्याहून श्रेष्ठ कोणीही नाही. अयोध्येत पूर्वी जेथे राम मंदिर होते ते पाडून तिथे बाबरी मशीद बांधली, असे म्हणतात. ते ईश्वरी इच्छेनेच घडले, कारण ‘आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चालेना’. नंतर ती बाबरी मशीद पाडली, तीसुद्धा देवाची तशी इच्छा होती म्हणूनच, कारण ‘ईश्वरेच्छा बलियसी’. नंतर दीर्घकाळपर्यंत तिथे राम मंदिर बांधता आले नाही, कारण ते व्हावे अशी देवाची इच्छा नसावी. त्याची इच्छा असती तर मंदिर उभे राहिलेच असते.

यावरून दिसते की, त्या जागी मंदिर नको तसेच मशीदही नको, अशीच देवाची इच्छा असणार. हे सर्व धार्मिकांच्या श्रद्धेनुसारच आहे. म्हणून आता त्या स्थानी कोणतेही देवालय न उभारता विद्यालय, ग्रंथालय, रुग्णालय अशी एखादी सर्व समाजोपयोगी वास्तू उभारावी; तरच ते देवाच्या इच्छेप्रमाणे झाले असे म्हणता येईल.

प्रा. य. ना. वालावलकर, पुणे

 

यज्ञ स्वीकारणे म्हणजे विवेकानंदांना नाकारणे

यज्ञाचे मोठेपण सांगणारे पत्र (लोकमानस, ३० मार्च) वाचले. वीर सावरकरांप्रमाणे विवेकानंदपण विज्ञाननिष्ठ आहेत. त्यांनी यज्ञ नाकारले. सप्टेंबर १८९६ मध्ये वराहनगर मठातील आपला मित्र शशी, ज्यांना रामकृष्णानंद असेही म्हणतात, त्यांना पत्र पाठवून कळविले, ‘मी सामाजिक रीतीभातींना चिकटून राहणारा, सनातनी, पुराणमताभिमानी हिंदू नाही. यज्ञासारखी कर्मे प्राचीनकाळी उपयुक्त होती, परंतु आधुनिक काळात ती उपयुक्त नाहीत’.

दत्तप्रसाद दाभोळकर, सातारा

 

मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta readers letter
First published on: 01-04-2017 at 03:25 IST