‘कडे कडेचे मध्ये आल्यास..’ हा अग्रलेख (७ जून) वाचला. कडे कडेच्या व्यक्ती व संघटनांचा वापर करून आपली राजकीय उद्दिष्टे साध्य करणे, हे भाजपच्या कारभाराचे प्रमुख सूत्र झाले आहे. ‘नरो वा कुंजरो वा’ या तत्त्वाने चालण्याच्या या नीतीमुळे सवंगता व बेजबाबदारपणा मात्र वाढीस लागला आहे. याकडे कडेच्या व्यक्ती व संघटना भाजपची रेषा मोठी करण्यापेक्षा विरोधकांची रेषा लहान करण्यात धन्यता मानत असल्याने राजकारणात नकारात्मकता वाढली आहे. मुळातच सोपविलेले कार्य विधायक नसल्यामुळे अशा शक्ती मध्यभागी आल्यास त्यांना नियंत्रित करणे अवघड होते व त्यामुळे समाजात अराजकता वाढते. गोमांस बाळगण्याच्या आरोपावरून गेलेल्या झुंडबळीपासून ते करोनासह प्रत्येक गोष्टीला हिंदू-मुस्लीम रंग देऊन समाजात द्वेषभावना वाढीस लावणाऱ्या अनेक घटनांनी हे सिद्ध केले आहे. सर्वोच्च नेतृत्व अशा घटनांवर नेहमीच धोरणात्मक मौन धारण करते. त्यामुळे जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीचे जगभर धिंडवडे मात्र निघत आहेत.

या व्यवस्थेचा आधुनिक लोकशाही आधारित राष्ट्रनिर्माणापेक्षा मध्ययुगीन धर्मआधारित राष्ट्रनिर्माणाकडे ओढा अधिक आहे. त्यामुळे भ्रामक ऐतिहासिक दाखले देत आधुनिकतेला तिलांजली देण्याचे उद्योगदेखील सुरू आहेत. जनतेने मोठय़ा अपेक्षेने रोजगार व विकासासाठी भाजपला दोनदा बहुमत दिले, पण आर्थिक व विकासाच्या आघाडीवर सपशेल अपयशी ठरल्याने अगतिक झालेल्या भाजपने जनतेला भ्रमित करण्यासाठी धर्मविचाराचे भ्रामक जाळे विणले आहे. नूपुर शर्मा, नवीन जिंदल आणि अन्य तत्सम हे या अगतिकतेचे प्रतिनिधित्व करतात. या भ्रामक धर्मविचारांच्या प्रसारासाठी पराकोटीचा काँग्रेसद्वेष व मुस्लीमद्वेष ही दोन प्रमुख अस्त्रे आहेत. प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी गणितात ‘क्ष’ चा आधार घेतला जातो, पण येथे मात्र आपल्या नाकर्तेपणामुळे उद्भवलेल्या प्रत्येक अनुत्तरित प्रश्नांसाठी काँग्रेस व मुस्लीम या दोन ‘क्षं’ना जबाबदार धरले जात आहे. त्यामुळे महागाई, बेरोजगारीसारख्या जनतेच्या समस्यांचे, लडाखमधील चिनी आक्रमणामुळे उद्भवलेल्या देशाच्या सुरक्षेच्या प्रश्नाचे व एकंदरीत देशाच्या विकासाचे गणित मात्र अवघड होऊन बसले आहे.                                                                                                     

हेमंत सदानंद पाटील, नालासोपारा

शेफारलेले कार्यकर्ते आणि संघटना जबाबदार

भाजप या हिंदू धर्म संघटनेप्रमाणे काम करणाऱ्या पक्षाच्या हाती आज भारत या कथित धर्मनिरपेक्ष राष्ट्राचे व्यवस्थापन असल्यामुळे जे झाले ते देशाच्या अब्रूचे धिंडवडे काढणारे ठरले आहे. संभाव्य विश्वगुरुपदालाच धक्का लागेल, हे लक्षात आल्यानंतर मठाधिपतींना जाग येणे स्वाभाविकच आहे. या अवस्थेला जबाबदार आहेत समाजमाध्यमांवर सक्रिय असलेले शेफारलेले कार्यकर्ते आणि त्यांना लाडावून ठेवणारी संघटना. घरात गोमांस सापडल्याच्या संशयावरून हत्या करण्याचा ‘पराक्रम गाजवणारे’ आता मुक्ताफळे उधळण्यात दंग आहेत.

