९० टक्क्यांकडे दुर्लक्ष कसे चालेल?

धर्माबद्दल मत मांडत असताना उचलली जीभ लावली टाळूला अशा प्रकारे कोणीही व्यक्त होत असल्याचे हल्ली पाहायला मिळते.

‘धर्म, विचार, विकास!’ हा अग्रलेख (१५ नोव्हेंबर) वाचला. धर्माबद्दल मत मांडत असताना उचलली जीभ लावली टाळूला अशा प्रकारे कोणीही व्यक्त होत असल्याचे हल्ली पाहायला मिळते. कोणत्याही धर्मात काही बोटावर मोजण्याइतक्या कट्टरतावाद्यांनी धुडगूस घातल्यामुळे त्या धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलताना दिसतो. सलमान खुर्शीद असो की अन्य कोणीही व्यक्त होत असताना किंवा तुलना करीत असताना चित्त थाऱ्यावर ठेवून व्यक्त झाल्यास बरे झाले असते. मूळ धर्म आणि धर्माची संकल्पना काय आहे याचा अभ्यास खुर्शीद यांनी केलेला नसावा. या जगावर फक्त आमच्याच धर्माचे वर्चस्व असायला हवे अशा वल्गना करीत हिंसक कारवायांना १०० टक्के समर्थन देणारी आयसिस आपण पाहतो आहोत. तर ‘जगा आणि जगू द्या’ या तत्त्वावर आपल्या रूढी, परंपरा जपत, हिंसेपासून दूर राहत हिंदू धर्माची जडणघडण झालेली आहे. असे असताना त्याची आयसिसशी तुलना करणाऱ्या सलमान खुर्शीद यांच्या बुद्धीची कीव येते. आजचा लेखक अथवा समाजात वावरणारा कोणीही ९० टक्के चांगल्या बाबींकडे दुर्लक्ष करीत असतो आणि दहा टक्के वाईट गोष्टींचे आकलन करून मतप्रदर्शन करतो; त्यामुळे अर्धवट माहितीच्या आधारे केलेली तुलना हास्यास्पद ठरते.

श्रीकांत शंकरराव इंगळे, पुणे

मग हिंदुत्ववादी विचारधाराअस्तित्वातच नाही?

‘धर्म, विचार, विकास!’ या अग्रलेखातील अनेक मुद्दे खटकले. गुलाम नबी आझाद यांनी सलमान खुर्शीद यांच्या वक्तव्याचा ‘निषेध’ केला असे अग्रलेखात म्हटले असले, तरी प्रत्यक्षात त्यांनी त्या वक्तव्याशी ‘असहमती’ दर्शविली होती. या दोन्हींची सांगड हा वाचकांना भरकटविण्याचा प्रयत्न ठरेल. गुलाम नबी आझाद यांनी चारेक वर्षांआधी आयसिस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना केली होती. अचानक झालेल्या त्यांच्या मतपरिवर्तनामागे असलेले ‘अश्रूंचे’ राजकारण कदाचित विस्मृतीतही गेले असेल. अग्रलेखातून ‘हिंदुत्ववादी विचारधारा’ अस्तित्वातच नसल्याचा निष्कर्ष जवळपास निघतो. ‘नवहिंदू’ अशी नावीन्यपूर्ण शाब्दिक खेळी बाबरीच्या विध्वंसावेळीही वापरता आली असती का? २००२ सालचा नरसंहार, भागलपूरच्या दंगली, मुझ्फरनगरच्या दंगलीवेळीही याच ‘नवहिंदू’चा समावेश होता का? की त्यात रथयात्रेतील शांतताप्रिय ‘जुने हिंदू’ सामील होते? ‘बेगडी सेक्युलर’ विचारधारा काय असते हे अग्रलेखात स्पष्ट केलेले नाही. अल्पसंख्याकांच्या दारिद्रय़पूर्ण स्थितीची आकडेवारी समोर असतानाही एखाद्या राजकीय  प्रपोगंडातून यापूर्वी मांडला गेलेला तो तथ्यहीन तर्क पुन्हा अग्रलेखाद्वारे मांडणे, हे अतिशय निराशाजनक वाटले. पूर्वग्रहदूषित मते बाजूला ठेवल्यास अनेक इस्लामी दार्शनिकांबद्दलची माहिती कुणालाही मिळेल.

प्रथमेश पुरूड, पुणे

संघाचे हिंदुत्व : हिंदूंचाच हिंदुस्तान

‘धर्म, विचार, विकास!’ या अग्रलेखाच्या संदर्भात आणखी दोन गोष्टी लक्षात घ्यावयास हव्यात. काँग्रेसच्या ‘सेक्युलर’ या शब्दाचा अर्थ पंडित नेहरूंनी ५ ऑगस्ट १९४७ रोजी राजेन्द्रप्रसाद यांना पत्र पाठवून कळवलेला आहे. – ‘आता गोहत्याबंदीचा कायदा व्हावयास हवा. बापूजींचे विचार असेच आहेत.’ या पत्राला लगेच पाठविलेल्या आपल्या पत्रात नेहरूंनी लिहिले, ‘त्यांनी (गांधीजींनी) आपल्याला केवळ सर्वधर्मसमभाव सांगितलेला नाही तर त्यांनी सांगितले आहे, आपण अल्पसंख्याकांचे केवळ संरक्षण करून चालणार नाही तर आपण त्यांच्या भावनांची काळजी घेतो हा विश्वास आपण त्यांच्या मनात निर्माण केला पाहिजे.’

