विरोधी पक्ष म्हणून भाजपने विधायक काय केले?

या काळात विरोधी पक्ष म्हणून भाजपने काय दिवे लावले हे जनतेला कळले असते तर ते अधिक रोचक झाले असते.

‘महाविकास आघाडी’ सरकारच्या दोन वर्षे पूर्तीचा वेध घेणारा लोकसत्ता (अंक २८ नोव्हेंबर) वाचला. यात सरकारच्या बाजूने केलेले भाष्य समयोचित होते. पण विरोधी पक्षाची बाजू मांडणाऱ्या लेखांमध्ये टीकेव्यतिरिक्त या सरकारची कामगिरी मांडली गेली असती तर अधिक उत्तम झाले असते कारण सरकारबरोबरच विरोधी पक्ष या भाजपच्या भूमिकेलाही दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात विरोधी पक्ष म्हणून भाजपने काय दिवे लावले हे जनतेला कळले असते तर ते अधिक रोचक झाले असते. भाजप आजही सत्ता हातून निसटल्याच्या सुतकातून बाहेरच आलेला दिसत नाही. जनतेचा कौल या तीन पक्षांना नव्हता अशी खदखद व्यक्त करताना आशीष शेलार हे का स्पष्ट करत नाहीत की पुरेशा संख्याबळाअभावी तो त्यांच्याही पक्षाला नव्हता. मग त्यांना आपल्या मित्रपक्षाला बरोबर घेण्यात आलेले अपयश ते का लपवतात? मुलीवर लग्नाची जबरदस्ती, पण संसार मीच चालवणार, तुला रांधा वाढा खरकटी काढा हीच कामे करावी लागतील या अटींवर कोण सोयरीक जुळवेल? तरीही तुम्ही दादांशी हातमिळवणी करत दीड दिवसांच्या सरकारचा विक्रम महाराष्ट्राच्या इतिहासात नोंदलाच ना? त्यालाही दोन वर्षे झाली. त्याचे मूल्यमापन महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेने भाजपची विश्वासदर्शक ठळक कामगिरी असे करायचे का?

गेल्या दोन वर्षांत सरकार अभूतपूर्व अशा वैश्विक महासाथीशी झुंजत असताना विरोधी पक्ष विविध आंदोलने करून सरकारला अडचणीतच आणताना महाराष्ट्राने पाहिला. फडणवीस महाराष्ट्रभर दौरे काढत होते त्याऐवजी एकदा दिल्लीत जाऊन महाराष्ट्राची जीएसटीची थकबाकी घेऊन आले असते तर इथल्या सरकारची बोलती बंद झाली असती. सुधीर मुनगंटीवार यांनी ‘दोन वर्षांत करोनामुळे राज्य सरकारला आर्थिक तूट किंवा कर्ज जास्त घ्यावे लागले यात काही अंशी सत्यता आहे’, हे आपल्या लेखात कबूल करण्याचा मोठेपणा दाखवला आहे. पण त्याच वेळी कंगना राणावत, अर्णव गोस्वामी, समीर वानखेडे ही भुतावळ महाराष्ट्राच्या माथी कोणी मारली हेही कबूल करायला हवे होते. सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा बिहारच्या निवडणुकीत वापर केला गेला, पण सीबीआयने आजतागायत त्याचा तपासणी अहवाल का सादर केला नाही? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे भाजपला द्यावीच लागतील.

अ‍ॅड. एम. आर. सबनीस, अंधेरी (मुंबई)

विरोधकांची आंदोलने, यात्रा यांचे फलित काय?

‘वर्धापनाच्या तुटीची जमा’ या समर्पक शीर्षकाचा आजचा अग्रलेख संतुलित आहे. मी भाजपचा पारंपरिक मतदार. परंतु कोणताही प्रशासकीय अनुभव नसलेल्या उद्धव ठाकरे यांनी ज्या धीराने गेली दोन वर्षे राज्यकारभार सांभाळला त्याचे कौतुक करायलाच हवे. त्याच जोडीला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची कामगिरीही उल्लेखनीय म्हणावी लागेल. या संकटकाळात नितीन गडकरी यांनी राज्याला थोडाफार आधार दिला. मात्र सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या भाजपचे या काळातील वर्तन संपूर्णपणे बेजबाबदारपणाचे आणि अतिशय आक्रस्ताळे होते. हे उघडा, ते चालू करा, विजेची बिले कमी करा अशी अनेक आंदोलने केली गेली आणि गुंडाळलीही गेली. ठिकठिकाणी तथाकथित यात्रा काढल्या गेल्या त्यांचे फलित काय? रोजच्या रोज विविध वृत्तवाहिन्यांवर चमकून तारस्वरात टीका करणाऱ्या विरोधी पक्षाने करोनासंकटात राज्यासाठी आणि येथील जनतेसाठी नक्की काय केले याचा लेखाजोखा मांडायला हवा. मतदारांचे सगळीकडे लक्ष असते याचे भान प्रत्येक राजकीय पक्षाने ठेवावे.