प्रमोद तावडे, डोंबिवली.

कतार, कुवेत, इराणमुळेच कारवाई

पैगंबरांविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी भाजपने आपल्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना निलंबित केले आहे, पण त्यांची पक्षातून हकालपट्टी केलेली नाही, हे लक्षात घेण्यासारखे आहे. म्हणजे जिथे शस्त्रक्रियेची गरज होती, तिथे केवळ मलमपट्टी केली आहे. वास्तविक नूपुर शर्मा या हिमनगाचा केवळ एक अष्टमांश भाग आहेत. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय तसेच टीव्हीवरील चर्चेत अनेकदा मर्यादा सोडून बोलणारे संबित पात्रा मात्र मोकळेच आहेत. नूपुर शर्मा यांच्या वक्तव्यावर कतार, कुवेत, इराणमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या म्हणून त्यांच्यावर नावापुरती कारवाई करण्यात आली.

संजय चिटणीस, मुंबई

आखाती देशांची नाराजी परवडणार नाही

‘कडे कडेचे मध्ये आल्यास’ हे संपादकीय (७ जून) वाचले. राजकीय नेते सामाजिक विषयाचा वापर राजकारणासाठीच करतात. म्हणूनच की काय सत्ताधारी राजकारणी आज अजिबात गरज नसताना ‘काश्मीर फाईल्स’, ज्ञानवापी, भोंगे वगैरे राजकीय फायदा मिळवून देणारे परंतु राष्ट्रहितास धोकादायक असलेले मुद्दे उकरून काढत आहेत.

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तोंडावर काश्मीर फाईल्सचा वापर करून घेण्यात आला. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भोंगे बाहेर येणारच होते. नूपुर शर्मा यांच्या पैगंबरांविषयीच्या वक्तव्याकडे १० दिवस डोळेझाक केली गेली. हिंसा होऊन जाईपर्यंत निष्क्रियता दाखवण्याची सवय जुनी आहे. काय गोध्रा हत्याकांडात हिंदूंवर कारवाई झाली तशी आता होऊ, नये म्हणून अल्पसंख्याकांनाच भडकवून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. आतंरराष्ट्रीय स्तरावर प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर शर्मा आणि जिंदल यांच्यावर कारवाई करण्यात आली. मधल्या काळात परराष्ट्र धोरणाच्या नावाखाली नरेंद्र मोदींनी जे दौरे केले त्यांचे फलित होण्याऐवजी या धोरणाला धक्के बसू लागले आहेत. युक्रेन युद्धाबाबत भारताच्या भूमिकेमुळे अमेरिका आणि युरोप नाराज असतानाच,आखाती देश नाराज होणे, परवडणार नाही.

आदित्य भांगे, नांदेड

अन्यथा हिंदूंच्या सहिष्णू प्रतिमेला तडा जाईल

केवळ ‘कडेला’ असलेलेच हेतुपुरस्सर बाष्कळ परंतु द्वेषपूर्ण वक्तव्ये करतात असे नाही. मध्यस्थानी असलेल्या विविध मान्यवरांनीही अशी वक्तव्ये केल्याची उदाहरणे आहेत. विद्यमान पंतप्रधान आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ‘हम पांच, हमारे पच्चीस’ असा वाक्प्रचार वापरला. गृहमंत्र्यांनी आहार व पेहराव यावरून व्यक्तीचा धर्म ओळखता येतो, या

आशयाचे वक्तव्य केले होते. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची तर अनेक वक्तव्ये कमालीची जहाल होती.