याउलट संघ परिवाराची प्रथमपासूनची वाटचाल ‘हिंदूंचाच हिंदुस्तान’ या एककलमी कार्यक्रमावर सुरू आहे : (१) बलराज मधोक यांनी आपल्या ‘हिंदू राष्ट्र’ या पुस्तकात लिहिले आहे- ‘पटेलांना कात्रजचा घाट दाखवत गुरुजींनी संघाची एक शाखा म्हणून जनसंघ स्थापन केला. त्या वेळी जनसंघाच्या घटनेत ‘हिंदुराष्ट्र’ हा शब्द घालावयाचा होता. पण पटेलांची दहशत एवढी होती की आम्ही तसे न करण्याचे ठरवले. मात्र डिसेंबर १९५२ मध्ये कानपूर येथे झालेल्या आमच्या पहिल्या वार्षिक अधिवेशनात ‘शिक्षणात उपनिषदे, रामायण आणि महाभारत यांचा समावेश असावा आणि संस्कृत ही अनिवार्य भाषा असावी’ असे दोन ठराव पारित केले.’ (२) संघाचे सर्वात सर्वसमावेशक सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की ‘हिंदूंचाच हिंदुस्तान’ हा आमचा एककलमी कार्यक्रम आहे. ज्या वेळी आपण असे म्हणतो त्या वेळी हे हिंदू राष्ट्र आहे आणि म्हणून भगवा ध्वज हा आमचा राष्ट्रध्वज आहे हे आपोआप येते. (३) गुरुजी गोळवलकर यांनी त्यांच्या ‘विचारधन’ या पुस्तकात लिहिले आहे, ‘फाळणीनंतर या देशात राहिलेले मुसलमान पंचमस्तंभी आहेत.’ लालबहादूर शास्त्री यांना भेटून या गुरुजींनी ‘मुसलमानांचा मतदानाचा हक्क काढून घ्या’ म्हणून सांगितलेले आहे. वीर सावरकर म्हणाले होते ‘या देशात दोन राष्ट्रे आहेत: हिंदू आणि मुसलमान.’ प्रश्न एवढाच की आजच्या भारतातही अशीच काहीशी वाटचाल आपण करतो आहोत का?

दत्तप्रसाद दाभोळकर, सातारा

न वाचता आक्रस्ताळेपणाने बोललो तर..

‘धर्म, विचार, विकास!’ या संपादकीयमधला जनानुनयासाठी उभय बाजूंनी अजून किती धर्मच्छल होणार, हा खरा प्रश्न सद्य परिस्थितीत आणखी जटिल होताना दिसतो आहे. मुळात कोणताच धर्म वाईट नसतो. तो काळानुरूप बदलतही असतो. पण आज धर्माचे राजकारण आणि राजकारण्यांचा धर्म या गोष्टी खूप मिसळलेल्या दिसताहेत. राजकारणात एखादा नेता एकटा पडतो, तेव्हा तो जात किंवा धर्माचा आधार घेतो किंवा काही संघटना (उदा. संघ, रजा अकॅडमी इत्यादी) हेतुपुरस्सर धर्माचा वापर करत असतात. हे लोकांना समजत नाही आणि लोक स्वत: धर्म, राजकारण आणि समाजकारण यांना वेगळे करत नाहीत कमीत कमी तोपर्यंत तरी, जनानुनयासाठी उभय बाजूंनी अजून किती धर्मच्छल होणार, या प्रश्नाचे उत्तर सापडणे कठीण आहे. शेवटी सलमान खुर्शीद यांनी लिहिलेला ग्रंथ न वाचता त्यावर काही आक्रस्ताळेपणे बोललो, तर ज्या धर्माचे रक्षक म्हणून भूमिका मांडतो आहोत, त्याने शिकवलेल्या सहिष्णू, सदाचार या घटकांचे आपण आचरण करतो आहोत असे म्हणता येणार नाही. 

दीपक पाटील, लासूर्णे (इंदापूर)

कंगनाला समर्थनानंतरचे अनेक प्रश्न..