अभय विष्णू दातार, मुंबई

कमलाकरांचा भविष्यवेध

पहाटेच्या स्वप्नाला दोन वर्षे झाली. म्हणजेच महाविकास आघाडीच्या उदयाला दोन वर्षे झाली. अर्थातच ज्यांनी सत्तेत येण्याची स्वप्ने पहाटे बघितली त्यांची स्वप्ने सूर्योदय होताच लुप्त पावली. पण, ज्यांना स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते ते मात्र सत्तेत आले.

आज कोसळणार उद्या कोसळणार म्हणता म्हणता दोन वर्षे झाली. ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’चा आलाप लावणाऱ्या पहाटेच्या ‘वासुदेवां’च्या पदरी मात्र घोर निराशा पदरी पडलेली आहे. बंद खोलीतील फॉम्र्युला वापरला असता तर, इथून पुढे सहा महिन्यांनी वासुदेवांचे कमळ फुलले असते. अडीच वर्षे सत्तेत असते. आज देशभरात मरगळलेल्या पक्षांना महाराष्ट्रातील राजकारणाने ऊर्जितावस्था दिली. त्याचे प्रत्यंतर पोटनिवडणुकीच्या निकालानंतर दिसलेच आहे. तीनचाकी रिक्षा काय किंवा अन्य अनेक विशेषणांनी महाविकास आघाडीच्या नावाने खडे फोडणाऱ्या व रोजच्या रोज पडणार पडणार म्हणून भाकीत वर्तविणाऱ्या ‘कमलाकरांची’ पंचाईत झालेली आहे. तीनचाकी असली तरी करोनासारख्या जागतिक महासाथीत मोठय़ा संयमाने या रिक्षाचालकांनी प्रवास केलेला आहे. कमलाकरांनी आता भविष्यवेधापेक्षा कमलानिवासात चिंतन शिबीर आयोजित करण्याची वेळ आली आहे.

दत्तप्रसाद शिरोडकर, मुलुंड (मुंबई)

सर्वच राजकीय पक्षांनी तमाशाचे फड उभे केले

‘महाविकास आघाडी सरकार म्हणजे तीन पक्षांचा तमाशा’ ही बातमी (२९ नोव्हेंबर) वाचून खरोखर मनोरंजन झाले. आशीष शेलार हे विसरतात की वाजपेयींपासून भाजपने तमाशाचा फडच उभा केला आहे हे सर्वश्रुत आहे. तमाशाचा कळस गाठला तो काश्मीरमध्ये पाकिस्तानी पुरस्कृत दहशतवाद्यांशी साटेलोटे असणाऱ्या पीडीपीसह सत्ता उपभोगून. तसे पाहावयास गेले तर सर्वच राजकीय पक्षांनी तमाशाचे फडच उभे केले आहेत, हे माझ्यासारखे पक्षीय बांधिलकी नसणारे नागरिक जाणून आहेत. तेव्हा शेलारांनी नसती वटवट करू नये. झाकली मूठ नेहमीच सव्वा लाखाची असते हे लक्षात ठेवावे.

चंद्रशेखर सु. खारकर, ठाणे

चला, त्यांनीच दिली तमाशाची कबुली

‘मविआ सरकार म्हणजे तीन पक्षांचा तमाशा’ हे आशीष शेलार यांचे वक्तव्य वाचले. हे रूपक गेल्या काही वर्षांत राजकारण हा केवळ तमाशा बनत चाललेला असल्याची नकळत किंवा अप्रत्यक्ष दिलेली कबुली समजायला हरकत नाही. जनतेने दोन पक्षांचा तमाशा पाच वर्षे पाहिला. त्यातील काही कलावंतांनी फड सुटल्याने प्रेक्षकांमध्ये बसून खेळ बंद पाडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही हेपण पाहिले. आता येत्या तीन वर्षांत या असंतुष्ट त्रस्त समंधांनी बिनपैशाचा आपला खेळ बंद करण्याचा समंजसपणा दाखवावा हे उत्तम!

गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर (मुंबई)

महाविकास आघाडीच्या यशाचे श्रेय भाजपलाच!

‘वर्धापनाच्या तुटीची जमा!’ हे संपादकीय (२९ नोव्हेंबर)वाचले. यात सरकारच्या जमेचा रकाना भरण्यास कारणीभूत विरोधी पक्षाची आणखी जनतेला न आवडलेली गोष्ट म्हणजेच आंदोलने व पीएम केअरला मदतीचे आवहान! जनता मुख्यमंत्र्यांच्या सूचनेचे पालन करत असताना विरोधी पक्ष मात्र घंटानाद करायला सांगत होता, ही गोष्ट अनेकांना खटकली.

सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात सापडत असताना राज्यातील विरोधी पक्षाच्या पहिल्या फळीतील नेत्यांपासून तालुका तसेच गावपातळीवरील कार्यकर्त्यांपर्यंत सगळेजण पीएम केअरला मदत करण्यासाठी विविध माध्यमांतून आवाहन करत होते. ही बाब पाहता भाजप महाराष्ट्रद्रोही आहे ही प्रतिमा जनतेपर्यंत पोहोचवण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली व सरकारला सहानुभूती मिळाली.

याचे सर्व श्रेय अर्थातच भाजपचेच!

माधव धोंडिबा बामणपल्ले, नांदेड

गावपातळीपासून सावधगिरी बाळगणे गरजेचे

‘देशभर सतर्कता!’ ही बातमी (२८ नोव्हेंबर )वाचला. दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळून आलेल्या करोनाच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणू प्रकारामुळे अवघ्या जगाच्या चिंता वाढल्या आहेत. भारतानेही आता याबाबत सावध पावले टाकायला सुरुवात केली आहे. ज्या विभागात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत, त्या विभागाकडे प्रशासनने अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ओमायक्रॉन विषाणूचा ग्रामीण भागात शिरकाव होऊ नये यासाठी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावागावात लसीकरणासंदर्भात जनजागृती करावी. स्थानिक प्रशासनाने शासनाच्या विविध योजना राबवून लसीकरणाचा वेग वाढवावा. शासनाच्या वेळोवेळी मिळालेल्या दिशानिर्देशाचे नागरिकांनी पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.

सुरेश रामराव पेंदोर, मु. गोंडखेडा(कोपरा ), जि. नांदेड

लसीबाबत कर्नाटक सरकारची भूमिका दुटप्पी

‘दोन डोस लसीकरणाचे प्रमाणपत्र असणाऱ्या भारतीय नागरिकांना जगभरातील ९६ देशांनी आपल्या देशाची दारे उघडली’ ही बातमी वाचत असतानाच कर्नाटकाने महाराष्ट्र व केरळ राज्यातील नागरिकांना दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र असूनसुद्धा आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याशिवाय प्रवेश देणार नाही, ही अट कायम ठेवल्याची बातमी वाचनात आली. अशी दुटप्पी भूमिका घेऊन वास्तविक कर्नाटक महाराष्ट्रातील नागरिकांची अडवणूक करीत आहे. लसीकरणासाठी देशपातळीवर जोरदार प्रयत्न चालू आहेत. अशा वेळी लसीकरणावर देशातीलच एक राज्य शंका कशी काय घेते? त्यामुळे लसीबाबत जनतेतही निरुत्साह निर्माण होऊ शकतो. या राज्याचा लसीकरणावर भरवसा नाही असे म्हणावे तर कर्नाटकात जोरदार लसीकरण मोहीम सुरू आहे. नागरिकांमध्ये करोना संसर्गाची कोणतीही लक्षणे नसताना, त्यांनी दोन डोस घेतलेले असताना कर्नाटककडून आरटीपीसीआर चाचणीच्या अहवालाची सक्ती करून जनतेचा पैसा व वेळ वाया घालवला जात आहे. केंद्र सरकारने हस्तक्षेप करून देशभरात करोनाबाबत एकच नियम सगळीकडे लागू असल्याचे जाहीर करणे गरजेचे आहे.

– मोहन मनोहर खोत, रेंदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta readers mail loksatta readers reaction loksatta readers letters zws 70

ताज्या बातम्या