अरब, मुस्लीमबहुल आणि पाश्चिमात्य देशांतून यापूर्वीही गोरक्षा, लव्ह जिहादमुळे झालेल्या अत्याचारानंतर प्रतिक्रिया उमटल्या होत्या. चीनमध्ये मुस्लिमांवर अत्याचार होताना हे अरब देश काहीच का बोलले नाहीत, असा प्रतिवाद होत आहे. याचे साधेसुधे कारण आहे ते चीनची आर्थिक आणि संरक्षण क्षमता. जागतिक राजकारणात भावना, विचारधारा यापेक्षा या क्षमता निर्णायक ठरतात. देशाच्या हितासाठी ‘कडे कडे’ वरील उपद्रवींचा बंदोबस्त करणे आणि मध्यभागी असलेल्यांनी मुत्सद्देगिरीने वागणे आवश्यक आहे. अन्यथा जगातील भारताच्या शांतताप्रिय आणि हिंदू धर्माच्या सहिष्णू प्रतिमेला तडा जाईल.

अ‍ॅड. वसंत नलावडे, सातारा

कंगना, केतकीला आवरले असते तर?

‘कडे कडेचे मध्ये आल्यास..’ हा अग्रलेख (७ जून) वाचला. खरे तर भाजप हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झालेला सज्जन पक्ष, पण दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून त्यांच्या पक्षातील वाचाळ नेते,  प्रवक्ते आणि त्यांचे अप्रत्यक्ष समर्थन करणारे वक्ते वाढले आहेत. आधी कंगना आणि मग केतकी चितळेने तारे तोडले होतेच. नूपुर शर्मा आणि नवीन जिंदल यांनी त्यांनाही मागे टाकले. ही वक्तव्ये अंगलट आल्यावर केंद्रीय नेतृत्वाला जाग आली आणि त्यांना पक्षातूनच हाकलून द्यावे लागले. केतकी, कंगनासारख्यांना आणि अन्य वाचाळांना आधीच आवरले असते, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ही नामुष्की ओढावली नसती. 

सुनील समडोळीकर, कोल्हापूर

केंद्राने राज्याला कारशेडसाठी जागा द्यावी

‘कांजूर कारशेडचा पेच कायम’ ही बातमी (लोकसत्ता- ७ जून) वाचली. एखाद्या चांगल्या कामासाठी केंद्राने स्वत:च्या अखत्यारीतील जागा राज्य सरकारला दिली तर काय बिघडते? महाराष्ट्र भारतातच आहे पाकिस्तानात नाही. मुळात आरेचा निसर्ग वाचावा म्हणून राज्य सरकारने कांजूरच्या जागेचा प्रस्ताव पुढे आणला, तरीही काहींना वाटते की हा राज्य सरकारचा आडमुठेपणा आहे. पण जनहिताचा विचार करून केंद्राने ही जागा कारशेडला द्यायला हवी, म्हणजे केंद्र सरकार महाराष्ट्रद्वेष्टे नाही, हे सिद्ध होईल.

राजेंद्र ठाकूर, मुंबई

भाजपमध्ये सारेच धुतले तांदुळ?

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात नोटीस बजावली आहे. त्यामुळे काँग्रेस अस्वस्थ झाली आहे. दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाचे नेते आणि आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना ईडीने अटक केली. महाराष्ट्रात महाआघाडी सरकारचे दोन मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक तुरुंगात आहेत. ईडीने महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना अक्षरश: बेजार केले आहे. रोज कोणाच्या ना कोणाच्या चौकशा सुरू आहेत.

दोन वर्षांपासून विरोधकांवर वारंवार ईडी-आयटीचे छापे सुरू आहेत. विरोधी नेत्यांच्या भवितव्याचा चुराडा करण्याचे हे अभियान आहे. कदाचित उद्या यातील काही नेत्यांवरील आरोप बिनबुडाचे असल्याचे  निष्पन्न होईलही, मात्र न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बराच वेळ लागेल. तोपर्यंत नेत्यांच्या माथ्यावर कलंक कायम राहील. या पार्श्वभूमीवर प्रश्न पडतो की, भाजपचे नेते धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत का? अनेक पक्षांच्या नेत्यांना भाजपने आपल्या पक्षात आणून प्रामाणिकपणाचे दाखले वाटले आहेत. त्यांच्यापैकी आणि एकूणच भाजपच्या देशभरातील शेकडो आमदार, खासदारांपैकी कोणीही भ्रष्ट असल्याचा संशय ईडीला येत नाही, याचे आश्चर्य वाटते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिच्छद्र ऐनापुरे, जत, जि. सांगली