‘कंगनाच्या वक्तव्याचे विक्रम गोखले यांच्याकडून समर्थन’ हे वृत्त (लोकसत्ता, १५ नोव्हेंबर) वाचले. विक्रम गोखले कंगनाचे समर्थन करत असतील तर त्यांना काही प्रश्नांचीही उत्तरे द्यावी लागतील. कंगना म्हणते देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ साली मिळाले, तर तिला पद्मश्री बहाल करणारे सरकार यंदाच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव का साजरा करत आहे?  कंगनाच्या गणितानुसार स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव २०८९ साली येणार आहे. मग कंगनाला पाठीशी घालणारे व तिला झेड दर्जाची सुरक्षा पुरवणारे सरकार स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची इतकी घाई का करत आहे? बँक राष्ट्रीयीकरण, पंचवार्षिक योजना, लोकसभेच्या निवडणुका, जनगणना, मोठमोठी धरणे, अनेक  वीजनिर्मिती प्रकल्प, रस्ते-महामार्ग, आरोग्याच्या सुविधा यांसारख्या देशाला विकासाकडे नेणाऱ्या गोष्टी १९४७ ते २०१४ या पारतंत्र्याच्या काळात झाल्या का? अकलेचे तारे तोडणारे कंगनाचे वक्तव्य व तिला समर्थन देणारे विक्रम गोखलेंचे वक्तव्य हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य या दोघा नट-नटींना पारतंत्र्यात मिळाले का? १९५० साली आपल्या देशात लागू केलेली ‘राज्यघटना’ या दोघांना व तिला पद्मश्री पुरस्कार देणाऱ्या सरकारला मान्य नाही का? संपूर्ण भारताचे ‘भगवेकरण’ करण्याची आस लागलेल्या गोखलेंना भारतीय राज्यघटनेत ‘धर्मनिरपेक्षता’ हे तत्त्व (मूल्य) असावे, हेही मान्य नाही का?

टिळक उमाजी खाडे, नागोठणे (ता. रोहा, जि. रायगड)

पारितोषिकाच्या रांगेत?

कंगना राणावतचे उद्गार बालिश बडबड म्हणून दुर्लक्षित केले तरी त्यास जुने आणि जाणते म्हणवून घेणाऱ्या विक्रम गोखले यांनीही संमती दर्शवावी यामुळे कंगनाचे कौतुक करावे की विक्रमजींची कीव करावी कळेनासे झाले आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर हळूहळू सर्व ब्रिटिश वसाहती मुक्त झाल्या म्हणजे त्यांना मिळालेले स्वातंत्र्य भीक मागून  मिळाले असे होत नाही. प्रत्येक वसाहतीत स्वातंत्र्य मिळावे म्हणून चळवळी चालूच होत्या. बरे १९४७ मध्ये भारताला मिळालेले स्वातंत्र्य भीक मागून मिळाले तर त्यानंतर २०१४ मध्ये कुठल्या नवस्वातंत्र्याची पहाट उगवली याचा तरी खुलासा विक्रम गोखले यांनी करावा, काँग्रेसपासून मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य असे त्यांना म्हणायचे असावे, कारण मोदीजींनी तसा नारा लावला आहे. आता विक्रम गोखले यांनाही एखादे ‘पद्म’ पारितोषिक मिळायला हरकत नाही.

श्याम कुलकर्णी, पुणे

हीच रक्कम त्यांच्यासाठी वापरली असती तर?

नक्षलवादी – माओवादी म्हणून मारल्या गेलेल्या भारतीय नागरिकांसंदर्भातील बातम्यांनी सर्व दैनिके भरून गेली आहेत. या गटात प्रामुख्याने आदिवासी जमात येते. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. उत्सव साजरे झाले. यात श्रीमंतांची गर्दी होती. यात कोठे आदिवासी दिसला? अगदी ठरवून हा समाज धनदांडगे, राज्यकर्त्यांनी उद्ध्वस्त केला.  मुंबई शहरालगत असलेल्या  ठाणे – वसई येथून हा समाज गायब कुणी केला? जे मारले गेले ते कुणी चिनी – पाकिस्तानी नव्हते, अनेकांची नावे शिवाजी, वामन, मिलिंद अशी. हे मराठीच ना? केंद्र – राज्य सरकारचा गचाळ कारभार व गोरगरिबांना भांडवलदार मंडळींच्या ताब्यात दिल्यामुळे समाजात रोष पसरणारच. मोठमोठे रस्ते उभारणारे आदिवासी भागात साधा रस्ता का देऊ शकले नाहीत? आजच्या भारतात आयुष्यमान सरासरी ६८ मात्र आदिवासी समाजात हे प्रमाण केवळ ५५ वर्षे.   शेवटी गडचिरोली – छत्तीसगड येथे जंगल भागात आधुनिक शस्त्रे पोहचतात कशी याचे उत्तर मंत्री एकनाथ शिंदे यांनी द्यावे. आज नक्षलवाद्यांना मारणाऱ्या पोलिसांना जी भक्कम रक्कम गौरव म्हणून दिली जात आहे त्या रकमेत तेथील समाजाची नक्कीच प्रगती झाली असती.

मार्कुस डाबरे, पापडी, वसई

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta readers reaction on current social issues zws 70

ताज्या बातम्या